Friday, 2 August 2024

गटारी नव्हे "गतहारी" अमावस्या म्हणजे दीप अमावस्या !

 गटारी नव्हे "गतहारी" अमावस्या म्हणजे दीप अमावस्या !



" हिंदू धर्मा मध्ये आषाढी अमावास्याला दीप अमावस्या म्हणतात. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरवात होते. श्रावण महिना हिंदू धर्मात अतिपवित्र मनाला जातो. परंतु  पवित्र दिवसाला गटारी हे नाव देऊन धिंगाणा घालून या दिवसाचे पावित्र्य राखले जात नाही. मद्य दारू प्राशन करून मास खाणे आणि गटारी साजरी करणे हि आपली संस्कृती नाही. तर या दिवशी घरातले सगळे दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित करून अंधारातून प्रकाशमान होण्याची एक सुवर्ण संधी आहे. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. निषिद्ध आहार टाळावेत , हे सांगणारा आषाढी अमावस्या म्हणजे गतहारी दिवस', मात्र आधुनिक काळात याला हटके गोष्टीची जोड मिळाली आणि गतहारी या शब्दाचा अपभ्रंश  म्हंणून गटारी अमावस्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला" 


आषाढ अमावस्या हि चातुर्मासातील पहिली अमावस्या मानली जाते. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी या दिवसाची सुरवात होते. या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्व आहे. या अमावस्याला दीप पूजनाचे अधिक महत्व प्राप्त असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. घरात दिव्यांच्या भोवती रांगोळी काढून दिवे लावून त्या दिव्यांची पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो. आषाढी एकादशी पासून भगवान श्री विष्णू हे निद्रासनात जातात. त्या दिवसांपासून चातुर्मास सुरु होतो. हा चातुर्मास चार महिन्याचा असतो. 


भारत हा कृषिप्रधान देश असल्याने चातुर्मासाचा काळ हा शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा असतो. आषाढी अमावास्याला देशातील बहुतांश भागातील शेतकरी नांगर, कुदळ , फावडे , कुऱ्हाड यासारख्या कृषी अवजारांचे पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेरणीपूर्वी पोळा सणासारखा बेंदूर हा सण साजरा केला जातो. यावेळी बैलांना दिवसभर आराम करायला देतात. त्यांचे पूजन केले जाते. त्यांना गोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात. देशभरात चातुर्मास हा आत्मिक शांतता, सुख, समृद्धी , ऐश्वर्य , वैभव प्राप्त करण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने साजरा करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरु आहे. 


हिंदू सनातन धर्मात दिव्याला मांगल्याचे प्रतीक मानले आहे. कोणत्याही कार्याची सुरवात शुभारंभ करताना आपण दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना करतो. खरतर या दिवशी घरात असलेले सर्व दिवे स्वच्छ केले जातात. यांनतर टेबलावर स्वच्छ कापड पसरवून त्यावर ते दिवे ठेवले जातात. ते दिवे तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित केले जातात. या दिव्यांना फुले आणि नैव्यद्य दाखवून त्याची पूजा केली जाते. पुढचा येणारा काळ हा व्रत वैकल्य, सण उत्सव यांचा असल्याने घरातील दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते. तसेच या दिव्यांकडे पाहून आपल्या जीवनातील अंधकार दूर लोटण्याची शक्ती मिळते. 


नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी रविवार म्हणजे हक्काचा दिवस असतो. त्यामुळे गटारी गत हारी अमावस्याच्या निम्मिताने मांसाहार वर यथेच्छ ताव मारला जातो. आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी समस्त नॉनव्हेज प्रेमी मटण, चिकन अंडी खाताना दिसतात. या दिवशी अनेक हॉटेल्समध्ये नॉनव्हेज प्रेमींची तुंबड गर्दी दिसून येते तर काहीठिकाण पार्टीचे नियोजन हि दिसून येत. त्याचप्रमाणे मोठयाप्रमाणत मद्यविक्री दिसून आली आहे . काही कुटुंबामध्ये गणपती आगमन आणि विसर्जनपर्यंत मांसाहार आणि मद्यपान केले जात नाही. त्यानंतर अनेक सण लागोपाठ असल्याने मांसाहार चा विषयच येत नाही. रविवार चा दिवस हा दिवस कुटुंबातील सदस्यांचा दिवस सुट्टीचा दिवस. एकत्र येऊन मज्जा मस्ती करण्याचा हक्काचा दिवस असल्याने गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी सुवर्ण योग च असतो. पण दुसऱ्याबाजूने विचार केला तर या श्रावणात जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे जड अन्न लवकर पचत नाही. तसेच हा माश्यांचा पजननाचा असतो, म्हणून मासे खाणे टाळले पाहिजे. 


हा दिवस म्हणजे मज्जा मस्ती आणि भरपोट मांसाहार असे बऱ्याच जणांना माहित आहे. पण गटारी अमावस्या आणि गटार यांचा काडीमात्र संबंध नाही. हेच आपल्यापैकी काहींना ठाऊक नाही आहे. खरतर गटारी अमावस्या हि गतहारी अमावास्या असून या नावामागे काही मूळ करणे देखील आहेत. पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणात शहराची घाण वाहून घेऊन समुन्द्रात मिसळतात. तीच घाण मासे वाटे आपल्या शरीरात जाण्याची भीती असते. त्यामुळे असे आहारटाळणे हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे. गतहार हि शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत या शब्दाचा अर्थ गेलेला किंवा त्यागलेला असा अर्थात काही आहार चा त्याग . 


खरतर श्रवणात हिंदू संस्कृतिचे अनेक सणांचा वारसा आपण जपला जातो. चांद्रमासा प्रमाणे बारा महिन्यांमध्ये वेगवेगळे सण हिंदू संस्कृती मध्ये आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणांमागे काही शास्त्रीय करणे देखील आहेत. असेच एक शास्त्रीय कारण आपल्या श्रावण महिन्याला आहे. या ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली दिसते. त्यात साधं खाण पचवणं सुद्धा कठीण होऊन जात असत. तास मांस मासे वैगरे गोष्टी पचण्यास मुळातच अधिक कठीण असतात. अश्या दिवसांमध्ये मांसाहार न करणंच शास्त्रीय दृष्ट्या योग्य असत. महिनाभर मांसाहार खायाला भेटणार नाही म्हणून गटारी या दिवशी तुटून पडणे टाळा. त्यामुळे या दिवशी गटारी नाही तर भक्ती भावाने जीवनातील अंधारमय शक्ती दूर करण्यासाठी घरातले दिवे प्रज्वलित करून दीप अमावस्या साजरी करूया आणि आपली संस्कृती जपून ती पुढच्या पिढीला सांगूया.  


सचिन कृष्णा तळे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale