Friday, 16 August 2024

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघाती की हत्या?

 

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघाती की हत्या?



 " भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांच्या मृत्यू वर आजही प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहत आहेत. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री असतील किंवा सुभाष चन्द्र बोस. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजसुद्धा एक रहस्यच आहे. १० राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय तपासानंतर जरी हे स्पष्ट झाले की नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात झाला तरीही काही तज्ञ च्या मते सुभाष बाबू त्या विमान अपघातातून वाचले आणि सुरक्षित ठिकाणी पोहचले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी नेताजींचे पार्थिव अवशेष १८ ऑगस्टपर्यंत जपानमधील रेन्कोजी येथून परत आणण्याचे आवाहन केले तसेच नेताजींच्या मृत्यूच्या तपासाशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्यास सांगितल्या आहे. त्या अपघातातून नेताजी वाचले आणि त्यानंतर ते रशियाला निघून गेले, असं भारतातले अनेकजण मानतात." 

 

नेताजींचे वैचारिक मतभेद कोणाशी होते ?


 नेताजींच्या कार्यकाळात त्यांच्याच राजकीय पक्षात काँग्रेस मधून त्यांच्या कार्यप्रणालीला आणि विचारांना गांधींचा विरोध होता. ज्या गांधींना "राष्ट्रपिता " हि पदवी नेताजींनी दिली त्याच गांधींनी नेताजी पुन्हा काँग्रेस चे अध्यक्ष होऊ नये यासाठी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला होता. १९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली. अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले होते याची नोंद देखील आज इतिहासात आहे. मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

 १९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले.  कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळून दिली. गांधींजी त्याकाळी स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला होता.  सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव १९२५ साली इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले. १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते.

 

 

नेताजींचा देशाबाहेरील प्रवास -


इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. तेथून ते पेशावर ला पोहचले. सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला. नंतर ओरलँडो मझयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले.  मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले. आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा "असा नारा देत दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते.

 

१८ ऑगस्ट चा काळा दिवस -

दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. जपानने शरणागती पत्करून तीन दिवस उलटून गेले होते. १८ ऑगस्ट १९४५ ला सुभाषचंद्र बोस यांचं विमान इंधन भरण्यासाठी ताइपे विमानतळावर थांबलं होतं. दुसऱ्यांदा उड्डाण करत असतानाच एक जोराचा आवाज आला. शत्रूच्या विमानभेदी तोफेचा गोळा तर विमानाला लागला नसेल ना, असं बोस यांचे सहकारी हबीबुर रहमान यांना वाटलं. पण नंतर विमानाच्या इंजिनाचं प्रोपेलर तुटल्याचं लक्षात आलं. विमान समोरच्या बाजूने जोरात खाली आदळलं. विमानाच्या मागून बाहेर निघण्याचा रस्ता सामानामुळे बंद झाल्याचं त्यांनी पाहिलं. समोरच्या बाजूला आग लागली होती. हबीब यांनी सुभाषचंद्र बोस यांना आवाज दिला, "नेताजी, समोरून बाहेर पडा." नंतर त्यांच्या लक्षात आलं, की जेव्हा विमान पडलं त्यावेळी नेताजींची खाकी वर्दी पेट्रोलने भिजली होती. ते आगीने घेरलेल्या दरवाजातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या शरीराला आग लागली होती. त्यावेळी थरथरत्या आवाजात नेताजींनी आपला अंत जवळ आल्याचं हबीब यांना सांगितलं. "आझादीची लढाई सुरू ठेवा, असं भारतात जाऊन लोकांना सांगा," असंही त्यांनी म्हटलं. अंत्यसंस्कारानंतर २५ दिवसांनी हबीबुर रहमान नेताजींच्या अस्थी घेऊन जपानला पोहोचले.  "रिंकोजी मंदिरात बोस यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही घेऊन जा, पण त्यांची डीएनए चाचणी करण्यात येऊ नये, अशी अट त्यांनी घातली. या अटींवरून या अस्थी नेताजींच्या कश्या यावर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहत आहे.

 

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale