Tuesday, 29 March 2022

जागतिक मराठी परिषद

 



 

जागतिक पातळीवर मराठी भाषकांना एकत्र आणावे, मराठी भाषा व संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योगात मराठी माणसाची प्रगती होण्यासाठी त्याला उद्युक्त करावे आणि या सर्व संदर्भात विचारांची देव-घेव व्हावी या उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना १९८९ साली झाली. फक्त साहित्यिकी अन साहित्य विषयी ती सीमित न राहत त्यांत सर्व कलाशाखांतील कलाकार,  शिल्पकार, चित्रकार, गायक, वादक, नर्तक, संगीतकार, नाट्य-चित्रपटकलावंत, व्यापारी-उद्योजक, नावाजलेले कारखानदार, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते, राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रांतले  मान्यवर आणि सर्वसामान्य रसिकजन या सर्वांना एकत्र आणून त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे अशी सूचना त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. शरद पवार , डॉ. रवी बापट, बी. के. देसाई आणि माधव गडकरी ह्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या व्यासपीठावरून केली.  कल्पना तर भव्यच होती आणि ती शरद पवारांनी मनोहर जोशी ह्यांच्या सहकार्याने ती उचलून धरली.

 

जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली. वि.वा. शिरवाडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ आणि १३ ऑगस्ट १९८९ साली मुंबई इथे परिषदेचे पहिले अधिवेशन भरवले गेले होते. ह्या पहिल्या अधिवेशनात स्वागतगीत गाण्यासाठी दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मीना, उषा, हृदयनाथ ही भावंडे उपस्थित होती.  पु. ल. देशपांडे एक वक्ता म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या पदी मॉरिशसच्या मंत्री शीलाबाय बापू होत्या. अश्या अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत हा पहिला सोहळा पार पडला होता. पु. ल. देशपांडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली मॉरिशस येथे  १९९१ साली दुसरे अधिवेशन झाले नंतर दिल्ली इथे १९९४ साली ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे वसंत गोवारीकर होते, १९९६ साली जेरुसलेम इस्रायल येथे प्रभाकर देवधर ह्याच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झाले आणि १९९९ साली रघुनाथ माशेलकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे अधिवेशन झाले.

 

मराठी भाषेच्या, मराठी भाषिकांच्या व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित प्रयत्न करणे हा या परिषदेचा मूळ उद्देश आहे. अशा प्रयत्नांसाठी जगातील विविध क्षेत्रांतील मराठी भाषिकांचे प्रतिनिधी पहिल्यांदाच या परिषदेच्या रूपाने एकत्र येत आहेत. मातृभाषा हे व्यक्तीच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम मानून आम्ही या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत. ” ह्या शब्दात शरद पवारांनी ‘ जागतिक मराठी परिषदेची ‘ संकल्पना स्पष्ट केली.

 

कुसुमाग्रजांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या सद्य:स्थितीविषयीची आपली मते मांडताना  "कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचं दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे " आजही महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात हीच परिस्थिती दिसून येते.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale