जमिनीत पेरलेली बी अंकुरल्यानंतर
जशी त्याची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रकारे साहित्य क्षेत्रातील नवोदित साहित्यिक
हे एक अंकुरच असतात. त्यांची काळजी घेणे त्यांना प्रोत्साहन देणे त्यांना व्यासपीठ
निर्माण करून देणे त्यांना साहित्य घडवण्यात सहकार्य करणे हे खूप गरजेचे आहे. जुन्या
नावाजलेल्या साहित्यिकांचा वारसा आपण वाचून जपून ठेवलंच पाहिजे पण नव्या साहित्यिकांकडून
नवोदितांकडून तश्याच प्रकारचे साहित्य लिहून घेणे त्यांना त्या उंचीवर घेऊन जाणे हे
नावाजलेल्या साहित्यिकांचे कर्तव्य आहे. ह्याच विचारांवर आधारित अकोल्यात ‘प्रस्थापितांचा
सन्मान, नवोदितांना प्रोत्साहन’ हे
ब्रीद वाक्य घेऊन नवसाहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे अंकुर साहित्य संघ.
नवोदित लिखाणाला प्रसिद्धीद्वारे
खतपाणी देणे, साहित्य संमेलनाचे व्यासपीठ देऊन प्रोत्साहन देणे, शिवाय पुरस्कार देऊन
कौतुक करणे अशा एक ना अनेक बाबी अंकुर साहित्य संघ गेली अनेक वर्षे करत आहे. हिंमत
शेगोकार ह्यांनी अंकुर साहित्य संघ ही संस्था ९ ऑगस्ट १९८६ रोजी वाशीम जिल्ह्यातील
मालेगाव येथे स्थापन केली. तिचे महाराष्ट्र राज्यभर हजारापेक्षा अधिक सभासद आहेत. या
संस्थेच्या अकोला, अमरावती, कुर्हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे अनेक शाखा आहेत.
अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्ह्यातील चांदूर येथे एक वाचनालय सुद्धा आहे. या वाचनालयातर्फे
१९९८सालापासून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. अंकुर साहित्य संघ या संस्थेची ३० वर्षांत अकोला जिल्ह्यात २०
साहित्य संमेलने झाली, वाशीम जिल्ह्यात ७ तर अमरावती जिल्ह्यात ६ व सोलापूर जिल्ह्यात ३, यवतमाळ जिल्ह्यात ३, हिंगोलीत
२ संमेलने झाली असून मुंबई, परभणी, वर्धा,
नांदेड, सातारा, पुणे आणि गोवा येथे एकदा संमेलन झाले आहे. या सर्व साहित्य संमेलनांतून
जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशात आले आहे. प्रत्येक
संमेलनात कथा, कविता, गझल, ललित, बालसाहित्य, समीक्षक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील
मान्यवरांना ’अंकुर साहित्य पुरस्कार’, ‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार,
‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’
पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी
’बी’
पुरस्कार दिले जाते. शाल, श्रीफळ देऊन
सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
आतापर्यंत झालेल्या साहित्य
संमेलनात अनेक दिग्गज साहित्यिकांनी अध्यक्षपद भूषवले आहे. यात डॉ. यशवंत मनोहर, सिंधूताई
सपकाळ, प्रा. फ. म. शहाजिंदे, प्रा. भगवान भोईर, प्रतिमा इंगोले, नामदेव कांबळे, श्रीकृष्ण
बेडेकर, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. विठ्ठल वाघ, मलिका अमर शेख, प्रा. फ. मुं. शिंदे,
शंकर सारडा, डॉ. प्रा. विलास डोईफोडे, स्व. जगदीश खेबूडकर, डॉ. सय्यद जब्बार पटेल,
मेघना वसंत वाहोकार, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. शंकर राऊत, रवींद्र बगाडे,
रामदास डांगे, प्रा. सदानंद मोरे, शुभांगी भडभडे, प्रा, इंद्रजित भालेराव, डॉ. श्रीपाल
सबनीस, माधवी कुंटे यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment