Monday, 23 May 2022

मराठी अभ्यास परिषद

मराठी अभ्यास परिषद





आपण भाग्यवंत आहोत कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जशी संतांची परंपरा लाभली तशीच साहित्याची हि लाभली आहे. थोडक्यात काय तर जसे वाचक तसे त्यांचे लेखक अन जसे लेखक तसे त्या लेखकांची संस्था आहे. सध्या मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. मराठी भाषा, मराठी समाज आणि मराठी संस्कृती यासाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन करून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मानाचे स्थान मिळविण्यासाठी मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करण्यासाठी मराठी अभ्यास परिषद हि १९८२ पासून कार्यरत आहे. 


दर वर्षी नियमितपणे, मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या अनुषंगाने पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होण्याचे काम संस्था करत आली आहे. ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्टे हे मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे , ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा मिळून देणे , लोकव्यवहारात मराठीचा अधिकधिक वापर कसा होईल ह्यसाठी प्रचार करणे, मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या गोष्टी शक्य आहे त्या घडवून आणणे आहे. 'भाषा आणि जीवन' हे भाषाविषयास वाहिलेले त्रैमासिक मराठी अभ्यास परिषद १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित करत आली आहे. या त्रैमासिकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा १९९५ सालचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. या नियतकालिकात भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा व भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य असते. अश्या प्रकारे भाषाचिंतनाला वाहिलेले इतक्या प्रदीर्घ काळ प्रकाशित होणारे भारतीय भाषांमधले हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक आहे.


१ मे हा परिषदेचा स्थापना दिन. या दिवशी भाषाव्यवहार, भाषाभ्यास, भाषाजीवन असे विषय केंद्रस्थानी ठेवून व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र आयोजित केले जाते. भाषाभ्यासाच्या व्याकरण, कोशकार्य, शुद्धलेखन इत्यादी पैलूंविषयी चर्चा करणारे व्याख्यान आयोजित केले जाते. संस्थे तर्फे आयोजित केलेल्या चर्चासत्रांचे विषय हे त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन , भाषिक नीती आणि व्यवहार , प्रसार-माध्यमे आणि मराठीचा विकास आणि पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन आहे. मराठी अभ्यास परिषद कोश, बोलींचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील लेखनाला आणि लेखकांना २०१८ पासून दरवर्षी प्रा. ना.गो. कालेलकर यांच्या नावे परिषद पुरस्कार देत आली आहे. 


सचिन तळे 

Monday, 16 May 2022

राज्य मराठी विकास संस्था

 




भाषेचा विकास हा अखेर भाषिकांचा विकास असतो. परिभाषा, साक्षरताप्रसार, शुद्धलेखनसुधारणा या किंवा अशा मोजक्या अतिपरिचित विषयांमध्येच भाषेच्या विकासाचा विचार अडकून पडणे हिताचे नाही. विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान व्हावी ह्यासाठीमराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकासहे बोधवाक्य घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. संस्थेचा मुख्य हेतू हा मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन होय.


महाराष्ट्र शासनाने दिनांक २५ जून १९७९ रोजी मुंबई येथे `महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रशासनात मराठी भाषेचे स्थान' या विषयावर एक परिषद घेतली होती. त्या परिषदेत मराठी भाषेसाठी एक राज्यस्तरीय संस्था स्थापण्यात यावी, अशी सूचना पुढे आली. त्यासाठी एक अभ्यासगट निर्माण करावा लागला. त्या अभ्यासगटात प्रा. वसंत बापट आणि अन्य सदस्य म्हणून प्रा. मे.पुं.रेगे, प्रा. वसंत दावतर, डॉ. अशोक केळकर आणि प्रा. मं. वि.राजाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आलीसंस्थेचे नावराज्य मराठी विकास संस्था' (स्टेट इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ऑफ मराठी) असे ठेवण्यात आले. राज्य मराठी विकास संस्थेची मुद्रा ही आकाराने पिंपळपनासारखी असून ती मराठी वर्णमाला वापरून तयार करण्यात आली आहे.


संस्थेचे कामकाज नियामक मंडळाच्या सल्ल्यानुसार चालते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे नियामक मंडळाचे पदसिद्ध 'अध्यक्ष' असून मराठी भाषा मंत्री हे संस्थेचे पदसिद्ध 'उपाध्यक्षआहेत. मराठीच्या गुणवत्तासंवर्धनासाठी शिक्षक, शासकीय कर्मचारी, पत्रकार आदींच्या कार्यशाळा चर्चासत्रे आयोजिणे, कोशनिर्मिती प्रकल्प राबवणे, देवनागरी टंक निर्माती करणे , रंगवैखरी नाट्यविष्कार , दुर्मिळ ग्रंथाचे संगणकीकरण, अमराठी भाषिकांसाठी उपक्रम राबवणे इत्यादी उपक्रम संस्थेमार्फत चालवले जातातसंस्थेच्या मुख्य उद्दिष्ट्ये हे कृषी, वैद्यक, उद्योग, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे .व्यवहारक्षेत्रांत मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री विकसित करणे; तसेच भाषेशी संबंधित असलेल्या तंत्रविद्यांचा विकास करणे आहे. वेळोवेळी भाषिक पाहणीचे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून मराठीच्या विविध व्यवसायक्षेत्रांतील स्थितिगतीचे निरीक्षण करून त्यांचे समाज भाषावैज्ञानिक अहवाल शासनाला सादर करणे आहे. महाराष्ट्राची व्यवहारभाषा, प्रशासनिक भाषा आणि ज्ञानभाषा या तिन्ही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत् करणे आहे.



Tuesday, 10 May 2022

कोकण मराठी साहित्य परिषद

 

 


प्राचीन वाङ्‌मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे इथल्या भाषेवर त्याचा प्रभाव पडला. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. ह्या तीन राज्यांमध्ये सप्तकोकण विभागलेला जरी असला, तरी भाषा, वाङ्‌मय व संस्कृती यांच्या स्नेहधाग्यांनी आजचे कोकण, गोवा आणि कारवार हे प्रदेश आजही परस्परांशी बांधले गेले आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर मराठी साहित्यविश्वावर कोकणाचे नाव कोरण्याच्या उद्देशाने  २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषद ची स्थापना केली.

 

कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे हे जिल्हे आणि मुंबई शहर व उपनगर आहेत. कोमसापतर्फे ’झपूर्झा हे मराठी द्वैमासिक प्रसिद्ध होते. हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे.  कविवर्य केशवसुत यांच्या जन्मगावी, रत्नगिरीजवळ मालगुंड येथे केशवसुत स्मारकाची उभारणी हा ‘कोमसाप च्या कामगिरीतील मानाचा तुरा ठरला. कोकण मराठी परिषदेचा दुसरा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गोव्यात कोणारे “शेकोटी संमेलन आहे. लेखकाला अनुकूल भूमी निर्माण करून देणे, साहित्यप्रेम वृद्धिंगत करणे आणि संमेलनाच्या व्यासपीठावर केशवसुतांच्या कवितांचे सादरीकरण, राष्ट्रीय कवींच्या मुलाखती आणि आठवणीतल्या कवितांचे सादरीकरण असे अनेक उपक्रम परिषदे मार्फ़त राबवले जात आहे. तसेच कोकणातील साहित्यिकाना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात.

 

कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी मंगेश पाडगावकर , विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, विश्वास पाटील, अशोक नायगावकर, माधव गडकरी इत्यादी मान्यवर होते. ह्या संस्थे अंतर्गत जिल्हा साहित्य संमेलने हि भरवण्यात आले त्यात संमेलनाध्यक्ष पदी डॉ. अरुणा ढेरे , रामदास फुटाणे, डॉ. अनिल अवचट, अचला जोशी होते.  कोकणातील वाचन-लेखन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्टे आहेत. कोमसापने ५० हुन अधिक जिल्हा साहित्य संमेलने, तसेच महिला साहित्य संमेलने आणि १४ हुन अधिक मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत.

  @सचिन कृष्णा तळे 

 

 

 

 

Thursday, 5 May 2022

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

 


बालभारती हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला माहित आहे. बालभारती म्हणजे अनेक मराठी वाचकांचं बालपण. बालभारती ही राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. ह्या मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरली जात होती. या पुस्तकाचा दर्जा, किंमती मधील तफावत आणि त्यांची उपलब्धता पाहता विद्यार्थी अन शाळेची गैरसोय होऊ नये यासाठी कोठारी आयोगाने राज्याकडे स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस केली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारने २७ जानेवारी १९६७ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना केली. हीच संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.

विद्याविभाग, सामान्य प्रशासन विभाग, वितरण विभाग, वित्त विभाग, अंतर्गत-लेखापरिक्षण विभाग, निर्मिती विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग, किशोर विभाग असे मंडळाचे एकूण नऊ विभाग आहेत. मंडळाची मुख्य उद्दिष्टे हे शालोपयोगी पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तके विद्यार्थ्यांसाठी व्यवसायपुस्तके तसेच शिक्षणविषयक इतर साहित्य तयार करणे असून शिक्षणाच्या सर्वसाधारण दर्जामध्ये सुधारणा व्हावी या हेतूने अभ्यासक्रम पाठ्यक्रम तयार करणे, प्राथमिक माध्यमिक शिक्षण आणि शिक्षणाच्या इतर शाखा यांतील अभ्यासक्रम पाठ्यक्रम यांच्यात सुधारणा करणे आहे. कार्यकारी समिती, वित्त समिती, विद्यापरिषद,  संशोधनसल्लागार परिषद निर्मिती वितरण परिषद अश्या समित्यांमार्फत मंडळाचे व्यवस्थापन चालते. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी भाषा विषयांच्या एकूण सात समित्या आहेत मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी आणि इंग्रजी. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबरोबरच मंडळाने इयत्ता ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिगीतांचे एक पुस्तक तयार करून ते प्रसिद्ध केले आहे.

१४ नोव्हेंबर, इ. स. १९७१ पासून आठ ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी किशोर हे मासिक मंडळाने सुरू केले आहे . मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथील ‘ बालभारती ’ नामक इमारतीत असून निर्मिती विभाग वरळी (मुंबई) येथे आहे. यांशिवाय पुणे, नागपूर, मुंबई (गोरेगाव) व औरंगाबाद या चार ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक-भांडारे व वितरण केंद्रे आहेत. राष्ट्रीय प्रौढशिक्षणासाठी जी पाठ्यपुस्तके, पूरक साहित्य आणि अध्यापन साहित्य तयार करते, त्यांची छपाई, निर्मिती आणि वितरण यांचे काम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ह्यांच्या कडे आहे. राज्याचे शिक्षणमंत्री शिक्षण संचालक हे मंडळाचे अनुक्रमे पदसिद्ध अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत.


सचिन कृष्णा तळे 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale