Monday, 25 March 2024

दुष्ट वृत्तीचा अंत करण्या पेटवू होळीच्या ज्वाळा

 

दुष्ट वृत्तीचा अंत करण्या पेटवू होळीच्या ज्वाळा

करू साजरा धुळवड अन रंगपंचमीचा सोहळा !

 


 

"आजादी है जिसको चाहो आज उसे वर लो, होली है तो आज अपरिचित से परिचय कर लो !

हरिवंशराय बच्चन यांच्या वरील ओळी प्रमाणे होळी अन त्यामागून येणारी धुळवड अन रंगपंचमी हा एकमेव असा सण आहे ज्या सणाची भारतीय लोक आतुरतेने वाट पाहत असतात. या सणाला बंधने नाही ना वयाची ना जातीची ना धर्माची ना श्रीमंत अन गरिबीची ना थोरांची ना मोठ्यांची. हा असा सण आहे ज्या सणात सगळ्यांना स्वतंत्र आहे ओळखी अन अनोळखी कोणालाही तुम्ही तुमच्या रंगात रंगवू शकता. प्रेमाची अन मैत्रीची थोडी मस्ती थोडी पाण्यात भिजण्याची. हा सण एकमेकांमध्ये एकता निर्माण करतो, प्रेम, आनंद व उत्साह वाढवतो. हा सण लहान मोठे, भाऊ बहीण, शेजारी-पाजारी सर्वांना सोबत राहून एक दुसऱ्याचे सहकार्य करण्याची शिकवण देतो.  या दिवशी सर्व लोक आपले दुःख विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करतात.

 

पाच दिवस होळी साजरी केली जाते आणि पाचव्या दिवसाला “रंग पंचमी” म्हटले जाते. परंतु अलीकडे धुळवड ज्या दिवशी खेळली जाते त्याच दिवशी रंगपंचमी देखील साजरी केली जाते. उत्तर भारतातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची आहे. आजकाल मराठी सण विसरून अनेक जण सर्रासपणे उत्तर भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. त्यामुळे आजकाल महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जात आहे. महाराष्ट्रातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिकावंदन करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची आहे. परंतु आजकाल अनेकांना धुलिकावंदन अर्थात धुळवड म्हणजे काय हे माहीत नसते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. याला धुलिकावंदन, धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात. धुलीवंदन म्हणजे वाईट विचाराचा संहार करण्यासाठी गाईच्या पवित्र शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या एकत्र करून त्यात गाईचे तूप, कापूर, उसाचे वाढे, एरंडची फांदी या सर्व वस्तू जाळतात. अग्नी प्रजव्लित करून त्याचा धूर केल्याने वातावरण शुद्ध होते अशी भावना आहे.

 

होळी अर्थात होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेला दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे. होळीचा सण साजरा करण्यामागे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक कथा सांगितली आहे. या कथेनुसार प्राचीन काळात एकदा हिरण्यकश्यप नावाच्या एका दैत्य राजाने अमरत्वाचे वरदान प्राप्त करून पृथ्वीवरील प्रजेला त्रास देणे सुरू केले. त्याची एक दृष्ट बहिण 'होलिका' होती. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते, ज्याद्वारे की सहज आगीत प्रवेश करू शकत होती. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. प्रल्हादच्या विष्णु भक्तीला कंटाळून हिरण्यकश्यपूने त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यासाठी त्याने आपली बहिण होलिका ची मदत मागितली. होलिका प्रल्हाद ला धरून आगीत जाऊन बसली, परंतु भगवान विष्णुच्या कृपेमुळे होलिका त्या अग्निमध्ये जळाली व भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर पडला. अशा पद्धतीने होलिका दहन झाले. यावरून लक्षात येते की होळी ही वाईटावर चांगल्याचा विजय दिवस आहे. तर काही धार्मिक ग्रंथ म्हणतात की होळी खेळण्याच्या दिवसाची सुरुवात राधा आणि कृष्णा यांनी केली होती.

 

धुळवडीत अन रंगपंचमीच्या दिवशी उधळले जाणारे रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी आपल्याला आनंदी आणि सकारात्मकतेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. खरं तर हाच धुलिवंदन हा सण साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. मनुष्याच्या आयुष्यात रंग आपल्या विचार, कृती आणि भावनांवर प्रभाव टाकण्यास मदत करतात. रंग वातावरण प्रसन्न करतात आणि उत्सवाची मोहकता वाढवतात. माहितीसाठी आजकाल मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी देखील कलर थेरपीची मदत घेतली जाते. या होळीच्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी ओळखले जाते. कोकणात शिमगो म्हणतात.

 

या दिवशी महाराष्ट्रात घराघरामध्ये पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला जातो. तर यादिवशी होळीला नारळ अर्पण करून आपल्यावर कोणतेही संकट न येवो यासाठी प्रार्थनाही केली जाते. कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो.  शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. अर्थात यावेळात शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजणी करून ठेवलेली असते. चाकरमानीही खास सुट्टी काढून शिमगोत्सवासाठी गावाला रवाना होतात. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात. नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात.

 

गुलाल उधळून, टिमक्या आणि ढोल वाजवून, तसंच आनंद नृत्य करून उत्साहात होळीच्या दिवशी आपले आदिवासी बांधव होळीचा सण साजरा करतात. होळी साजरी करताना आदिवासी लोकांच्या जेवणामध्ये गोड पुरी, मासे आणि गोड भात असा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. विविध नक्षीकामाचे दागिने घालून यामध्ये स्त्री आणि पुरूष सहभागी होतात आणि आपला आनंद दर्शवतात. विविध वाद्यांच्या तालावर इथे नृत्य साजरे करण्यात येते. तर मथुरेच्या बरसानाध्ये होणाऱ्या या होळीचा संबंध प्रेमाशी आहे. राधा कृष्णाचे प्रेम इथेच बहरले आणि कृष्ण आपल्या मित्रांसह राधेसह होळी खेळायला इथे यायचा असे समजण्यात येते. राधाकृष्णाच्या प्रेमाच्या रंगाची होळी आजही इथे लठमार होळीच्या प्रतिकासह साजरी करण्यात येते. कृष्ण राधेला खूपच त्रास द्यायचा आणि मग राधा काठीने त्याला मारायला यायची असा समज आहे. त्यामुळे आजही तशाच स्वरूपाची ही लठमार होळी खेळण्यात येते.

 

उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत होळी उत्सव हा सर्वांसाठी आनंद घेऊन येतो असे म्हटले तर नक्कीच वावगे ठरणार नाही.

 

सचिन कृष्णा तळे

७७०९०९९६४६

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale