Friday, 8 March 2024

"संगीतावर" बोलू काही ...

 

"संगीतावर" बोलू काही ...




कवींच्या हृदयातून त्याच्या नजरेतून त्यांच्या विचारांतून कागदावर वृत्तबद्द शब्दांची एक सुंदर लय तयार होते. त्याला आपण कविता म्हणतो गझल म्हणतो गीत म्हणतो. त्या शब्दांना सुंदर चाल लागते त्या चालीवर मनाला स्पर्शून जाणारं संगीत तयार होत. त्यांनतर मानवी मनाला व्यक्त होण्याचं एक सुंदर असं साधन मिळत ते म्हणते गाणी. नादयुक्त गायन, वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगम म्हणजे संगीत होय.

आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात. संगीत आयुष्याला प्रेरणा देते. एकांत दूर करते. प्रेम करण्यास भाग पाडते. मार्ग दाखवते. राग, वैराग्य, आक्रोश, आनंद, भक्ती, शक्ती तर कधी कधी अंगात चेतना अन एक नवा संदेश देण्याचं महत्वपूर्ण कार्य संगीत करत असते. संगीत हा एक आनंददायी आवाज आहे जो सुरांचा आणि सुसंवादाचा मिलाफ आहे आणि जो तुम्हाला शांत करतो. तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारा दुवा म्हणजे संगीत आहे. संगीतामध्ये सरगम, राग, ताल इत्यादींचा समावेश असतो. संगीत हे केवळ मानवांनी बनवलेले नसून ते निसर्गातही असते. तुम्ही कधी धबधब्याचा किंवा वाहणाऱ्या नदीचा आवाज ऐकला आहे का? तुम्हाला तिथे हि संगीत ऐकू येईल. पक्ष्यांच्या किलबिलाट मध्ये संगीत आहे, मोराच्या अन कोकिळेच्या आवाजात सुंदर संगीत आहे. आपल्या आसपास सैरभैर उनाड वारा देखील कधी कधी संगीत निर्माण करत असतो. पावसाच्या कोसळणाऱ्या धारेत संगीत आहे. शाळेच्या आवारात वाजणाऱ्या घंटेत देखील संगीत आहे.

संगीतामध्ये व्यक्तीला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या बरे करण्याचे मोठे गुण असते. संगीत हे ध्यान साधनेचा एक सुंदर प्रकार देखील आहे. संगीत तयार करताना किंवा ऐकत असताना माणूस त्याच्या सर्व चिंता, दुःख आणि वेदना विसरतो.  द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाच्या बासरीतून निघालेल्या संगीताने गोपीच काय तर गाय वासरे देखील मंत्रमुग्ध झाल्या. कृष्णाच्या बासरीतून निघालेल्या संगीतात इतकी ताकद होती कि ऐकणारे स्वतःला त्याच्या स्वाधीन करायचे. संगीत हे भगवंताशी जोडण्याचे एक अतिशय शक्तिशाली माध्यम आहे. संगीत हे ईश्वराच्या उपासनेचे आणि आपल्या आत्म्याशी जोडण्याचे सर्वात शुद्ध प्रकार देखील आहे. चांगल्या संगीतातला प्रत्येक स्वर हा स्वयं प्रकाशित असतो त्याच्या सुंदर आवाजाने आपण देखील अंतर्मनातून प्रकाशित होत असतो.  पहाटे पहाटे गायिले जाणारे राग हे आरोही चलनांनी गायिले जातात. सकाळच्या बऱ्याच रागांचा वादी स्वर धैवत असतो. धैवत म्हणजे धारिष्ट्य. धैवत म्हणजे कामसूपणा. धैवत म्हणजे उत्साह.

विविध वाद्यांच्या तालमीतून एकत्र आणला जाणारा आवाज म्हणजे संगीत ही जीवनाची वैश्विक भाषा आहे. माणसाच्या जीवनात संगीत नसेल तर ते किती भक्कास वाटेल याची कल्पना करून तरी पहा. संगीतात  चिंता, नैराश्य, निद्रानाश इत्यादी रोग बरे करण्याची शक्ती असते. संगीताच्या सामर्थ्याची साक्ष म्हणजे तानसेनने राग मेघ मल्हार गाऊन पाऊस पाडला होता. एकाग्रता सुधारण्यास संगीत फार मदत करते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात चांगल्या संगीताची रुची वाढली पाहिजे. कमी शब्दात सखोल अर्थ सांगणार संगीत जीवनातील वेदनां कमी करण्यास मदत करते. अगदी सोप्या आणि आताच्या भाषेत सांगायचं तर संगीत हे मूड फ्रेशनर आहे. संगीताचा थेट परिणाम आपल्या हार्मोनल पातळीवर होत असतो. संगीत ऐकल्याने आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होते आणि दीर्घकालीन तणावाच्या प्रभावाचा प्रतिकार होतो. संगीत कानांद्वारे हृदयाला भिडत असते म्हणून झोपण्यापूर्वी शास्त्रीय किंवा आरामदायी संगीत ऐकल्याने झोप सुधारते.

ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचा सहवास नित्य मिळाल्यावर त्याच्या स्वभावातले बारकावे आपल्याला कळू लागतात, त्याचप्रमाणे स्वरांचा नित्य सहवास लाभल्यावर आपल्याला त्या संगीतातले बारकावे सहज कळून येतात. संगीताची खरी निर्मिती हि आपल्या आसपासच्या निसर्गातूनच झालेली आहे. आपल्या प्रत्येक भावना ह्या संगीतातील स्वरांशी बांधल्या गेलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक आठवणी ह्या संगीताशी जोडलेल्या असतात. संगीताचा शोध कोणी लावला हे कोणालाही माहिती नाही. पहिले गाणे कोणी गायले, किंवा पहिली ट्यून कोणी वाजवली किंवा आज संगीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या लयबद्ध ध्वनी कोणी तयार केल्या हे सांगण्यासाठी कोणताही ऐतिहासिक पुरावा अस्तित्वात नाही. यावरून विचार करा कि मानवाच्या निर्मीतीच्या अगोदरच्या काळापासून संगीत आहे. कोसा कोसावर जशी भाषा बदलते तसेच संगीत देखील बदलताना दिसते. त्यामुळे संगीतातले बारकावे समजून घेत संगीत प्रेमी व्हा आणि जीवनात एक वेगळा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्य फार सुंदर वाटेल.

-          सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale