महाराष्ट्राचे नाथ - पैठणचे संत एकनाथ
स्वतयाचे कुळी
दिपको दिव्य झाला॥
हरिभक्ती लागोनि
तारी समस्ता।
नमस्कार माझा
सद्गुरू एकनाथा॥
संत हे चालते
फिरते देवच. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. या संतांच्या भूमीत अनेक दिव्यज्योती
जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कार्यातून देव, देश अन
धर्म तसेच समाजसेवेचा संदेश दिला. अश्याच संतांच्या यादीत पैठणच्या एकनाथांचे नाव श्रेद्धेने
घेतले जाते.
छत्रपती संभाजी
नगर या जिल्ह्यातील पैठणमधील नाथ षष्ठी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची
यात्राचं. शके १५२१ ला फाल्गुन षष्ठीस नाथांनी समाधी घेतली. नाथांच्या आयुष्यात या
षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन,
नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या
सगळ्या गोष्टी एका तिथीला झाल्या. नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या
साहाय्याने जनजागृती केली. साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन करणारे संतकवी, पंतकवी
व तंतकवी म्हणून एकनाथांची ओळख. श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर
श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणुन देखील साजरा करण्यात येतो. पैठण येथील नाथषष्ठीची
वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी
नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी
व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस
गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त
श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता
श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. सप्तमीच्या दिवशी रात्री
१२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. अष्टमीच्या दिवशी सायंकाळी
४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. काला भरलेली हंडी सूर्यास्तासमयी
’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती
हंडी फोडण्यात येते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला
वाटण्यात येतो.
संत
ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५०
वर्षांनी एकनाथांचा जन्म इ.स.
१५३३ मध्ये पैठण येथे झाला.
एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी त्यांच्याकडूनच वेदांत, योग, भक्तियोग यांचे
शिक्षण घेतले. गुरुंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गुरुंच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला. नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास
महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती
पंढरीत परत आणली, हा
इतिहास आहे. ज्ञानेश्वरांची विस्मृतीत
गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा
आणि गाभारा बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरू
केली. एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या
स्वप्नात आले. त्यांनी सांगितले, ’माझ्या गळ्यास अजानवृक्षाच्या मुळीने वेढले आहे तु
आळंदीस ये आणि मुळ्या काढ’. पेतुन जागे झाल्यावर नाथांनी आपल्या
भक्तगणंसमवेत आळंदीस प्रस्थान केले. तेथे पोचल्यानंतर सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली
त्यांना दिसली. नाथ एके ठिकाणी बसले, श्री ज्ञानेश्वरांचे ध्यान केल्यानंतर नंदीच्या
खालुन आत येण्याचे द्वार आहे असा दृष्टांत त्यांना झाला. सर्व मंडळींनी मिळुन झुडपे
तोडली. नाथ नंदीखालील द्वारातून आत प्रवेश करते झाले. समोर प्रत्यक्ष तेज:पुंज मदनाचा
पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज बसले होते. त्यांनी नाथांना आलिंगन दिले. नाथांनी माऊलीस
नमस्कार केला. त्या दोघांचा दिव्य संवाद तीन दिवस चालला. नाथ बाहेर आले. त्यांनी समाधीचे
दार बंद केले. ज्ञानेशांच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वरीची शेकडो हस्तलिखिते जमा करुन
संशोधन केले. त्यात अनेक अपपाठ घुसविले गेले होते, लोकांनी आपल्या मनाच्या ओव्या अनेक
ठिकाणी घातल्या होत्या. त्या सर्व वगळून नाथांनी श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार
केली. त्याच्या अनेक हस्तलिखित प्रती तयार करवून सर्वत्र पसरविल्या. याच कारणाने नाथ
हेच सर्व मराठी सारस्वतांचे आद्य संपादक ठरतात. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती नाथांनी
शुद्ध केली आहे.
काशीहून रामेश्वरास
वाहण्यात येणाऱ्या कावडीतील पाणी नाथांनी पाण्याविना तडफडत असलेल्या गाढवाच्या मुखात
घातले व देव देवळात नसून तो चराचरात आहे हे सांगितले त्याचप्रमाणे प्राणीमात्रांवर
दया करावी हेही त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले.
सर्वसामान्यांपासून
ते मुक्तांपर्यन्त सर्वांसाठी नाथांनी विपुल प्रमाणामध्ये ग्रंथरचना करुन मराठी ग्रंथ
भांडारात खुप मोठी भर घातली. तसेच अंधश्रद्धेवर कोरडे ओढुन श्रद्धेला प्रोत्साहन दिलं.
नाथ वाळवंटातून
जात असता हरिजनाचे एक मूल तापलेल्या वाळूत रडत असल्याचे त्यानां दिसले. कोणताही स्पृश्य
अस्पृश्यतेचा विचार न करता नाथांनी त्या बालकास कडेवर घेतले व त्याच्या घरी जावून त्याच्या
आईकडे सुपुर्द केले. या घटनेतून नाथांनी आपल्याला समतेचा व बंधुत्वाचा संदेश दिला आहे.
पैठण येथील
काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरुन एक यवन (मुसलमान) नाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकला
तरीही नाथांना क्रोध आला नाही. उलट पान खाल्यानं तुझं तोंड भाजलं असेल घरी चल तुला
मध चाखतो म्हणजे तुझ्या तोंडाचा दाह शांत होई असे सांगुन नाथांनी आपल्या आचरणाने शांतीचा
संदेश आपणास दिला तसेच सत्याग्रह कसा असावा याचा वस्तुपाठही घालून दिला.
एकनाथांनी महाराष्ट्रात
वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली. त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले
अन्याय, अत्याचार या विषयी ‘रोडगा’ या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या
मनाची स्थिती व्यक्त केली. महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील
वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिकस्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम
स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.
एकनाथांनी बोली
भाषेत सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत साहित्यनिर्मिती केली. ‘विंचू चावला’
हे भारुड खूप गाजलं. त्याच प्रमाणे ‘दादला’ हे भारुड विनोदी अंगाने लिहून हसत हसवत
आशय लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले.
एकनाथी भागवत,
४० हजार ओव्या असलेल्या भावार्थ रामायण, चिरंजीवपद , रुक्मिणीस्वयंवर, शुकाष्टक टीका,
स्वात्मबोध , आनंदलहरी, हस्तमालक टीका, चतुःश्लोकी भागवत, ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे
शुद्धीकरण अश्या अनेक साहित्याची निर्मीती
हि संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांनी केली.
- सचिन कृष्णा
तळे