दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषेच्या विकासाची दालने खऱ्या अर्थाने मराठी माणसांसाठी खुली झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृति आणि ज्ञाननिर्मीती यांचा विकास करण्याकरिता जी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली त्यात महत्वाचं पाऊल म्हणजे साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना. या मंडळ अंतर्गत मराठी विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला.
मानवविद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन ज्ञान शाखांमध्ये जेवढे विषय असतील, त्या सर्वांची माहिती मराठी वाचकांना उपलब्द करून द्यावी हे विश्वकोशाचे प्रमुख उद्दिष्टे. याच विश्वकोशाची वाढ व व्याप्ती लक्ष्यात घेऊन १ डिसेंबर १९८० रोजी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन आणि प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मती मंडळाची स्थापना करण्यात आली. प्राज्ञ पाठशाळेच्या माध्यमातून संस्कृतचे अध्ययन करणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर हि जवाबदारी आली आणि मराठी विश्वकोशाचे कार्य सुरु झाले. विश्वकोशाचे संपादकीय कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या वास्तूची पायाभरणी दि ११ ऑक्टोबर १९५९ रोजी वाई जिल्हा सातारा येथे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले.
२००८ साली मराठी विश्वकोशाच्या १८ व्या खंडाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रकाशन समारंभात मा. विलासराव देशमुख यांनी विश्वकोश हा कोशात न राहता तो जगात पोहचावा ही भावना व्यक्त केली. खंड २० चे प्रकाशन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते जून २०१५ मध्ये करण्यात आले. ज्ञानमंडळ या योजनेस मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांशी सामंजस्य करार करून त्या-त्या विद्यापीठातील तज्ज्ञांकडे त्यांच्या-त्यांच्या विषयांच्या संपादनाची जबाबदारी सोपविली गेली आहे. अशा पद्धतीने सामंजस्य करार करून आजवर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था यांच्या पालकत्वाखाली ज्ञानमंडळांतर्फे संपादनाचे कार्य सुरू आहे. ज्ञानमंडळाची ही योजना व्यापक स्वरूप असणारी असल्याने तिला राज्यातील सर्वच तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक, संशोधक आणि विविध विद्याशाखीय संस्था यांचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग मिळतोय. महाराष्ट्रातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था यांनी मराठी विश्वकोशाच्या या ज्ञानमंडळात सक्रिय योगदान द्यावे यासाठी राज्यपालांनी कुलपती म्हणून आवाहन करावे यासाठी मा. दिलीप करंबेळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम विद्यासागर राव यांची भेट घेतीली होती. मुलांचा विश्वकोश या योजनेखाली बालविश्वकोश आणि कुमारविश्वकोश प्रत्येकी १२ खंडात तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून कुमारविश्वकोश खंड २ ते ११ चे संपादन-प्रकाशन करण्याचे काम चालू आहे. मराठी विश्वकोश निर्मितीमागे जनतेच्या भाषेत ज्ञानसंक्रमण करणे हीच सांस्कृतिक भूमिका आहे.