Tuesday, 29 March 2022

जागतिक मराठी परिषद

 



 

जागतिक पातळीवर मराठी भाषकांना एकत्र आणावे, मराठी भाषा व संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योगात मराठी माणसाची प्रगती होण्यासाठी त्याला उद्युक्त करावे आणि या सर्व संदर्भात विचारांची देव-घेव व्हावी या उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना १९८९ साली झाली. फक्त साहित्यिकी अन साहित्य विषयी ती सीमित न राहत त्यांत सर्व कलाशाखांतील कलाकार,  शिल्पकार, चित्रकार, गायक, वादक, नर्तक, संगीतकार, नाट्य-चित्रपटकलावंत, व्यापारी-उद्योजक, नावाजलेले कारखानदार, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते, राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रांतले  मान्यवर आणि सर्वसामान्य रसिकजन या सर्वांना एकत्र आणून त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे अशी सूचना त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. शरद पवार , डॉ. रवी बापट, बी. के. देसाई आणि माधव गडकरी ह्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या व्यासपीठावरून केली.  कल्पना तर भव्यच होती आणि ती शरद पवारांनी मनोहर जोशी ह्यांच्या सहकार्याने ती उचलून धरली.

 

जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली. वि.वा. शिरवाडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ आणि १३ ऑगस्ट १९८९ साली मुंबई इथे परिषदेचे पहिले अधिवेशन भरवले गेले होते. ह्या पहिल्या अधिवेशनात स्वागतगीत गाण्यासाठी दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मीना, उषा, हृदयनाथ ही भावंडे उपस्थित होती.  पु. ल. देशपांडे एक वक्ता म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या पदी मॉरिशसच्या मंत्री शीलाबाय बापू होत्या. अश्या अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत हा पहिला सोहळा पार पडला होता. पु. ल. देशपांडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली मॉरिशस येथे  १९९१ साली दुसरे अधिवेशन झाले नंतर दिल्ली इथे १९९४ साली ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे वसंत गोवारीकर होते, १९९६ साली जेरुसलेम इस्रायल येथे प्रभाकर देवधर ह्याच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झाले आणि १९९९ साली रघुनाथ माशेलकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे अधिवेशन झाले.

 

मराठी भाषेच्या, मराठी भाषिकांच्या व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित प्रयत्न करणे हा या परिषदेचा मूळ उद्देश आहे. अशा प्रयत्नांसाठी जगातील विविध क्षेत्रांतील मराठी भाषिकांचे प्रतिनिधी पहिल्यांदाच या परिषदेच्या रूपाने एकत्र येत आहेत. मातृभाषा हे व्यक्तीच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम मानून आम्ही या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत. ” ह्या शब्दात शरद पवारांनी ‘ जागतिक मराठी परिषदेची ‘ संकल्पना स्पष्ट केली.

 

कुसुमाग्रजांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या सद्य:स्थितीविषयीची आपली मते मांडताना  "कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचं दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे " आजही महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात हीच परिस्थिती दिसून येते.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

Thursday, 17 March 2022

अमेरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था

 



 

बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय होय. बालसाहित्यात बुद्धीरंजन-मनोरंजन-संस्कार यांचा समतोल-समन्वय साधून छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी कविता, नीतिकथा, साहसकथा, अन्य गमतीदार कथा, प्रवासवर्णने आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या असतात. राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे यांच्या कथा बालसाहित्याचे विषय असून लहान मित्रांना त्यातून गम्मत आणि वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक या मराठी मातीत जन्माला आले. उगवत्या पिढीवर चांगले संस्कार घडवण्यासाठी चांगले बालसाहित्य आणि बालसाहित्य लिहिणारे लेखक घडणे गरजेचे आहेत. कदाचित ह्याच विचारांवर बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ यांनी इ,स, १९७६मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन नावाची संस्था स्थापन केली.

 

अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. अनेक बालसाहित्याची त्यांनी निर्माती केली. बालसाहित्यात साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना. ह. आपटे, भा. रा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आपल्याला भावी पिढी जर मानसिकदृष्ट्या निरोगी व कल्पक घडवायची असेल तर बालपणापासून मुलांच्या हातात (मोबाइलसोबत) सकस बालसाहित्यही देता आले पाहिजे. कारण मुलांचे भावविश्व हे बालसाहित्य वाचनातूनच लवकर समृद्ध होते. गेल्या पिढीतील आजी-आजोबा ही लहान मुलांसाठी गाणी-गोष्टींची चालती-बोलती विद्यापीठे होती. ही माणसं पाठ्यपुस्तकी शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित अल्पशिक्षित असतील, परंतु मौखिक परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण त्यांच्या जवळ विपुल होते.

 

'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे नाव बदलून ते २०१७ साली 'अमेरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था' असे करण्यात आले. पुणे , सोलापूर , जळगाव , कोल्हापूर , ठाणे , सातारा, सांगली, संगमनेर, अहमदनगर , परभणी अश्या अनेक ठिकाणी २५ हुन अधिक बाल साहित्य संमेलन ह्या संस्थेमार्फत भरवण्यात आले. दरवर्षी  विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात सहभाग असे. ह्या संस्थे मार्फत घेण्यात येणाऱ्या संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद, सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रमांचा समावेश आहे. २०१० साली स्व. मंगेश पाडगांवकर ह्यांच्या अध्यक्षते खाली संगमनेर इथे बाल साहित्य संमेलन भरवले गेले होते.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

 

Thursday, 10 March 2022

अंकुर साहित्य संघ

 



 

जमिनीत पेरलेली बी अंकुरल्यानंतर जशी त्याची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रकारे साहित्य क्षेत्रातील नवोदित साहित्यिक हे एक अंकुरच असतात. त्यांची काळजी घेणे त्यांना प्रोत्साहन देणे त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणे त्यांना साहित्य घडवण्यात सहकार्य करणे हे खूप गरजेचे आहे. जुन्या नावाजलेल्या साहित्यिकांचा वारसा आपण वाचून जपून ठेवलंच पाहिजे पण नव्या साहित्यिकांकडून नवोदितांकडून तश्याच प्रकारचे साहित्य लिहून घेणे त्यांना त्या उंचीवर घेऊन जाणे हे नावाजलेल्या साहित्यिकांचे कर्तव्य आहे. ह्याच विचारांवर आधारित अकोल्यात ‘प्रस्थापितांचा सन्मान, नवोदितांना प्रोत्साहन हे ब्रीद वाक्य घेऊन नवसाहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे अंकुर साहित्य  संघ.

 

नवोदित लिखाणाला प्रसिद्धीद्वारे खतपाणी देणे, साहित्य संमेलनाचे व्यासपीठ देऊन प्रोत्साहन देणे, शिवाय पुरस्कार देऊन कौतुक करणे अशा एक ना अनेक बाबी अंकुर साहित्य संघ गेली अनेक वर्षे करत आहे. हिंमत शेगोकार ह्यांनी अंकुर साहित्य संघ ही संस्था ९ ऑगस्ट १९८६ रोजी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्थापन केली. तिचे महाराष्ट्र राज्यभर हजारापेक्षा अधिक सभासद आहेत. या संस्थेच्या अकोला, अमरावती, कुर्‍हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे अनेक शाखा आहेत. अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्ह्यातील चांदूर येथे एक वाचनालय सुद्धा आहे. या वाचनालयातर्फे १९९८सालापासून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. अंकुर साहित्य  संघ या संस्थेची ३० वर्षांत अकोला जिल्ह्यात २० साहित्य संमेलने झाली, वाशीम जिल्ह्यात ७ तर अमरावती जिल्ह्यात ६ व  सोलापूर जिल्ह्यात ३, यवतमाळ जिल्ह्यात ३, हिंगोलीत २ संमेलने झाली असून  मुंबई, परभणी, वर्धा, नांदेड, सातारा, पुणे आणि गोवा येथे एकदा संमेलन झाले आहे. या सर्व साहित्य संमेलनांतून जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशात आले आहे. प्रत्येक संमेलनात कथा, कविता, गझल, ललित, बालसाहित्य, समीक्षक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ’अंकुर साहित्य पुरस्कार, ‘अक्षरतपस्वी पुरस्कार, ‘अक्षरवेल पुरस्कार, ’बालकवी पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी पुरस्कार दिले जाते. शाल, श्रीफळ देऊन सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

 

आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनात अनेक दिग्गज साहित्यिकांनी अध्यक्षपद भूषवले आहे. यात डॉ. यशवंत मनोहर, सिंधूताई सपकाळ, प्रा. फ. म. शहाजिंदे, प्रा. भगवान भोईर, प्रतिमा इंगोले, नामदेव कांबळे, श्रीकृष्ण बेडेकर, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. विठ्ठल वाघ, मलिका अमर शेख, प्रा. फ. मुं. शिंदे, शंकर सारडा, डॉ. प्रा. विलास डोईफोडे, स्व. जगदीश खेबूडकर, डॉ. सय्यद जब्बार पटेल, मेघना वसंत वाहोकार, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. शंकर राऊत, रवींद्र बगाडे, रामदास डांगे, प्रा. सदानंद मोरे, शुभांगी भडभडे, प्रा, इंद्रजित भालेराव, डॉ. श्रीपाल सबनीस, माधवी कुंटे यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.

 

सचिन कृष्णा तळे




Wednesday, 9 March 2022

महाराष्ट्र साहित्य परिषद


 

आपण भाग्यवंत आहोत कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जशी संतांची परंपरा लाभली तशीच साहित्याची हि लाभली आहे. थोडक्यात काय तर जसे वाचक तसे त्यांचे लेखक अन जसे लेखक तसे त्या लेखकांची संस्था. पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर अन माझ्या मते हि विद्या लेखकांच्या लेखणीतून विचारवंतांच्या विचारातून तर अखंड साहित्यातून निर्माण झालेली देवता आहे. मग ह्याच पुण्याला साहित्याचा जुना वारसा असताना पुण्यात लेखकांची, विचारवंतांची अन क्रांतिकारकांची साहित्य संस्था नाही असं होणार नाही. एकोणविसाव्या शतकाच्या उत्तराधार्थ (१८७८) न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केले पण काही कारणास्तव संमेलन खंडित होत होती. या खंडित संमेलनाना स्थायी संस्थेचं स्वरूप देण्याचा विचार झाला. ह्या विचारातून लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने २७ मे १९०६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची ज्योत पुण्यात पेटवली गेली.

 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सुरुवातीला मळेकर वाडा म्हणून ओळखल्या जाणार्या वास्तूत होते. त्यानंतर ते टिळक रोडवर स्थलांतरित करण्यात आले. इथे ‘माधवराव पटवर्धन सभागृह, एक ग्रंथालय आणि त्यातच ‘कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालयआहे तसेच इमारतीच्या तळघरात खासगी संस्था पुस्तक प्रदर्शने भरवली जातात. मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. खर सांगायचं तर अनेक मान्यवर लेखक कवी साहित्यिक ह्यांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे.

 

महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते. महाराष्ट्रात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. परिषदे मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात जसे कि साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे , सावित्रीबाई फुले अभ्यासिका चालवणे , साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देणे , साहित्यिक गप्पा वर आधारित कॉफी क्लब भरवणे इ. साहित्याची योग्य दखल घेत , लेखकांचा योग्य तो सन्मान करत परिषद दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात पुरस्कार प्रधान करत आली आहे.  शंभर हुन अधिक वर्षाचा अनुभव असलेली हि संस्था आणि त्याचा परिवार व त्याच अस्तित्व पाहता परिषदेच्या संमेलन अध्यक्षाच्या निवडीसाठी दरवर्षी वाद निर्माण होताना आपण पाहत आलो आहे. तरीही महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य सेवा हि अखंड नित्यनेमाने स्वकर्तृत्वावर खंबीरपणे अविरत चालू आहे.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale