Tuesday, 24 August 2021

देवा घरची फुलं

 देवा घरची फुलं 


लहान मुलांचा निरागस भाव पाहिला तर पुन्हा लहान व्हावं वाटतं. वाढत्या वयात लहानपण कधी निसटून जात हे कळत नाही त्यामुळे लहानपणाच्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात असा काही दरवळत असतो कि एखाद लहान मुलं दिसलं कि त्याच्या सोबत आपण हि लहान होऊन जातो. पण काहींचं लहानपण हे इतकं वाईट असत कि ते कधीच आठवणीत ठेवू नये आणि कोणाच्या वाटेला हे असं बालपण येऊ नये. 


पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेर घर. अर्थात पुण्यात जो येतो तो शिक्षण घेण्यासाठी स्वतःला घडवण्यासाठी. टोलेजंग इमारती, मॉल, आयटी कंपन्या, अनेक शैक्षणिक संस्था तसेच औदयोगिक कारखाने आणि वाढती लोकसंख्या हि नव्या स्मार्ट पुण्याची ओळख. पण ह्यात अजून एक उल्लेख राहिला ती म्हणजे पुण्यात वाढती बेरोजगारी आणि रस्त्याच्या कडेवर भीक मागणारी लहान मुलं. होय कारण पुण्यात असे बरेच चौक आहे, बाजार पेठ आहेत , स्टेशन परिसर आहे कि जिथे लहान मुलं भीक मागताना दिसतील किंवा हातात कापड घेऊन तुमच्या गाडीला पुसत पाच दहा रुपयाची मागणी करताना दिसतील.  काहीवेळेला तुम्हाला ती फुल किंवा  खेळणी सारख्या वस्तू विकताना दिसतील. जर बारकाईने पाहिलं तर हे प्रमाण गेल्या काही वर्षात जास्त वाढले आहे त्यामागचं कारण स्थलांतर असू शकत. पर-राज्यातून आपल्याच जिल्ह्यातील दुष्काळ भागातून अनेक जण शहराकडे वळतात. घर दार सोडून लहान मुलाना घेऊन ती शहरात येतात आणि रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहतात. त्यांना रोजगार मिळेल तेव्हा मिळेल पण पोटाची भूक मिटवण्यासाठी ह्या निरागस बालकांना त्यांच्याच पालकांकडून भीक मागण्यास प्रवृत्त केले जाते हे सत्य आहे. ह्यात आईच्या झोळीत तीन चार महिन्याचं मुलं देखील दिसेल. 


आपण काय करतोय हे ह्या मुलांना काहीच माहित नसते. फक्त हातात पैसे किंवा काही खायला मिळालं कि ते त्यांच्या आई वडिलांकडे देयचे आणि खेळाला जायचं. ज्या हातात पाठी आणि पुस्तक हवं त्या हातात ह्यांना पैसा येतो. ज्या वयात लाड असतात त्या वयात उन्हाचे चटके ह्यांना खावं लागत. कधी कधी मनात हा विचार येतो कि हि सुंदर गोंडस मुलं नक्की त्यांचीच आहेत का? मुलं पळवून नेणे हा प्रकार राज्यात देशात नवीन नाही. एक मोठी साखळी सुद्धा ह्यांच्या भोवती असते हे अनेक चित्रपटातून दाखवलं गेलं. अनेकांनी हि मुलं त्यांची नाहीत हे सिद्ध पण केलय. अनेक सामाजिक संघटनेनं ह्या मुलांसाठी रस्त्यावर शाळा देखील भरवल्या. मुळात विषय आहे भीक मागणाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यात लहान मुलांचा असणारा सहभाग जो देशाच्या राज्याच्या प्रगतीच्या दुर्ष्टीने चांगला नाही. भिक्षा प्रतिबंध कायद्यानुसार चौकात, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणे हा देखील एक प्रकारे गुन्हाच आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्याधींचे जखंमाचे, अपंगत्वाचे किंवा असहायतेचे प्रदर्शन करून पैसे अन्य वस्तूंची मागणी करणे म्हणजेच भीक पण त्यात लहान मुलांना घेऊन भीक मागणे हा खूप मोठा गुन्हा आहे कारण आपण देशाची भावी पिढी बर्बाद करतोय. 


सर्वांना मूलभूत सुविधा, निवारा व वैद्यकीय सुविधा देणे हे सरकार चे कार्य आहे आणि त्यासाठी शासन अनेकवेळा कार्य करताना दिसतात. पुण्यात अश्याच मुलांसाठी रात्र निवारा प्रकल्प पालिकेतर्फे राबवला जातो. सेनादत्त सांस्कृतिक हॉल (सेनादत्त पेठ) , दुध भट्टी समाजमंदीर (बोपोडी ), मदर तेरेसा समाजमंदिर (येरवडा) हि ती ठिकाण जिथे बेघर, बेसहारा लोकांसाठी रात्र निवारागृहांची संकल्पना राबवली जाती. केंद्रातून राज्यातून पालिकेकडे ह्यासाठी काही रक्कम सुद्धा सुपूर्द केली जाते. रात्र निवारा चालवणाऱ्या संस्थेला मानधन सुद्धा देण्यात येते. ‘चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन’ तीन गटात मोडली जाते रस्त्यावर राहणारी मूल, रस्त्यावर काम करणारी मुलं , रस्त्यावरील कुटुंब त्यात असणारी मुलं त्यानुसार पुणे महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर एक सर्वे सादर केला आहे. ह्या सर्वे नुसार पुण्यात सध्या १०४२७ मुलं हि ह्या गटात मोडतात. ह्या  मुलांमध्ये ५२०७ मुले ६ ते १४ वयोगटातील आहेत. करोनाच्या महामारीत वाढलेल्या बेरोजगारीची आता हि आकडेवारी किती असेल ह्याचा अंदाज कदाचित पुणे महानगरपालिकेला नसेल. 


जर रात्र निवारा अंतर्गत विचार केला तर दाखवलेल्या आकडेवारी नुसार ह्या १० हजार मुलांसाठी हि तीन केंद्र पुरेशी आहेत का ? जर हि सामाजिक केंद्र शासन तर्फे राबवली जात आहेत तर रस्त्यावर मुलं का दिसत आहेत ? कारवाई होत असेल तर पुन्हा ती मुलं रस्त्यावर कशी ? अश्या अनेक प्रश्नाच्या विचार केला तर एका बाजूला करोडोचा घोळ खंडणी प्रकरण राज्यात आहे तर दुसरीकडे देशाची पिढी रस्त्यावर आहे म्हणजे आपली प्रणाली खरंच कुठे तरी कमी पडतीय का ?.  मुलं हि देवाघरची फुल आहेत असं म्हणतात मग देव भव्य स्थळात असताना त्याच्या ओंजळीतील हि निष्पाप गोंडस फुल रस्त्यावर का?


सचिन कृष्णा तळे .





No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale