Friday, 30 August 2024

पुतळे बोलू लागले तर काय म्हणतील ते या राजकारण्यांना?

 "राजे माफ करा, पण आजकाल जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचे महत्व जास्त वाढले आहे. चालतीबोलती हाडामांसाची माणसे नकोत पण निर्जीव पुतळे हवेत. कारण हे पुतळे बिचारे निषेधार्थ आवाज उठवू शकत नाहीत. त्यांची विटंबना करा, त्यांच्यावरून राजकारण करा, त्यांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या आदर्शाची चिंधड्या करा, त्यांची स्थापना करून त्यांना मोकळ्यावर सोडा पण हे पुतळे काहीही म्हणणार नाही. उदारणार्थ तुम्ही कष्टाने उभारलेली तुमची गड किल्लेच पहा, विशाळगड सारखे अनेक किल्ले अतिक्रमणाच्या जाळ्यात अडकले पण आम्ही राजकारण करत बसलो. पुतळे उभारणारेच मंडळी या लोकनायकांच्या तत्वांचे प्रामाणिकपणे आचरण करतात किती, हा प्रश्न उपस्तिथ होतो. राजे, देशात अनेक प्रश्नांपेक्षा पुतळे अथवा स्मारके कुठे उभारायची हा प्रश्न जास्त ज्वलंत आहे असे यां राजकीय नेत्यांना वाटते. म्हणून तर देशातील कोट्यावधी गरीब जनता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सोयींपासून वंचित राहो, यांना पुतळे हवेत. देशाचे आणि राज्याचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नेतृत्व ज्यांनी ज्यांनी केले, इतिहासात ज्यांची वैशिष्ट्यपूर्ण नोंद आहे, त्यांचे पुतळे उभारण्याची परंपरा खूप जुनी आहे. त्यातून नवीन पिढीला मार्गदर्शन मिळावे हा उदात्त हेतू असतो. पण आता पुतळे नको असं वाटू लागलं आहे. राजे, पण जे घडलं ते चुकीचं घडलं. तुम्ही हिमालया पेक्षा मोठे आहेत तुम्हाला विचारात न मोजता उंचीत मोजू लागलो. याबद्दल क्षमस्व "

 


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे पहिले जनक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भारतीय नौदलाच्या ध्वजावरही शिवरायांचा शाही शिक्का छापण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला याचा साक्षीदार म्हणून नौदलाने ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मालवणच्या तारकर्ली समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ला संकुलात २ कोटी ४० लाख ७१ हजार रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आला. जमिनीपासून ४५ फूट उंचीवर बसवण्यात आलेला हा पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला. हि घटना फार दुर्दैवी आहे. यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यात हा भव्य पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करत कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आज राज्यभर आंदोलन उभे करणार असल्याची माहिती मिळत आहे. असो पण तो वाऱ्याने पडला, पावसाळी वातावरणामुळे काही गंभीर दोष निर्माण झाल्याने पडला, पुतळा अनेक भागांचे जोडकाम केल्याने नटबोल्ट गंजून पडला, अशा अनेक बाबी पुढे केल्या जात आहेत. एखाद्या खासगी अथवा स्वयंसेवी संस्थेने उभारलेला पुतळा पडला असता, तर त्यांचे सरकारी यंत्रणांकडून काय हाल झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.

 

ज्या वाऱ्याचे आणि पावसाळ्याचे कारण दिले जात आहे, त्याच्याशी नौदल नेहमीच झुंजत असते. त्यांच्याकडे सागरी व्यवस्थापन, हवामान याच्याशी संबंधित प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ आहेत. मग हा पुतळा असा कसा बांधला गेला? विशेष म्हणजे, पंतप्रधान जे कार्यक्रम स्वीकारतात, त्या कार्यक्रमाची आणि तेथील प्रत्येक गोष्टीची सखोल आणि तपशीलवार माहिती घेतली जाते. असे असताना हा प्रकार घडला आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी देखील मागितली आहे. आधी माफी मागा म्हणून विरोधकांनी आवाज उचलला आणि माफी मागितल्यावर त्यावर हि टीका करण्यात विरोधक कुठे कमी पडले नाहीत. अर्थात सत्तेत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हेच काम विरोधकांकडे राहिलेत का?

 

कधी कधी असे वाटते की या निष्प्राण निर्जीव पुतळ्यांत चमत्कार व्हावा आणि कुणीतरी प्राण फुंकावेत आणि त्यांनी त्यांचे मनोगत सांगावे आणि आपण ते ऐकावे. जिवंत माणसांना भेडसावणारे प्रश्न किती महत्वाचे आणि पुतळ्यांच्यावरून होणारे राजकारण किती महत्वाचे यावरील त्यांचं भाष्य तरी ऐकता येईल. पण एक मात्र निश्चित आहे ते हे नक्की म्हणार कि "आमच्या तत्वप्रणालींशी ज्यांचे काडीचेही सोयर-सुतक नाही अशी माणसे जेव्हा काही राजकीय हितसंबंध, स्वार्थ जोपासण्यासाठी आमची स्थापना करायला निघतात तेव्हाच आमची खरी विटंबना होते. ज्या वीरांनी, देशभक्तांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वतंत्र भारतातील किती जनता आज खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे याचा हिशेब द्या आणि बाबानो हे आमच्यावर राजकारण थांबवा"

 

एकदा का पुतळा उभारला की, त्यापासून काही प्रेरणा घेतली जाईल, असेही नाही. काही व्यक्तिमत्त्वांचे पुतळे दुर्लक्षित दिसतात. मंत्रालयाजवळ जमशेदजी टाटा यांचा पुतळा आहे. टाटांचे देशाच्या औद्योगिकीकरणातील योगदान सुविख्यात आहे. मग किती मान्यवर लोक त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीदिनी तिथे जातात?  पण प्रश्न खरा पुतळ्यांचा आहे, तो उभारण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. गरीबाच्या पोटाला पुरेसे अन्न द्या, बेकारांना नोकरी द्या, बेघरांना माफक दरात घरे द्या, महागाईचा आवळलेला फास सैल करा, ज्याच्या श्रमावर अवघा देश, राष्ट्र पोसले जाते त्या शेतकऱ्याची झोळी सुखाने भरा, जनावरांच्या हत्या करू नका, नैसर्गिक संपत्तीचे जतन करा, वाढत्या लोकसंख्येला आळा घाला, बाहेरून येणारे लोंढे थांबवा, जातीयतेला खतपाणी घालू नका  मग भले पुतळे उभारले नाहीत तरी चालेल.

 

आजही  काही पुतळ्यांचे अवयवांचीही पडझड झालेली दिसून येते. धुळीचे लोट या पुतळ्यावर वर्चस्व गाजवीत असतात. या पुतळ्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची कोणाचीच इच्छा नसते कारण हे पुतळे मुळी निर्विकार, निर्विचार, स्तब्ध, अचल असतात. पुतळे अजिबात उभारू नका पण आमचे विचार अंगीकारून कृपया समाजाचे हित साधा एवढीच या पुतळ्यांची कळकळीची विनंती असेल. जगात सगळ्यात जास्त पुतळे हे भारतात आहे. तरी हि दंगली अन समाजात अशांतता दिसून येते हि शोकांतिका या भारताची. त्याच जागी पुन्हा नव्याने पुतळा उभारण्यापेक्षासिंधुदुर्गसारख्या किल्ल्यांची चालु असलेली पडझड थांबवणे गरजेचे आहे प्रथम शिल्लक बुरुजांची डागडुजी ला हा पैसा वापरला गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तर आमच्या हृदयात आहेत, आमच्या घरात आहेत त्यांना चौकात एकांतात का ठेवायचे. महाराजांचे गड-दुर्ग त्यांची जिवंत स्मारकं आहेत तीच आमच्यासाठी श्रद्धा आहे.

 

सचिन कृष्णा तळे

Friday, 23 August 2024

आमचा दोष काय ? - आम्ही स्री म्हणून जन्म घेतला पण आम्ही तुमच्या वासनेची भाकर नाही !

 आमचा दोष काय ? 

आम्ही स्री म्हणून जन्म घेतला पण आम्ही तुमच्या वासनेची भाकर नाही !


" ज्या योनीतुन पुरुष जातीचा जन्म झाला, ज्या स्तनातून या पुरुषांनी पहिलं अन्न प्राशन केलं, त्याच जागेवर प्रेमातून नव्हे तर वासनेतून घाव घालत त्याची विटंबना करणे यात कोणता पुरुषार्थ ? सर्वात जास्त बलात्काराच्या घटना या अल्पवयीन वयात होत आहे. आम्ही तुमची मालमत्ता नाही. आम्हाला जगू द्या!"


बलात्काराच्या घटना देशात नवीन नाही. देशात काय तर राज्यात खूप विचित्र अश्या बलत्कारच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. अश्यावेळी महिलांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महिला अत्याचारची हि मालिका थांबता थांबेना. आसाम मधील घटनेनंतर राज्यात अश्या काही घटना घडल्या कि राग हा व्यक्त होणारच. आसाम मधील १४ वर्षाच्या मुलीवर जी घटना झाली तसाच आक्रोश बदलापूर मधील घटनेत देखील पाहायला मिळाला. जनता रस्त्यावर उतरली , बातम्या आल्या , सत्तेत नसल्यानी सरकार ला धारेवर धरत निर्दशने दिलीत. सत्तेत असणाऱ्यांनी कारवाई ची आदेश दिल्या. अटक. दगडफेक. दंगलसदृश्य घटना घडल्या तेव्हा जाऊन आसाम आणि बदलापूर च्या घटनेची माहिती घराघरात पोहचली. बदलापूर पेक्षाही अंगावर काटा आणणाऱ्या दोन घटनांचा कुठेच चर्चा नाही.  छत्रपती संभाजी नगर मधील १६ वर्षांची पूजा पवार आणि नवी मुंबईतील उरण गावातली २० वर्षाची यशश्री शिंदे यांचा दोष काय ? 



रायगडच्या उरणमधील यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची बलात्कार करून दाऊद शेख ने अत्यंत निघृणपणे हत्या केली. आरोपीने तिचे अवयव कापले. चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. पनवेल रेल्वे स्टेशनजवळच्या झुडपातील तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. यशश्री एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही. २५ जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. यशश्री ही दाऊद शेख जवळ असेल असा पोलिसांना संशय होता. पोलीस तिचा शोध घेतील त्यापूर्वीच तिची निघृणपणे हत्या करण्यात आली. यशश्री ज्या अवस्थेत सापडली ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार करण्यात आले होते. तिच्या छातीवरही अनेक ठिकाणी खूणा होत्या. सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची होती. 


छत्रपती संभाजीनगर येथील जटवाडा गावात एका १६ वर्षाच्या पूजा पवार या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वी या मुलीला गावातल्या गॅरेज मेकॅनिक कासीम यासिन पठाण या तरुणाने धमकावले होते. अनेक दिवसांपासून हा तरुण त्या तरुणीला त्रास देत होता तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्या करणाने त्या तरुणीला तुझ्या भावाला संपवून टाकू अशा प्रकारची धमकी देत ब्लॅकमेल करत होता अशी माहिती समोर आली आहे. अखेर या सततच्या जाचाला कंटाळून या अल्पवयीन तरुणीने आपले जीवन यात्रा संपवली. आता पूजाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असली तरी मुख्य आरोपीसह त्याच्या अन्य साथीदारांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. बहुते वेळी आपल्या घरची आपल्या आईवडिलांची इज्जत जाऊ नये यासाठी अनेक तरुणी या घटना पोलिसांपर्यंत पालकांपर्यंत पोहचू देत नाहीत. कदाचित याच कारणामुळे पूजा पवार हिने या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असांवी. 



जगभरात बलात्कार वर कोणती शिक्षा आहे ?

अनेक देशांमध्ये बलात्कारापेक्षा बाल लैंगिक शोषण हा अधिक मोठा गुन्हा समजला जातो. मलेशियामध्ये बाल लैंगिक अत्याचारासाठी जास्तीत जास्त ३० वर्षांची कैद आणि कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते. सिंगापूरमध्ये चौदा वर्षांच्या बालकावर बलात्कार झाल्यास गुन्हेगाराला २० वर्षं तुरुंगवास भोगावा लागतो. शिवाय कोडे मारण्याची आणि दंड भरण्याची शिक्षाही मिळू शकते. अमेरिकेत लहान मुलांवर झालेल्य बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद होती. लहान मुलांवरील बलात्कारासाठी सर्वात कठोर कायदे फिलिपाईन्समध्ये आहेत. अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला ४० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. ऑस्ट्रेलियात अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला २५ वर्षांपर्यंतची शिक्षा तर कॅनडा या देशात १४ वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाते. तर चीन, नायजेरिया, कांगो, पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, यमन आणि सुदान या देशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षेची तरतूद आहे. 


बलात्कार विषयी महत्वाचे- 

- बलात्कार कसा केव्हा होईल हि वेळ काळ सांगता येत नाही त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला तुमची सुरक्षा कशी करता येई याच ज्ञान असणे गरजेचे आहे. 

- तुमच्यावर कोणी वाईट नजर किंवा छेडछाड करत असेल तर हा तुमचा दोष नसून त्या व्यक्तीचा आहे. यात तुम्हीं तुम्हाला दोषी समजून कोणतेही पाऊल उचलू नका. 

- अशी एखादी घटना तुमच्यासोबत होत आहे असे जाणवले तर सर्व पुरावे जपून ठेवा. पालकांना किंवा तुमच्या जवळच्या विश्वासातील व्यक्तीला सांगून पोलिसात तक्रार दाखल करण्यास उशीर करू नका. आपण उशीर केल्यास किंवा भयभीत झालात तर पुरावे नष्ट होऊ शकतात. तुमची माहिती गुपित ठेवण्याचे अधिकार पोलिसांना आहे. 

- जर अशी अनपेक्षित घटना तुमच्या सोबत घडली तर अंघोळ करू नका, अंगावरील कपडे धुवू नका. त्यांना थेट वैद्यकीय तपासणी साठी घेऊन जावे. लक्ष्यात ठेवा पुरावे हरवले तर पोलिसांना कारवाई करता येणार नाही. 

- बलात्कारात योनीमध्ये लिंग प्रवेश करणे आवश्यक नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत जबरीने शाररिक संबंध जुळवण्याचा पर्यंत करत तुमच्या अंगाला स्पर्श करत असेल तर तो देखील बलात्कार मध्ये मोडतो. 


 सचिन कृष्णा तळे

Tuesday, 20 August 2024

प्रबोधन समाजासाठी करायचं का आपल्या पोटासाठी हे आधी काही लोकांनी ठरवून घ्यायला हवं..!

 प्रबोधन समाजासाठी करायचं का आपल्या पोटासाठी हे आधी काही लोकांनी ठरवून घ्यायला हवं..!




Friday, 16 August 2024

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघाती की हत्या?

 

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघाती की हत्या?



 " भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांच्या मृत्यू वर आजही प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहत आहेत. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री असतील किंवा सुभाष चन्द्र बोस. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजसुद्धा एक रहस्यच आहे. १० राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय तपासानंतर जरी हे स्पष्ट झाले की नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात झाला तरीही काही तज्ञ च्या मते सुभाष बाबू त्या विमान अपघातातून वाचले आणि सुरक्षित ठिकाणी पोहचले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी नेताजींचे पार्थिव अवशेष १८ ऑगस्टपर्यंत जपानमधील रेन्कोजी येथून परत आणण्याचे आवाहन केले तसेच नेताजींच्या मृत्यूच्या तपासाशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्यास सांगितल्या आहे. त्या अपघातातून नेताजी वाचले आणि त्यानंतर ते रशियाला निघून गेले, असं भारतातले अनेकजण मानतात." 

 

नेताजींचे वैचारिक मतभेद कोणाशी होते ?


 नेताजींच्या कार्यकाळात त्यांच्याच राजकीय पक्षात काँग्रेस मधून त्यांच्या कार्यप्रणालीला आणि विचारांना गांधींचा विरोध होता. ज्या गांधींना "राष्ट्रपिता " हि पदवी नेताजींनी दिली त्याच गांधींनी नेताजी पुन्हा काँग्रेस चे अध्यक्ष होऊ नये यासाठी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला होता. १९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली. अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले होते याची नोंद देखील आज इतिहासात आहे. मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

 १९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले.  कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळून दिली. गांधींजी त्याकाळी स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला होता.  सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव १९२५ साली इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले. १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते.

 

 

नेताजींचा देशाबाहेरील प्रवास -


इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. तेथून ते पेशावर ला पोहचले. सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला. नंतर ओरलँडो मझयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले.  मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले. आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा "असा नारा देत दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते.

 

१८ ऑगस्ट चा काळा दिवस -

दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. जपानने शरणागती पत्करून तीन दिवस उलटून गेले होते. १८ ऑगस्ट १९४५ ला सुभाषचंद्र बोस यांचं विमान इंधन भरण्यासाठी ताइपे विमानतळावर थांबलं होतं. दुसऱ्यांदा उड्डाण करत असतानाच एक जोराचा आवाज आला. शत्रूच्या विमानभेदी तोफेचा गोळा तर विमानाला लागला नसेल ना, असं बोस यांचे सहकारी हबीबुर रहमान यांना वाटलं. पण नंतर विमानाच्या इंजिनाचं प्रोपेलर तुटल्याचं लक्षात आलं. विमान समोरच्या बाजूने जोरात खाली आदळलं. विमानाच्या मागून बाहेर निघण्याचा रस्ता सामानामुळे बंद झाल्याचं त्यांनी पाहिलं. समोरच्या बाजूला आग लागली होती. हबीब यांनी सुभाषचंद्र बोस यांना आवाज दिला, "नेताजी, समोरून बाहेर पडा." नंतर त्यांच्या लक्षात आलं, की जेव्हा विमान पडलं त्यावेळी नेताजींची खाकी वर्दी पेट्रोलने भिजली होती. ते आगीने घेरलेल्या दरवाजातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या शरीराला आग लागली होती. त्यावेळी थरथरत्या आवाजात नेताजींनी आपला अंत जवळ आल्याचं हबीब यांना सांगितलं. "आझादीची लढाई सुरू ठेवा, असं भारतात जाऊन लोकांना सांगा," असंही त्यांनी म्हटलं. अंत्यसंस्कारानंतर २५ दिवसांनी हबीबुर रहमान नेताजींच्या अस्थी घेऊन जपानला पोहोचले.  "रिंकोजी मंदिरात बोस यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही घेऊन जा, पण त्यांची डीएनए चाचणी करण्यात येऊ नये, अशी अट त्यांनी घातली. या अटींवरून या अस्थी नेताजींच्या कश्या यावर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहत आहे.

 

सचिन कृष्णा तळे

Thursday, 8 August 2024

एकतेचा एकच नारा , हर घर तिरंगा

 एकतेचा एकच नारा , हर घर तिरंगा 



"१५ ऑगस्ट २०२२ मध्ये भारताने संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा केला त्यावेळी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" चा नारा दिला आणि बघता बघता हिमालय पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देश हा तिरंगा च्या रंगा ने रंगून गेला होता. ना जात, ना धर्म, ना भाषा, ना पक्ष . या मोहिमांतर्गत सगळ्या देशबांधवानी भाग घेतला. आजवर आपण आपल्या घरावर अनेक रंगाचे झेंडे फडकावले पण तिरंगा फडकवणे हि अभिमानाची संधी २०२२ पासून आपल्याला मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात "हर घर तिरंगा अभियान" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या चारही बाजूने अराजकता पसरलेली आहे अश्यावेळी हि मोहीम आपल्याला एकतेचा संदेश देण्याचं काम करेल यात शंका नाही" 


तिरंगा मोहिम च्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकावण्याची सरकारची हि योजना आहे. एक काळ असा होता कि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता पण आता सामान्य माणूस हा आपल्या घरावर, कार्यालयावर तिरंगा फडकवू शकतो. २००२ मध्ये ध्वज संहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला आहे.  ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबविण्यात आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे ३ दिवस घरोघर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. अडीच कोटी घरावर तिरंगा फडकावण्याचं लक्ष सध्या राज्यासमोर आहे. एक तिरंगा साधारण १० रुपयाचा असेल तर या अभियानवर २० कोटी च्या आसपास खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेत सर्वात जास्त मदत हि छोटे मोठे महिला बचत गट यांना होणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकप्रतिनिधी द्वारे झेंड्याच वितरण होणार त्यामुळे विक्री हि मोठ्या प्रमाणात असेल. निर्णय घेतल्या नंतर अनेक कापड उद्योग सध्या कामाला लागली असेल यात शंका नाही. 



'हर घर तिरंगा' मोहीम ही एक लोकचळवळ बनली आहे ज्यात सर्वजण एकत्र येऊन खेड्यांपासून शहरांपर्यंत, देशभरातील लोक तिरंगा फडकवत आपल्या देशासाठी शौर्याने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसून आलेत. सध्या देशाच्या चारही बाजूने अराजकता पसरलेली आहे. अफगाणिस्तान , श्रीलंका आणि आता बांगलादेश अन पाकिस्तान कोणत्या परिस्थितीतून जातोय हे आपण पाहतोय. जागतिक स्तरावर भारताची होणारी प्रगती आणि भारताला मिळणारा मानसन्मान हा काहींना पाहवत नाहीय. अश्यावेळी भारतातील प्रत्येक नागरिकाने जात, धर्म, भाषा , पक्ष विसरून जगाला या मोहिमेंतर्गत एकता दाखवून देण्याची हि एक सुवर्ण संधी आपल्या समोर आली आहे. जसा मंदिरातला देव, मशिदी मधील कुराण, चर्च मधील क्रॉस महत्वाचा तसाच तिरंग्याचा मानसन्मान हा महत्वाचा आहे त्यामुळे तो कितपत आणि कसा ठेवायचा आणि किती श्रद्धेने फडकावयाचा हि सरकारची जवाबदारी नसून आपली आहे. भारतीय राष्ट्रध्वज भारतातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवतो. हे आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि राष्ट्रध्वजाबद्दल सर्वत्र आपुलकी आणि आदर आणि निष्ठा आहे. भारतातील लोकांच्या भावना आणि मानसिकतेमध्ये ते एक अद्वितीय आणि विशेष स्थान व्यापलेले आहे. ज्यांची सोशल मीडियावर खाती आहेत ते त्यांचे प्रोफाइल चित्र तिरंग्यामध्ये बदलून सहभागी होऊ शकता.


घरावर तिरंगा लावण्यापूर्वी काही नियम- 


-ध्वजारोहण करतान हे लक्षात ठेवावे की, तिरंग्याचा सन्मान सर्वात महत्वाचा आहे. कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये. कापडी ध्वज चा वापर करावा. 

-राष्ट्रध्वज कोणासमोरही झुकवू नये. त्यासह तिरंग्याच्या आसपास इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने लावलेला नसावा.

-तिरंगा कधीही उलटा फडकावू नये. ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वरती दिसला पाहिजे. 

-ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.

-तिरंग्याच्या दांड्यावर इतर कोणतीही गोष्ट अथवा वस्तू नसावी. त्यामध्ये फुलं, माळा यांचा समावेश आहे.

-कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.

-तिरंग्याचा कधीही एखादा पेहराव म्हणून वापर वापर करू नये. आपला रुमाल, उशी तसेच कपडे किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर तिरंग्याचा वापर करू नये. तसेच तिरंग्यावर कधीही, काहीही लिहू नये.

-३० डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये सुधारणा करण्यात आली आणि पॉलिस्टर किंवा मशीनपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाला परवानगी देण्यात आली. आता, राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा यंत्राने बनवलेल्या, कापूस/पॉलिस्टर/लोर/रेशीम खादी बंटिंगचा असेल.

- राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असावा. ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 3:2 असावे.


ध्वजसंहिता काय आहे?

राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी ध्वजसंहिता २००२ चं पालन करावं लागतं. तसंच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१ चंही पालन करावं लागतं.

या संहितेच्या २.१ या कलमानुसार सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान ठेवून कोणत्याही ठिकाणी ध्वज फडकावण्यावर बंदी नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास मात्र तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. २० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती.


आतापर्यंत सहा वेळा बदलला झेंडा- 

१९०६  भारताचा स्वातंत्र्यलढा जसजसा तीव्र होत होता, तसतसे क्रांतिकारी पक्ष आपापल्या पातळीवर स्वतंत्र राष्ट्राच्या स्वतंत्र अस्मितेसाठी स्वत:चा झेंडा तयार केला. देशाचा पहिला प्रस्तावित राष्ट्रध्वज १९०६ मध्ये दिसला. हा राष्ट्रध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान चौक, कोलकाता (आता ग्रीन पार्क, कोलकाता) येथे फडकवण्यात आला होता. या ध्वजावर हिरवा, पिवळा आणि लाल असे तीन रंगाचे पट्टे होते. त्याच्या वरच्या हिरव्या पट्टीत आठ पांढऱ्या रंगाची कमळाची फुले होती. मध्यभागी पिवळ्या पट्टीत वंदे मातरम लिहिलं होतं. याशिवाय सर्वात खाली असलेल्या लाल पट्टीत पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्याची चित्रं होतं.


 १९०७ मध्ये देशाचा दुसरा नवा राष्ट्रध्वज जारी करण्यात आला. सुरुवातीला निर्वासित झालेल्या मॅडम भिकाजीकामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारक साथीदारांनी मिळून पहिल्या ध्वजात काही बदल करून पॅरिसमध्ये भारताचा नवा राष्ट्रध्वज उभारला. हा राष्ट्रध्वज दिसायलाही आधीच्या ध्वजासारखाच होता. पण त्यामध्ये रंग बदल करण्यात आला होता. या ध्वजामध्ये भगवा, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे पट्टे होते. मध्यभागी वंदे मातरम लिहिलं होतं.


१९१७ मध्ये भारताचा आणखी एक नवीन ध्वज प्रस्तावित झाला. या नवीन ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या रंगाचे पट्टे होते. ध्वजाच्या शेवटी काळ्या रंगात त्रिकोणी आकार होता. त्याच वेळी, डाव्या कोपऱ्यात एक युनियन जॅक देखील होता. तर चंद्र आणि तार्‍यांसोबत सात नक्षत्रही त्यात समाविष्ट होते.  हा नवा ध्वज पहिल्यांदा डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवला होता. 


१९२१ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने अधिवेशनादरम्यान बेझवाडा (आता विजयवाडा) येथे एका आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने महात्मा गांधींना हिरवा आणि लाल रंगाचा झेंडा दाखवला, गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यांनी त्यात काही बदल केले. त्यामध्ये आणखी एक पांढरा पट्टा जोडला. तसेच यामध्ये देशाचा विकास दाखवण्यासाठी मध्यभागी एक चरखाही होता. अशाप्रकारे चौथ्यांदा राष्ट्रध्वज बदलला.


१९३१ मध्ये एका दशकानंतर पुन्हा एकदा भारताचा राष्ट्रध्वज बदलण्यात आला. या झेंड्यामध्ये वरती भगवा, मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरव्या रंग होता. यामध्ये मधल्या पांढऱ्या पट्टीमध्ये लहान आकारात चरखा दाखवण्यात आला होता. पांढऱ्या पट्टीतील चरखा हे राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचं मानलं जायचे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हा नवीन ध्वज अधिकृतपणे स्वीकारला.


१९४७ मध्ये अखेर भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाला तिरंगा राष्ट्रध्वज मिळाला. २२ जुलै १९४७ रोजी भारताचा ध्वज स्वीकारण्यात आला. घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने २२ जुलै १९४७ ला या ठरावाला मंजुरी दिली. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकविण्यात आला. हा राष्ट्रीय ध्वज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकविण्यात आला.



राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ - 


भारतीच्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग प्रामुख्याने आहेत. भारतीय ध्वज संहितेनुसार, भारतीय ध्वजाची रुंदी:उंची गुणोत्तर ३:२ आहे. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, आणि पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा आणि समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असा बोध या अशोकचक्रातून होतो. परंतु या तीन रंगाला काही समाजकंटकांनी धर्माशी जोडून दिले हि शोकांतिका आहे. 


सचिन कृष्णा तळे 

Friday, 2 August 2024

गटारी नव्हे "गतहारी" अमावस्या म्हणजे दीप अमावस्या !

 गटारी नव्हे "गतहारी" अमावस्या म्हणजे दीप अमावस्या !



" हिंदू धर्मा मध्ये आषाढी अमावास्याला दीप अमावस्या म्हणतात. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरवात होते. श्रावण महिना हिंदू धर्मात अतिपवित्र मनाला जातो. परंतु  पवित्र दिवसाला गटारी हे नाव देऊन धिंगाणा घालून या दिवसाचे पावित्र्य राखले जात नाही. मद्य दारू प्राशन करून मास खाणे आणि गटारी साजरी करणे हि आपली संस्कृती नाही. तर या दिवशी घरातले सगळे दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित करून अंधारातून प्रकाशमान होण्याची एक सुवर्ण संधी आहे. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. निषिद्ध आहार टाळावेत , हे सांगणारा आषाढी अमावस्या म्हणजे गतहारी दिवस', मात्र आधुनिक काळात याला हटके गोष्टीची जोड मिळाली आणि गतहारी या शब्दाचा अपभ्रंश  म्हंणून गटारी अमावस्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला" 


आषाढ अमावस्या हि चातुर्मासातील पहिली अमावस्या मानली जाते. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी या दिवसाची सुरवात होते. या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्व आहे. या अमावस्याला दीप पूजनाचे अधिक महत्व प्राप्त असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. घरात दिव्यांच्या भोवती रांगोळी काढून दिवे लावून त्या दिव्यांची पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो. आषाढी एकादशी पासून भगवान श्री विष्णू हे निद्रासनात जातात. त्या दिवसांपासून चातुर्मास सुरु होतो. हा चातुर्मास चार महिन्याचा असतो. 


भारत हा कृषिप्रधान देश असल्याने चातुर्मासाचा काळ हा शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा असतो. आषाढी अमावास्याला देशातील बहुतांश भागातील शेतकरी नांगर, कुदळ , फावडे , कुऱ्हाड यासारख्या कृषी अवजारांचे पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेरणीपूर्वी पोळा सणासारखा बेंदूर हा सण साजरा केला जातो. यावेळी बैलांना दिवसभर आराम करायला देतात. त्यांचे पूजन केले जाते. त्यांना गोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात. देशभरात चातुर्मास हा आत्मिक शांतता, सुख, समृद्धी , ऐश्वर्य , वैभव प्राप्त करण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने साजरा करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरु आहे. 


हिंदू सनातन धर्मात दिव्याला मांगल्याचे प्रतीक मानले आहे. कोणत्याही कार्याची सुरवात शुभारंभ करताना आपण दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना करतो. खरतर या दिवशी घरात असलेले सर्व दिवे स्वच्छ केले जातात. यांनतर टेबलावर स्वच्छ कापड पसरवून त्यावर ते दिवे ठेवले जातात. ते दिवे तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित केले जातात. या दिव्यांना फुले आणि नैव्यद्य दाखवून त्याची पूजा केली जाते. पुढचा येणारा काळ हा व्रत वैकल्य, सण उत्सव यांचा असल्याने घरातील दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते. तसेच या दिव्यांकडे पाहून आपल्या जीवनातील अंधकार दूर लोटण्याची शक्ती मिळते. 


नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी रविवार म्हणजे हक्काचा दिवस असतो. त्यामुळे गटारी गत हारी अमावस्याच्या निम्मिताने मांसाहार वर यथेच्छ ताव मारला जातो. आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी समस्त नॉनव्हेज प्रेमी मटण, चिकन अंडी खाताना दिसतात. या दिवशी अनेक हॉटेल्समध्ये नॉनव्हेज प्रेमींची तुंबड गर्दी दिसून येते तर काहीठिकाण पार्टीचे नियोजन हि दिसून येत. त्याचप्रमाणे मोठयाप्रमाणत मद्यविक्री दिसून आली आहे . काही कुटुंबामध्ये गणपती आगमन आणि विसर्जनपर्यंत मांसाहार आणि मद्यपान केले जात नाही. त्यानंतर अनेक सण लागोपाठ असल्याने मांसाहार चा विषयच येत नाही. रविवार चा दिवस हा दिवस कुटुंबातील सदस्यांचा दिवस सुट्टीचा दिवस. एकत्र येऊन मज्जा मस्ती करण्याचा हक्काचा दिवस असल्याने गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी सुवर्ण योग च असतो. पण दुसऱ्याबाजूने विचार केला तर या श्रावणात जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे जड अन्न लवकर पचत नाही. तसेच हा माश्यांचा पजननाचा असतो, म्हणून मासे खाणे टाळले पाहिजे. 


हा दिवस म्हणजे मज्जा मस्ती आणि भरपोट मांसाहार असे बऱ्याच जणांना माहित आहे. पण गटारी अमावस्या आणि गटार यांचा काडीमात्र संबंध नाही. हेच आपल्यापैकी काहींना ठाऊक नाही आहे. खरतर गटारी अमावस्या हि गतहारी अमावास्या असून या नावामागे काही मूळ करणे देखील आहेत. पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणात शहराची घाण वाहून घेऊन समुन्द्रात मिसळतात. तीच घाण मासे वाटे आपल्या शरीरात जाण्याची भीती असते. त्यामुळे असे आहारटाळणे हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे. गतहार हि शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत या शब्दाचा अर्थ गेलेला किंवा त्यागलेला असा अर्थात काही आहार चा त्याग . 


खरतर श्रवणात हिंदू संस्कृतिचे अनेक सणांचा वारसा आपण जपला जातो. चांद्रमासा प्रमाणे बारा महिन्यांमध्ये वेगवेगळे सण हिंदू संस्कृती मध्ये आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणांमागे काही शास्त्रीय करणे देखील आहेत. असेच एक शास्त्रीय कारण आपल्या श्रावण महिन्याला आहे. या ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली दिसते. त्यात साधं खाण पचवणं सुद्धा कठीण होऊन जात असत. तास मांस मासे वैगरे गोष्टी पचण्यास मुळातच अधिक कठीण असतात. अश्या दिवसांमध्ये मांसाहार न करणंच शास्त्रीय दृष्ट्या योग्य असत. महिनाभर मांसाहार खायाला भेटणार नाही म्हणून गटारी या दिवशी तुटून पडणे टाळा. त्यामुळे या दिवशी गटारी नाही तर भक्ती भावाने जीवनातील अंधारमय शक्ती दूर करण्यासाठी घरातले दिवे प्रज्वलित करून दीप अमावस्या साजरी करूया आणि आपली संस्कृती जपून ती पुढच्या पिढीला सांगूया.  


सचिन कृष्णा तळे 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale