बालसाहित्य म्हणजे मोठ्या
माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय होय. बालसाहित्यात बुद्धीरंजन-मनोरंजन-संस्कार
यांचा समतोल-समन्वय साधून छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी
कविता, नीतिकथा, साहसकथा, अन्य गमतीदार कथा, प्रवासवर्णने आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या
असतात. राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी-
दुर्गुणी माणसे यांच्या कथा बालसाहित्याचे विषय असून लहान मित्रांना त्यातून गम्मत
आणि वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून बालसाहित्य लिहिणारे अनेक
लेखक या मराठी मातीत जन्माला आले. उगवत्या पिढीवर चांगले संस्कार घडवण्यासाठी चांगले
बालसाहित्य आणि बालसाहित्य लिहिणारे लेखक घडणे गरजेचे आहेत. कदाचित ह्याच विचारांवर
बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ यांनी इ,स, १९७६मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य
संमेलन नावाची संस्था स्थापन केली.
अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार
साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. अनेक बालसाहित्याची
त्यांनी निर्माती केली. बालसाहित्यात साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना. ह. आपटे,
भा. रा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचे योगदान महत्त्वाचे
ठरले आहे. आपल्याला भावी पिढी जर मानसिकदृष्ट्या निरोगी व कल्पक घडवायची असेल तर बालपणापासून
मुलांच्या हातात (मोबाइलसोबत) सकस बालसाहित्यही देता आले पाहिजे. कारण मुलांचे भावविश्व
हे बालसाहित्य वाचनातूनच लवकर समृद्ध होते. गेल्या पिढीतील आजी-आजोबा ही लहान मुलांसाठी
गाणी-गोष्टींची चालती-बोलती विद्यापीठे होती. ही माणसं पाठ्यपुस्तकी शिक्षणाच्या दृष्टीने
कदाचित अल्पशिक्षित असतील, परंतु मौखिक परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण त्यांच्या
जवळ विपुल होते.
'अखिल भारतीय मराठी बालकुमार
साहित्य संस्थेचे नाव बदलून ते २०१७ साली 'अमेरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य
संस्था' असे करण्यात आले. पुणे , सोलापूर , जळगाव , कोल्हापूर , ठाणे , सातारा, सांगली,
संगमनेर, अहमदनगर , परभणी अश्या अनेक ठिकाणी २५ हुन अधिक बाल साहित्य संमेलन ह्या संस्थेमार्फत
भरवण्यात आले. दरवर्षी विद्यार्थी, शिक्षक,
पालक तसेच बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात सहभाग
असे. ह्या संस्थे मार्फत घेण्यात येणाऱ्या संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद,
सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रमांचा समावेश आहे. २०१० साली स्व.
मंगेश पाडगांवकर ह्यांच्या अध्यक्षते खाली संगमनेर इथे बाल साहित्य संमेलन भरवले गेले
होते.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment