Friday, 27 April 2018

अंघोळीची गोळी



जगण्यासाठी काय हवे, काय हवे वसुंधरेला
हिरवळ क्रांती चोहीकडे, पाना फुलांची काया

हवा, पाणी, प्रकाश कोण देई मूलभूत गरजा
निर्मात्याने काय दिले, ते डोळे उघडून पहा

त्या निर्मात्याने आपल्याला काय दिले आहे ते आज डोळे उघडून पाहण्याची नितांत गरज आहे. त्याने जे काही निर्माण केलय ते आपल्यासाठी , त्या मुक्याप्राणांसाठी तर जीवसृष्टी जगवण्यासाठी आहे. त्या दैवी शक्तीने जागृत असलेल्या ह्या अद्भुत अश्या निसर्गावर जितका हक्क आपण गाजवतो त्याहून जास्त हक्क हा त्या वन्य प्राणींचा देखील आहे. त्याने माणसाला घडण्यासाठी धर्म दिला, राहण्यासाठी देश व समाज दिला, तर जगण्यासाठी निसर्ग दिला आहे. त्याच निसर्गाच्या गाभाऱ्यातून वर्षानुवर्षांपासून आपण फक्त घेतच चालले आहोत. त्याच्या साह्यानेच तर आपण प्रगत झालो. त्या निसर्गाने आजपर्यंत मानव जातीस भरपूर दिलं आणि देत ही आहे. त्याने कधीच माघार घेतली नाही. माणसाच्या मूलभूत गरजा हवा , पाणी , प्रकाश कोणामुळे आणि कोणत्या दैवी कार्याने आपल्याला मिळते हे सांगण्यात वेळ न दडवता ते आपल्या पुढील भविष्यात जन्मणाऱ्या पिढीसाठी  निरंतर कसे राहील त्यासाठी विचार व कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाज प्रबोधन करून लोकांपर्यंत पोहचून कार्यास गती व त्या गतीतीतून एकतेतून निसर्ग संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत , रंक पासून ते श्रेष्ठांपर्यंत सगळ्यांनी आपले योगदान दिलेच पाहिजे. निसर्गाला पुजून निसर्गाची सेवा करणे म्हणजेच आपल्या देवाशी, देशाशी त्या निर्मात्याशी एकनिष्ठ राहणे. माणसाने चंद्रावर जरी पाय ठेवले तरी तो हवा , पाणी आणि प्रकाश शिवाय जगू शकत नाही आणि हेच कडू सत्य माणसाने स्वीकारले पाहिजे . निसर्गाशिवाय दुसरा कोणता ही पर्याय मानवासाठी नाही. निसर्गाचे नियम आपण जागोजागी तोडतोय , मिळेल तिथे आपण निसर्ग प्रेमींचे खच्चीकरण करतोय. तरीही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज ही कित्येक तरुण आणि सामाजिक संस्था आपापल्या परीने निसर्ग जपण्यास कार्यरत अन कटिबद्ध आहेत. पाणी फाउंडेशन , तनिष्का , नाम फाउंडेशन तसेच आंघोळीची गोळी. असे अनेक निसर्ग सेवक त्या वसुंधरेच्या मदतीस वेळ काढून निसर्ग सेवा करत आहेत आपले योगदान देत आहेत. श्रमदान करत आहेत.

मातीमधुनी जन्म त्याचा, तोच आपुली छाया          
गाव वस्ती शहर सगळे त्याचाच आहे पसारा

दुष्काळात का आठवतो ,कुठे विसावतो प्रेमात
त्याच्या नसण्याने, काय शोधतो आपण उन्हात

देशातल्या तसेच राज्यातल्या काही भागात दुष्काळ हा बारमाही आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्यांना मिळणारा कमी भाव . पाणी नाही म्हणून उद्योग कारखाने नाही शेती नाही गावात गावकरी नाही. ओसाड पडत चाललेली गाव अन नद्या. महागाई , रोजगार बेरोजगार, विरोधी पक्षांचे  आरोप प्रत्यारोप , गोंधळ , मोर्चे अश्या अनेक प्रश्नांना सरकार ला तोंड द्यावं लागतंय .  तरीही सरकार आपल्या परीने पर्यावरण वाचवण्यास प्रयत्न करत आहेत. राज्यात ५० कोटी वृक्ष लावण्यासाठी सरकारने हरितसेना स्थापन केली असून त्यात अनेक तरुणांनी सहभाग देखील नोंदवला आहे.  पाणी फाऊंडेशन च्या मदतीने राज्यातल्या प्रत्येक गावात स्पर्धा राबवून कलाकारांच्या साह्याने जे कार्य जे निसर्ग सेवा चालू आहे ती खऱ्या अर्थाने दखलपात्र आहे.  " तुफान आलय " च्या व्यासपीठावर अनेक शहरी नागरिकांनी गावाकडे श्रमदान केले.  शहरात काय नि गावात काय ? उन्हाचे चटके जेव्हा लागतात तेव्हा आपली पायवाट ही त्या झाडांच्या शोधातच निघते. आपल गाव म्हंटल तर शेती डोंगर नद्या पाखरांची अन माणसांची. आपली वस्ती आणि आपले शहर म्हंटल तर त्या निसर्गाची देणगी माणसांसाठी मनुष्याच्या सुखासाठी.  धावपळीच्या युगात मनशांती साठी आपण निसर्गाच्याच सानिध्यात राहायला पसंद करतो . आता फार्म हाऊस ची गरज ही भासू लागली आहे. प्रेमात असो की उन्हात झाडाच्या सावली खाली जो आनंद मिळतो तो इतर कुठे आहे का ?  ज्या प्रमाणे मनुष्यास भावना आहे , जीव आहे , वाढ आहे , संवेदना आहे त्या प्रमाणे झाडाना देखील आहे. फक्त त्यांना व्यक्त होता येत नाही . आपण व्यक्त होऊ शकतो आणि सहकार्य करू शकतो. झाडांना वाचवू शकतो. 

झाडावरचे एक एक घाव अन जखमा जाऊन पहा
            मुक्याने सोसले किती, खरा देव कोणता शोधा



मोठया प्रमाणात निसर्ग आणि झाडे जपणारा आपला देश हा वनस्पतींनी समृध्द आहे. शहरीकरणाच्या नादात जरी आपण खूप मोठ्या चुका केल्या तरी ही भारत आयुर्वेदासाठी आणि पर्यावरण रक्षणास त्याचे जतन देखील करत आहे. लाजाळू च्या झाडाला स्पर्श करता त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. म्हणजे झाडांना व्यक्त होता येत. मग जेव्हा आपण आपल्या सोयी साठी त्या झाडांची कत्तल करतो त्यांच्या अंगावर खिळे ठोकून आपल्या जाहिराती करतो. तेव्हा त्यांना ही त्रास होत असेल ना ? जर झाडांना संवेदना आहे तर १०१ टक्के त्यांना त्रास होतो फक्तआवाज नसतो . हीच जाणीव मनात ठेवून " अंघोळीची गोळी " ह्या संस्थेने राज्यातल्या प्रत्येक गावात अन शहरात झाडांना खिळे मुक्त करण्याचा मानस आखला. सुरुवात केली आणि आज कित्येक झाडांची त्या गंजलेल्या खिळ्यापासून सुटका केली. #PainFreeTree #खिळेमुक्तझाड ह्या ह्यास ट्याग ने सोशल मीडियाच्या मदतीने लोकांना एकत्र केलं.  झाडाना होणाऱ्या वेदनांची नागरिकांना जाणीव करून देता अनेक खाजगी , सामाजिक संस्था , कार्यकर्ते झाडांना ह्या वेदनेपासून मुक्त करण्यास रस्यावर उतरली. प्राचीन काळापासून आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे . आपल्या संस्कृतीत झाडांना विशेष महत्व आहे.  अभंगात जगतगुरु तुकाराम महाराज ह्यांनी ही  "‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ झाडांचे हे महत्व पटवून सांगितले होते. वृक्ष लावणे सोपे परंतु वृक्ष जगवणे आणि त्याची जतन करणे हे अवघड आहे . केवळ दिखाव्यापुरतं वृक्षारोपण करून बातमी लावून घराच्या चार भिंतीत आरामात झोप घेणारे आपल्या कडे खूप आहेत. परंतु त्याच झाडांसाठी तळमळणाऱ्या लोकांची संख्या मात्र त्या मानाने खूप कमी आहे. पुढील येणारी भीषण परिस्तिथी जाणून आता तरी वृक्षांबाबत आपण जागृत झालो पाहिजे. निसर्गाचा फटका जेव्हा बसतो तेव्हा त्याचा होणारा आवाज हा मात्र आपल्या पुढील सात पिढीपर्यंत गुंजतो . त्यासाठी चला झाडे लावा झाडे वाचावा , निसर्गावर प्रेम करा , झाडांना वेदनामुक्त करा . एक पाऊल..हिरवळ क्रांती चोहीकडे ..

शेतात रानात वनात आणि डोंगर दऱ्या खोऱ्यात
निरोगी आयुष्याची ही संजीवनी आपल्या हातात

झाडे जगवा झाडे लावा, खरी श्रीमंती ही जपा
झाडांसोबत प्रगतीचा , इतिहास आपला नवा




-सचिन कृष्णा तळे
770909646













Tuesday, 24 April 2018

पुणेकर मला वाचावा

पुणेकर मला वाचावा ...!!


प्रगतीच्या वाटेवरून ,जरा मागे वळून पाहतोस का ?
चुकल्या असतील निर्णय काही, इकडे वळतोस का ?

तुझ्या साठी आज ही,आहे उभी दौलत लाखाची ती
तिच्या ऐतिहासिक पदरा खाली ,थोडा थांबतोस का ?

तुझेच होते लढले तुझेच होते जे माझ्यासाठी झिजले
तुझ्याच पूर्वजांची मित्रा ,कथा पुन्हा लिहितोस का ?

मी ढासळलो आहे कोसळलो आहे अनेक युगांपासून
पडक्या ह्या वैभवाची किंकाळी जरा ऐकतोस का ?

तुझ्याच पुढील भविष्यासाठी, तुझ्या नव्या पिढीसाठी
माझे अस्तित्व टिकवण्यास, मला पदरात घेतोस का ?


Monday, 23 April 2018

ते कवी कुठे आहेत ?

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी देव देश धर्म
अन समाज घडवला

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी महाभारत, गीता 
रामायण सारखे काव्य रचले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी ह्या हिंदवी स्वराज्याचे
एक एक क्षण टिपले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी कीर्तनातून अभांगातून
देवाला ही विठेवर उभे केले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी सत्यासाठी कर्तव्यासाठी
त्यागातून बलिदान दिले

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांनी प्रेमाची इतिहासाची
आणि माणुसकीची ज्योत पेटवली

ते कवी कुठे आहेत ?
ज्यांच्या शब्द शब्दाला
अमृताची उपमा लाभली

ते कवी कुठे आहेत ?
ह्या कलीयुगात ...
ह्या विश्वात ...
ज्यांच्या पहाडी आवाजाने
आज ही
तो एक काळ गाजला होता

ते कवी कुठे आहेत?

त्यांची आज गरज आहे ...

-सचिन कृष्णा तळे 




Friday, 20 April 2018

अस वाटत




अस वाटत ..
वेड्या पाखरावाणी आकाशी उडावं
पाऊस होऊन सर्वाना चिंब.. चिंब.. भिजवावं …
मग..
सूर्याच्या तांडव रुपात सर्वाना कोरड करावं ...
अन,
रात्रीला चंद्राच्या शीतलतेत  हळूच स्वप्नात घेऊन जावं ..
खरचं अस वाटत ...
कोणाशी तरी बोलावं …
मनात पुन्हा श्रावण फुलवावं ...
चहूबाजूने प्रेमाचे गीत..
प्रेमाचे संगीत..
फक्त प्रेमाची कविता..अन प्रेमच असावं
त्या प्रेमातच रडावं.. रुसावं .. आणि सर्वाना पोट भरून हसवावं  …
खरचं अस वाटत ..
वेड्या..पाखरावाणी आकाशी उडावं …
बघा जमतय का?

सचिन तळे



Wednesday, 18 April 2018

हे कृष्णा ..

हे कृष्णा तुझं प्रेम होत राधेवर
रुक्मिणीशी मग विवाहात का रे

आज ही तुझ्या मंदिरात राधा
सांग रुक्मिणी ती विरहात का रे

गोविंद हृदयी पद्मा विराजे छान
कोल्हापुरी ती एकांतात का रे

राम नामाच्या सत्ययुगात देवा
सीता माई सांग वनवासात का रे 

सत्यभामा जशी संसारात उभी
मीरा मात्र तुझ्या काव्यात का रे

गोकुळच्या त्या यमुनेच्या तीरी
गवळनी फक्त इतिहासात का रे

सचिन तळे





Thursday, 12 April 2018

पुणेकर मला वाचवा...


पुणेकर मला वाचवा...

प्रगतीच्या वाटेवरून ,जरा मागे वळून पाहतोस का ?
चुकल्या असतील निर्णय काही, इकडे वळतोस का ?
तुझ्या साठी आज ही,आहे उभी दौलत लाखाची ती
तिच्या ऐतिहासिक पदरा खाली ,थोडा थांबतोस का ?
तुझेच होते लढले तुझेच होते जे माझ्यासाठी झिजले
तुझ्याच पूर्वजांची मित्रा ,कथा पुन्हा लिहितोस का ?

आताच्या धावपळीच्या युगात आपल्याला अनेक सोयीसुविधा हवेत. त्याशिवाय आपले जीवन निरर्थक होईल. आपले गाव हे स्मार्ट सिटी व्हावं, आपल्या गावात सर्व सुख सोयी मिळाव्या हे प्रत्येक नागरिकांचं स्वप्न असत. माझं घर, माझं गाव, माझं शहर अन माझा ऐतिहासिक ठेवा. असा ठेवा जो मला माझ्या पूर्वजांनी दिला. खरतर प्रगती आणि बदल हा हवाच. माणसांत तसेच निसर्गात ही!  आपल्या भोवताली असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू हे आपल्याला खूप काही शिकवत असतात. आपले गड, किल्ले , वाडे , राजवाडे , राजे , महाराजे ह्यांचा इतिहास. त्यांचे योगदान बलिदान. ते सतत त्यांची आठवण करून देत असतात. ते जन्मले, त्यांनी केलं ,ते जिंकले आणि गेले इतिहासाच्या पानांत हरवून. एखाद्या माहिती पुस्तकात , आभ्यासिकात किंवा जयंती अन भाषणात.. हो ते पूर्णतः हरवून गेलेत.    

आताच्या विज्ञान युगात, ह्या ऐतिहासिक ठेवांना आहे का हो महत्व. ज्या महापुरुषांनी अन इतिहासप्रेमींनी तो जपून ठेवला तसाच जपून ठेवण्यास आपण समर्थ आहोत का? खरतर आठवड्यातून सुट्टी घालवण्यासाठी नाहीतर प्रेमी युगलांना प्रेम करण्यासाठी चं काय ती जागा उरलीय आता! थोडेफार जे काय अवशेष आहे त्यावर ही आपले नाव कोरून इतिहास गाजवणारे प्रेमवीर अन सुट्टीत ऐतिहासिक स्थळाला पिकनिक पॉईंट च स्वरूप देऊन प्लॅस्टिक अन कचरा करणारे मंडळी. ह्यांना कसलं घेणं देणं त्या इतिहासाशी, सांडलेल्या रक्ताशी, त्या संघर्षाशी. जयंती जल्लोषात डीजे वाजवून किंवा मोठं मोठाले पोस्टर बाजी करून त्या दिवसापुरता त्या महापुरुषांना जागे करून आताची युवा कोणता इतिहास घडवतीय . स्वतःला युवा नेता म्हणत नाक्यावरली चार टाळकी समर्थक घेऊन आपल्या पोस्टरवर स्वतःचीच झाहिरात करणारे तरुण , समाजाच्या विकासात किती भर देत आहेत . तरीही आज कुठेतरी माणुसकी म्हणा किंवा इतिहास प्रेमी म्हणा इतिहास वारसा जपावा म्हणून काही मंडळी निस्वार्थी झगडत आहे. कित्येक तरुण वर्ग कित्येक सामाजिक संस्था सध्या ह्या इतिहासाचे पाने कुजण्यापासून वाचवत आहे, आहोरात्र राबत आहेत,  कित्येक नागरिक ऐतिहासिक ठेवा जपण्यास तळमळतायत . पण असाच ऐतिहासिक ठेवा आपल्या ह्या पुण्याला भेटलाय. हे जाणून ही आपण अंध झाले आहोत.

काही दिवसा नंतर मुलांना शाळांची सुट्टी पडली की गावाकडे जाणाऱ्या लहान मुलांना त्यांच गाव आता पूर्णतः बदलेलं दिसेल. मामाच्या गावाला जाऊया असे म्हणणारी लहान मुलं जेव्हा शहरातून  पुण्यात येतील तेव्हा त्यांना शहरासारखंच गजबजलेलं गावं  दिसेल. खरा चिंतेचा विषय हा नसून दुसराच आहे. ह्या मुलांना इतिहासाची ओळख आता फक्त कागदी पुस्तकातून भेटणार का?  आता कागदी पुस्तक ही सोडा डायरेक्ट पुस्तक तेही नेट च्या जाळ्यातून सोशल मीडियावरून..

आपण आपल्या मुलांना इतिहास शिकवतो त्यांना इतिहासाची माहिती देतो त्यासाठी त्यांना ऐतिहासिक स्थळावर घेऊन जातो त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य आणि त्यातून देव देश समाज कसा घडला ह्याची ओळख करून देतो . आपण जरा विचार करूया! जर हे स्थळ नष्ट झाले तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवू ... घाणीच्या साम्राज्यात कुजत पडलेले हे शौर्याचे अन वीरतेचे प्रतीक की एके काळी अमुक गोष्ट इथे घडली होती आणि अमुक असा इथे वाडा होता, हे सांगणार आहोत.. का? सगळ्यात जवळच उदाहरण देण्याचं झालं तर.    एके काळी सात मजली असलेला शनिवार वाडा आपल्या अद्याप उभारता आलेला नाही. त्याच्या आजूबाजूस असणारे अतिक्रमण आपल्याला हटवता आले नाही. शनिवार वाड्यात भेटी देणारे लोकांची संख्या दिवसंदिवस वाढतीय त्याप्रकारे दर ही आकारले जातात. पण जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा काही अवशेष अस्थव्यस्थ तर काही माहिती फलक ते ही तुटक्या फुटक्या अवस्थेत आढळतात.  आपण त्या विशाल सिंधू सागराच्या छाताडावर मुंबई किनारी भव्य स्मारक उभे करू शकतो. कामगारांच्या त्या जागेवर भव्य दिव्य स्मारकाचे योजना आखू शकतो. त्यासाठी पैसा राजकारण करू शकतो .त्याची स्वप्ने जनतेला दाखवू शकतो. परंतु आपण ज्या ठिकाणी इतिहास घडला.. ज्या जागेवर त्या वीर महा पुरुषांनी बलिदान दिल .. जिथे स्वराज्याची ध्वजा मानाने फडकावली गेली त्या जागेवर त्याकाळी जे वैभव होत, किमान त्याचे ५० टक्के तरी वैभव पुढच्या पिढीसाठी पुन्हा उभारू शकत नाही का ? किंवा त्या साठी आपल्याकडे अनुदान ही नाही का ? किंवा वेळ च नाही.

आपल्या महाराष्ट्रातील पुणे हा ही तसाच ऐतिहासिक जिल्हा. जिथे भोसले, पेशवे तसेच शाहू, फुले, कर्वे ह्यांच्या पदस्पर्शाने अन तुकाराम, ज्ञानेश्वर सारख्या संतांच्या अमृतवाणीने पावन. पुणे कुठे तरी ऐतिहासिक वास्तू जपण्यास असमर्थ राहिलाय का ? एकीकडे जीवनाशी लढत शिव इतिहास सांगणारे महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे तर दुसरीकडे सरकारी नोकरीत मस्त असणारे, त्या ऐतिहासिक ठिकाणावर दुर्लक्ष्य करणारे सरकारी अधिकारी. पुण्यातली वाढती लोकसंख्या, समस्या आणि कमी पडत चाललेले रस्ते ह्यातून पालिकेला, सरकारला कदाचित लक्ष्य देता येत नसावे. पण हा वारसा विभाग जपण्यासाठीच वारसा विभाग तयार केले गेले परंतु वारसा विभागात असणारे कर्मचारी आणि त्यांची कार्याची माहिती कोण घेतय का ?  पुण्याच्या मध्यवर्गीय भागातून वाहणारी मुळा मुठा तिच्या पात्रात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत जसे कि सिंहगड, शनिवार वाडा, पर्वती, घोरपडे घाट, पाताळें श्वर, नाना साहेब पेशवे समाधी, अनेक पुरातन मंदिरे, वाडे, विश्रांत बाग, महात्मा फुले वाडा.  जिथे महात्मा फुले ह्यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली तो भिडे वाडा . . सरकारी कागद पत्राद्वारे ही सगळी स्थळे वारसा पुरातन विभागात मोडतात. परंतु  ह्या सगळ्या स्थळांसाठी सरकार कोणत्या यादीत मोडत हेच उत्तर अद्याप मिळलेलं नाहीय . 

 वारजे कर्वेनगर अन खडकवासला तसेच खेड शिवापूर इथून थेट दिसणारा सिंहगड म्हणजे स्वराज्याचा साक्षिदार. शौर्याच प्रतीक. पण दुर्दव्य कि, गडावर गेल्यावर तिथे  स्वरज्याच इतिहास सांगणारे दगड मात्र कोसळलेले आढळतात. त्या ठिकाणी इतिहास काय होता कसा घडला ते महत्वाचं नसून आपल्याला सिंहगडावर मिळनारी कांद्याची भजी , पिठलं भाकर अन कुठे तरी लपून प्रेमाचे चाळे करणारे तरुणाई ची भुरळ दिसते. वारजे तुन निघाल्यावर नळ स्टॉप च्या मार्गे नदीपात्रात उतरल्यावर थेट स्टेशन गाटे पर्यंत आपले सर्वांचे मन वेधून घेणारे काही स्थळ आहेत ते पाहताना मन खूप अस्वस्थ होत. त्याची दुरावस्था पाहवत नाही. पेशवे हे नाव जरी ऐकलं तर उत्सुकता वाटते. ज्यांनी महाराष्ट्र नव्हे तर त्या अफगाणिस्थान पर्यंत मराठी झेंडे फडकावले त्या पेशव्यांची समाधी ह्याच नदीपात्रात आहे. जिथे त्यांचे निरंतर वास आहे,ज्यांनि त्यांच्या काळात ऐश्वर्य चे जीवन जगले आज त्यांची समाधी धूळ खात आहे . नदीपात्रात उतरल्यावर उजव्या हाताला भारती विद्यापीठ च्या बाजूला प्रथम लक्ष जात ते नाना साहेब पेशवे ह्यांच्या समाधी कडे . पेशव्यांना पाहत तिथून सरळ निघाल्यावर ओंकारेश्वर मंदिर च्या कळसाला नमस्कार करावं. आतल्या भव्य दिव्य गाभाऱ्यातल्या शिव पिंडीला पाहून मन प्रसन्न व्हावं. सरळ वाट चालावी आपल्याला घोरपडे घाट नजरेस पडतो . त्याच्या थेट समोर शनिवार वाडा अन पुढे विश्राम बाग वाडा आणि आजून खूप काही.

गेल्या दोन तीन वर्षांपासून सतत माझ लक्ष वेधून घेतय ते म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या थेट समोर असलेल घोरपडे घाट . त्याची तटबंदी  कोरीव दगडी चिरा, सुंदर पायऱ्या .. अन तिथे विसावलेले सुंदर असं शिव पिंड आणि नंदी . हे पाहताना उत्सुकता वाढते अन मन तितकंच अस्वस्थ होत. त्याच्या भोवती असणारे घाणीचं साम्राज्य आन त्यात देवाचा अपमान ... मान खाली टाकण्या शिवाय दुसरा पर्याय तरी काय? त्या संबधी पालिकेला विचारणा केली तर उत्तरे ही असमाधानकारक . हालचाल करण्यासाठी ते आपल्या घरातली वास्तू कुठे आहे. घोरपडे घाट आणि त्यासंबंधी साधी फलक सुद्धा आपल्याला लावता आला नाही. पुरात इथले भव्य शिवमंदिर हे वाहून गेलं परंतु देव तिथेच त्याच जागेवर राहिला.  शनिवार वाडा अन लाल महाल ला खेटून चिकटून इमारती उभे करत गेलो . आपण आपली घरे वाढवत गेलो पण देवाचे दाराकडे मात्र दुर्लक्ष्य केलं.  तिथून शनिवार वाड्याला वेढा घातला तर त्याच्या तटबंदी भोवती अनेक विक्री वाले धंदे करत बसतात त्यावर पोस्टर लावणे स्वतःच्या उद्योगाची झायिरत करणे. इतिकेच नाही तर जिथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं ते लालमहाल काय इतका लहान असावं ? त्याच्या भवती चिपकून खाजागी इमारती उभे तरी कश्या राहिल्या. त्यात हि राजकारण करून समाज पेटवणे हे चालूच आहे.  हे सर्व चित्र पाहताना पुण्याच्या वारसा विभागाची किव करावी वाटे . पण हे नक्की, जर असच दुर्लक्ष राहील तर एक दिवस पुण्यातील सर्व ऐतिहासिक वास्तूंची " पुणेकर मला वाचावा " अशी किंकाळी ऐकू येईल .

मी ढासळलो आहे कोसळलो आहे अनेक युगांपासून
पडक्या ह्या वैभवाची किंकाळी जरा ऐकतोस का ?
तुझ्याच पुढील भविष्यासाठी, तुझ्या नव्या पिढीसाठी
माझे अस्तित्व टिकवण्यास, मला पदरात घेतोस का ?


सचिन कृष्णा तळे
बिबवेवाडी - ७७०९०९९६४६



“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale