सत्कार्योत्तेजक सभा
१९
मे १८९३ रोजी सत्कार्योत्तेजक सभा या संस्थेची स्थापना
झाली. महाराष्ट्राचे 'सांस्कृतिक तीर्थ' अशी ओळख लाभलेल्या मोजक्या संस्थांमध्ये धुळ्याच्या 'सत्कार्योत्तेजक सभे'चा समावेश होतो.
भक्ती, शक्ती, संघटन आणि समाज प्रबोधन या माध्यमांतून खानदेशवासीयांना
जागृत करण्याचे काम सत्कार्योत्तेजक सभेने केले आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि संस्था स्वातंत्र्यपूर्व
काळात देखील समाजप्रबोधनाद्वारे राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्या संस्थांमध्ये अव्वल होती. 'भाषा प्राकृत उन्नतीस चढवा, काया करा अर्पण, आर्यावर्त हितास द्या, सतत सत्कार्यास उत्तेजन' या स्थापनेप्रसंगी निर्धारित
करण्यात आलेल्या उद्देशास अनुसरून सभेची वाटचाल आजपर्यंत समर्थपणे सुरू आहे.
ह्या
सव्वाशे वर्षांच्या प्रवासात 'सत्कार्योत्तेजक सभे' ने सन १९३५
मध्ये 'श्री समर्थ वाग्देवता मंदिर', सन २०१५ मध्ये
शताब्दी महोत्सव साजरा केलेले 'रामदास आणि रामदासी' नियतकालिक, मुक्तद्वार वाचनालय, सन १९९३ मध्ये
भारतीय विद्या संशोधन केंद्र आणि अखिल भारतीय स्वरुपाचा 'श्री समर्थ संघ' आणि जांब येथील 'श्रीसमर्थ मंदिर' या संस्थांना जन्म
दिला. आज या संस्था
आपल्या मातृसंस्थेचा मूळ गाभा असलेल्या श्री समर्थ रामदासांचे विचार व आचारांचे सखोल
चिंतन व संशोधन करुन
समाजस्वास्थ्य निकोप ठेवण्याचे कार्य अवितरपणे करीत आहेत. संस्थे तर्फे रायगड स्मारकासाठी घरोघरी फिरुन निधी संकलन करण्यात आले. दुष्काळाचा कायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समजावून देण्याचे काम केले. तर 'छत्रपती श्री शिवाजी महाराज व शिवजन्मोत्सव' (सन
१८९९), 'आपण कोण' (सन १९००) या
नानासाहेबांच्या व्याख्यानावर आधारित आणि सन १९०३ मध्ये
'जपानची मर्दुमकी' या तीन पुस्तकांचे
प्रकाशन हि या संस्थे
मार्फत करण्यात आले.
सत्कार्योत्तेजक
सभेचे संस्थापक दिवंगत शंकर श्रीकृष्ण उपाख्य नानासाहेब देव यांचे श्री समर्थ रामदास स्वामी भक्तिप्रेम, हे या सर्व
कार्यामागील मूळ सूत्र होते. श्री समर्थांनी स्थापित केलेल्या महाराष्ट्रातील सर्व आणि लाहोरसह बहुसंख्य मठांना नानासाहेबांनी भेटी दिल्या. याशिवाय श्री समर्थ, त्यांचे ज्येष्ठ बंधू रामीरामदास आणि कल्याणादि शिष्यमंडळी यांच्यासंबंधी असलेले हस्तलिखित ग्रंथ आणि इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी थेट दक्षिणेत तंजावरपर्यंत आणि उत्तरेस पंजाबपर्यंत प्रवास केला.या संशोधन दौऱ्यातील
सुवर्णक्षण म्हणजे १९१६ साली शिवथर घळीचा - श्रीसमर्थांच्या सुंदरमठाचा -श्रीमद् दासबोधाच्या जन्मस्थानाचा लागलेला शोध होय. संशोधित हस्तलिखितांचे अभ्यासपूर्ण संपादन करून त्यांचे ग्रंथरुपाने समर्थ विचारांचे प्रदर्शन करण्याचा उद्देश व 'रामदास आणि
रामदासी' ग्रंथमालेला पूरक ठरणे असा हेतू ठेवून 'इतिहास आणि ऐतिहासिक' हे मासिक १९१६
साली सुरु झाले. ३६
वर्षांत (१९१५-१९५१) त्यांच्या संपादकत्वाखाली ४३२ अंक प्रकाशित झाले. आतापर्यंत सभेने सुमारे १३ हजार २२३
पृष्ठांच्या १७३ ग्रंथांचे प्रकाशन केले आहे. नानासाहेब देव यांनी सुमारे ३२०० बाडांचे संशोधन करुन ४ सूचिखंड अभ्यासकांसाठी
उपलब्ध करुन दिलेले आहेत. समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील दुर्मीळ हस्तिलिखितांचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. विविध भाषांमधील ग्रंथ, बखरी, मंत्रतंत्र, व्याकरण, संगीत, रागदारी, जमाखर्च, गणित, आयुर्वेद, व्रतवैकल्ये, ज्योतिष, यंत्रे, ताम्रपट इत्यादी अनेक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण दस्तावेजांचा एकत्रित संग्रह सभे तर्फे स्थापन झालेल्या श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेत आहेत.



