पुण्याची तुंबई केली कोणी ?
मुंबई ची तुंबई कशी होते कश्यामुळे झाली याच जिवंत उदाहरण पुणेकरांकडे असताना पुणेकर शांत कसे ?
" जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली. पुणे शहरआणि घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शिरूर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तसेच खडकवासला परिसरात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुळा मुठा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुणेकर सावध झाले. पण काहीभागात घरातील सामान पाण्यावर तरंगत असल्याने दयनीय स्थिती झाली होती. काही वर्षांपूर्वीच पावसाचं रौद्र रूप पुणेकरांनी अनुभवले असताना देखील हवे तसे नियोजन पुण्यात दिसून आले नाही. पुण्याची पुन्हा तुंबई झाली याला जवाबदार कोण ? महानगरपालिका कि आपण ? २०२१ मध्ये अतिक्रमण विभागाला कोणी विरोध केला ? पुण्यात पावसामुळं शहरात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र गेल्या काही वर्षांत वारंवार पाहायला मिळत आहे."
२५ सप्टेंबर २०१९ , पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस. पेशव्यांच्या आधीपासून अस्तित्व असेलेला आंबील ओढा पुण्येकरांच्या डोळ्यात पाणी आणेल असे वाटले नव्हते. एका रात्रीच्या तुफान पावसाने कहर आणला आणि पुण्याच्या दक्षिण भागात अक्षरशः पुर परिस्तिथी निर्माण झाली. कोट्यवधींच नुकसान झाले. या पावसाचे रूप पाहून पुणेकरांच्या मनात भीती भरली. दांडेकर पूल , मित्र मंडळ, जेधे चौक, अरण्येश्वर , पर्वती , मार्केटयार्ड , पद्मावती, स्वामी विवेकानंद चौक या भागात इतकं पाणी साचले कि नागरिकांच्या गाड्या तसेच अनेक मालमत्तेचं नुकसान झालं. हे चित्र असताना शहरातील दांडेकर पुलापाशी आंबील ओढ्या जवळ असणाऱ्या वस्ती वर अतिक्रमण कारवाई करण्यास गेली. आंबील ओढ्याची रुंदी वाढवून तिथे संरक्षण भिंत उभी करण्याचे काम देखील चालू झाले पण या कामाला २०२१ मध्ये स्थानिक लोकांच्या विरोधाने स्थगिती आली. दरम्यान या लोकांसाठी राहणायची सोया देखील करण्यात आली होती तरीही मोठ्या प्रमाणात लोकांनी विरोध केला. आज याच भागात पुन्हा पाणी शिरले त्याला जवाबदार प्रशासन कसा हे नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वी पुन्हा असाच अनुभव ने पुणेकर भयंकर चिंतेत आले. महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई आणि चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले. धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळं पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पण यापेक्षा हि गंभीर कारणे आहेत. अनधिकृत झोपडपट्टी, इमारती बांधकाम ची चढाओढ, नालेसफाईकडे दुर्लक्ष, सिमेंटचे रस्ते अशी अनेक कारणं यामागं असल्याचं चर्चांमधून पुढं येत आहे. आधी आपल्याकडे टार रोड होते, बाजुला माती असल्यानं तिथून पाणी जात होतं. पाऊस आला तरी तो तिथून जात होता. पावसाचं जमिनीत जाण्याचं प्रमाण जास्त होतं. पण आता ९० टक्के पाणी वाहतं. ते जमिनीत जात नाही. फक्त सिमेंटचे रोड नाही, तर आपल्याकडं एका ठिकाणी अनेकदा जी कामं होतात, त्यात अनेकदा रस्ते खोदले जातात. त्यात चेंबर डिस्टर्ब होतात.
अगदी काही वर्षांपूर्वीच पुणे शहर मोस्ट लिव्हेबल सिटीच्या यादीत आलं होतं. मात्र आता हे शहर तुंबत चाललं आहे. अगदी पंधरा मिनिटं ते अर्धा तास कोसळणाऱ्या पावसानंही ते तुंबल्याचं दिसत आहे. आंबील ओढ्याला पूर आला तेव्हा पुणे शहरातले नदी नाले प्रवाह याच्या पाहण्या करण्याच्या घोषणा झाल्या. हानी झाली आणि उपाययोजनाही आखण्यात आल्या. त्यानंतर आंबील ओढ्याचं खोलीकरण, भिंती बांधंणं असे प्रकार झाले. सरकार प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे पण त्याला साथ नागरिकांनी हि दिले पाहिजे. नदीपात्रात तुम्ही घरे बांधणार , ओढ्यात बांधकाम करून ओढा लहान करणार , पाण्याच्या वाहत्या प्रवाहात कचरा टाकून अडथळे निर्माण करणार आणि प्रशासन ने त्याला विरोध केला तर स्थानिक लोकप्रतिनिधीला मतांची भीती दाखवून हक्क गाजवणार मग जेव्हा निसर्ग त्याच्या मूळ रूपात येतो तेव्हा तुम्हीच डोळ्यात पाणी घेऊन त्याच प्रशासन ला मदत मागणार हे किती दिवस चालणार पुणेकर. मुळा मुठा ला पूर आल असं नाही तर मुळा मुठा तिच्या मूळ रूपात आली आहे. पावसाळा सोडला तर हीच मुळा मुठा काय अवस्थेत वाहते हे सांगण्याची गरज नाही. शहरातील सगळं सांडपाणी आणि त्यासोबत वाहत येणारा कचऱ्याने मुळा मुठा वर्षभर नदी वाटतच नाही हो ! ती जर काहीदिवस तिच्या मूळ रूपात येत असेल तर त्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण भितो आणि पळू लागतो याला जवाबदार ती नदी अन पावसाचं पाणी नसून आपण आपल्या हातून केलेली निसर्गाची चेष्टा आहे. वेळ गेली नाही मुंबई ची परिस्तिथी तुमच्या डोळ्यसमोर आहे. पुण्याची तुंबई करून पुण्याच नाव खराब करू नका. त्याच नैसर्गिक वारसा आपण जपला तरच आपण खरे पुणेकर होऊ.
सचिन कृष्णा तळे


