सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना)
राज्यातील कोणत्याही वाचनालयात सहसा न सापडणारे पुस्तक हमखास मिळण्याचे ठिकाण, म्हणजे 'सावाना' ऊर्फ सार्वजनिक वाचनालय नाशिक. जुन्या कागदपत्रांत 'नाशिक सिटी लायब्ररी' असा या वाचनालयाचा उल्लेख सापडतो. वाचनाची भूक भागवणे इतका साधा आणि सरळ उद्देशाने या संस्थेची स्थापना १८४० मध्ये झाली. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ हे असे मानले जाते. हे वाचनालय नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात शालिमार चौकाजवळ नेहरू गार्डनच्या समोर आहे. या वाचनालयाची स्थापना सरकारवाड्यात झाली. त्यावेळी तिथे इंग्रजी राजवटीची कार्यालये होती. इ.स. १८८३च्या अहवालात वाचनालयात असलेल्या दोन हजार पुस्तकांचा उल्लेख आढळतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी यांचादेखील सहवास काही काळ नाशिकला होता. त्यांचादेखील या सार्वजनिक ग्रंथालयाशी संबंध आलेला आहे.
इ.स. १९०५ मध्ये कवी गोविंद व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यप्रतिमेचा लाभ वाचनालयाला मिळाला आहे. इ.स. १९४७ मध्ये वाचनालयात बालविभाग सुरू झाला. तसेच वाचनालयाला कुसुमाग्रज, डॉ. अ.वा. वर्टी, वसंत कानेटकर अशा थोर व्यक्तींचा आणि अनेक साहित्यिकांचा सहवास मिळालेला आढळतो. साहित्यिक आणि सुधारकांच्या सहवासामध्ये या ग्रंथालयाची मोठी जडणघडण झाली कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथालयाचा मोठा विकास झाला जे सुरुवातीला या ग्रंथालयाचे वाचक म्हणून या ग्रंथालयात येत होते तेच पुढे नाशिककर साहित्यिक नटसम्राटकार वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे या ग्रंथालयाचे दहा वर्ष अध्यक्ष राहिले. इ.स. १९६२ मध्ये कुसुमाग्रज यांनी विनंती केल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नव्या इमारतीसाठी आर्थिक मदत दिली. ६ ऑगस्ट रोजी नव्या इमारतीच्या प्रवेश दालनास 'नगरपालिका दालन' असे नाव मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.
पानसे अभ्यासिका चालवणे , पुस्तक मित्र मंडळ, साहित्य मेळावा भरवणे, काव्य वाचन, बालभवन सानेगुरुजी कथामाला, बालनाटय़ स्पर्धा, सावाना ग्रंथालय सप्ताह निम्मित विविध पुरस्कारांचे वितरण करणे, वस्तुसंग्रहालय, मुक्तद्वार व ग्रंथ देवघेव विभाग, शालेय पातळीवर कथाकथन स्पर्धेचे आयोजन इ अश्या अनेक उपक्रमांनी सार्वजनिक वाचनालय, नाशिक कार्य करत आहेत. सावना द्वारे साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिकांना सावाना ग्रंथ पुरस्कार, ग्रंथालय भूषण मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई वावीकर पुरस्कार , डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार - उमेदीने कथा लेखनासाठी, वि.म. गोगटे पुरस्कार - ललितेतर माहितीपर ग्रंथासाठी , स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर पुरस्कार - अनुवादित ग्रंथासाठी , वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार - विनोदी पुस्तकासाठी, बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार तर नाशिक शहरातील पदवी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला अलकनंदा आकूत स्मृती पुरस्कार देण्यात येतो. आद्य साहित्यिक संस्था असलेल्या या वाचनालयात इ.स. १९२४ पासून नाशिक बाहेरील विद्वान, तपस्वी, साहित्यिक अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्याची प्रथा सुरू झाली. या वाचनालयात १ लाख ७० हजार पुस्तके आहेत. वाचनालयात आज सुमारे ४ हजार ५०० संस्कृतमधील दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. यातील ३ हजार १५३ पोथ्यांची नोंद भारत सरकारच्या डिजिटल वाचनालयात घेतली गेली आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य वाचकाला पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून वाचनालयाने ‘पेटी वाचनालय’योजना सुरू केली आहे. लवकरच "लायब्ररी ऑन व्हील" हि नवी संकल्पना लवकरच राबवली जाणार आहे.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment