Friday, 12 July 2024

वारकऱ्यांचा एकचं नेता एकचं पक्ष - दिंडीरवन चा पांडुरंग

 

वारकऱ्यांचा एकचं नेता एकचं पक्ष - दिंडीरवन चा पांडुरंग




 

"ज्ञानेश्वर माउली अन तुकोबांच्या अन समकालीन संतांच्या उपस्तिथीत चालू झालेली पांडुरंगाची वारी आजही भक्तिभावाने अखंड चालू आहे. वारीत सामील झालेल्या सर्व दिंड्या नेतृत्व आजही आपले ज्ञानबा तुकोबा चं करत आहेत. आषाडी एकादशी दिनी त्या भीमा चंद्रभागा किनारी महामेळावा भरतो आणि या महामेळाव्याचा एकच नेता एकच पक्ष पांडुरंग पांडुरंग. अश्यावेळी वारकऱ्यांना आपलंस करून स्वार्थ साधणारी विविध राजकीय मंडळी केविलवाणा प्रयत्न करताना दिसतातं. पण त्या राजकीय नेत्यांना काय ठाऊक उन्ह वारा पाऊस झेलत शेकडो मैल चालणारा वारकरी तुमच्या शब्दांचा भुकेला नसून तो तर पांडुरंगाच्या दर्शनाचा भुकेला आहे. जिथे मोह माया सत्ता काहीच उपयोगी नाही, जिथे स्वार्थाला श्रीमंतीला मोठेपणाला स्थान नाही अश्या वारीत जिथे फक्त माणुसकी पाहिली जाते माणुसकी पुजली जाते. जिथे जातीला नाही तर मातीला कपाळी लावली जाते. अश्या वारीत राजकीयांची घुसकोरी निषेधार्थ आहे""

 

प्रत्येक वर्षी वारी आळंदी देहू वरून निघाली कि रस्त्याच्या बाजूला अन वारीत हमखास स्वतःच्या पक्षाचं बॅनर बाजी करत काही नेते मंडळी घुसकोरी करतात. मिडिया घेऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अश्यावेळी भक्तिभाव कमी करून राजकीय शक्ती प्रदर्शन जास्त दिसून येत. काही वारकरी भुलतात अश्या गोष्टींना तर काहींना फक्त ओढ असते पांडुरंगाच्या दर्शनाची. नेता येतो डोक्यावर पगडी फेटा बांधून चार पाऊले चालतो.. नाचतो.. बोलतो..  मतांची भीक मागतो अन जातो आलिशान चार चाकी गाडीत बसून. त्याच्या बाजूला त्याचेच सेवेकरी अन त्याचेच कार्यकर्ते अन त्याचीच मीडिया. असो.. आपला विषय राजकीय नेत्यांचा नसून वारकऱ्यांच्या पांडुरंगाचा आहे.

 

द्वारकेचा श्रीकृष्ण दिंडीरवणात आला -

दिंडीरवन चा पांडुरंग म्हणजे पंढरपूरचा श्री हरीच. आताचे प्रसिद्ध असलेले पंढरपूर हे स्थान आधी दिंडीरवन म्हणून नावारूपाला होते. डिंडिरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. हा पांडुरंग दिंडीरवनात कसा आला त्याची एक सुंदर कथा आहे. कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून उपर्युक्त दिंडीरवनात ( पंढरपुरात ) येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि वेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. रुक्मिणीस भेटून तिची समजूत काढून तिला द्वारकेस घेऊन जाताना दिंडीरवनात मातृपितृभक्त पुंडलिकाचे घर दिसले. मग पुंडलिकाने श्रीकृष्णास पाहिले एक वीट श्रीकृष्णांकडे टाकली कृष्णास सांगितले की थांब ह्या विटेवर माझ्या आईवडिलांना झोप लागली की येतो. मग थोड्या वेळात तो श्रीकृष्णास भेटला मग पुंडलिकाचे आईवडील ही भेटले. मग पुडलिकाने श्रीकृष्णाकडे वरदान मागितले की देवा आपण इथेच दिंडीरवनात भक्ताच्यासाठी कायम निवास करावा. निरोप घेऊन श्रीकृष्ण रुक्मिणी द्वारकेस परत निघाली तेव्हा परत निघताना ब्रम्हदेवास बोलावून विटेवर उभ्या असलेल्या श्रीकृष्णरूक्मीणीच्या मूर्ती (विग्रह) तयार करवून पुंडलिकास भेट दिल्या मग नंतर, स्वतः रुक्मिणीसह द्वारकेस परत गेला. त्याच ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पंढरपुरात राहिल्या. त्या दिवसापासून हा वैष्णवांचा पक्ष स्थापन झाला .. तेव्हापासून चुकता देश विदेशातून लाखो विठ्ठल भक्त या पांडुरंगाच्या महामेळाव्यात येतात अन मंत्रमुग्ध होतात.

 

या वारकऱ्यांचा नेता आहे तरी कसा ?

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. अन पायाखाली पुंडलिकाची विट.

 

पुंडलिकाच्या शब्दपाई आजही विठ्ठल उभा राही -

 १६५९ साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीमध्ये पांडुरंग सुरक्षित ठेण्यासाठी विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरच्या गावांत हलविण्यात येई. अफजलखानाच्या या धार्मिक स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेविली होती आणि अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय  हयास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांचा विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. संकट काळी पांडुरंगाला या दिंडीरवनातून जावं लागलं पण त्यांनी भक्त पुंडलिकाचा शब्द मोडला नाही गेली अनेक वर्ष तो असाच उभा आहे.

 सचिन कृष्णा तळे

 


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale