कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे, - सारस्वतांनो तुमच्यासाठी
कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे,
यांस साष्टांग
सप्रेम नमस्कार,
मुंबईच्या
अथांग सागराच्या लाटांच्या किनारी, गिरणी कामगारांच्या चाळीत, मराठी सारस्वतांच्या यादीतून अन संघर्षातून स्वतःचं
आयुष्य घडवतं, काव्यांतून मराठी माणसांचे आयुष्य तुम्ही फुलवले. "कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच मुंबईचा केशवसुत म्हणून तुमची ओळख ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी
या मुंबईनगरी ला करून दिली.
हि ओळख फक्त मुंबई पुरती सिमीत न राहता ती
मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाना पटली. तुमचा जन्मापासूनचा खडतर प्रवास वाचला कि आजही अंगावर
काटे येतील. पण तुम्ही कसे
घडलात हे आजच्या या तरुण
साहित्यिक अन वाचकांना सांगितलं
पाहिजे. म्हणून या पत्रात तुमची
थोडी ओळख माझ्या वाचकांना करून देतोय.
असे म्हटले
जाते कि, नदी आणि
ऋषी यांचे कुळ आणि मूळ शोधू नये. १९२६-२७ मध्ये मुंबईतील
चिंचपोकळी मधील एका कापड गिरणी समोर गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने
रस्त्यावरील एक अनाथ जीवास
उचलून घरातं आणले. त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या निरागस जीवाला
पोटच्या मुलासारखे प्रेम दिले. जगण्याचा
संघर्ष आणि अविरत कष्ट यातून सुर्वे परिवारचा प्रवास चालू असताना देखील त्या मुलाला शिक्षण दिले. १९३६ मध्ये ते बालक चौथी
उत्तीर्ण झाले तेंव्हाच गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. तिथून पुढे कधी घरगडी म्हणून, कधी हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करत ते वाढले. टाटा
ऑईल मिलमध्ये हमालाचे काम केले. कापड गिरणीत धागा धरला, बॉबीन भरली. पुढे जाऊन मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. १९५९ मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकाची सनद मिळविली आणि १९६१ मध्ये ते शिपायाचे शिक्षक
झाले. आणि याच प्रवासातून या महाराष्ट्राला पद्मश्री कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे मिळाले.
कविवर्य सुर्वे
सर… मार्क्सवादी विचाराचा
पगडा तुमच्यावर असल्याने, तुमच्या लेखणीतून सदैव समाज परिवर्तनाच्या कविताचं आम्हाला ऐकायला व वाचायला मिळाल्या.
‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ या निर्भीड वृत्तीने
तुम्ही मराठी सारस्वताच्या दरबारात शब्दरूपी तळपती तलवार परजत ठेवली. ‘ऐसा गा मी ब्रह्म’,
‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘सनद’, ‘नव्या माणसाचे आगमन’या काव्यसंग्रहातून तुमचा वेगळेपण
प्रत्येकाने अनुभवला. अनेक अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे काम तुम्ही केले. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत
तुमच्या कवितांना मान्यता मिळाली. तुम्ही तुमच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही उल्लेख केलेला नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा
नरसिंह मेहता पुरस्कार, सोव्हिएत रशियाचं नेहरू ॲवॉर्ड, मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार, कराड साहित्य पुरस्कार इ. अश्या अनेक
पुरस्कारांनी तुम्हाला गौरवण्यात आले. तुमच्या नावाने आज अनेक साहित्यिकांना
पुरस्कार दिले जातात, हा आमच्यासाठी मोठा
सन्मानच आहे.
मास्तर,
या विसाव्या शतकातील आजचं जग पूर्ण बदललं
आहे. तुमच्या काव्य लेखणीतून तुम्ही माणसांची दुःख आणि आक्रोश मांडला, निसर्गाचं अन शेतकऱ्याच्या भावना
मांडल्या, साम्यवादाची भूमिका मांडत असताना तुम्ही वस्तुस्तिथी दाखवून दिली. झोपड्या बदलत, विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन तुम्ही जगलातं. मध्य प्रदेश सरकारचा १९९९ चा कबीर पुरस्कार
स्वीकारताना चे तुमचे शब्द
आजही आमच्या आठवणीत आहे. "कर्तबगारीत कबीर माझ्यापेक्षा हजार पटीने मोठा आहे. पण जीवनाच्या बाबतीत
आमच्यात बरेच साम्य आहे, त्याला त्याच्या आईने नदीकाठी आणि मला माझ्या आईने समुद्रकाठी मुंबईच्या फुटपाथवर सोडलं. कबिराला सांभाळणारा विणकर होता आणि मला सांभाळणाराही कापडाशीच संबंध असलेला गिरणी कामगार होता. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला
लागलो. त्यालाही त्याची जात सांगता आली नाही आणि मलाही."
सचिन
कृष्णा तळे
