पुण्यात भर रस्त्यावर तुम्हाला उन्हात पावसात थंडीत लहान मुलं भीक मागताना दिसतील आणि हे प्रमाण हि वाढले आहे. ‘चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन’ तीन गटात मोडली जाते रस्त्यावर राहणारी मूल, रस्त्यावर काम करणारी मुलं , रस्त्यावरील कुटुंब त्यात असणारी मुलं त्यानुसार पुणे महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर एक सर्वे सादर केला आहे. ह्या सर्वे नुसार पुण्यात सध्या १०४२७ मुलं हि ह्या गटात मोडतात. ह्या मुलांमध्ये ५२०७ मुले ६ ते १४ वयोगटातील आहेत. करोनाच्या महामारीत वाढलेल्या बेरोजगारीची आता हि आकडेवारी किती असेल ह्याचा अंदाज कदाचित पुणे महानगरपालिकेला ह्यांच्या कडे नसेल. १० हजार मुलांना पुण्यात फक्त चारच ठिकाणी दिवस रात्र निवारा प्रकल्प राबवला जातो. १) सेनादत्त सांस्कृतिक हॉल, सेनादत्त पेठ, पुणे-३०, २) मोलेदिना पार्किंग प्लाझा, पुणे स्टेशन, पुणे ३) दुध भट्टी समाजमंदीर, बोपोडी ४) मदर तेरेसा समाजमंदिर, येरवडा. मुलांची आकडेवारी पाहता ह्या सांस्कृतिक हॉल ची जागा वाढवली पाहिजे किंवा पुण्यात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था च्या मदतीने हा मुलांना जे रस्त्यावर भीक मागतात त्यांना सहकार्य करून त्यांना शिक्षण तसेच आहार देण्यात यावी. भिक्षा प्रतिबंध कायद्यानुसार चौकात, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणे हा देखील एक प्रकारे गुन्हाच आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्याधींचे जखंमाचे, अपंगत्वाचे किंवा असहायतेचे प्रदर्शन करून पैसे अन्य वस्तूंची मागणी करणे म्हणजेच भीक. पण त्यात लहान मुलांना घेऊन भीक मागणे हा खूप मोठा गुन्हा आहे कारण आपण देशाची भावी पिढी बर्बाद करतोय. जे पालक लहान मुलांना घेऊन भीक मागताना दिसतील त्यांच्यावर पुणे महानगर पालिके तर्फे कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे. आता ह्या मुलांची आकडेवारी किती आहे , ह्या मुलांवर किती खर्च होतोय तसेच ह्या मुलांची नोंदी पालिकेत किती आहेत ? ह्याची माहिती अद्याप समाज कल्याण विभागाने दिली नाही.
पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेर घर. अर्थात पुण्यात जो येतो तो शिक्षण घेण्यासाठी स्वतःला घडवण्यासाठी. टोलेजंग इमारती, मॉल, आयटी कंपन्या, अनेक शैक्षणिक संस्था तसेच औदयोगिक कारखाने आणि वाढती लोकसंख्या हि नव्या स्मार्ट पुण्याची ओळख. पण ह्यात अजून एक उल्लेख राहिला ती म्हणजे रस्त्याच्या कडेवर भीक मागणारी लहान मुलं. होय कारण पुण्यात असे बरेच चौक आहे, बाजार पेठ आहेत , स्टेशन परिसर आहे कि जिथे लहान मुलं भीक मागताना दिसतील किंवा हातात कापड घेऊन तुमच्या गाडीला पुसत पाच दहा रुपयाची मागणी करताना दिसतील. काहीवेळेला तुम्हाला ती फुल किंवा खेळणी सारख्या वस्तू विकताना दिसतील. जर बारकाईने पाहिलं तर हे प्रमाण गेल्या काही वर्षात जास्त वाढले आहे त्यामागचं कारण स्थलांतर असू शकत. पर-राज्यातून आपल्याच जिल्ह्यातील दुष्काळ भागातून अनेक जण शहराकडे वळतात. घर दार सोडून लहान मुलाना घेऊन ती शहरात येतात आणि रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहतात. त्यांना रोजगार मिळेल तेव्हा मिळेल पण पोटाची भूक मिटवण्यासाठी ह्या निरागस बालकांना त्यांच्याच पालकांकडून भीक मागण्यास प्रवृत्त केले जाते हे सत्य आहे. ह्यात आईच्या झोळीत तीन चार महिन्याचं मुलं देखील दिसेल.
हे थांबलं पाहिजे
सचिन कृष्णा तळे