Friday, 31 May 2019

एका झाडाच्या पायथ्याशी


एका झाडाच्या पायथ्याशी
बाळ होती हिरवळलेली
नाजूक त्यांच्या पातीवर
निसर्गाची होती सावली

लाला माती थोडी दगडी
अवतीभवती होती वेली
छोट्या छोट्या फुलांनी
चिमुकल्या पाकळ्यांनी

त्यावर सोनेरी किरणे
फुलपाखरांचे फिरणे
वाऱ्याची झुळूक होती
होती काही रानपाखरे

शेजारी वाहत होती
सुंदर चंचल एक नारी
तिच्या शुभ्र दुधाने
हिरवळ होती बहरलेली

माणसांना हवी हवीशी
ती गवताची पात होती
नाजूक पानांची वेल होती
एका झाडाच्या पायथ्याशी


सचिन कृष्णा तळे














Sunday, 26 May 2019

ती बाग रुसलेली


लोकांच्या वस्तीमध्ये
उंच उंच इमारतीमध्ये
कुठेतरी कोपऱ्यामध्ये
सजलेली बाग दिसे

जिथे हिरवळ कुंचलेली
जिथे झाडी खुंटलेली
जिथे छोट्या कुंडीमध्ये
मोठी झाडे सजवलेली

तिला बाग म्हणावे का
तिला गार्डन म्हणावे का
निसर्गाला कैद केलेली
तिला खोली म्हणावी का

माणसाने माणसासाठी
कोणीतरी नावासाठी
स्वच्छ सुंदर क्षणासाठी
कल्पनेची कला ती

असली थोडी नकली
थोड्याच जागेमधीं
ती बाग रुसलेली
दिसते मला कैदी

तिच्या भोवती पिंजरा
सोबत मालकाचा पहारा
दिवसातून एकदाच
मिळे नळातील पाणी

तिच्यासाठी कैची असते
तिच्यासाठी उंची नसते
घरातल्या त्या बागेमध्ये
निसर्गाची मिठी नसते

सचिन कृष्णा तळे



Monday, 20 May 2019

नव्या कवींची कविता



साहित्य हे समाजाचा वास्तविक आरसा आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांवर तर काल्पनिक चित्रांच्या तीरावर सरस्वतीचं हे गाव वसलं आहे. जिथे शब्दांचं भांडार आणि शब्दांचा मार तर शब्दांचा आधार आहे. जिथे शब्दांचा खेळ रंगतो तिथे काव्याची अन कवीच्या कल्पनेची जादू हे चालणारच. मोजक्या शब्दात विश्वाची रचना विश्व दाखवण्या ची ताकद फक्त कवितेत आहे. साहित्याच्या मंदिरावर कविता हे सोनेरी कळस आहे. अभंग , संत वाणी , गाणी , पोंवडा , सोहळा , शाहिरांची बोली , सावरकरांची ती बंदिस्त खोली , महाभारताची कहाणी , स्वतंत्रतेचे उभारणी , सुख दुःखाची काळजी , आई ची अंगाई , बालपणाची आठवणी , नात्याची शहनाई , दुष्काळाची आरोळी कुठं कुठं नाहीय कविता . गझलांमधुन वृत्तांमधून छंदामधून ते सात सुरांच्या भेटीमधून , प्रेमातून विरहातून नात्यातून ते निसर्गाच्या मिठीतुन फुलापानांच्या श्रावणी सोहळ्यातून , अश्रूं पासून पावसाच्या थेंबातुन , एकांतात , चार चौघात  फक्त कविता आणि कविताच तर आहे. बोलता बोलता बोली जाणारी शायरी ते लग्नात नवरा नवरी घेणारी नावे कवितांच्या चार ओळी .

कुठलीही कलाकृती हि कलावंतांच्या कल्पनाशक्तीने यशस्वी अन सुंदर होते. अशीच अनेक कलाकृती अनेक कवींनी त्यांच्या शब्दातून जिवंत ठेवली. आज हि जुन्या कविता आपल्याला जितक्या आवडतात त्याच ताकदीचे नव्या कविता लिहिणारे कवी आणि त्यांची लेखणी आहे. नव्या कवींची कविता म्हणजे सारस्वताच्या झाडावर फुटलेली पालवी आहे आणि ती जपणे आजच्या पिढीचे कर्तव्य. गर्भांतून जेव्हा मुलं बाहेर येत तेव्हा होणार तो त्रास आणि आनंद असतो तो कवी चा अनुभव आहे. कविता जन्माला घालताना त्याची मांडणी करताना त्याला जगासमोर सादर करताना प्रत्येक कवी हा श्रोत्यांकडून प्रेक्षकांकडून रसिकांकडून व्हा व्हा ची आशा बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेली कविता काही क्षण समोरच्या व्यक्तीला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. त्याच्या कानावर कवीचे शद्ब हे अमृताचे बोल जणू.

चित्रकाराने रंग भरून रेखाटलेले चित्र जितके मोहक तितकेच कवीने शब्दातून रेखाटलेले काव्य चित्र सुंदर असतं. आजच्या काळात एक उदासीनता अशी हि आहे . नव्या कवींची कल्पना आपण लवकर स्वीकार करत नाही किंवा त्याला प्रोस्थाहन देण्या ऐवजी त्याचे खच्चीकरण केले जाते. प्रत्येक कवी हा कविप्रतिभेच्या आविष्कारातून रूपकातून व्यक्त होत असतो. कवीमनाचा एखाद्या वस्तूशी, घटनेशी , प्रसंगाशी संपर्क येतो. त्यातून त्याची मानसिकता विकसित होत जाते, त्या मानसिक अवस्थेतून अनेक प्रतिमा तयार होते , त्यातुन जे उत्तम आहे त्या प्रतिमेला घेऊन कवी एक मांडणी करतो नंतर ती कविता लोकार्पण केली जाते. त्याला संगीताची जोड मिळता ती फुलपाखरा सारखी अनेकांना मोहून घेते. पूर्वी राजदरबारी कवीला मानाचं स्थान असायचं त्याच्या शब्दाने राजदरबार रंगत होत. आज किमान लोकांच्या धगधगत्या जीवनातून थोडा वेळ नव्या कवींच्या कवितेला आणि त्यांच्या काव्य संग्रहाला मिळो.

सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६








Friday, 10 May 2019

राजकारण मुक्त भारत हवं


राजकारण मुक्त भारत हवं


सागराच्या लाटा जेव्हा किनाऱ्यावर येऊन धडकतात तेव्हा त्या सोबत शंख शिंपल्या तसेच मनाला स्पर्श करणारा एक आनंद मिळतो पण कधी कधी मानवनिर्मित मानवाने विसर्जित केलेली घाण देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी तसेच माणसाचं मन आणि विचार आहेत . रोज हजारो विचाराने आपले मन विचलित तर कधी आनंदी होत असतं आणि कधी कधी ह्याच विचारातून आपण निर्णय घेतो. खरं सांगायचं तर अगदी त्याच प्रमाणे माणसाच्या मनावर मानवानेच निर्माण केलेले अनेक चांगले वाईट घटना प्रसंग वातावरणाला सामोरे जावे लागते. घराच्या चार भिंती मध्ये घडणाऱ्या गोष्टी मुळे फक्त घरातल्या वातावरणात फरक पडतो पण देशाच्या सीमे अंतर्गत घडणाऱ्या गोष्टी मुळे सगळं समाज विचलित होतो. इथला प्रत्येक व्यक्ती आज सोशल मीडियावर आहे आणि त्याच सोशल मीडियावर तो सहज व्यक्त होतो . सोशल मीडियावर आज जोरदार एक शीत युद्ध चालू आहे. इथे वैचारिक लढाई सोडून एकमेकांबद्दल द्वेष आणि त्या द्वेशातून माझा देश बिघडतोय आणि त्यासाठी जिम्मेदार हे आजचे राजकीय पुढारी नेते. घरातले चढउतार फक्त एका घरा पुरते सीमित असतं जर देशात चढ उतार झाले तर लाखो घरांचे दार अश्रूंच्या पुराणे वाहून जातील.

राजकीय सत्ता आणि त्या सत्तेची लालच तसेच स्वतःच अस्तित्व गाजवण्यासाठी नेते मंडळी वाटेल ती शाब्दिक चिखलफेक करतायत. एक काळ असा पहिला होता जिथे नेते म्हणजे आदर्श मानले जायचे आणि आज असा काळ अनुभवतोय पाहतोय  जिथे नेते ह्याच सोशल मीडियावर शिव्या खातायत ,भर रस्त्यात कोणीतरी येऊन कानाखाली वाजवतॊय. इथले राजकीय समर्थक नेत्याची भूमिका डोक्यावर घेऊन त्यांच्या विरोधी जो बोलेल त्याला मारहाण करून कोणाच्या प्रश्न सोडू इच्छितात हे त्यांनाच माहित. देशाची नाही तर स्वतःची इमेज प्रतिमा तयार करण्यात इथला प्रत्येक नेता आणि त्या नेत्याची समर्थक एकमेकांविरोधी भिडले आहेत. बरेच वेळा ह्याच नेत्यांकडून अशी काय भाषणे होतात कि ती कॉमन म्यान सामान्य माणूस हा फक्त मनोरंजन म्हणून पाहतो. त्यांच्या भाषणातून माणूस माणसाविरोधी , एक समाज दुसऱ्या समाजविरोधी , एक धर्म दुसऱ्या धर्माविषयी बोलतो भांडतो तिरस्कार करून दंगलीच रक्तरंजित राजकारण खेळतो आणि ह्या खेळात सामान्य माणूस चिरडला जातो मारला जातो . पक्षाची भूमिका महत्वाची पक्ष महत्वाचा पण राष्ट्र नाही , नेता महत्वाचा नेत्याची भाषणे महत्वाची पण देश आणि देशाची नियमावली महत्वाची नाही.

मनात अनेक प्रश्न असतात आणि कालांतराने ते सुटतात देखील पण सगळयात भयानक आणि गंभीर असा एकच प्रश्न देशाचा विकास जनतेचा विकास . शेतकऱ्यांची आत्महत्या , वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी रॊजगारी तसेच शहरीकरणात अपुरी पडणारी जागा , जगातिक स्तरावर देशाचं स्थान , सीमेवर होणारे रोजचे आघात , बलात्कार आणि पैशाचा काळ बाजार. असे बरेच प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर देशाला कधी मिळनार. कोण देशाला ह्या सगळ्या प्रशांतून बाहेर आणणार . असा कोणता नेता आहे जो निस्वार्थी देशासाठी जनतेसाठी भाषणे करतोय . असा कोणता नेता आहे जो त्याच्या सभेतून जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर शोधून लोकांना पटवून देतोय ? निवडणुकीत घरा बाहेर पडून आव आणणारे नेते दुष्काळाची तळमळ निवडणुकीच्या तोंडावर दाखवणारे नेते सत्ता असतानां आणि नसताना उपाय योजना का आणू शकत नाही. माझा देश हा माझा देह आहे. जर माझा देश बिघडला तर माझे घर हे आपोपाप बिघडेल. नेत्यांचे भाषणे आस्वासने आणि भ्रष्टाचार त्यातून अपुरी सुविधा. हे आता कुठंतरी थांबलं पाहिजे आम्हाला आझादी हवी स्वच्छ सुंदर भारतातुन राजकारण मुक्त भारत हवं.

सचिन कृष्णा तळे
तिरुपती निवास
लेन नंबर , सुखसागर नगर भाग
कात्रज , पुणे
७७०९०९९६४६



Thursday, 2 May 2019

मुंबई ते पुणे




गावाकडच्या प्रत्येक माणसाला शहरी जीवनाचं आकर्षण असत कारण तिथे सहज मिळणाऱ्या सोयी सुविधा . आणि शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला गावाकडची ओढ असते कारण तिथे मिळणारी शांतात , निसर्गाची माया . पण माझा प्रवास हा शहराकडून एका शहराकडे झाला. म्हणजेच मुंबई ते पुणे . खूप वेळा मुंबईच्या किनारी नशीब अजमावून पाहण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. भारताच्या कोण्या कोपऱ्यातून माणसं नशीब अजमावायला अन रोजगार अन स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुंबईची वाट धरतात आणि माझ्या सारखे भूमी पुत्र मुंबईत जन्म शिक्षण पूर्ण करून मुंबईची वाट सोडून परदेशी नाहीतर पुणे गाठतात .  मुंबईने मला जन्म दिल लहानच मोठं केलं आणि पुण्याने माझ्या स्वप्नांना साकार केलं.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत नोकरीचा शोध सुरु केला . कॉमर्स साईट मग नोकरी फक्त मार्केटिंग आणि सेल्स ची . धरसोड चालूच होती . महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आयुर्विमा महामंडळ चा एजंट झालो आणि पॉलिसी काढत फिरू लागलो. त्यामुळे नोकरी शोधताना अनुभव पाहून फिल्ड वर्क शिवाय कोणतंच काम मिळत नव्हतं. पॉलिसी काढत एका गोडाऊन मध्ये मटेरियल स्टोरेज काम शिकलो. पुण्यात भावाच्या ओळखीने मग ह्याच फिल्ड मध्ये मला नोकरी मिळाली . पिरंगुट इथे मी स्टोर किपर म्हणून काम करू लागलो. घरापासून दूर मुंबई सोडून माझी पहिली नोकरी २००८ पासून चालू झाली ते हि महिना ३५०० रुपये पगारावर . आमची परिस्थिती तशी चांगली नव्हती आई वडील दोघे हि शिलाईचं काम करत होते मग कधी कधी आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण आम्ही दोघे त्यांना हातभार लावत असो . हातपाय हलवल्याशिवाय पैसा नाही . कधी कधी वरण भात वर नाहीतर पिठलं भाकर नाही तर मिरची आणि तेल आणि चपाती . पण आमच्या आई वडिलांची एक इच्छा होती मुलांनी शिकावं मोठं व्हावं.

नोकरी करून महिना पगार मिळत होता. पण काही तरी करण्याची आणि नाव कमवण्याची जी धडपड होती ती मिळत नव्हती. मुंबईत असताना एका राजकीय  पक्षातर्फे अनके सामाजिक कार्य केले आणि माहितीच्या आधाराखाली अनेक विषय जनतेसमोर आणले आणि त्याची दाखल अनेक वृत्तपत्राने घेतली . अधून मधून लेख प्रकाशित होत होते . महाविद्यालयं शिक्षण पूर्ण करत मी पत्रकारिता पूर्ण केली . त्यामुळे सामाजिक अन राजकीय गोष्टींना जवळून पाहता आलं. पण पुण्यात नोकरी आणि फक्त  नोकरीच होती . त्यात वाचन चालू केलं. पुन्हा लिहायला सुरवात केली . आणि हे करत असताना अनिमेशन चा कोर्स पूर्ण केला . पुन्हा पुणे सोडून मुंबईची वाट धरली आणि १५०० रुपये पगारावर मुंबईत पवई मध्ये अनिमेशन काम करू लागलो . ती पण फिल्ड अशी कि प्रोजेक्ट संपला तर घरी प्रोजेक्ट असला तर काम आणि पगार दोन तीन महिन्यातून एकदा . वडिलांना हे आवडलं नाही आणि त्यांनी मला पुन्हा पुण्यात जाण्यास सांगितलं . मी पुन्हा पुण्यात नोकरी करू लागलो. अनुभवाने माझ्या नावापुढे स्टोर किपर चा स्टॅम्प हा असा बसला होता कि मी दुसरी कडे कुठे हि ह्याच पोस्ट साठी सिलेक्ट होत होतो . अनुभव तो हि फक्त कारखान्यात भंडारपाल म्हणून त्यामुळे मुंबईत जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले. मुंबईत कारखाने राहिलेच नाही नवी मुंबईत आहे ते हि अखेरचा श्वास घेत आहेत .

पिरंगुट , कर्वे रोड  ते शिक्रापूर ते शिवणे ते कात्रज हा पुण्यातला प्रवास . मी खऱ्या अर्थाने जगासोमर आलो ते पुण्यातुन . माझे प्रकशित साहित्य  वाचून अभिमानाने त्यांच्या मित्रांना दाखवणारे माझ्या वडिलांचे छत्र एकदिवस हरवरलं . एका महिन्यात बहीण लग्न, आई एकटी आणि पुण्यात नोकरी . नोकरी सोडावी लागली बहिणीचं लग्न पार पाडलं आईला पुण्यात घेऊन आलो. सहा महिने नोकरी नाही पगार नाही पैसा नाही . माझी आई आणि मी दोघे हि असेच दिवस काढत होतो आणि मी नोकरी साठी वणवण फिरत होतो . एक दिवशी नवी मुंबईत आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी नोकरी मिळाली आता परत मुंबईत जाण्याची इच्छा नव्हती मग पुण्यातच स्थायिक झालो .

पुण्यात माझी ओळख लेखक , गीतकार , कवी तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून झाली . लहानपणी विमान पाहताना प्रश्न पडायचा कि आपण कधी बसणार विमानात . पण ज्या कंपनीत मी आता कार्यरत आहे तिथे हि संधी भेटली. माझं पहिला विमान प्रवास हा पुण्यातून झाला . माझं पाहिलं गीत आदर्श शिंदेच्या आवाजात गायलं गेलं ते हि पुण्यातच . माझं पहिल्या चित्रपटात नाव झळकलं ते हि पुण्यातून . माझे सर्वात जास्त लेख आणि कविता प्रकाशित झाले ते पुण्यातून. मी पहिली कविता सादर केली ते पुण्याच्या बालगंधर्व सभागृहातून. सायकल कधी घेतली नाही पन पहिली टू व्हीलर घेतली ती पुण्यात आणि मुलगी हि पुण्यातलीच भेटली . चित्रपट महामंडळ आणि फ्लिम रायटर्स असोसिएशन सदस्य पुण्यातूनच मिळालं. माझ्या आगामी नवीन चित्रपटाचं लेखन हे पुण्यातूनच करतोय.

प्रत्येक माणसाला गरज असते ती पैशाची , पैसा साठी चांगली नोकरी ची, नोकरी सोबत छोकरी आणि स्वतःला सिद्ध करण्याची . मला ह्या सगळ्या गोष्टी परगावी मिळाल्या . मुंबई पुणे च्या ह्या प्रवासात मी असा घडलो आणि मला घडवलं गेलं. चांगल्या वाईट गोष्टी हि फार घडल्या खरे कोण आणि खोटे कोण ह्याची समज पुण्यातून मिळाली . आज मला पाहून माझे बरेच मित्र पुण्यात स्थायिक झाले आहेत स्वतःला घडवत आहे एका शहरातून दुसऱ्या शहरात . 



सचिन कृष्णा तळे














“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale