प्राचीन वाङ्मयात
सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ
अशा राज्यात विभागला गेला आहे. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय
भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे इथल्या भाषेवर त्याचा प्रभाव पडला. कोकणाची सीमा
ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. ह्या तीन राज्यांमध्ये सप्तकोकण
विभागलेला जरी असला, तरी भाषा, वाङ्मय व संस्कृती यांच्या स्नेहधाग्यांनी आजचे कोकण,
गोवा आणि कारवार हे प्रदेश आजही परस्परांशी बांधले गेले आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर
मराठी साहित्यविश्वावर कोकणाचे नाव कोरण्याच्या उद्देशाने २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी ६४व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी
येथे कोकण मराठी साहित्य परिषद ची स्थापना केली.
कोकण मराठी
साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे हे
जिल्हे आणि मुंबई शहर व उपनगर आहेत. कोमसापतर्फे ’झपूर्झा’ हे
मराठी द्वैमासिक प्रसिद्ध होते. हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे. कविवर्य केशवसुत यांच्या जन्मगावी, रत्नगिरीजवळ
मालगुंड येथे केशवसुत स्मारकाची उभारणी हा ‘कोमसाप’ च्या
कामगिरीतील मानाचा तुरा ठरला. कोकण मराठी परिषदेचा दुसरा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे
गोव्यात कोणारे “शेकोटी संमेलन’ आहे. लेखकाला अनुकूल भूमी निर्माण करून
देणे, साहित्यप्रेम वृद्धिंगत करणे आणि संमेलनाच्या व्यासपीठावर केशवसुतांच्या कवितांचे
सादरीकरण, राष्ट्रीय कवींच्या मुलाखती आणि आठवणीतल्या कवितांचे सादरीकरण असे अनेक उपक्रम
परिषदे मार्फ़त राबवले जात आहे. तसेच कोकणातील साहित्यिकाना कादंबरी, कथासंग्रह, कविता,
चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका
या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात.
कोमसापची
मध्यवर्ती साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी मंगेश पाडगावकर , विंदा करंदीकर,
नारायण सुर्वे, विश्वास पाटील, अशोक नायगावकर, माधव गडकरी इत्यादी मान्यवर होते. ह्या
संस्थे अंतर्गत जिल्हा साहित्य संमेलने हि भरवण्यात आले त्यात संमेलनाध्यक्ष पदी डॉ.
अरुणा ढेरे , रामदास फुटाणे, डॉ. अनिल अवचट, अचला जोशी होते. कोकणातील वाचन-लेखन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्नशील
राहणे हे ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्टे आहेत. कोमसापने ५० हुन अधिक जिल्हा साहित्य
संमेलने, तसेच महिला साहित्य संमेलने आणि १४ हुन अधिक मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली
आहेत.

No comments:
Post a Comment