Saturday, 30 November 2019

आम्ही मुर्ख आहाेत

आम्ही मुर्ख आहाेत
आम्ही ह्या राजकीय लाेकांची भाकरी आहाेत
आम्ही फक्त आक्राेश आहाेत
सत्तेसाठी माजलेल्या गाढवांचे
आम्ही पहारेकरी आहाेत
लुटा खुशाल लुटा हा देश
कसाई च्या बांधणीला खुशाला टांगा हा देश
आम्ही हा देश तुमच्या स्वाधीन केलाय
आमच्या मतदानाने
आमच्या सळसळत्या रक्ताने
तुमच्या खाेट्या भाषणाने
सत्तेच्या बाजारातून
आणि पक्षांच्या नियमातून
तुम्हाला लाज नाही
आम्हाला ही लाज नाही
कारण
आम्ही मूर्ख आहाेत

सचिन कृष्णा तळे



Wednesday, 27 November 2019

उध्दव ठाकरे ह्यांची शपथ विधी पुर्वी

मुख्यमंत्री हाेणे आणि राज्य सांभाळणे हे साेपे काम नाही. राज्य राज्यातले प्रश्न आणि विराेधकांचा आवाज आणि त्यांना हजरजवाबी उत्तर देणे हे काैशल्य मुख्यमंत्री त हवं. देशामध्ये महाराष्ट्र राज्य हा असा एकमेव राज्य आहे जिथे सत्तापालट हाेण्यासाठी एक शब्द हि कारणीभूत ठरतं. फक्त एक चूक सरकार झाेपवते. टि आर पी साठी हापहापलेली मिडिया गिधाडां सारखी टपून असते. राज्यात रात्री अपरात्री घडलेल्या घटनेवर पाेहचणे. राज्यात नवे याेजना राबवून ती यशस्वी करने. केंद्रातून निधी आणने. रखडलेल्या याेजना मार्गी लावून पक्ष वाढवणे. ह्यात घर परिवार चार चाैकटीत न ठेवता त्याला राज्यांच्या सिमेशी जाेडने. जाे पर्यंत ह्या पदावर आहे ताे पर्यंत पुर्ण वेळ फक्त धावपळ असते. त्यात राज्यावर काेसळणारे आस्माणी संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, सट्टा बाजार, राजकारण इ. विषयांवर चाेख माहिती ठेवणे मुख्यमंत्री चे काम आहे.

उद्या उध्दव साहेब  राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपत घेतील आणि हेच आव्हान स्विकारणार आहेत. तुमच्या साेबत जे आहेत त्यांच्यावर विश्वास नव्हता आणि नसणार त्यामुळे उध्दव साहेबांनी सावध राहून कामगीरी उत्तम बजवावी आणि यशस्वी व्हावे हिच भवानी चरणी प्रार्थना. ज्यांचे पाय आधीच भ्रष्टाचाराच्या चिखलात रूजले आहेत ज्यांना जनतेने नाकारले आहे अश्या नापास आणि काटावर पास झालेल्या विद्यार्थी साेबत तुम्ही राज्य चालवणार आहे. एक बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून काळजी, शेवटी आनंद आहेच भगव्याचा, ताे असणारच हिंदुत्वासाठी..फक्त सावध राहून राज्य करावे.

#आहेतेआहे
जय महाराष्ट्र
#सचिन_तळे


Sunday, 24 November 2019

मी आणि माझे वाचन - पुस्तक एखाद्या शब्दासाठी

 मी आणि माझे वाचन - पुस्तक एखाद्या शब्दासाठी -पुण्यनगरी २५ -११-२०१९


Tuesday, 19 November 2019

एखाद्या शब्दासाठी.


कवितेमध्ये शब्दांची योजना करताना अभिद्या शक्तीने दिलेल्या अर्थाची जाणीवपूर्वक सुयोग्य , उचित आणि सुंदर योजना करणे म्हणजे कवीचे सोंदर्य. कवीच आपल्या शब्दातून आपल्या विचारातून आणि कल्पकतेतून अश्या काही रचना मांडत असतो कि ते रसिक वाचक वर्गाला वाचताना आपलस वाटत. कधी कधी त्याच कवितेच्या शब्दावर वाचक वर्गाला वाचताना हळूच मन एका वेगळ्या लय वर डोलायला लावत मग नकळत त्याचे गाणे  तयार होते आणि आपल्या मनाला भुरळ घालून जाते. अगदी तसेच नाशिकचे कवी गीतकार संतोष वाटपाडे ह्यांच्या कविता आहेत. ज्यांना कवितेचे येड लावून घेयच आहे आणि शिकायची आहेत त्यांनी  खास करून संतोष ह्यांच्या कविता नक्कीच वाचावे.  " हि बाग कोणाची " ह्या लोकप्रसिद्ध काव्य संग्रहानंतर संतोष ह्यांचा " एखाद्या शब्दासाठी " हा दुसरा काव्यसंग्रह लोकार्पण झाला. बघता बघता वर्ष झालं तरीही ह्या काव्यसंग्रहाची जादू कायम आहे. पहिल्या काव्य संग्रहासोबत हा काव्य संग्रह हि अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला. हे दोन्ही काव्य संग्रह म्हणजे नवोदित कवींसाठी एक गाईड आहे असेच म्हणावे लागेल.

जिथे शब्दांचा खेळ रंगतो तिथे काव्याची अन कवीच्या कल्पनेची जादू हे चालणारच. मोजक्या शब्दात विश्वाची रचना विश्व दाखवण्या ची ताकद फक्त कवितेत आहे. साहित्याच्या मंदिराला कवितारुपी सोनेरी कळस आणि त्याच्या गाभाऱ्यात रसिक श्रोता हा देव म्हणून विराजमान आहे. अभंग , संत वाणी , गाणी , पोवाडा , शाहिरांची बोली , सावरकरांची ती बंदिस्त खोली , महाभारताची कहाणी , स्वतंत्रतेचे उभारणी , सुख दुःखाची काळजी , आई ची अंगाई , बालपणाची आठवणी , नात्याची शहनाई , दुष्काळाची आरोळी कुठं कुठं नाहीय कविता . गझलांमधुन वृत्तांमधून छंदामधून ते सात सुरांच्या भेटीमधून , प्रेमातून विरहातून नात्यातून ते निसर्गाच्या मिठीतुन फुलापानांच्या श्रावणी सोहळ्यातून , अश्रूं पासून पावसाच्या थेंबातुन , एकांतात , नाटकात ,  चित्रपटात , चार चौघात  फक्त कविता आणि कविताच तर आहे. आणि ह्या सगळ्या कवितांमधून संतोषजी ह्यांच्या कविता नव्याने वाचकांना आपलंस करून घेतायत.

आजवर आपण बरेच कवींच्या कवितासंग्रह वाचले असतील. त्यात मुक्तछंद किंवा  प्रामुख्याने गझल वाचायाला मिळतील. प्रत्येक काव्यसंग्रहात कवीचे मनोगत , कवीची कविता आणि प्रस्तावना असते. पण ह्या पुस्तकाचा विषयच वेगळा आहे. इथे कविता आहेतच पण त्याचबरोबर कविता वृत्तात कसे लिहावे ह्याची माहिती अभ्यासपूर्वक सविस्तर रित्या दिली गेली आहे. कमी शब्दात नवोदिताना समजेल त्या भाषेत "वृत्तबद्ध कविता: एक शास्त्र"  आठ पानात ह्याची मांडणी केली आहे. ज्ञानेश्वरांच्या देवद्वार छंदाचा अक्षरक्रम आणि बहिणाबाई चौधरी ह्यांच्या पादाकुलक छंद तसेच ती लिहिताना मात्रा कश्या मोजाव्या त्याच मात्रांमध्ये कविता कशी सादर करावी ह्याबद्दल सांगितले आहे. त्यानंतर अक्षरगणवृत्तांची लगावली कशी असते , कालगंगा , मंदाकिनी , मृगाक्षी , आनंदकंद ,भुजंग इ अक्षरगणवृताची ओळख ह्या पुस्तकातून होते. एकूण २५ वृत्तांची माहिती देत संतोषजी म्हणतात " वृत्तबद्ध कवितेच्या शोधात प्रवास करत असताना जे जे हाती लागले ते रसिकांच्या स्वाधीन करण्याचा प्रयन्त केलाय , यापुढे वृत्तबद्ध कवितेचा शोध सुरुच राहणार" आपल्याला जे गवसलंय ते मोकळ्या हाताने नवोदितांना देत समाजात एक चांगले कवी घडवण्यासाठी संतोषजी सतत प्रयत्नशील आहेत. प्रत्येक वृत्ताची नजाकत आणि स्वभाव पटवून देण्याचे कार्य संतोषजी ह्या  काव्य संग्रहात करत आहेत.

एकूण ८९ कविता असून ह्या  काव्य संग्रहात कवीने वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलाय. रात्रीच्या अंधारातून चंद्र कोरीतून होणारी तेजोमय पहाट, कुठे संसाराचा विडा कुंकवाचा मळवट, कुठे म्हातारीची तगमग, कुठे रात्रीचा सुगधं, कुठे सांजवेळीची पश्चिमा ,कुठे लागट गाठ.  इथे सटवाईचे कासोटे, इथे मन हिरवा श्रवणमास, जिथे देव्हारा, तिथे फुटलेली एक समाधी ,तिथे गोदावरीचा काठ. कधी प्रियेचे भास, कधी निरोप सावळी, कधी बाभळीची लेक ,कधी वसंताची  हाक, कधी तलवार, कधी अनुराग, कुठे क्षितिजावर दिसतो हसरा बुद्ध. इथे नशिबाचा शाप इथे विठ्ठलाचा एकांत, इथे मदनमंजरी इथे आयुष्याचा मेणा इथे हळवी हाक इथे एक दमलेला दिवा फक्त एखाद्या शब्दासाठी… फक्त एखाद्या शब्दासाठी.


आज हि जुन्या कविता आपल्याला जितक्या आवडतात त्याच ताकदीचे नव्याने कविता लिहिणारे कवी आणि त्यांची लेखणी आहे. नव्या कवींची कविता म्हणजे सारस्वताच्या झाडावर फुटलेली पालवी आहे आणि ती जपणे आजच्या पिढीचे कर्तव्य. कविता जन्माला घालताना त्याची मांडणी करताना त्याला जगासमोर सादर करताना प्रत्येक कवी हा श्रोत्यांकडून प्रेक्षकांकडून रसिकांकडून एक आशा बाळगून असतो फक्त एखाद्या शब्दासाठी.

खांद्यावर ओघळलेल्या
रंगीत फुलांच्या वेण्या
ती आली होती केवळ
स्पर्शाना अत्तर देण्या
तळहाती ठेवुन माझ्या
व्याकुळल्या खांद्यावरती
पेरली सुगंधी कविता
बोटाने पाठीवरती 

पुस्तक - एखाद्या शब्दासाठी
कवी - संतोष वाटपाडे
प्रकाशक - स्वयं प्रकाशन
मूल्य - २२५
पाने – १०६
सचिन कृष्णा तळे






Friday, 8 November 2019


मा. सचिव

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समिती
पुणे १




विषय : गरोदर महिलांना बस मध्ये किमान एक या दोन सीट आरक्षित                      मिळण्याबाबत




माननीय महोदय ,
           पुण्यात एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बस मध्ये महिलांसाठी डावी बाजू पूर्ण पणे राखीव आहे. कारण आपल्या पुण्यात पुरुषांसोबत अनेक महिला हे रोजगार करतात कामावर हजेरी लावतात. त्यात संसार आणि घर सांभाळण्यासाठी तसेच स्वतःच्या आणि पोटातल्या बाळाच्या सुरक्षेतेसाठी अनेक गरोदर महिला हे सरकारी वाहनास अर्थातच बसला प्राध्यान्य देतात . सर्वांकडे गाडी आहे असे नाही . खास करून मध्यमवर्ग महिला जास्तीत जास्त बसचा उपयोग करतात .
  एक नागरिक म्हणून एक अनुभव सांगू इच्छितो. एकदा एका बसमध्ये एक गरोदर स्त्री चढली पण बस पूर्णतः भरलेली होती. ती महिलांकडे आशेने पाहत होती कि कोणीतरी मला सीट देईल आणि इतर महिला हे वाट पाहत होते कि कोणीतरी तिला सीट देईल. त्या नादात तिला कोणीच सीट दिली नाही. जर आज तिच्या साठी किमान एक सीट जरी राखीव असती तरी तिला आराम भेटला असता.
  आपल्या मुंबई मध्ये एक सीट पूर्णपणे गरोदर महिलांसाठी राखीव आहे. महिलांच्या त्याच रांगेत फक्त एक या दोन सीट ह्या गरोदर महिलांसाठी राखीव करावे हि माझी विनंती आहे. ह्या निर्णयाला कोणाचाच विरोध नसणार उलट महिला वर्गातून आणि त्या प्रत्येक घरातून ज्या घरात गरोदर स्त्री आहे त्या घरातून ह्या निर्णयाचा स्वागतच होईल .
  ह्याच विषयावर आपले सरकार पोर्टल द्वारा पुणे महानगर महामंडळ लिमिटेड ह्यांच्या कडे तक्रार नोंदवली होती ( उत्तराची प्रत जोडलेली आहे ). त्यानुसार मी आपल्याशी हा पत्र व्यवहार करतोय. कृपया ह्याची नोंद घ्यावी.
  जर मुंबई सारख्या भागात होऊ शकत तर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत पुण्यात का होऊ शकत नाही.
  कृपया आपण विचार करावा आणि हा प्रस्ताव समिती कडे सादर करून मंजूर करून घ्यावा हि विनंती . कदाचित ह्या निर्णयाची गरज आपल्यातल्याच कोण्याच्या तरी घरातल्या महिलेस पडेल.
  मी आपल्या उत्तराची वाट पाहतोय.  कळवावे ..!!


जय हिंद
जय महाराष्ट्र

सचिन कृष्णा तळे


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale