एकतेचा एकच नारा , हर घर तिरंगा
"१५ ऑगस्ट २०२२ मध्ये भारताने संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा केला त्यावेळी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" चा नारा दिला आणि बघता बघता हिमालय पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देश हा तिरंगा च्या रंगा ने रंगून गेला होता. ना जात, ना धर्म, ना भाषा, ना पक्ष . या मोहिमांतर्गत सगळ्या देशबांधवानी भाग घेतला. आजवर आपण आपल्या घरावर अनेक रंगाचे झेंडे फडकावले पण तिरंगा फडकवणे हि अभिमानाची संधी २०२२ पासून आपल्याला मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात "हर घर तिरंगा अभियान" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या चारही बाजूने अराजकता पसरलेली आहे अश्यावेळी हि मोहीम आपल्याला एकतेचा संदेश देण्याचं काम करेल यात शंका नाही"
तिरंगा मोहिम च्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकावण्याची सरकारची हि योजना आहे. एक काळ असा होता कि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता पण आता सामान्य माणूस हा आपल्या घरावर, कार्यालयावर तिरंगा फडकवू शकतो. २००२ मध्ये ध्वज संहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला आहे. ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबविण्यात आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे ३ दिवस घरोघर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. अडीच कोटी घरावर तिरंगा फडकावण्याचं लक्ष सध्या राज्यासमोर आहे. एक तिरंगा साधारण १० रुपयाचा असेल तर या अभियानवर २० कोटी च्या आसपास खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेत सर्वात जास्त मदत हि छोटे मोठे महिला बचत गट यांना होणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकप्रतिनिधी द्वारे झेंड्याच वितरण होणार त्यामुळे विक्री हि मोठ्या प्रमाणात असेल. निर्णय घेतल्या नंतर अनेक कापड उद्योग सध्या कामाला लागली असेल यात शंका नाही.
'हर घर तिरंगा' मोहीम ही एक लोकचळवळ बनली आहे ज्यात सर्वजण एकत्र येऊन खेड्यांपासून शहरांपर्यंत, देशभरातील लोक तिरंगा फडकवत आपल्या देशासाठी शौर्याने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसून आलेत. सध्या देशाच्या चारही बाजूने अराजकता पसरलेली आहे. अफगाणिस्तान , श्रीलंका आणि आता बांगलादेश अन पाकिस्तान कोणत्या परिस्थितीतून जातोय हे आपण पाहतोय. जागतिक स्तरावर भारताची होणारी प्रगती आणि भारताला मिळणारा मानसन्मान हा काहींना पाहवत नाहीय. अश्यावेळी भारतातील प्रत्येक नागरिकाने जात, धर्म, भाषा , पक्ष विसरून जगाला या मोहिमेंतर्गत एकता दाखवून देण्याची हि एक सुवर्ण संधी आपल्या समोर आली आहे. जसा मंदिरातला देव, मशिदी मधील कुराण, चर्च मधील क्रॉस महत्वाचा तसाच तिरंग्याचा मानसन्मान हा महत्वाचा आहे त्यामुळे तो कितपत आणि कसा ठेवायचा आणि किती श्रद्धेने फडकावयाचा हि सरकारची जवाबदारी नसून आपली आहे. भारतीय राष्ट्रध्वज भारतातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवतो. हे आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि राष्ट्रध्वजाबद्दल सर्वत्र आपुलकी आणि आदर आणि निष्ठा आहे. भारतातील लोकांच्या भावना आणि मानसिकतेमध्ये ते एक अद्वितीय आणि विशेष स्थान व्यापलेले आहे. ज्यांची सोशल मीडियावर खाती आहेत ते त्यांचे प्रोफाइल चित्र तिरंग्यामध्ये बदलून सहभागी होऊ शकता.
घरावर तिरंगा लावण्यापूर्वी काही नियम-
-ध्वजारोहण करतान हे लक्षात ठेवावे की, तिरंग्याचा सन्मान सर्वात महत्वाचा आहे. कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये. कापडी ध्वज चा वापर करावा.
-राष्ट्रध्वज कोणासमोरही झुकवू नये. त्यासह तिरंग्याच्या आसपास इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने लावलेला नसावा.
-तिरंगा कधीही उलटा फडकावू नये. ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वरती दिसला पाहिजे.
-ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.
-तिरंग्याच्या दांड्यावर इतर कोणतीही गोष्ट अथवा वस्तू नसावी. त्यामध्ये फुलं, माळा यांचा समावेश आहे.
-कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
-तिरंग्याचा कधीही एखादा पेहराव म्हणून वापर वापर करू नये. आपला रुमाल, उशी तसेच कपडे किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर तिरंग्याचा वापर करू नये. तसेच तिरंग्यावर कधीही, काहीही लिहू नये.
-३० डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये सुधारणा करण्यात आली आणि पॉलिस्टर किंवा मशीनपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाला परवानगी देण्यात आली. आता, राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा यंत्राने बनवलेल्या, कापूस/पॉलिस्टर/लोर/रेशीम खादी बंटिंगचा असेल.
- राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असावा. ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 3:2 असावे.
ध्वजसंहिता काय आहे?
राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी ध्वजसंहिता २००२ चं पालन करावं लागतं. तसंच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१ चंही पालन करावं लागतं.
या संहितेच्या २.१ या कलमानुसार सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान ठेवून कोणत्याही ठिकाणी ध्वज फडकावण्यावर बंदी नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास मात्र तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. २० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती.
आतापर्यंत सहा वेळा बदलला झेंडा-
१९०६ भारताचा स्वातंत्र्यलढा जसजसा तीव्र होत होता, तसतसे क्रांतिकारी पक्ष आपापल्या पातळीवर स्वतंत्र राष्ट्राच्या स्वतंत्र अस्मितेसाठी स्वत:चा झेंडा तयार केला. देशाचा पहिला प्रस्तावित राष्ट्रध्वज १९०६ मध्ये दिसला. हा राष्ट्रध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान चौक, कोलकाता (आता ग्रीन पार्क, कोलकाता) येथे फडकवण्यात आला होता. या ध्वजावर हिरवा, पिवळा आणि लाल असे तीन रंगाचे पट्टे होते. त्याच्या वरच्या हिरव्या पट्टीत आठ पांढऱ्या रंगाची कमळाची फुले होती. मध्यभागी पिवळ्या पट्टीत वंदे मातरम लिहिलं होतं. याशिवाय सर्वात खाली असलेल्या लाल पट्टीत पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्याची चित्रं होतं.
१९०७ मध्ये देशाचा दुसरा नवा राष्ट्रध्वज जारी करण्यात आला. सुरुवातीला निर्वासित झालेल्या मॅडम भिकाजीकामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारक साथीदारांनी मिळून पहिल्या ध्वजात काही बदल करून पॅरिसमध्ये भारताचा नवा राष्ट्रध्वज उभारला. हा राष्ट्रध्वज दिसायलाही आधीच्या ध्वजासारखाच होता. पण त्यामध्ये रंग बदल करण्यात आला होता. या ध्वजामध्ये भगवा, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे पट्टे होते. मध्यभागी वंदे मातरम लिहिलं होतं.
१९१७ मध्ये भारताचा आणखी एक नवीन ध्वज प्रस्तावित झाला. या नवीन ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या रंगाचे पट्टे होते. ध्वजाच्या शेवटी काळ्या रंगात त्रिकोणी आकार होता. त्याच वेळी, डाव्या कोपऱ्यात एक युनियन जॅक देखील होता. तर चंद्र आणि तार्यांसोबत सात नक्षत्रही त्यात समाविष्ट होते. हा नवा ध्वज पहिल्यांदा डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवला होता.
१९२१ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने अधिवेशनादरम्यान बेझवाडा (आता विजयवाडा) येथे एका आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने महात्मा गांधींना हिरवा आणि लाल रंगाचा झेंडा दाखवला, गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यांनी त्यात काही बदल केले. त्यामध्ये आणखी एक पांढरा पट्टा जोडला. तसेच यामध्ये देशाचा विकास दाखवण्यासाठी मध्यभागी एक चरखाही होता. अशाप्रकारे चौथ्यांदा राष्ट्रध्वज बदलला.
१९३१ मध्ये एका दशकानंतर पुन्हा एकदा भारताचा राष्ट्रध्वज बदलण्यात आला. या झेंड्यामध्ये वरती भगवा, मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरव्या रंग होता. यामध्ये मधल्या पांढऱ्या पट्टीमध्ये लहान आकारात चरखा दाखवण्यात आला होता. पांढऱ्या पट्टीतील चरखा हे राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचं मानलं जायचे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हा नवीन ध्वज अधिकृतपणे स्वीकारला.
१९४७ मध्ये अखेर भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाला तिरंगा राष्ट्रध्वज मिळाला. २२ जुलै १९४७ रोजी भारताचा ध्वज स्वीकारण्यात आला. घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने २२ जुलै १९४७ ला या ठरावाला मंजुरी दिली. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकविण्यात आला. हा राष्ट्रीय ध्वज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकविण्यात आला.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ -
भारतीच्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग प्रामुख्याने आहेत. भारतीय ध्वज संहितेनुसार, भारतीय ध्वजाची रुंदी:उंची गुणोत्तर ३:२ आहे. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, आणि पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा आणि समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असा बोध या अशोकचक्रातून होतो. परंतु या तीन रंगाला काही समाजकंटकांनी धर्माशी जोडून दिले हि शोकांतिका आहे.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment