आंबेडकरी साहित्य संमेलनांना १९९३ पासून सुरुवात झाली. मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली ही संमेलने आयोजित झाली होती. या सर्व मान्यवर विचारवंतांनी 'आंबेडकरी साहित्य' या संज्ञेचा पुरस्कार केला. मुळात या संमेलनांची आयोजनं ज्या पद्धतींनी झाली, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या आयोजनासंदर्भातली आयोजकांची भूमिका निश्चितच आंबेडकरी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी पोषक असे सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करणारीच होती. त्यामुळे संमेलनाचा आराखडा, नियोजन आणि कार्यक्रमाच्या बाबतीत आवश्यक असणारी समकालीन कल्पक भूमिका यासाठी सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक होते. या सामूहिक गरजेतून महामंडळाची संकल्पना पुढे आली. २१ सप्टेंबर २००८ ला झालेल्या बैठकीत प्रा. सतेश्वर मोरे यांच्या पुढाकाराने ' अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाची' स्थापना करण्यात आली. प्रा. सतेश्वर मोरे यांची महामंडळाचे निमंत्रक म्हणून तर अशोक बुरबुरे यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती.
हे महामंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांचे असेल अर्थात या महामंडळाचे सदस्य व्यक्ती नसून संस्था असतील, त्याच बरोबर आतापर्यंत ज्या संस्थांनी अथवा आयोजन समितीने या संमेलनाचे आयोजन केले आहे त्या संस्था अथवा त्या आयोजन समितीचे अध्यक्ष व सचिव यांना महामंडळाचे प्रथम सदस्य करण्यात आले. आणि त्यातूनच कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सांस्कृतिक क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असणाऱ्या नोंदणीकृत / अनोंदणीकृत संस्था महामंडळाच्या सदस्य होऊ शकतील. अशी अट ठेवण्यात आली. अत्यंत दर्जेदार आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करत प्रा. सतेश्वर मोरे यांच्या नेतृत्वात महामंडळाचे नाव सर्वदूर पोहचले. प्रा. मोरे यांच्या अकाली निधनानंतर महामंडळाची धुरा अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सीमा मेश्राम आणि निमंत्रक म्हणून प्रशांत वंजारे हे समर्थपणे सांभाळत आहेत.
शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत न घेता साहित्य संमेलनाचे आयोजन करावे अशी महामंडळाची भूमिका असल्याने सदर महामंडळाची शासन दरबारी नोंदणी करण्यात आलेली नाही. साहित्य संमेलने ही सांस्कृतिक आयोजने असल्यामुळे ती कार्यकर्त्यांच्या मेहनतीतूनच झाली पाहिजे, असा महामंडळाचा आग्रह आहे. महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत १४ अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनांचे आयोजने करण्यात आले असून नऊ अखिल भारतीय युवा आंबेडकरी साहित्य संमेलनांची आयोजने करण्यात आलेली आहेत. विविध संस्थांकडून संमेलनाच्या आयोजनाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महामंडळाकडून त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येते. तीन अ. भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलने, वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलने, ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलने, पाच आंबेडकरी संवाद संमेलने, काव्यसंगीती, विद्यार्थी साहित्य संमेलने ही महामंडळाची अलीकडच्या काळातील विशेष उपलब्धी आहे. पाच मार्च २०२३ रोजी अमरावती शहरात महामंडळाच्या नेतृत्वात आंबेडकरी गझल संमेलन सुद्धा आयोजित करण्यात आले होते.
केवळ विदर्भ हा महामंडळाचे कार्यक्षेत्र नसून मराठवाडा आणि तेलंगणा राज्यात सुद्धा महामंडळाची संमेलने आयोजित करण्यात आलेली आहेत. वैचारिक शिस्त आणि सूत्रबद्धता यासाठी हे महामंडळ ओळखले जाते. महामंडळाचे हितचिंतक आणि कार्यकर्ते भारतात सर्वदूर पसरले असून त्यांच्या सहकार्यानेच महामंडळाची वाटचाल सुरु आहे.
No comments:
Post a Comment