Wednesday, 27 April 2022

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद

 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद




मनामनाला साऱ्या जनाला जोडीत जाते माती

ना धर्माचा ना जातीचा ध्वज बंधुतेचा हाती

स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय ह्या चार मूल्यांच्या संवर्धनहेतू माणसाने माणूस म्हणून जगण्याहेतू समाजात काही ठोस पाऊले उचलणे गरजेचे होते. धर्मापलीकडे जातीपलीकडे आपण माणूस आहोत आणि माणूस ह्या नात्याने बंधुता हि प्रत्येकाच्या मनात कोरली गेली पाहिजे.  माणसाने जातीधर्माचा पिंजरा तोडून मोकळा श्वास घ्यावा ह्यासाठी आणि हि बंधुता चळवळ घरोघरी पोहचावी ह्यासाठी प्रकाश मुरलीधर रोकडे ह्यांनी चौदा वर्ष सेवा शिल्लक असतानाहि वयाच्या ४५ व्या वर्षी स्वेच्छने सेवानिवृत्ती घेतली. ह्या चाळीस वर्षात आज बंधुता चळवळ हि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात पोहचली आहे.

राष्ट्रीय बंधुता परिषद ही ६ डिसेंबर १९८९रोजी स्थापन झालेल्या सम्यक सहकार आंदोलन या संस्थेतून निर्माण झालेली एक साहित्यिक संस्था आहे. ‘गर्वसे कहो हम बंधू हैं हे या संस्थेचे ब्रीदवाक्य असून संस्थेच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. ह्या संस्थे मार्फत साक्षरता अभियान, बालविकास तसेच प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने आपापसात मैत्री कारण्याहेतू "धर्ममैत्री" अभियान सुरु आहे. "मानवतेच गाव " हि व्याख्यानमाला भरवण्यात येते." आरोग्य रक्षक घरोघरी ", " केशर माती आभाळ नाती ", " माणसाच्या दारी प्रबोधन वारी" अश्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम संस्थे द्वारा राबवले जातात. डॉ. संगीता बर्वे ह्यांच्या अभ्यासात्मक विवेचनातून "आम्ही सावित्र्याच्या लेकी" ह्या काव्यसंमेलनचे आयोजन केले जाते. बंधुता ह्या विषयांवर ज्यांनी काव्य लिहिले आहे त्यांना "काव्यपंढरी" ह्या व्यासपीठावरून कविता सादर करण्याची संधी दिली जाते. संस्थे तर्फे पुस्तक प्रकाशन, चर्चासत्र, मेळावे, शिबिरे आणि विविध विषयांवर परिसंवाद भरवून साहित्यिकांना मार्गदर्शन करून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे कार्य हि चालू आहे.

बंधुता साहित्य परिषद संस्थेने आजवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, आम्ही भारतीय साहित्य संमेलन, राजर्षी शाहू महाराज साहित्य संमेलन, कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन, संत गाडगे महाराज साहित्य संमेलन, साने गुरुजी साहित्य संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, तथागत भगवान गौतम बुद्ध साहित्य संमेलन, संत साहित्य साहित्य संमेलन, स्त्री साहित्य साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन, विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, आदी संमेलने भरवली आहेत. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ’बंधुता साहित्य संमेलने ही बहुतेक संमेलने पुणे जिल्ह्यात भरली गेली आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

Thursday, 21 April 2022

गुन्हेगारीच्या विश्वातल्या शोधकथा

 

गुन्हेगारीच्या विश्वातल्या शोधकथा


क्राईम च्या घटना ह्या आपल्याला नव्या नाही. आपल्या आसपास , शेजारी किंवा ऑफिस किंवा मित्र परिवारात कुठे ना कुठे गुन्हा हा घडत असतो मग तो अंधारात असो किंवा उजेडात. ह्याच गुन्हेगारीवर आधारित काही बातम्यांचे सत्र हि चालू असते. ते आपण पाहतो कारण गुन्हा कसा घडला का घडला हे पाहताना आपल्याला उत्सुकता लागलेली असते. समोरच्या हातून गुन्हा का घडला ? हत्येचे कारण काय ? पोलिसांनी त्याचा तपास कसा केला? ह्या शोधमोहिमेत पोलिसांना काय त्रास झाला ? त्यातून त्या गुन्हेगाराला काय शिक्षा झाली ? असे अनेक प्रश्नाचे उत्तर आपण त्या मालिकेतून पाहत असतो. पण त्या टीव्ही वरच्या त्या मालिका पाहण्यापेक्षा शब्दांच्या चौकटीत असणाऱ्या क्राईमच्या कथा वाचण्यात आणि त्या समजावून घेण्यात एक वेगळीच नशा आहे.

