Tuesday, 31 October 2017

विठ्ठलाच्या सोबतीने

विठ्ठलाच्या सोबतीने

विठ्ठलाच्या सोबतीने रुक्मीणी सुंदर दिसते
राधेच्या प्रेमाची ती प्रेम कहाणी सुंदर दिसते

द्वारकेला सांगा कृष्ण हरवला माझ्या गावी
गावात चंद्रभागेचें वाहते पाणी सुंदर दिसते

विठू एकटा नाही सोबत संतांचा हा पसारा
वाळवंटी बहुजनांची अभंगवाणी सुंदर दिसते

एकादशी ला जत्रा भरते ..  पंढरीच्या द्वारी
भक्तांची त्या देवाशी बांधणी सुंदर दिसते

तीर्थ पुंडलिकाचे कळस तुका ज्ञाना झाला
वैष्णवांच्या खेळाची ही मांडणी सुंदर दिसते

किती नामघोष किती पताका केशरी डोले
पायरीस स्पर्श होता जीवन गाणी सुंदर दिसते

सचिन कृष्णा तळे 
पुणे
७७०९०९९६४६


Friday, 27 October 2017

राष्ट्रगीत गाऊ ..

राष्ट्रगीत गाऊ ..

राष्ट्रगीत हे मंत्र राष्ट्राचे, प्राणाहुनही जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

वंद वंदे मातरम, पेटती लख क्रांती दिवे
तेजाने शूरतेने, सैन्याचे सज्ज अमर थवे
ह्या राष्ट्राचे कर्ते आपण राष्ट्र ध्वजा ही जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

चहूदिशानी प्रकाशगंगा वाहे संविधानाने
पूर्व दिशेने भारताची विजयी पाऊल उमटे
श्रुंखला ही जयजयकाराची आज पुन्हा जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

शत्रूंचे थैमान असे अन पदोपदी निखारे
तुजला ठार करण्या म्लेंछ चाले शतकाहून शतके
जी छबी भारताची आहे तोच हिंद आज पुजू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

तुझेच बलिदान देशा डफावर तुझे यशोगान
हिमवंत उभा बलवंत तुझाच आहे अधिकार
देश धर्म हाच एक आपुल्या मंदिरी जपू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

हिंदू मुस्लिम शीख इसाई बुद्ध भाई भाई
रंग एक सगळ्यांचा भारत तिरंगा परी
क्रांतिकारकांच्या रक्ताची लाज आज राखू
देवभूमीच्या प्रांगणात,चला आनंदे गाऊ .. राष्ट्रगीत गाऊ ..

सचिन कृष्णा तळे 
पुणे
७७०९०९९६४६



Thursday, 26 October 2017

माझी मुलगी

माझ्या नशिबी, माझी मुलगी


किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती 
माझ्या नशिबी, माझी मुलगी, किती न्यारी आहे ती 

रोज येता कामावरूनी, देते प्रेमळ आलिंगन मला 
जणू सोहळे आनंदाचे, विरून जातो थकवा माझा
घरात असतो कल्लोळ आणिक खेळ दोघांचा 
चोरून पहाते आई माझी, सोबत असते बायको ती 
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती 

बोबड्या स्वरात ती, खुणवते मज काही बाई 
लाडात असते रोज, येता बाप लवकर घरी 
खाऊ नको तिला, नको असते दुनियादारी 
घेऊन चला बागेत, धरते हट्ट  रोज रोज ती 
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती  

माझ्या परीला आवडते, गोष्ट राजा राणीची
मोठे महाल अन जंगलातल्या वाघोबाची 
ऐकत बसते निवांत झोपते कुशीत माझ्या 
विसरून जातो जग सारे, अशीच असते रोज ती
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती   

शाळा कॉलेज ची वाट चालेल होईल मोठी ती 
येईल राजा जाईल सासरला सोडून आठवणी 
दिवस कसे भर्रकन उडून जातील हातामधुनी 
माझ्या सोबत राहतील फक्त माझ्या परीची गाणी 
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती  

थकलेल्या हाताने जेव्हा, हाक मारेल देवा 
दिसावे सुखी संसार तिचे, इतकीच असेल ईच्छा 
त्या कोमल हाताने घडला होता बाप माझ्यातला 
माझ्या नशिबी, माझी मुलगी आहे जीवन सरी  
किती कोवळी, किती भोळी, किती प्यारी आहे ती  

सचिन कृष्णा तळे 
पुणे 



Wednesday, 25 October 2017

स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...


स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...

मी भक्त त्यांचा सेवेकरी
असे कृपा त्यांची मजवरी
दुःख  हरी नि सुख करी
स्वामी आमचे गिरिधारी
आज पाहावा, जिथे तिथे, आनंद आनंद  
स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...

अजानबाहू रूप सावळे
अक्कलकोटी देव मिळे
समर्थांची नि वडाची
चोहीकडे दत्त सोहळे  
दिगंबरा दत्तात्रयाचे, दिसे असे, रंग रंग
स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...   

स्वामी माय स्वामी बाप 
स्वामी आमची चारी धाम 
विश्वेश्वरा हे शंकरा 
अक्कलकोट हेच कैलास 
स्वामी स्पर्शाने स्वामी कीर्तने रंगे अभंग अभंग 
स्वामी नामाचा,लागो मज, छंद छंद ...  

सचिन कृष्णा तळे 
पुणे 



Tuesday, 24 October 2017

माझी मायं

शेतात बाप राबतो सोबत असते माझी मायं
खेड्यातलया विश्वात कशी सजते माझी मायं 

शेणा मातीचं घरं त्याचा उंबरटा असे पवित्र
संस्काराचे धन लुटते शिकवते माझी मायं 

प्रवास करावा पाखराणी ज्या ज्या वाटेवर
त्या वाटेची मग दिशा ठरवते माझी मायं

मालभावाला कंटाळून बाप निजतो रातील
त्याच्या सोबत उपाशी निजते माझी मायं

तिच्या पदरी जणू नांदतो विठू पंढरीचा
दुष्काळाने जेव्हा ... हंबरते माझी मायं

मातीचा गंध सांज वेळी जेव्हा दिवे पेटवतो
तेव्हा तुळशीचे आंगणगीत गाते माझी मायं

सचिन कृष्णा तळे 
पुणे 

Sunday, 22 October 2017

पावसाळी रात्र ही...

पावसाळी रात्र ही...

पावसाळी रात्र ही, चंद्र ही भिजला होता !
मिठीत प्रेमाने तो, एकदा निजला होता !

लाज माझी वेडी, ओठांवरुनी बावरली
मी ही सजली होती, तो ही सजला होता !

मधुचंद्राच्या आंगणीं, त्या मदनच्या द्वारी
दोघासांठी रिकामा, एक मजला होता !

स्पर्शाची जादू होती, मी माझ्यात नव्हती
खेळ हा निसर्गाचा, कोणी रचला होता  !

टाळता आले ना काही, होकार दोघांचाही
मी ही रमली होती, तो ही रमला होता !

नेमके होतो कुठे, दोघांस ठाऊक नव्हते
जरा हारली मी, जरा तो जिंकला होता !

सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६

Monday, 16 October 2017

कोणता पक्ष कोणता नेता हवा तुम्हाला
विकासाला राजा जाणता हवा तुम्हाला

मतदार आहात कि आहात सौदागर तुम्ही
देशासाठी सत्तेवर खरा कर्ता हवा तुम्हाला

खुप झाले राजकारण खुप झाला विकास
लोकांसाठी राबणारा आता हवा तुम्हाला

कळुन चुकेल तेव्हा नुसती होती बडबड
चांगल्या राजकारणीचा पत्ता हवा तुम्हाला

घोषणा भाषण आश्वासन मिळेल फक्त
निवडणुकीत कसा भत्ता हवा तुम्हाला

हातात टाळी नको आता असावी गालावरती
तुमच्यासाठी तसाच कार्यकर्ता हवा तुम्हाला


#सचिन_तळे

www.sachinktale.blogspot.com

गोऱ्या गोमट्या गाली

गोऱ्या गोमट्या गाली


गोऱ्या गोमट्या गाली लाली लाली लाजते रे
होता इशारा तिचा जीवास  हुरहूर लागते रे ...

तिच्या स्पर्षांच्या सरी, अंग अंग भिजतो मी
तिच्या शब्दाची जादू, रात रात मागतो मी
अलगद सांजवेळी बावरी वेडी ती थोडी
सांगत एक कहाणी, कुशीत जागते रे
गोऱ्या गोमट्या गाली लाली लाली लाजते रे ...
होता इशारा तिचा जीवास  हुरहूर लागते रे ...

हा दरवळणारा गंध, फक्त तिच्यासाठी
हा उनाड वारा भिरभिरतो कोणासाठी
चंद्र चांदण्या आडुनी पाहे ती थोडी थोडी
हरवून जाते अशी , छेडीत सूर सारे
गोऱ्या गोमट्या गाली लाली लाली लाजते रे ...
होता इशारा तिचा जीवास  हुरहूर लागते रे ...

ऊन पावसाचे खेळ,  होते सावली ओली
भरे नभाचा उर, कोवळ्या पावलांनी
अश्या श्रावण खेळी भेटते ती थोडी थोडी
गंधाळते गीत माझे , मयुरी होते साजरी रे
गोऱ्या गोमट्या गाली लाली लाली लाजते रे ...
होता इशारा तिचा जीवास  हुरहूर लागते रे ...

सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६


Sunday, 15 October 2017

भाषा आणि युक्ती …

भाषा आणि युक्ती …

आपण रोज बोलतो, आपले म्हणे पठवून देतो, हट्ट करतो आणि हट्ट पूर्ण हि करून घेतो. आपल्याला जर काही हवं असेल तर आपण आपल्या आई वडील किंवा आजी आजोबा आणि भावाकडे बहिणीकडे अन मित्राकडे त्या  विषयी सवांद साधतो. हा सवांद साधताना ज्या शब्दाची आपण मदत घेतो ते शब्द म्हणजेच आपली भाषा जी आपल्याला आपल्या आई वडिलांकडून आपल्या शिक्षकाकडून शिकायला मिळाली. लहान असताना आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात ते आपण काळजीपूर्वक ऐकत असतो. एकदा का ते शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ काळाला कि आपण त्या नुसार चालतो वागतो. भाषा हि आपल्या मनातील राग , आनंद , मनोगत , भावना , विचार , कृती इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे. जशी आपली भाषा आहे तशीच आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत त्यांची हि एक वेगळी भाषा आहे, ती फक्त त्यांनाच कळते. मांजर म्याव म्याव करते , कुत्रा भुंकतो , कोकीळ गाते , चिमणी चिव चिव  करते इत्यादी हे सगळं काही त्यांची भाषा आहे , जसे आपण बोलतो तसे ते हि बोलतात . जगात ६८०० हुन अधिक बोलीभाषा आहे . आपल्या भारतात तब्बल १२२२ भाषा रोज वापरात आहे त्यातली २२ भाषा ह्या मुख्य भाषा आहे .. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो. जर आपण आपल्या जवळची कुठली हि दहा रुपयाची नोट पहिली तर त्यावर प्रमुख १५ भाषांचा समावेश आहे. जे दहा लाख किंवा त्याहून अधिक लोक आपल्या रोजच्या व्यवहारात वापरतात . आपली मातृ भाषा मराठी हि सुद्धा ह्याच प्रमुख भाषेत आहे. ज्ञानेश्वरांनी लहानपणी ह्याच भाषेच्या मदतीने रेड्यातोंडी वेद वदवून घेतले होते. आता हि झाली भाषा बद्दलची थोडक्यात माहिती. भाषेवर बोलायला सांगायला गेलं तर खूप काही आहे. ह्याच भाषेवरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो . भाषा कशी तयार झाली , भाषा तयार करण्याची गरज का पडली, आणि भाषेचं महत्व आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी व आपल्यासाठी का महत्वाची आहे ती.

हि गोष्ट फार जुनी आहे मला ती माझ्या आजीने सांगितली होती. एक राजा होता आणि त्याच भल मोठ असं राज्य होत. त्या राज्यात सर्व प्रजा हि सुखी होती समाधानी होती. त्या राज्यातले लोक हि फार आनंदी आणि समृद्धता मध्ये नटलेले होते.कोणाची नजर न लागो असं ते राज्य होत. एके दिवस त्या राज्यावर एका क्रूर राजाची नजर पडली. त्याला तिथलं वैभव पाहावलं नाही. दोन्ही राजाची राज्य भाषा हि सारखी होती त्यामुळे त्या राज्यात काय चालय हे त्याला लगीच कळत असे. तो क्रूर राजा आपला गुप्तहेर त्या राज्यात पाठवून त्याच्या मदतीने तिथली माहित गोळा करायचा आणि त्या राज्यावर व चांगल्या राजावर सारखा आक्रमण करून तिथली संपत्ती लुटायचा. पण इथली माहिती तिथल्या क्रूर राजाला कशी काय कळतीय हे कळतच नव्हतं. कोणीतरी आहे जो माहिती गोळा करतो आणि त्यांना देतोय हे लक्ष्यात आल्यावर राजाने दरबार भरवलं. दरबारात सगळे जमा झाले , राजा , प्रधान , पंडित , कलावंत, कवी, लेखक , भाषिक , तज्ञ् आणि काही प्रजा . विषय निघाला त्यावर बरीच चर्चा झाली. पण प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं. शेवटी एक व्यक्ती समोर आला आणि म्हणाला " राजे माझ्या कडे एक युक्ती आहे जर तुमची इच्छा आणि आदेश असेल तर मी सांगतो " राजा म्हणाला " हो सांगा ... त्यासाठीच इथे तुम्हाला सगळ्यांना मी आज बोलावलं आहे " तो व्यक्ती आपले मत मांडू लागला. त्याचे विचार व युक्ती राजाला आवडली. लगेच राजाने फरमान सोडला आदेश सोडला एका तज्ञाला बोलावून त्यानुसार ते कार्य  चालू केलं, कवी लेखक कलावंत ह्यांच्या मदतीने राज्यात लोकांपर्यंत ते पोहोचवलं. प्रधान जातीने दिवसरात्र त्यावर नजर ठेवू लागला. एक दिवस संपूर्ण राज्य त्या युक्ती वर चालू लागली. आणि त्याचा परिणाम हि त्या राजा व प्रजेसमोर आला. त्या क्रूर राजा ला हार पत्करावी लागली कारण त्याला आता कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्याचा तो गुप्तहेर हि पकडला गेला.

तर त्या व्यक्तीने अशी कोणती युक्ती सांगितली होती जी राजाने त्याच्या साह्याने आपले राज्य वाचवले. ती युक्ती होती भाषा बदलण्याची.एक अशी भाषा निर्माण करायची जी कोणाला कळणार नाही. जी भाषा आहे त्या भाषेला अनुसरून एक अशी भाषा हवि कि जी फक्त आपल्या राज्यातल्या लोकांनाच कळेल. दोन्ही राज्यातली भाषा हि सारखी होती म्हणून इथली सर्व माहिती त्या क्रूर राजाला मिळायची. त्या प्रकारे राज्यातल्या तज्ञाकडून एक भाषा तयार करण्यात आली , ती कवी लेखक शिक्षक ह्यांच्या द्वारे राज्यात शिकवली गेली . त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीस एक ओळख पत्र देऊन त्यांची कार्यशाळा चालू केली. आणि एक दिवस सगळे जण तीच भाषा बोलू लागले. भाषा बदलली हे त्या क्रूर राजाला माहित नव्हतं. जेव्हा त्याने त्याचा गुप्तहेर त्या राज्यात पाठवला तेव्हा त्याला काहीच कळेनासं झालं , त्याची चोरी पकडली गेली . त्याला दरबारी उभ करून शिक्षा केली. काही दिवसाने जेव्हा त्या क्रूर राजानेआपल्या सैन्यासोबत आक्रमण केले तेव्हा तिथली रचना व त्या राजाने आखलेली रण योजना कळलीच नाही . शेवटी त्याला हार पदरी घेऊन परतावे लागले.


तर मित्रानो, एक भाषा बदलली म्हणून त्या चांगल्या राजाने आपले राज्य वाचवले .त्याच प्रकारे आपली मराठी , कोकणी , अहिराणी तर बाजूच्या राज्यात तामिळ , तेलगू , कन्नड , पंजाबी , उर्दू असे अनेक भाषा निर्माण झालेत. आज आपल्या देशावर आक्रमणे होतात , आपल्या देशात हिंसा पसरवली जाते . शेजारच्या देशांना आपली सगळी माहिती मिळते . कारण त्यांना आपली हिंदी हि भाषा येते, कळते .  त्यांना हिंदी ह्या भाषेच ज्ञान आहे. आपल्या भारतात प्राचीन भाषा म्हणून संस्कृत आणि पाली भाषा हि प्रचलित आहे. आणि त्याच्याच ह्या पोटजाती. संस्कृत ह्या भाषेला आपण देव भाषा म्हणतो आपल्या पूजा अर्चना मध्ये त्याचा वापर करतो . आपले ग्रंथ ह्याच भाषेत लिहिली गेली. देवांना हि भाषा आवडते. जर देव देश वाचवायचा असेल तर भाषा शिकली पाहिजे .आता साधं उदाहरण देतो , जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला तिथली भाषा आधी शिकावी लागते . नाहीतर तिथली भाषा कळणारच नाही. कवी कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मदिवशी २७ फेब. ला आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. संत ज्ञानेश्वर महाराज ह्याच आपल्या मराठी भाषेची थोरवी सांगताना लिहितात
जैसी दीपांमाझि दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम।।
तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी।
भाषांमध्ये तैशी। मऱ्हाटी शोभिवंत।।
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।
मग आपल्या राज्यासाठी मराठी, परदेशासाठी इंग्रजी आणि देशासाठी संस्कृत शिकूया .


सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६










Friday, 13 October 2017

राज ठाकरे आणि त्यांची सेना ...


राज ठाकरे आणि त्यांची सेना ...

सत्तेच पारडं हे वर खालीच असतं . हार जीत हे सगळं राजकारणाच्या भूमीवर अन पैश्याच्या खेळावर अवलंबुन आहे . पैसा आणि राजकारण हे एकमेकांना पूरक आहेतं . पैशयाशिवाय राजकारण करता येत नाही तर राजकारणात राहून पैसा कमावलं नाही असा एकही नाही . राजकारणात सत्ता मिळवणारा व्यक्ती त्याची आधीची परिस्तिथी आणि त्याची काहीच वर्षात निर्मण केलेलं विश्व् हे आश्चर्यकारक असत. लोक फारस ह्याचा विचार फक्त नाक्यावर किंवा कट्ट्यावर गप्पा मारताना करतात. आपल्या सोबत असणारा व्यक्ती आज कोट्याधीश होतो आणि आपल्याला मामा बनवतोहार फुले भाजी विकणारे भुजबळ असो किंवा रिक्षा चालवणारे कोणी फुटीर नगरसेवक असो.

राज साहेब ठाकरे ह्यांनी सेनेतुन बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि ह्या महाराष्ट्राला खास करून मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीस राजसाहेब ठाकरे ह्यांच्या कडून एक आशा निर्माण झाली. राज साहेब ठाकरे ह्यांनी मराठी मुद्द्याला हात घालत मराठी लोकांच्या मनातून मराठी हृदय सम्राट म्हणून जग जाहीर झालं. त्यांच्या नावाने संपूर्ण भारतभर मराठी मुद्दा गर्जु लागला. जशी ललकारी शिव सेनेत बाळासाहेबांनी दिली तशीच ललकारी राजसाहेब ह्यांची होती . राज ठाकरे ह्यांची बोली , चाल , भाष्य , वक्तव्य हे सगळं पाहता मुंबईकरांना तरुण बाळासाहेब दिसू लागले. मुंबईत मराठी तरुणांना नोकरी मिळू लागली , मुंबईत रिक्षावाले भाडं मिळेल तिथे जाऊ लागले . मुंबईत परप्रांतीय लोकांनी मराठी शिकायला  बोलायला सुरवात केली. मराठी फलक दिसू लागले. तरुणांनी राजसाहेब ह्यांच्या पक्षाकडे धाव घेतली . त्यात कित्येक तरुणांना नवी संधी मिळाली नव राजकीय व्यासपीठ मिळालं.जिथे राजसाहेब ठाकरे ह्यांची सभा भरणार तिथे अलोट गर्दी असणारच . राजसाहेब काय बोलतील ह्यावर राज्यातले प्रत्येक राजकीय लोकांपासून ते सामान्य लोकांची नजर असायची . त्याचे सगळे आंदोलन हे यशाच्या पायरीला स्पर्शून महाराष्ट्राचे उद्धार करणारे आहेत , आताचे रेल्वे आंदोलन हे सुद्धा त्यातलेच. पण राज ठाकरे आणि त्यांची सेना मागे पडणार नाही आणि हार पत्करणार नाही हेच कडू सत्य.
आज बाळासाहेबांची आठवण होणे साहजिकच आहे. कारण नेते घडवणारे  तीनच व्यक्ती ह्या महाराष्ट्रात होते आणि आहेत. बाळासाहेब ठाकरे , शरद पवार आणि राज साहेब ठाकरे. एका सभेत बाळासाहेब म्हणाले होते " सेनेच्या नावावर निवडून आल्यावर , पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणारा , शिवसैनिकांचे विश्वासघात करणाऱ्याला दिसेल तिथे भर चौकात झोडून काढा". बाळासाहेबांनी आणि राज साहेब ठाकरे ह्यांनी कधीच लोक फोडली नाहीत तर लोकांच्या मनात स्वतःच्या पक्षाबद्दल आदर निर्माण करून लोकांना आपलंस केलं . जे फुटले मग त्यात राम कदम असो किंवा आताचे सहा नगरसेवक असो . डोक्यावर मनसेचं फेटा घालून गर्जना करणारे आपले स्व. रमेश भाऊ वांजळे कुठे आणि सत्तेची भीक घेऊन  गट निर्मण करणारे हे सहा नगरसेवक कुठे. आजून तरी आदेश नाही मिळाला नाहीतर सहा विभाग पुन्हा चर्चेत येतील.

जर कोणी पक्ष सोडून जात असतील तर त्या पाठी फक्त पैसा सत्तेची लालच एवढच कारण असू शकत. जर मराठीचा मुद्दा होता मराठी भाषिकांचा मुद्दा होता तर हा विषय मनसेत राहून हि करू शकले असते. म्हणे मराठी माणसाचा पराभव आमच्या जिव्हारी लागला. मुंबईतून मराठी महापौर हटवण्याची भाषा भाजपने केल्याचं आपल्याला रुचलं नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया सेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी व्यक्त केली . असे जरी असले तरी मराठीचा मुद्दा आणि मराठी माणसासाठी दिलीप लांडे उर्फ मामा किती लढले हे दाखून द्यावं. जर मनसेच्या सत्तेच्या वाटेत जे मराठी मुद्दे राजसाहेब ठाकरे ह्यांनी उचलले होते तेव्हा तुम्हच मराठी बद्दल प्रेम का फुटलं नव्हतं. आजून लोकांची किती फसवुनूक करणार तुम्ही . खरचं मराठी मुद्दा आणि मुंबईत मराठी टिकावी ह्यासाठीच शिवसेनेच्या पदरी गेलात कि भाजप च्या किरीट सोमय्या ह्यांनी केलेले आरोप खरे तर नाही ना ? जमल तर लोकांची प्रश्नांची उत्तरे हि द्या ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हि फक्त मराठी आणि महाराष्ट्रा साठी राज साहबे ठाकरे ह्यांनी निर्माण केली आणि स्वतःला भर सभेत महाराष्ट्राच्या उद्धार करण्यास वाहून घेतलं.

शेवट इतकच राज ठाकरे आणि त्यांची सेना हि मराठी भाषेसाठी , महाराष्ट्रासाठीच लढणार आणि त्यासाठीच राजकारण समाजकारण करणार !

सचिन कृष्णा तळे
7709099646
  
पुणे


Monday, 9 October 2017

मनी करतो हा दंगा

दूर वनात, रान माळात, खुणावतो कानात चावट भुंगा 
पाकळ्यांभोवती , मारून भिंगा, मनी करतो हा दंगा II धृ II

कृष्ण सावळा अडवे हि पायवाट 
धरून पदरचा काट छेडी मधु गाट
वाजुनी बासरी मोहात लाजवी हा रंगा 
पाकळ्यांभोवती, मारून भिंगा, मनी करतो हा दंगा II १ II

तीरी यमुने तीरी सोबती नाही मैत्रिणी 
एकटी नार मी जशी लावण्याची घागरी
छेडितो हा हरी ,दाऊ कशी त्यास इंगा
पाकळ्यांभोवती, मारून भिंगा, मनी करतो हा दंगा II २ II

काटावरी सोडली चोळी रेशीमची 
बैसली अशी अंगअंग घेऊन लाजमोळी 
कुठे गेला गिरी जाऊ कशी घरी सांगा 
पाकळ्यांभोवती, मारून भिंगा, मनी करतो हा दंगा II ३ II

सचिन कृष्णा तळे 
पुणे 
7709099646
Sachintale777@gmail.com

Sunday, 8 October 2017

हे कृष्ण, रे मुकुंदा,

हे कृष्ण, रे मुकुंदा,

हे कृष्णा, रे मुकुंदा, तुझी मुरली राधा ने चोरली 
जसे चोरत तुही होता, मटक्यातली ती लोणी 

ती गेली, वाट चोरत यमुने तीरी 
कसा अडवशील, कसा धरशील, तिला आडवाटे 
हे कृष्णा, रे मुकुंदा, आज विसर तुझी मुरली रे 


गवळण सोबतीने, सोबतीने तुझी मुरली रे 
डोक्यावर घागर, घागरीत तुझी बासुरी रे 
ती चाले हरणी, त्या यमुने तीरी 
कसा शोधशील, कसा पाहशील 
हे कृष्णा, रे मुकुंदा, आज विसर तुझी मुरली रे 

हे कृष्णा, रे मुकुंदा, तुझी मुरली राधा ने चोरली 
जसे चोरत तुही होता, मटक्यातली ती लोणी 

चंचल राधा, निर्मल मन तुझे कृष्णा रे 
सुंदर मधुबनची नाजुकशी ती कोर रे 
लाडली गोकुळाची त्या यमुने तीरी 
सहज भूलशी, सहज हारशील 
सोड हे कृष्णा, सोड हा हट्ट, आज विसर तुझी मुरली रे 

हे कृष्णा , रे मुकुंदा, तुझी मुरली राधा ने चोरली 
जसे चोरत तुही होता, मटक्यातली ती लोणी 
ती गेली, वाट चोरत यमुने तीरी 
कसा अडवशील, कसा धरशील, तिला आडवाटे 
हे कृष्णा, रे मुकुंदा, आज विसर तुझी मुरली रे 

सचिन कृष्णा तळे 
पुणे 
७७०९०९९६४६



Friday, 6 October 2017

जोगव्याचा पुजारी

जोगव्याचा पुजारी

जात म्हणजे श्रुंगार एका समाजाची ओळख ती
भारताच्या वृक्षावरची नटलेली ती फांदी असते

जात, पंत, धर्म, भाषा, परंपरा, वर्ण असे बऱ्याच गोष्टीचा उगम आपल्या भारतात होतो. ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात साजरे हि होतात. आपल्या समाजात, आपल्या धर्मात , आपल्या जातीत राहणे त्याचे कार्य पुढे चालवणे आणि पुढच्या पिढीला ती शिकवणे हे देव कार्य समाज कार्य मानलं जात. भारतात अनेक जाती , अनेक धर्माचे, अनेक समाजाचे लोक तुम्हाला पाहायला मिळतील. अश्याच एका समाजाची खरी ओळख मला एक प्रवासा दरम्यान मिळाली. पुरुष आणि स्त्री हे दोन जीव श्रुष्टीचे कर्ते आहेत. ह्यांच्या मिलनाने जीवनाची उत्पत्ती होते. पण ह्या दोघांमध्ये एक व्यक्तिमत्व असे हि आहे जे समाजात स्वतःच अस्तित्व हरवून बसलेत. अर्धनारीश्वर म्हणून शिव पार्वतीचे आपण पूजन करतो तिला शक्तीचं प्रतीक मानतो. अर्धनारीश्वर म्हणजेच पुरुष अन स्त्री . जिथे पुरुषात स्त्री अन स्त्री मध्ये पुरुष जन्माला येतोतृतीय पंक्ती , हिजडा , जोगती , देवदासी असे बरेच नावाने आपण त्याला ओळखतो. त्याच्या शापाला घाबरतो तर कधी त्याच्याशी अश्लील चाळे करतो. त्याच्या अंगावर हात फिरवतो त्याला वाईट नजरेने पाहून वाईट वागणूक देतो. तर कधी  आशीर्वाद घेऊन त्याला पैसे देतो.

पुण्याहून मुंबई ला जाताना किंवा रेल्वे प्रवासात तुम्हाला हि मंडळी चुकता सापडतील. एकीकडे बुलेट ट्रेन अन मेट्रो ची स्वप्ने पाहणारा भारतीय माणूस, हा रेल्वेच्या जनरल डब्ब्यातुन प्रवास करताना त्याला माणसांनी भरलेलीच मिळते, गर्दी शिवाय त्याला काहीच मिळत नाही. अश्याच परिस्तिथी त्याला प्रवास करावा लागतो. सामान्य माणसाला ह्या शिवाय दुसरा पर्याय नाही. असाच प्रवास करताना मी जनरल डब्ब्यात शिरलो ,बॅग वरच्या कप्प्यावर ठेवून दरवाज्याच्या कडेला उभा राहिलो. समोर भरलेली गर्दी जणू सर्वसामान्यांची काही क्षाणासाठी भरलेली जत्राच होती ती. कोणीही ओळखीचं नाही, परंतु विषय काढून गप्पा मारणारे , कोणी पुस्तकात रमलेले , कोणी हेडफोन कानात लावून मस्त गाणी ऐकत होते तर कोणी ग्रुप मध्ये गप्पा गोष्टी करत बसलेलेअधून मधून भेळ , पेपरवाला आणि खेळणी विकणारी लोकमी त्या सगळ्यांना न्याहाळत होतो . ह्याच गर्दीत एक चार पाच जणांचा ग्रुप खाली बसलेला होता . दिसायला सरळ बांधा केस लांब डोळ्यात काजळ आणि अंगावर साडी तर काहींच्या अंगावर शर्ट परकर आणि बाजूला आई भवानीची परडी. बोलता बोलता हसत चिडवत टाळ्या वाजवत त्यांचा प्रवास चालू होत.तितक्यातच पुढच्या स्टेशन वर दोन हिजडे डब्ब्यात शिरले. त्यांची डब्ब्यात एंट्री होताच काही नि झोपेचं सोंग घेतलं तर काही जण त्यांच्या कडे बघत होते. दोघांनी तिथे उभे असलेल्या सर्वांकडून टाळ्या वाजवत पैसे मागण्यास सुरु केले . कोणी दिले तर काही नि दिले नाही . ज्या लोकांनी त्यांना नकार दिला त्यांना वेड वाकड बोलत ते सरळ निघून गेले. आता आलेले ते दोघे आणि माझ्या समोर बसलेले ते चार पाच जण , दोघे हि एकाच समाजातून एकाच पंतांचे . त्यानि पैसे मागितले परंतु ह्या लोकांनी पैसे मागितले नाही किंवा कोणाला वेड वाकड हि बोले नाही.

काही वेळ गेला मला राहवलं नाही, मी सहज त्यांच्या ग्रुप जवळ गेलो त्यांच्या शी चर्चा करू लागलो. त्यांनी हि माझ्याशी बोलताना चांगल्या प्रकारे उत्तर दिले. त्या चार पाच पैकी एक विशाल नावाचा मुलगा होता , त्यांनी त्याची सर्व गोष्ट मला सांगितली. विशालचा मुंबईत परिवार आहे त्याला आई , वडील , बाहू , बहीण आहेत. इतर मुलांप्रमाणे त्याचे हि परिवारात लाड झालेत! शाळेत हि गेला . पण त्याची आई , त्याची वडील , त्याची भावंडं आता फक्त त्या तृतीय पंक्तीतला मुख्य गुरू आहे. जसा विशाल मोठा होत गेला तस त्याची राहणी बदलत गेली. मूळ पुरुष असणारा विशाल हळू हळू मुलींसारखे वागू लागला. घरच्यांनी खूप प्रयन्त केले विशाल ला बदलण्याचे आणि विशाल ने हि  प्रयन्त केले परंतु काही प्रमाणातच यश मिळाले. त्याच्या अश्या वागणुकीने शाळेत हि त्याला मुलांकडून मस्करी टवाळी सहन करावी लागत होती. ह्या सगळ्यांमुळे त्याने शाळा सोडली. एका ठिकाणी कामाला लागला परंतु तिथे हि त्याला वासनांच्या नजरेखाली आपल्या जीवनाची बळी द्यावी लागली. घरात मोठा मुलगा आहे , मुलगी आहे ह्यांना पुढे स्थळ कोण देणार म्हुणुन विशाल च्या आई वडिलांनी त्याला त्या गुरूच्या हवाली केलं. विशाल लग्न देवी सॊबत लावून त्याला तृतीय पंक्तीचा मार्ग स्वकारावा लागला. ह्याची विशाल च्या मनात जरा हि खेद किंवा राग नव्हता . तो आत खुश आहे. देवीचे गाणी गात , जोगती म्हुणुन तो जगतोय.

 विषय खूपच गंभीर होता. समाज माणसाला घडवतो पण तो त्याला बिघडवतो सुद्धा. जर विशाल च्या ह्या सर्व आवडीनिवडी आणि हरकती कडे दुर्लक्ष केलं असत तर आज विशाल शिकला असता. जर त्याला कामाच्या जागी चांगली वागणूक मिळाली असती तर तो आज स्वतःच्या पायावर उभा राहू शकला असता . जर त्याच्या आई वडिलांनी थोडा विचार केला असता  त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले असते तर तो आज कुठे तरी पोहचला असता. महाराष्ट्र आणि कर्नाटकात देवदासी बऱ्याच प्रमाणतात आढळून येतात . . त्या सर्व देवदासींच्या कथा काय विशाल सारखीच असावी ? विशाल ला आज ज्या प्रकारे अंधश्रद्धेच्या अग्नीत आपलं देह जाळावा लागतो, तसंच वर्षानुवर्षे ह्या देशात अगणित विशाल ला सहन करावं लागत असेल कातृतीयपंक्ती , हिजडे , देवदासी , ह्यांना समाजात स्थान कधी मिळणार? स्त्री पुरुष समानतेचं नारा लावणारे कधी ह्या लोकांसाठी रस्त्यावर येतील का ? सेक्स आणि जीवन हे वेगळे नाही किंवा सेक्स करण्यासाठी कोणी कोणासोबत करावं ह्याचे हि तरतूद आपल्या घटनेत नाही. स्त्री आणि पुरुषात आकर्षण असत , एका पुरुषच दुसऱ्या पुरुषासोबत तर एका स्त्री दुसऱ्या स्त्री सोबत आकर्षण असू शकत. मग एका पुरुषाचं तृतीय पंक्तीत असलेल्या व्यक्ती सोबतच आकर्षण समाज का नाकारतो

समाजात तृतीयपंक्ती , देवदासी ह्यांना स्थान दिले पाहिजे त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. आज ते स्वतःच अस्तित्व शोधण्यास बाहेर पडू इच्छितात . अनेक चित्रपटातून त्याची व्यथा मांडली गेली. " जोगवा " ह्या मराठी चित्रपटातून एक प्रेम आणि समाजातुन मिळणारी गलिच्छ वागणुकीच सुंदर चित्र दाखवण्यात आले आहे.   लक्ष्मी नारायण त्रिपाठी समाज कार्यातून , चित्रपटातून आपल्या समोर आली. तिचे भरतनाट्यम आपल्याला आवडते . बिग बोस सारख्या कार्यक्रमात ती सहभाग घेते . विशाल सारखे बरीच मंडळी आज तुमच्या सारखी होऊ पाहत आहेत. त्यांना  वाईट नजरेने पाहता चांगली वागणूक देऊन समाजातुन त्यांना पुढे येण्यास मदत   व्हावी.
सचिन कृष्णा तळे
बी , सिद्धनगरी
महेश सोसायटी जवळ
बिबवेवाडी
पुणे
७७०९०९९६४६






“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale