शरभ अवतार: भगवान शिवांचा रौद्र अवतार
हिंदू पुराणांमध्ये अनेक रहस्यमय आणि अद्भुत कथा सापडतात, ज्यामध्ये देवतांचे विविध रूपं, अवतार आणि त्यांचे उद्देश मानवाच्या कल्याणासाठी प्रकट होतात. अशाच एक अत्यंत रौद्र आणि दुर्लक्षित अवताराची गोष्ट म्हणजे शरभ अवतार. हा अवतार भगवान शंकरांनी घेतला होता आणि तो सुद्धा भगवान विष्णूंच्या नरसिंह रूपाला शमवण्यासाठी.
हिरण्यकश्यप नावाचा राक्षस अत्यंत अहंकारी आणि देवविरोधी होता. त्याने संपूर्ण ब्रह्मांडावर अत्याचार चालवले होते. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. हिरण्यकश्यपने आपल्या पुत्रालाही विष्णूभक्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. अखेरीस, भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेत हिरण्यकश्यपाचा वध केला. नरसिंह हे अर्धवट सिंह आणि अर्धवट मानव रूप होते – कारण ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार हिरण्यकश्यपाला कोणतीही सामान्य अस्तित्व असणारी गोष्ट मारू शकत नव्हती.
हिरण्यकश्यपाचा वध झाल्यानंतर, नरसिंह अवतारातील विष्णू अत्यंत रौद्र झाले होते. त्यांचा कोप शमायला तयार नव्हता. सृष्टीवरचा समतोल बिघडू लागला. त्यांना आपल्या मूळ रूपात परत आणण्यासाठी देवता चिंतातुर झाले. त्यावेळी भगवान शिवांनी शरभ अवतार घेतला. हा अवतार सिंहाहूनही अधिक शक्तिशाली आणि भयंकर मानला जातो. शरभ हे आठ पायांचे, सिंह व पक्षी यांच्या संयोगाने निर्माण झालेले अर्धसिंह व अर्धपक्षीरूपी एक रौद्र रूप होते.
शिवाने शरभ रूपात येऊन नरसिंहाचे रूप घेतलेल्या विष्णूंना आव्हान दिलं. त्यांच्या शक्तीचा सामना करत, त्यांना शांत केले आणि त्यांना त्यांच्या मूळ रूपात परत आणले. या प्रसंगात एक वेगळं तात्त्विक संदेशही आहे – कोणताही रौद्र भाव किंवा क्रोध सृष्टीत दीर्घकाळ टिकू शकत नाही. त्याचे नियंत्रण आवश्यक असते आणि त्या संतुलनासाठी भगवान शिव हे स्वयं उपस्थित होतात.
शरभ अवतार हा केवळ एक देवतेचा दुसऱ्या देवतेवर विजय नव्हे, तर सृष्टीतील सामंजस्य व संतुलन राखण्याचा एक प्रयत्न आहे. तो दर्शवतो की परब्रह्मरूप शक्तींमध्येही परस्पर पूरकता असते. शिव-विष्णू हे परस्परविरोधी नव्हे, तर परस्पर पूरक तत्त्वांचे प्रतीक आहेत. आणि शरभ अवतार हे त्याचे एक विलक्षण उदाहरण आहे.
- सचिन कृष्णा तळे (पुणे)