 

प्रा. अनंत वासुदेव वाईकर ह्यांच्या " माझ्या बायकोला फाशी द्या " ह्या त्यांच्या दहाव्या पुस्तकात रसिकांना वाचकांना अश्याच काही रहस्यमय कथा वाचायला मिळतात. पुस्तकाचं शीर्षक पाहून तुम्हाला काहीतरी वंगाळ वाटेल पण पुस्तकातील कथा वाचताना तुमची उत्सुकता कुठे हि कमी पडणार नाही अश्या प्रकारे पुस्तकात कथांची मांडणी केली आहे. गुन्हेगारीच्या विश्वातल्या एकूण आठ कथा ह्या पुस्तकात असून १७६ पाने आहेत. या कथासंग्रहातील कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत लेखकाच्या विचारातून मांडलेली आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथेत खुनासारखी खळबळजनक घटना घडलेली असून त्या घटनेला जबाबदार असणारा गुन्हेगार इन्स्पेक्टर व्ही. अनंत पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसोबत शोधून काढताना दिसतात. "माझ्या बायकोला फाशी द्या" , "निष्पाप बाली" ," शाल आणि उशी ", " जखम " , " निर्दोष दोषी " , " मेंदीने रंग भरला " , " एक म्यान दोन तलवारी " , " अपहरण " अश्या आठ कथा आहेत .

 

ह्या कथेतील कथा ह्या काल्पनिक जरी असल्या तरी लेखनातील सर्व घटना ह्या सामान्य वाचकाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या आहेत असे लेखकाला वाटते. वाचक हे पुस्तक वाचताना रममाण होऊ शकेल. पुढे काय घडणार आहे ? खरा अपराधी कोण आहे ? अश्या अनेक प्रश्नात वाचक गुंतून राहील तसेच त्याबद्दल उत्सुकता वाटेल अशी अपेक्षा प्रा. अनंत वासुदेव वाईकर ह्यांना वाटते.

 

पुस्तक - माझ्या बायकोला फाशी द्या

लेखक - प्रा अनंत वासुदेव वाईकर

प्रकाशक - संस्कृती प्रकाशन

किंमत - २५०

Wednesday, 20 April 2022

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ

 



मुस्लिम समाजात जी बोली भाषा वापरली जाते त्यात प्रामुख्याने उर्दू अन हिंदी भाषेचा प्रभाव हा जास्त असतो. काही ठिकाणी पारशी शब्दांचा वापर हि ते करताना दिसतात. ज्या मुस्लिम परिवाराचा जन्म हा महाराष्ट्रात झाला आणि ज्यांनी त्यांचे शिक्षण हे मराठी भाषेतून केले अश्या लोकांच्या मराठी भाषेला एक लय दिसून येते. महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण हे मराठीत लेखन करू पाहतात. त्या लेखनाचे प्रकाशन व्हावे त्यांना व्यासपीठ मिळावे त्यांचे साहित्य महाराष्ट्रात मराठी वाचकांपर्यन्त पोहचावे अशी त्या तरुणांची इच्छा असते. अश्या मुस्लिम लेखकांना मार्गदर्शन अन उत्तेजन मिळण्या हेतूने मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ ची स्थापना झाली. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुसलमान मराठी साहित्यिकांनी भरवलेले साहित्य संमेलन होय.

सण १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, इकबाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. ह्या मंडळा तर्फे तरुण मुस्लिम लेखक-कवींना योग्य लेखन-मार्गदर्शन करणे, त्यांच्या लेखनाला काव्याला प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी माध्यम उपलब्ध करूण देणे, नवलेखकांसाठी शिबिर भरवून त्यांना योगे ते मार्गदर्शन करणे अश्या विविध उपक्रम राबवले जातात.   या चळवळीची साहित्य संमेलने या आधी सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे येथे झाली आहेत. जी संमेलने औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई व जळगाव आदी शहरांत झाली, त्यावेळी उस्मानाबाद येथील डॉ. बशारत अहमद, अहमदनगर येथील डॉ. बशीर मुजावर, रायगड येथील प्रा. फातिमा मुजावर व पुणे येथील डॉ. ए.के. शेख हे त्यांपैकी एकेका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

अनेक मुस्लिम साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली त्यात ए.के. शेख, बदीऊज्जमा बिराजदार उर्फ (साबिर सोलापुरी), मसूद पटेल, पद्मश्री डॉ यू. म. पठाण, जावेद कुरेशी, अजीज नदाफ, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, मुबारक शेख, बाबा मुहम्मद अत्तार, हुसेन जमादार, कलीम खान तसेच महाराष्ट्राचे लाडके गझलकार इलाही जमादार आहेत. मुस्लिम मराठी साहित्यिक हे सुद्धा मऱ्हाटी संस्कृतीचे व मराठी वाङ्मयाचे अविभाज्य घटक व वारसदार आहेत. अन्य मराठी साहित्यिकांप्रमाणे महाराष्ट्रीय मुसलमान साहित्यिकही विविध लेखन प्रकारांतील यशाची शिखरे निश्चितपणे गाठतील अशी माफक अपेक्षेवर ह्या मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ चे कार्य चालू आहे.


सचिन कृष्णा तळे 

Thursday, 7 April 2022

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (द म सा)

  





 

सांगली, सातारा, सोलापूर अन कोल्हापूर हे चार जिल्हे म्हंणजे आपलं दक्षिण महाराष्ट्र. शेती अन कारखान्यांसाठी तसेच कामगारांचा प्रदेश म्हणून ओळख असणाऱ्या ह्या भागाला खूप मोठा सांस्कृतिक अन अध्यात्मिक वारसा हि लाभलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची, छत्रपतींच्या स्वराज्याची, साहित्यकारकांची अन देवांची हि देवभूमी म्हणजे आपली दक्षिण महाराष्ट्र. ह्या दक्षिण महाराष्ट्रात अनेक कवी, विचारवंत, रसिक तसेच अनेक नवोदित लेखक उदयास येत आहेत. ह्या सर्वांसाठी एका व्यासपीठाची गरज निर्माण झाली होती आणि ह्याच विचारांवर १९८२ साली यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना झाली. द म सा हि एक महाराष्ट्रातील महत्वाची साहित्यसंस्था आहे. तीन दशकांहून अधिक काळ ती पश्चिम महाराष्ट्र व सीमावर्ती भागात वाङ्मयीन सुरुपाचे कार्य करीत आहे.

 

दक्षिण महाराष्ट्र, बेळगाव, कारवारपर्यंत पसरलेल्या गोवा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच कोकण मुलुखातील साहित्यिकांसाठी चर्चा, मंथन, मार्गदर्शन आणि उदबोधन करण्या हेतू कृ गो सूर्यवंशी ह्यांच्या अध्यक्षतेखाली १४ एप्रिल १९८२ रोजी कोल्हापूर इथे ह्या संस्थेचे कार्य सुरु झाले. ह्या संस्थे मार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहे त्यात प्रामुख्याने साहित्यिकांचे मेळावे, कृतिसत्रे, चर्चासत्रे, कार्यशाळा, नवलेखक शिबीर, परिसंवाद भरवणे, पुरस्कार प्राप्त लेखकांचा सत्कार करणे, ग्रंथ प्रकाशन करणे तसेच ग्रंथ स्पर्धा घेऊन पुरस्कार हि दिले जातात. मराठी वाचकांसाठी वाचकांची अभिरुची समृद्ध व्हावी, नवोदित लेखक, कवी, समीक्षक याना व्यासपीठ लाभावे यासाठी द म सा तर्फे दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्यात येते. संस्थे मार्फत ग्रामीण शब्दकोश समिती स्थापन केली असून "ग्रामीण शब्दकोश" तयार करण्याचं काम हि चालू आहे. तसेच ह्या संस्थे तर्फे "दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका" या त्रैमासिक अंक नियमितपणे प्रकशित केला जात आहे. कथा, कविता, समीक्षा विषयक लेख, पुस्तक परिचय या स्वरूपाच्या प्रस्थापित आणि नवोदित लेखकांच्या लेखनातून ह्या त्रैमासिक ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

 

सध्या द म सा चे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संस्थेचं कामकाज चालू आहे.  मेहता पब्लिशिंग हाऊस फाऊन्डेशन पुणे तर्फे देण्यात येणार प्रथम क्रमांकाचा "स्वामी" कार "रणजित देसाई पुरस्कार" ने या संस्थेचा गौरव हि करण्यात आला अशी माहिती डॉ. विनोद कांबळे ह्यांनी दिली. ह्या संस्थेची महत्वाची बाजू म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात जी छोटी साहित्य संमेलन भरवली जातात जसे कि "ग्रामीण साहित्य संमेलन" "जागर कलासाहित्य संमेलन" याना मार्गदर्शन करून त्यांना योग्य ते सहाय्य केले जाते. महाराष्ट्रातील संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांचे लेख प्रसिद्ध करून, साहित्यिक उपक्रम राबवून वाङ्मयीन चळवळ पुढे नेणारी हि संस्था असल्याने तिचे एक वेगेळेपण सिद्ध झाले आहे.


सचिन कृष्णा तळे 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale