Monday, 31 January 2022

मराठी संशोधन मंडळ

 


एखाद्या कवीचा किंवा लेखकाचा, एखाद्या वाङ्मयप्रकाराचा, एखाद्या कालखंडाचा संपूर्ण व सूक्ष्म अभ्यास करून त्याबद्दलचे निर्णायक सिद्धान्त मांडण्याचे कार्य अनेक संशोधक संस्था सध्या करत आहेत. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेला सामिक्षातमक अभ्यास किंवा वैज्ञानिक चिकित्सा म्हणजे संशोधन होय. जिज्ञासा अथवा ज्ञान संपादन करणे ही माणसाची मुलभूत प्रवृत्ती आहे. भावी पिढी साठी अन खास करून मराठी विषयावर अभ्यास करू पाहणाऱ्या होतकरू तरुणांसाठी मराठी वाङ्मयाच संशोधनकार्य हि काळाची गरज आहे. मराठी वाङ्मयाचे, भाषेचे संशोधन व्हावे यासाठी खास स्वतंत्र, संशोधनाकरिता एक संस्था स्थापन व्हायला हवी अशी ईच्छा चिंतामण द्वारकानाथ देशमुख ह्यांनी १९४३ साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या व्याख्यानमालेत व्यक्त केली होती. ह्याच विचारांवर प्रा. प्रियोळकरांनी मराठी संशोधन मंडळाची कल्पना १९४६ साली मांडली आणि त्यांच्या कल्पनेवर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या पाठिंब्याने १ फेब्रुवारी १९४८ रोजी मराठी संशोधन मंडळाची स्थापना हि नायगाव मुंबई मध्ये झाली. त्यावेळी मंडळाचे पहिले अध्यक्ष भारतरत्न पांडुरंग वामन काणे होते.

 

१ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी संशोधन मंडळ हे ७५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. मंडळाचे शैक्षणिक कार्यात हि मोठे योगदान आहे कारण मंडळा तर्फे मुंबई विद्यापीठात एम. ए. (मराठी) साठी लेक्चर्स तसेच पीएच. डी.चे संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली नंतर अनेक नामवंत लेखकांनी , ख्यातनाम विद्वान विद्यार्थ्यांनि त्यांची पीएच. डी. मंडळातून पूर्ण केले आहे. पोर्तुगीज राजवटीत नाश पावलेल्या मराठी, कोंकणी बोलीतील अनेक पुस्तके मंडळांनी उजेडात आणले. मराठी भाषा विषयी संशोधन करणे व संशोधनास सहाय्य करणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्टे असून  प्राचीन मराठी ग्रंथाच्या चिकित्सक पद्धतीवर आवृत्या काढणे , सेंट पिटर्सबर्ग कोश किंवा ऑक्सफर्ड इंग्रजी कोष यांच्या पद्धतीवर मराठी भाषेचा कोश तयार करणे. थोडक्यात संशोधन प्रकल्प हाती घेऊन ग्रंथ प्रकाशन करणे , पुरातन मध्यकालीन शिलालेख ताम्रपट अन हस्तलिखितांचा संग्रह जपणूक करणे , शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करणे अश्या विविध बाबीतून मराठी संशोधन मंडळाचे कार्य चालू आहे. 

 

संशोधन हि एक प्रक्रिया आहे.त्यासाठी अनेक साधनांचा उपयोग करून त्याला संग्रहित करावी लागते. संशोधन करताना निरीक्षण करणे , मुलाखती घेणे , प्रश्नावली तयार करणे , शोधिका सूची बनवणे , त्यावर पडताळणी करणे आणि महत्वाची म्हणजे प्रत्येक ओळीवर साहित्यावर प्रामाणिक चाचणी करून साध्या सोप्या शब्दात वाचकांपर्यंत पोहचवणे. ह्याच साधनांच्या  साह्याने मंडळाने मुक्तेश्वरकृत महाभारताच्या आदिपर्वाचा पहिला खंड १९५१  साली प्रकाशित केला. 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' , " देवनागरीची ध्वनिलिपी " , " भारतीय लिप्यांची तात्विक एकात्मता ", "साहित्यभ्यासाची शैलीलक्ष्य पद्धत", " प्राचीन कोरीव मराठी लेख" , "अमृतानंद विरचित योगराज टिळक" इ .  सुमारे १०० च्या आसपास छोटे मोठे ग्रंथ मंडळाने वेळोवेळी प्रकाशित केले आहे. प्रामुख्याने ज्या विषयांवर सर्वसाधारण प्रकाशक हात घालणार नाहीत असे विषय निवडून ते प्रकाशित करणे हि वैशिष्ठ मराठी संशोधन मंडळाचे आहे.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

 

 

 

Saturday, 29 January 2022

 

नाव - सचिन कृष्णा तळे

पत्ता - तिरुपती निवास,लेन नंबर , सुखसागर भाग १, कात्रज , पुणे

शिक्षण - बी कॉम

दूरध्वनी – ७७०९०९९६४६

ब्लॉग  - https://sachinktale.blogspot.com/

चित्रपट लेखन –

आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात "ब" वर्ग सभासद तसेच स्क्रीन रायटर्स एसोसिएशन Associate member मध्ये नोंदणी आहे 

१) प्रशांत सुर्वे दिग्दर्शित "कन्फयुज" ह्या मराठी चित्रपटात तीन गाणी लिहिली आहे. त्यात आयटम सॉंग सोबत एक विरह गीत आहे जे आदर्श शिंदे ह्यांनी गायलं आहे.  (काही आर्थिक कारणास्तव अजून तो प्रदर्शित झाला नाही)

२) विराग मधुमालती दिग्दर्शित "डॉ तात्याराव लहाने" ह्या मराठी चित्रपटासाठी चित्रपटाचा शेवट अलका कुबल ह्यांच्यासाठी एक ५ मि सवांद लिहिला आहे.

३) "कस्तुरी" ह्या मालिकेसाठी कथा आणि डायलॉग लिहिले आहे.

४) विराग मधुमालती ह्यांच्या भगवान शंकरावर आधारित शिव गीत लिहिले आहे.

साहित्य क्षेत्र –                                                              

१) आजवर अनेक वृत्तपत्र, मासिक, साप्तहिक अन डिजिटल व्यासपीट मधून एकूण २५ लेख, ४० कविता, 10 पुस्तक परिचय अन ४ संस्था परिचय प्रकाशित झाले आहे.

२) चपराक, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स ह्या वृत्तपत्रामध्ये सामाजिक व राजकीय अश्या प्रकारच्या विविध विषयांवर मत मांडण्याची संधी मिळाली व ते प्रकाशित झाले आहे.

३) स्वातंत्रवीर सावरकर ह्याच्या सहा सोनेरी पाने ह्या पुस्तकाला गद्य व पद्य ह्या भागात त्याची मांडणी केली आहे (अप्रकाशित)

४) छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या चौरंगा ह्या घटनेवर आधारित "रंगा" नावाची कादंबरी लिहिली आहे (अप्रकाशित )

 

गझल : एक नाही, अनेक विषयांवर बोलते !

 


 

मार्ग काहीतरी काढ ह्यातून रे

हार मानू नको तू असा सारखा

 

सोबतीची जरी सर्व झाले पशु

तू तरी वाग ना माणसासारखा

 जेष्ठ गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत ह्यांच्या "तू तरी" ह्या गझलेतील हि ओळ. कविता जितक्या वाचायला आणि ऐकायला सुंदर श्रवणीय वाटतात त्याहून सुंदर गझल. कारण गझल हि एका विषयावर आशेवर ना थांबता ती आधीक विषयावर बोलते. दोन्ही ओळी समांतर मात्रात आणि मतल्याच्या दोन्ही ओळींमधे काफ़िया रदीफ़ असल्याने संगीतकाराना देखील गझल अगदी मोहक वाटते. उत्तम कवीच एक चांगली गझल लिहू शकतो असं म्हणतात कारण गझलेच गणित हि तितकच अवघड. गझल हि स्वतंत्र परंतु कमीतकमी पाच म्हणजे दोन दोन ओळींच्या कवितांची एक गज़लतंत्रातील मालिका तयार होते. थोडीशी किचकट असल्याने अनेक कवी गझलच्या दिशेने भरकटत नाही. म्हणून त्या प्रत्येक कविसांठी वरील ओळ योग्य ठरते "हार मानू नको तू असा सारखा"

 

 विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात माधव ज्युलियन ह्यांच्या विशेष प्रयत्नामुळे तसेच महाराष्ट्रात ह्या मराठी मातीत गझल रुजली ते सुरेश भट साहेब ह्यांच्या मुळे. उर्दू पारशी हिंदी नंतर सर्वात जास्त गझल हि मराठीत लिहिली गेली आहे कारण सुरेश भट साहेब ह्यांनी अनेक कवींना गझलेची बाराखडी लिहून ती शिकवली रुजवली आणि वाढवली. कवींनी गझल लिहावी म्हणून अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आणि जे चांगली गझल लिहीत आहे त्यांना एकत्र केलं त्यांना त्यांच्या ह्या काव्याला प्रोस्थान देण्यासाठी मराठी गझलांचा एक प्रातिनिधिक संग्रह १९९० मध्ये प्रकाशित केला. तोच हा संग्रह "काफला" आहे. महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरील विखुरलेल्या निवडक ७३ कवींच्या एक किंवा दोन अश्या गझलां निवडून १२५ गझलांचा हा संग्रह सोबत गझलकारांच छायाचित्र आणि शेवटी कवींचे परिचय पत्ते देण्यात आली आहे.

 

 काफला ह्या अरबी शब्दाचा अर्थ प्रवाश्यांचा तांडा म्हणजे एक समूह. श्रीराम पचिंद्रे, श्रीकृष्ण राउत , प्रदीप निफाडकर, चक्रधर बंडू, इलाही जमादार, वसंत देशपांडे, शरद म्हात्रे , वैष्णव सुभाषचंद्र, राजा मिसर, स्वतः सुरेश भट साहेब , अविनाश कांबळे, भा चव्हाण अश्या नामवंत गझलकारांचा हा काफला आणि त्यांच्या गझला ह्या वाचनीय आहेत. रसिकांना हा संग्रह एक चांगली गझलच नाही तर एक चांगल काव्य वाचून एक मैफिल रंगवलेली भासेल.

 

प्रत्येक गाव ठेवी, माजून रावणाला

उपयोग काय सांगा, जाळून रावणाला

 

 

पुस्तक - काफला

संपादक - सुरेश भट आणि अविनाश कांबळे

प्रकाशक - कॉन्टिनेनटल प्रकाशन

पाने - १५५

किंमत - तीस रुपये

 

सचिन कृष्णा तळे

 

Friday, 28 January 2022

वाईन हि शेतकरी फायद्याचे कि सरकारी ?

     राज्यात वाईन हा विषय विरोधकांनी चांगलाच उचलून धरला आहे. सोशल मीडियावरून हि विरोध दर्शवला जात आहे. विरोधकांकडून विरोध होणे हे साहजिकच आहे रास्त आहे. पण जनसामान्य लोकांकडून हि ह्या निर्णयाचा विरोध दिसतोय. वाईन जरी द्राक्षे किंवा धान्यापासून बनवत असले तरी हि दारूच्या दर्जात मोडते. इतकेच काय तर मर्यादेत व नियमित वाईनचे सेवन केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते असा दावा केला जातो. वाईन च्या विक्रीने जर शेतकरी वर्गाचा फायदा होणार असेल तर त्याचे सर्व सामान्य शेतकरी वर्गातून स्वागत च केले जाईल. मुळात सरसकट सर्वच शेतकरींना ह्याचा फायदा होणार आहे असेही नाही. जे बागायतदार आहेत जे द्राक्षे किंवा वाईन साठी उपयुक्त पीक घेतात त्यांनाच काय तो त्याचा फायदा.

 

    सुपर मार्केट , मॉल तसेच किराणा दुकानात आता सहज वाईन उपलब्ध होणार आहे . कारण गेल्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट , मॉल तसेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या सुपरमार्केट मध्ये एक स्टोल टाकून तुम्ही वाईन विक्री करू शकता. हो ,हि छोट्या मोठ्या उद्योगपती व्यापारी साठी आनंदाची बातमी असावी पण परंतु हि बातमी निराशाजनक ठरू शकते. आजपासून आपण आता आपल्या शॉप मध्ये वाईन विक्री करू शकतो ह्या विचारात जर व्यापारी असतील तर तस अजिबात नाहीय. व्यापारी वर्गाला हे माहित असावं कि एखाद वाईन शॉप, बियर शॉप किंवा दारूचे अधिकृत दुकान चालू करायचं असेल तर त्यासाठी लायसन्स घेणे बंधनाकार आहे. आणि ह्या लायसन्स ची रक्कम किती लाखांच्या घरात आहे हे सांगायची गरज नाही. तुमच्या दुकानात तुम्हाला हि वाईन विक्रीसाठी ठेवायची असेल तर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन आधी वाईन वक्रीसाठीचा रीतसर लाख रूपये खर्च करून परवाना घेणे आणि त्याला दरवर्षी नुतीनीकरण करावे लागणार आहे. आणि हीच सरकारची खरी कमाई आहे.

 

    जर वाईन विक्रीने व्यापारी वर्गाचा फायदा होईल असं वाटत असेल तर तस हि नाही. कारण हि वाईन तुम्हाला च खरेदी करून  तुम्हालाच ती विकावी लागणार आहे. व्यापारी दृष्टीने नफ्याची बाजू पाहिलं तर ह्यात जीएसटी अन उत्पादन कर ने सगळ्यात जास्त फायदा नफा हा सरकारचा असणार आहे. दारू मद्य पिणारा व्यक्ती जो पर्यंत त्याला किक बसत नाही , जो पर्यंत त्याला गुंगी येत नाही तोपर्यंत तो पितो. वाईनने सहसा लवकर गुंगी येत नाही. त्यासाठी वाईन खरेदी करायला येणार ग्राहक हा कोणत्या स्तिथी मध्ये असेल हे सांगता येत नाही. सुपर मार्केट अन किराणा माल च्या दुकानांचा मुख्य ग्राहक हा महिला वर्ग आहे. जर तिथे तळीराम वाईन खरेदी साठी येऊ लागले तर महिला तुमच्या दुकानात येतील का? ते सुरक्षित खरेदी करू शकतील का? तिथे काही अनर्थ प्रकार घडणार नाही ना? अश्या अनेक प्रश्नाच विचार हि होणे गरजेचे आहे.

 

    वाईन विक्रीने शेतकरी, व्यापारी अन सरकारी नफा तोट्याचा विचार आपण करत राहू. पण मुख्य मुद्दा हा आपल्या तरुण पिढीचा सुद्धा आहे. आजवर आपल्या नजरेत हे आलं असेल कि महाविद्यालय मधील तरुण तरुणी किंवा ऑफिस मधील काही कर्मचारी जेव्हा मिळून मिसळून पार्टी पिकनिक वैगेरे करण्यासाठी बाहेर परगावी जातात त्यावेळी हार्ड ड्रिंक वाले काही तरुण मंडळी तिथे असलेल्या निर्व्यसनी तरुणांना सॉफ्ट ड्रिंक आहे काही होत नाही घे म्हणून ती पेयाला  प्रवृत्त करतात. मैत्रीच्या मस्तीत जर हि चव ह्या निर्व्यसनी तरुणांच्या जिभेवर रेंगाळली तर भविष्यात त्या मुलांना त्याची सवय लागेल. प्रत्येक वेळी ते वाईनच पितील असं हि नाही . वाईन म्हणत बियर अन बियर म्हणत ब्रँडी च्या जाळ्यात कधी फसतील हे त्यांनाच कळून येणार नाही. विशेषतः घरापासून आईवडिलांपासून दूर शिक्षण घेणारे, नोकरी करणारे, हॉस्टेल लाईफ जगणारे या पुढे बिनधास्त तुम्हाला मॉल किंवा सुपर मार्केट मध्ये वाईन खरेदी करतात दिसतील. ह्याचे परिणाम आता दिसून येणार नाहीत पण हे असचं चालू राहील तर नक्कीच आपली भावी पिढी हि नशेत दिसेल आणि त्याला जवाबदार फक्त हे सरकार असेल.  सरकारी उत्पन्न वाढव्याच्या नादात हे सरकार मोठी चूक करत आहे.

 

सचिन कृष्णा तळे , पुणे 

७७०९०९९६४६

 

 

 

 

Monday, 24 January 2022

मुंबई मराठी साहित्य संघ

 


 


महाराष्ट्राच्या मातीला इथल्या शब्दांना साहित्याचा खूप मोठा वारसा आहे. आजही हा वारसा राज्यातल्या प्रमुख शहरात जोपासला जातो त्याला घराघरात पोहोचवलं जात हि आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. खास करून अश्या शहरात जिथे भारतातल्या तसेच जगातल्या सगळ्या भाषा बोल्या जातात. महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे मुंबई.  इथे परप्रांतीय लोकांच्या वाढत्या लोकसंख्येत स्वतःच अस्तित्व टिकवून मराठी साठी आग्रही असणारे महाराष्ट्रीन आणि ह्याच मराठी माणसाला मराठी भाषेविषयी जागृत करणारी मराठी भाषेची मराठी साहित्याची ओढ निर्माण करणारी साहित्य संस्था म्हणजेच मुंबई मराठी साहित्य संघ.

 

२१ जुलै १९३५ रोजी स्थापन झालेल्या साहित्य संघाला यंदा ८७ वर्ष होतील. संस्थेचे पहिले संस्थापक डॉ. अ ना. भालेकर यांच्या गिरगावातील नारायण सदन या निवासस्थानी ह्या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून हि संस्था गिरगावातल्या त्याच ठिकाणी आहे. बहुभाषा बोली जाणाऱ्या मुंबईत ह्या संस्थे तर्फे मराठी भाषा संवर्धन हेतू किती मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे हे तुम्हीच पहा. ह्या संस्थे मार्फत मुंबई अन मुंबई उपनर ह्या भागात कवींचे कविसंमेलने भरवणे त्यांना प्रोत्साहन देणे, नवोदित लेखकांचे ग्रंथनिर्मिती करणे, नाकटांचे नाट्यमहोस्तव तसेच नाट्य संमेलन भरवून नाट्य क्षेत्राची गोडी निर्माण करणे, नियतकालिके प्रकाशित करणे , साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण काम करणाऱ्या साहित्यिकांना पारोतोषिक देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करणे , भाषाध्यापन , मान्यवरांचे व्याख्याने ,साहित्यविषयक प्रासंगिक चर्चा घडवून आणणे , महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वर्ग चालविणे इ असे या साहित्य संघाच्या कार्याचे स्वरूप आहे. १९४४ मध्ये साहित्य संघाने मुंबई येथे खुल्या नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर नाट्योत्सव साजरा केला, इतकेच नव्हे तर त्यानंतर दरसाल कमीअधिक प्रमाणात मुंबईत नाट्योत्सव साजरा करण्याची प्रथा पाडलीं . आणि ही प्रथा आजपर्यंत संघाने अव्याहत पाळली आहे.

 

स्वातंत्रवीर सावरकर, आचार्य अत्रे. राजकवी यशवंत अश्या दिग्गजांच्या अध्यक्षतेखाली संघाने साहित्य संमेलन भरवले. मुंबई मराठी साहित्य संघाचं मुख्य आकर्षण म्हणजे त्यांनी साहित्य जपणूक म्हणून अनेक नाटकांची ध्वनिफीत आजही जपून ठेवली आहेत. साहित्य संघात सुमारे १९४० पासून सादर झालेली विविध नाटकांचा आणि विविध साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या खजिन्यात समावेश आहे. 'अमर भूपाळी या चित्रपटाची ध्वनिफीत असो किंवा कुमार गंधर्व यांचे ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या विषयावर केलेले भाषण असो किंवा मुंबई मराठी साहित्य संघाची ‘वाजे पाऊल आपुले, ‘नटसम्राट, ‘अश्रूंची झाली फुले, ‘पती गेले गं काठेवाडी, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो ह्या रसिकप्रिय नाटकांची ध्वनिफीत आजही संघाच्या कर्यलायात उपलब्ध आहेत आणि ती तुम्हाला पाहायला ऐकायला मिळतील.

१९५१ साली नाटकांवरील करमणूक कर हा माफ व्हावा , नाट्यगृहे व नाट्यप्रयोग याबाबत इतर सरकारी निर्बंध दूर व्हावेत म्हणून संघाने त्यावेळचे गृहमंत्री मोरारजी  देसाई ह्यांची भेट घेऊन त्यांना मुंबई मराठी साहित्य संघ तर्फे निवेदन दिले.

 

-      सचिन कृष्णा तळे

 7709099646

 

 

Sunday, 23 January 2022

स्वप्नपूर्तीचा संघर्ष मांडणारा ग्रंथ

एखादा माणूस आपल्या पूर्ण जीवनकाळात असे काही धाडसी सामाजिक भान ठेवून महत्वपूर्ण कार्य, देशकार्य करतो कि त्यामुळे इतर लोकांना त्या व्यक्ति कडून प्रेरणा मिळते, एक नवी दिशा मिळते आणि त्याच ध्येय वेड्या लोकांचे चरित्र लिहल जात , वाचल जात त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. अश्याच व्यक्तीमध्ये एकनाथजी रानडे आहेत ज्यांच्या कार्यातून वेवकानंदांच्या विचाराची गंगा सतत विश्वभर वाहत राहिली आणि आजून हि वाहत आहे

 

खरे एकनाथ जी रानडे मला विवेकानंद केंद्रातच अनुभवता आले कारण लेखक चा जसा विवेकानंद केंद्रा मधून सामाजिक प्रवास चालू झाला तसाच माझ्या हि प्रवासाची सुरवात विवेकानंदांच्या विचारातून झाली " घडा आणि घडावा ". ह्या पुस्तकाला समीर नर्लेकर ह्यांच मुख पृष्ठ असून त्याला विवेक विचार चे संपादक सिद्धाराम पाटील ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यामुळे कन्याकुमारी इथे उभारण्यात आलेल्या शीला स्मारक ह्याचा इतिहास कसा आहे, त्यासाठी कोण कोणते प्रयंत्न करण्यात आले आणि ती भव्य सुंदर शीला कशी उभी राहिली ह्याच वर्णन अतिशय सुंदर रित्या ह्या पुस्तकात मांडण्यात आले आहे . ४५ पानात आणि मोजक्या शब्दात एकनाथजी रानडे हे चरित्र मांडणे सोप कार्य नव्हते पण सामान्य वाचक वर्गाला  देखील समजेल अश्या साध्या सोप्या भाषेत ह्या पुस्तकाची निर्मिती करून सामन्यापर्यंत नाथांना पोहोचवण्याच कार्य पत्रकार सागर सुरवसे ह्यांनी केले आहे

 

महाराष्ट्राच्या मातीतून असे काही हिरे घडवले कि त्यांचा इतिहास देशाबरोबर जग हि वाचतंय. भारताच्या शेवटच्या टोकावर ज्या शिळेवर माता पार्वती ह्यांनी तप केला त्या कान्यकुमारीत श्रीपाद ह्या शिळेवर विवेकानंद ह्यांना अखंड भारताचे दर्शन झाले, अखंड भारताचे स्वप्न उभे राहिले त्याच शिळेवर मऱ्हाटमोळ्या नाथांनी एका भव्य स्मारकाचे स्वप्न पहिले आणि ती अस्तित्वात उतरवले. हे स्वप्न तरुण भारताला स्वाधीन करण्या आगोदर नाथांना स्थानिक पातळीवरून ते राष्ट्रीय पातळी का गाटावी लागलीस्मारकाला परवानगी मिळवण्यासठी फक्त दोन दिवसात ३२३ खासदारांची सह्या घेवून कितीतरी अधर्मीय राजकीय लोकांचे मनसुबे नाथानी धुळीस कसे पाडले, शिक्षित कार्यकर्त्यांची संघटना तयार करून स्मारकासाठी निधी गोळा करण्या पासून ते शिळेला विरोध करणाऱ्या काही ख्रिश्चन मिशनरी गटांना सामोरे जाण्यापर्यंत आणि सरकारला स्मारकाचे महत्व पटवून देवून ,जातीने स्मारक निर्माती साठी दिवस रात्र एक करून, ह्या भव्य शिलास्मारकाची कथा ह्या पुस्तकातून उलगडली गेली आहे.

 

स्मारकाला होणारा विरोध पाहता नाथानी पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांना भेटण्याचा प्रयन्त देखील केला परंतु भेट झाली नाही. आता स्मारकाचं स्वप्न हे एकटे नाथानाच नसून विवेकानंदांच्या त्या प्रत्येक चाहत्यांचे होते त्यामुळे  नाथानी राष्ट्र पातळीवर कार्य चालू केलं. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. केवळ दगड धोंड्याचा स्मारक बांधून  उपयोग नाही विवेकानंदाचे विचार त्यांचे कार्य देशभर पसरवण्यासाठी ५०० हुन अधिक शाखेत स्वाध्याय वर्ग , संस्कार वर्ग आणि योग्य वर्गाची सुरुवात केली. विवेकानंद स्मारक उभे राहू नये म्हणून त्या जागेवर काही ख्रिश्चन लोकांनी एक क्रॉस उभारला. १९३२ रोजी ती जागा हि हिंदू समाजासाठी पवित्र स्थान आहे हे सरकारला समजवून सांगून सरकारच्या आदेशाने शिळेवरचे क्रॉस हटवण्यात आले. परंतु पुन्हा ख्रिश्चन लोकांनी विवेकानंदांची शिला समुद्रात फेकून दिली. हा धार्मिक विरोध चालू असताना नाथानी स्मारकाचे स्वप्न पूर्ण केलं

 

एकनाथांचे बालपण ते संघकार्यात त्याची भूमिका, लोहपुरुष वल्लभ भाई पटेल ह्यांच्यातील सवांद , संघाचा राजकीय पक्ष नको? , स्मारकासाठी लागणार निधी ते स्वप्नपूर्ती आणि शेवट पतंप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी त्यांच्या शब्दात विवेकानंद केंद्राची माहिती तसेच काही नावाजलेल्या मान्यवरांची प्रतिक्रिया ह्या पुस्तकात देण्यात आली आहे. हे पुस्तक तरुण युवा वर्गाला चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी धडपड कशी असते हे वाचायला शिकायला मिळते

 

पुस्तक - एकनाथजी रानडे ( जीवन आणि कार्य )

लेखक - सागर सुरवसे 

प्रकाशक - चपराक 

पाने - ५६

किंमत - ७५ 

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale