Monday, 27 February 2023

अभिव्यक्ती - वैदर्भीय लेखिका संस्था – नागपूर

 

अभिव्यक्ती - वैदर्भीय लेखिका संस्था – नागपूर




पुरुषांच्या व्यासपीठावरून किंवा साहित्य संमेलनातून स्त्री साहित्यिक खूप कमी प्रमाणात सहभाग नोंदवायच्या, थोड्या स्रियांनाच या साहित्य व्यासपीठावर संधी मिळायची. साहित्य क्षेत्रात स्त्रियांनी पुढे यायला हवं असेल तर त्यांचा इतका थोडा सहभाग असून चालणार नाही. १९७६ मध्ये एक "लेखिका साहित्य संमेलन" प्रा. राम शेवाळकर यांनी भरवले होते. विदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात लेखिका आहेत, त्यांच्या हक्काची एक संस्था असायला हवी, या उदात्त संकल्पनेतून स्त्रियांची अशी एक संस्था असावी कि ज्यात सारं काही स्त्रियांचं करतील या विचारांवर ही संस्था १९७६ साली स्थापन केली.

अभिव्यक्ती ही विदर्भातील एक अतिशय सजग आणि अग्रगणी लेखिका संस्था आहे. नव्या दमाच्या तरुण उत्साही, नवविचारांच्या व धडाडीने काहीतरी नवे संकल्प करणाऱ्या, अभिव्यक्तींसाठी तळमळीने झपाटून काम करणाऱ्या स्त्रियांची दमदार साथ या संस्थेला लाभली. त्यामुळे अभिव्यक्ती नेहमीच राज्यात उत्तमोत्तम, दर्जेदार, नवनवीन कार्यक्रम, उपक्रम राबवित आहे. सर्वाना सामान संधी, सर्वाना व्यासपीठ मिळून देणे या मूळ उद्देशावर संस्थेची वाटचालू सुरु आहे. अभिव्यक्ती हे नागपूर व विदर्भातील लेखिका व कवयत्री यांच्या हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ आहे. गेली ४५ वर्ष शेकडो स्त्रियांना रसिकांच्या समोर आणण्याचे चांगले कार्य संस्थे द्वारे चालू आहे. फक्त नागपूरचं नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून या संस्थे द्वारे होणाऱ्या साहित्य संमेलनात अनेक लेखिका सहभागी होतात. साहित्यिक महिलांची, महिलांकरिता असलेली व महिलांनीच चालवलेली संस्था म्हणजेच अभिव्यक्ती - वैदर्भीय लेखिका संस्था होय.

अभिव्यक्ती संस्थेचा वर्धापन दिन दरवर्षी मार्च महिन्यात द्वि दिवसीय मान्यवरांच्या उपस्तिथीत साजरा केला जातो. त्यात काव्य वाचन, कथा-कथन, पुस्तक प्रकाशन, नामवंत व्यक्तींची भाषणे आधी कार्यक्रमाचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या "ग्रंथोस्तव" हा कार्यक्रमांर्गत परिसंवाद हा विशेष कार्यक्रम संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला होता. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. अभिव्यक्ती हि संस्था विविधांगी असे दर्जेदार साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवीत नवोदित लेखिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या लिखाणास चालना देण्याचं महत्वपूर्ण कार्य करत आहे.

अनेक दर्जेदार, सकस कार्यक्रम अभिव्यक्तीच्या माध्यमातून साजरे होऊ लागले तेव्हा आपल्या लेखिकांचा सन्मान व्हावा त्यांना पुरस्कृत करावे यासाठी कृष्णाताई मोठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी उत्कृष्ट कादंबरी साठी पुरस्कार दिला जातो. तसेच साहित्यातील योगदानासाठी राधाबाई बोबडे पुरस्कार, कथा, काव्य पुरस्कार आहेत. साहित्य मागवून एक स्पर्धा आयोजित करून मान्यवर व्यक्तींच्या परीक्षणातून हे पुरस्कार वितरित करण्यात येते. अभिव्यक्ती परिवारातील आणि परिवारबाहेरील लेखिकांच्या पुस्तकांची एक समृद्ध ग्रंथालय उभारण्याचा मानस संस्थेचा आहे. विदर्भातील सर्व शहरांमध्ये शाखा उघडण्याची योजना आहे. अभिव्यक्ती हि काही नागपूर शहरापुरती सीमित नाही. रामटेक, कोराडी, वर्धा इथे तर सदस्य आहेतच पण वैदर्भीय पुणे ते हैदराबाद शहरात देखील विखुरलेली आहे.

सचिन कृष्णा तळे

 

Thursday, 23 February 2023

सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना)

 सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना)




राज्यातील कोणत्याही वाचनालयात सहसा न सापडणारे पुस्तक हमखास मिळण्याचे ठिकाण, म्हणजे 'सावाना' ऊर्फ सार्वजनिक वाचनालय नाशिक. जुन्या कागदपत्रांत 'नाशिक सिटी लायब्ररी' असा या वाचनालयाचा उल्लेख सापडतो. वाचनाची भूक भागवणे इतका साधा आणि सरळ उद्देशाने या संस्थेची स्थापना १८४० मध्ये झाली. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ हे असे मानले जाते. हे वाचनालय नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात शालिमार चौकाजवळ नेहरू गार्डनच्या समोर आहे. या वाचनालयाची स्थापना सरकारवाड्यात झाली. त्यावेळी तिथे इंग्रजी राजवटीची कार्यालये होती. इ.स. १८८३च्या अहवालात वाचनालयात असलेल्या दोन हजार पुस्तकांचा उल्लेख आढळतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी यांचादेखील सहवास काही काळ नाशिकला होता. त्यांचादेखील या सार्वजनिक ग्रंथालयाशी संबंध आलेला आहे. 


इ.स. १९०५ मध्ये कवी गोविंद व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यप्रतिमेचा लाभ वाचनालयाला मिळाला आहे. इ.स. १९४७ मध्ये वाचनालयात बालविभाग सुरू झाला. तसेच वाचनालयाला कुसुमाग्रज, डॉ. अ.वा. वर्टी, वसंत कानेटकर अशा थोर व्यक्तींचा आणि अनेक साहित्यिकांचा सहवास मिळालेला आढळतो. साहित्यिक आणि सुधारकांच्या सहवासामध्ये या ग्रंथालयाची मोठी जडणघडण झाली कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथालयाचा मोठा विकास झाला जे सुरुवातीला या ग्रंथालयाचे वाचक म्हणून या ग्रंथालयात येत होते तेच पुढे नाशिककर साहित्यिक नटसम्राटकार वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे या ग्रंथालयाचे दहा वर्ष अध्यक्ष राहिले. इ.स. १९६२ मध्ये कुसुमाग्रज यांनी विनंती केल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नव्या इमारतीसाठी आर्थिक मदत दिली. ६ ऑगस्ट रोजी नव्या इमारतीच्या प्रवेश दालनास 'नगरपालिका दालन' असे नाव मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.


पानसे अभ्यासिका चालवणे , पुस्तक मित्र मंडळ, साहित्य मेळावा भरवणे, काव्य वाचन, बालभवन सानेगुरुजी कथामाला, बालनाटय़ स्पर्धा, सावाना ग्रंथालय सप्ताह निम्मित  विविध पुरस्कारांचे वितरण करणे, वस्तुसंग्रहालय, मुक्तद्वार व ग्रंथ देवघेव विभाग, शालेय पातळीवर कथाकथन स्पर्धेचे आयोजन इ अश्या अनेक उपक्रमांनी सार्वजनिक वाचनालय, नाशिक कार्य करत आहेत. सावना द्वारे साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिकांना सावाना ग्रंथ पुरस्कार, ग्रंथालय भूषण मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई वावीकर पुरस्कार , डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार - उमेदीने कथा लेखनासाठी, वि.म. गोगटे पुरस्कार - ललितेतर माहितीपर ग्रंथासाठी , स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर पुरस्कार - अनुवादित ग्रंथासाठी  , वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार - विनोदी पुस्तकासाठी, बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार तर नाशिक शहरातील पदवी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला अलकनंदा आकूत स्मृती पुरस्कार देण्यात येतो. आद्य साहित्यिक संस्था असलेल्या या वाचनालयात इ.स. १९२४ पासून नाशिक बाहेरील विद्वान, तपस्वी, साहित्यिक अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्याची प्रथा सुरू झाली. या वाचनालयात १ लाख ७० हजार पुस्तके आहेत. वाचनालयात आज सुमारे ४ हजार ५०० संस्कृतमधील दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. यातील ३ हजार १५३ पोथ्यांची नोंद भारत सरकारच्या डिजिटल वाचनालयात घेतली गेली आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य वाचकाला पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून वाचनालयाने ‘पेटी वाचनालय’योजना सुरू केली आहे. लवकरच  "लायब्ररी ऑन व्हील" हि नवी संकल्पना लवकरच राबवली जाणार आहे. 


सचिन कृष्णा तळे 

Monday, 13 February 2023

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

सोशल मीडियाच्या बदलत्या प्रवाहाचा वापर करून मराठी भाषा आणि मराठी शाळा यांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून काही समविचारी सदस्य एकत्र आले आणि ज्ञानभाषा मराठी या समूहाची स्थापना झाली. मराठी भाषेचा मुद्दा हा केवळ सांस्कृतिक व भावनिक नाही तर, त्याला वैज्ञानिक बैठक आहे, या जाणिवेतून सतत चार वर्षे ऑनलाईन काम करताना संस्थेची गरज भासू लागली, यासाठी 'ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना जून २०१७ रोजी करण्यात आली. बारामती कृषी केंद्र येथे डॉ. वसंत काळपांडे सर यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन झाले.

विज्ञान, तंत्रज्ञान यांचा वापर करून त्यावर लेखन करणार्‍यांना प्रोत्साहन देणे. ज्ञानवर्धक माहिती निर्माण करणे. मराठी माध्यमातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा लोकांसमोर आणणे. मराठी ही प्रशासकीय लोकव्यवहार आर्थिक व्यवहारभाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे हे मुख्य उद्दिष्टे असून प्रतिष्ठानने  'माझी शाळा माझी भाषा' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रभरातील शिक्षकांचे समूह तयार केले आहे. संस्थेतर्फे शिक्षकांना भाषा, विज्ञान तसेच इतर विषयांबद्दल उपयुक्त माहिती पुरविली जाते. 'मराठी भाषेचे पुस्तक,' 'मी मराठी शाळा बोलतेय' या संकल्पना संस्थतर्फे गुढीपाडवा शोभायात्रेत सादर केला जातो. प्रतिष्ठानच्या समूहातर्फे गेले पाच वर्ष 'मराठी भाषा पंधरवडा' साजरा केला जातो. या मराठी भाषा पंधरवड्यात भाषेचे विविध पैलू लोकांसमोर मांडले जातात. त्यानिमित्ताने ऑनलाइन परीक्षा,स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वांना मराठी भाषेतून व्यक्त व्हावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.९० वे आणि ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, डोंबिवली आणि यवतमाळ येथे झाले; त्यावेळी मराठी भाषेचा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या जाणिवेने प्रतिष्ठानने एक दालन घेऊन प्रचार केला; हे असे एकमेव दालन होते की जे, कोणत्याही व्यापारी उद्देशाने घेतलेले नव्हते; त्याचा उद्देश फक्त मराठी भाषा प्रचारार्थ होता.

मातृभाषेतून शिक्षण घेताना मराठी शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांचे अभिनंदन करावे म्हणून काही पालकांचे मुलांसहित फलक तयार करण्यात आले. 'रविवार ऑनलाइन वाचनकट्टा' हा गेले ५ वर्षे प्रतिष्ठानतर्फे राबवला जाणारा अतिशय अभिनव उपक्रम आहे. विंदा वंदन, हास्य कट्टा, दिवाळी अंक वाचन असे प्रत्यक्ष वाचनकट्टे पुणे आणि डोंबिवली, इचलकरंजी येथेही राबविण्यात आले. हे कट्टे गेली २ वर्षे सातत्याने सुरू आहेत. प्रतिष्ठानचे जिल्हानिहाय कृतीगटसुद्धा स्थापन करण्यात आले आहेत. पुणे, डोंबिवली, नाशिक या गटांची स्थापना करून त्यामार्फत शाळांमध्ये जागृती करण्यात येत आहे. 'चला अनुवाद करूया' या उपक्रमाद्वारे इंग्रजीतील आणि बोलीभाषेतील तसेच इतर भाषेतील ज्ञानवर्धक माहिती अनुवाद रूपाने लोकांसमोर आणण्याचे कार्य संस्थेचे चालू आहे. सर्वत्रमराठी या संकल्पनेवर आधारित प्रतिष्ठानचे आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्र विचारात घेऊन स्थापत्यशास्त्र, पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र,निसर्ग संवर्धन, तंत्रज्ञान असे १०० च्या आसपास समूह तयार केले आहेत. या समूहातून ज्ञानवर्धक चर्चा घडविल्या जातात. विविध स्तरावरून येणारे प्रश्न या गटात विचारले जातात; त्याच्यावर सखोल चर्चा करून "ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान च्या ब्लॉग" वर ती माहिती संकलित करून प्रसारित केली जाते.मराठी भाषा आणि मराठी शाळा याप्रती बांधिलकी जपत ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान भविष्यात नक्कीच भरीव कार्य करील यात शंका नाही.


Sunday, 12 February 2023

समरसता साहित्य परिषद

 


समाजाची प्रकृती ठणठणीत राहण्यासाठी साहित्यिकांनी त्यांच्या लेखणीतून सामान्य माणसाची अपेक्षा मांडणे गरजेचे आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली १९९८ साली झालेल्यासमरसता साहित्य मंचाच्या जळगाव येथील साहित्य संमेलनात डॉ. यादव यांनीसमरसताहे सामाजिक मूल्य आहे, हा मुद्दा मांडला आणिसमरसता साहित्य परिषदेची स्थापना झाली. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिकहे समरसता साहित्य परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. समरसता साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शाखा ही महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात समरसता साहित्य संमेलन भरवते. मुंबईत या संस्थेचे ’ सामाजिक समरसता प्रकाशनआहे, त्याद्वारे समरसता विषयक पुस्तके प्रकाशित केली जातात.

 

समरसता साहित्य परिषदेने आजवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीन दिवसांची समरसता साहित्य संमेलने भरवली आहेत. त्याशिवाय कविसंमेलने, परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, तसेच विद्यार्थी केंद्रबिंदू धरून त्यांच्या साहित्यिक जाणिवांना हळुवार साद घातली आणि बघता बघता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळू लागला.  विद्यार्थ्यांच्यातील सुप्त साहित्यिक गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्थाकवितेकडून कवितेकडेहा उपक्रम चालवते. कवितेच्या स्पर्धा ठिकठिकाणी होतातच पण २०१४ सालापासून काव्य सादरीकरणाच्या सांघिक स्पर्धा होऊ लागल्या आहेत.

 

समरसतेचा भाव जागविल्याशिवाय समाजात खरीसमतायेऊ शकत नाही. ‘समतायुक्त समाजनिर्मितीसाठीसमरसताही पूर्वअट आहे. अशा समतायुक्त समाजनिर्मितीत साहित्यिकांचे योगदान म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे ठरते. समाजाचे जीवंत, चैतन्ययुक्त, रसरशीत चित्रण साहित्यात येत असते. ही खरी साहित्यिक समरसता. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनससापपिंपरी-चिंचवडची आजवरची वाटचाल झाली आहे. संस्थे मार्फत समरसता: एक साहित्य मूल्य; संपादक श्याम अत्रे रमेश पतंगे. लोकसंस्कृती समरसता, स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य समरसता, अनुवादित साहित्य आणि समरसता, स्त्री साहित्य आणि समरसता, युवा साहित्य आणि समरसता अशी पुस्तके प्रकाशित केली गेली आहेत. साहित्यिकांचे साहित्य सर्वदूर पसरावे तसेच त्याला ओळख मिळावी, या प्रेरणेने सुरू केलेलासाहित्यसंवादहा संस्थेचा आणखी एक दर्जेदार उपक्रम आहे. सर्व साहित्याचे सादरीकरण, अभिवाचन, भाष्य, मुलाखत या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न चालू आहे. ‘ससापपिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष कैलास भैरट, उपाध्यक्ष सुहास घुमरे कार्यवाह मानसी चिटणीस तर पद्मश्री गिरीश प्रभुणे हे शाखेचे मार्गदर्शकआहेत. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी बारावे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन झाले त्याचे अध्यक्षस्थानी प्रकाशक घनश्याम पाटील होते. या साहित्य संमेलनांना आजवरभारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले, ज्येष्ठ साहित्यिका प्र. डॉ. श्यामाताई घोणसे, डॉ. संजीवनीताई तोफखाने, ज्येष्ठ लेखिका विनीताताई ऐनापुरे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कोकिळ, मनोहर सोनावणे, रमेश पतंगे सर, ज्येष्ठ व्याख्याते नायडू सर, राजेंद्रजी घावटे, बाळकृष्ण कवठेकर असे दिग्गज अध्यक्ष म्हणून मिळाले आहेत..

 सचिन कृष्णा तळे 

Monday, 6 February 2023

'युवकमित्र परिवार,पुणे

'युवकमित्र परिवार,पुणे

 




वाचनालय नसलेल्या दुर्गम आणि ग्रामीण भागात 'गाव तिथे वाचनालय अन शाळा तिथे ग्रंथालय' या ब्रीद वाक्यावर काम करत वाचन चळवळ वृद्धिंगत करणारी 'युवकमित्र परीवार' पुणे ही नोंदणीकृत संस्था युवाशक्तीवर आधारित समविचारी युवकांनी संघटित होत सन २०१५ साली स्थापन केली. नंदुरबार येथील प्रवीण महाजन हे संस्थेचे संस्थापक असून पुणे शहरात मोशी येथे या संस्थेचे कार्यालय आहे. स्वातंत्रोत्तर काळात देशासमोर असलेल्या विविध समस्या पाहता त्यावर फक्त एकच उपाय म्हणजे शक्ती युक्ती अन बुद्धीचा वापर करून युवकांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणे होय. ह्याच विचारातून युवकमित्र परिवार ची सुरवात झाली आणि आज या संस्थे मार्फ़त अनेक युवकांपर्यंत पोहचली , अनेक गावात , अनेक शाळेत अनके विद्यार्थी वर्गापर्यंत पोहचली आहे.

 

साहित्यिक, शैक्षणिक युवा चळवळ हे या संस्थेचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. या संस्थेमार्फत ग्रामीण भागात गावापासून लांब, दूर असलेल्या शाळांमध्ये पायी जाणाऱ्या मात्र गरिबीअभावी सायकल खरेदी करू शकणाऱ्या अत्यंत गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली उपलब्ध करून देणे हे महत्वपूर्ण कार्य चालू आहे. या सर्व सायकली पुणे मुंबई शहरातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये पडून असलेल्या नागरिकांनी स्वइच्छेने दान केलेल्या जुन्या सायकली आहेत मात्र त्या संस्थे मार्फ़त दुरुस्त करून वितरण केले जातात. तसेच दुर्गम भागात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून पुणे मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेले जुने संगणक दुरुस्त करून दुर्गम शाळांमध्ये मोफत वाटप करून संगणक कक्ष उभारले आहेत.

 

युवकमित्र परिवार तर्फे आजअखेर संस्थेमार्फत ११२ शाळामध्ये मोफत १००० पेक्ष्या अधिक संगणक कक्ष स्थापन झाले आहे. जस मिळेल तसं , जिथे मिळेल तिथून पुस्तके गोळा करून ४१३ वाचनालये चालू करून समाजासमोर एक आदर्श या संस्थेने स्थापन केला आहे. जुने संगणक,जुनी पुस्तके जुन्या सायकली वेस्ट संकलन करणाऱ्या या संस्थेमार्फत 'टाकाऊपासून टिकाऊ' हे पर्यावरणदृष्ट्या पोषक अभियान राबवले जाते. गावातील मुलांमध्ये वाचन चळवळ रुजवण्यासाठी अन या पुस्तक रुपी साहित्यातुन उत्तम साहित्यिक घडवण्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे. तसेच हि संस्था युवक कल्याण क्षेत्रात देखील कार्यरत आहे. दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन संस्थे मार्फत केले जात आहे. व्यक्तिमत्व विकास शिबीर , करियर मार्गदर्शन शिबीर असे शिबीर दरवर्षी संस्था आयोजित करत आली आहे.


सचिन कृष्णा तळे 

Thursday, 2 February 2023

साहित्यकणा फाउंडेशन नाशिक

 साहित्यकणा फाउंडेशन नाशिक 




साहित्यकणा फाउंडेशन ही साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी वाहिलेली नोदणीकृत संस्था आहे. या संस्थेची स्थापना २०१८ साली झाली. याआधी ही संस्था कुसुमाग्रज साहित्यिक मंच नावाने २०१४ पासून साहित्यिक क्षेत्रात कार्यरत होती. मात्र कुसुमाग्रजांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक संस्था क्रियाशील आहे पाहून कुसुमाग्रजांची गाजलेली कविता ‘कणा’ शब्द घेऊन ‘साहित्यकणा फाउंडेशन नाशिक’नावाने वाटचाल करू लागली.   


या संस्थेची कार्यकारणी सदस्य सात असून सभासद संख्या साठ आहे. या संस्थेचे अध्यक्ष संजय द. गोराडे व सचिव विलास पंचभाई हे प्रामुख्याने काम पाहतात. गेली नऊ वर्ष या संस्थेने साहित्यिक क्षेत्रात विविध प्रयोग करत साहित्यिकांना प्रेरित केले आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. विजयकुमार मिठे, लक्ष्मण महाडिक, राज लाखे, ऐश्वर्य पाटेकर, श्रीपाद सबनीस असे अनेक दिग्गज साहित्यिक संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले आहेत. या संस्थेच्या वतीने  साहित्यिकांना विविध पुरस्काराणे सन्मानित केले आहे. सुमनताई पंचभाई स्मृती काव्यसंग्रह पुरस्कार, मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार, शीलाताई राजपूत कादंबरी पुरस्कार व राहुल पाटील स्मृती बाल वाड्मय पुरस्कार असे चार वाड्मयीन पुरस्कार साहित्य कणा तर्फे दिले जातात. तसेच समाजात उत्तम कामगिरी करणाऱ्या हातांना बळ मिळण्या खातीर त्यांची योग्य ती दखल घेत ज्ञानरत्न, साहित्यरत्न, वृत्तसेवा रत्न, विकलांग रत्न व समाजरत्न असे पाच नाशिकरत्न म्हणून पुरस्कार देखील दिले जातात. नाशिकरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव न मागवता संस्था स्वतःहून कर्तुत्वान व्यक्तींचा शोध घेऊन पुरस्कार देत असते. तसेच संस्थे मार्फत राज्यस्तरीय रजनी अनंत वाणी काव्य स्पर्धाही आयोजित केले जातात. या काव्य स्पर्धेतून अनेक दिग्गज कवी / गझलकार घडले आहेत व महाराष्ट्रात कीर्तिमान बनत प्रसिद्ध देखील झाले आहेत. 


साहित्य सोबत ही संस्था सामाजिक कामातही अग्रेसर आहे. वृक्षरोपण, पूरग्रस्तांना मदत, कोविड काळात वस्तू रूपाने मदत असे अनेक दखलपात्र कामे संस्थेने केली आहेत. नाशिकमध्ये असे विविध विधायक कामे करत संस्था कमी कालावधीत नावारूपाला येत साहित्यकणा फाउंडेशन नावाने परिचित झाली व महाराष्ट्रात स्वतःचे एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहेत. साहित्यकणा फॉउंडेशन वतीने यंदाचे वाड्मय पुरस्कार हे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे  होणार असून मनीषा पाटील हरोलीकर, तन्वी अमित , प्रा. यशवंत माळी, पुष्पा चोपडे, सुनील विभुते, नीरजा याना जाहीर झाला आहे. 


सचिन कृष्णा तळे, पुणे 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale