Thursday, 13 April 2023

भौतिक विकासासोबत मानसिक विकास हि महत्वाचा...!!


 

 

काशी हे स्थान भारताच्या इतिहासात सुरवातीपासून केंद्रस्थानी आहे. भारतावर जेव्हा जेव्हा धार्मिक द्वेषातून परकीय आक्रमणे झालीत तेव्हा तेव्हा काशी उध्वस्त करून भारतीयांचे खच्चीकरण करण्याचा केविलवाणा प्रयोग परकीयांनी केला. त्याला उत्तर देत भारतीयांनी पुन्हा काशी उभी केली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि परकीय प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला अन आता ह्या एकविसाव्या शतकात पंतप्रधान मोदी ह्यांच्या हस्ते काशीने मोकळा श्वास घेतला. भूतकाळातल्या इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प. विकासाला साद घालत वारसा जपण्याचा संदेश म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प अन राजकीय दबाव खाली बाटलेल्या हिंदूंना आकर्षित करण्याची एक युक्ती म्हणजेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे.

आपल्या आसपास जो भौतिक विकास घडतोय त्यासोबत माणसाला मानसिक विकास सुद्धा हवाचं. माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय आहे. मानसिक समाधानासाठी माणूस अनेक ठिकाणांचा शोध घेतो. मनशांती साठी अनेक उपाय करतो. जिथे त्याला शांती मिळेल जिथे त्याला आनंद मिळेल अश्या ठिकाणी माणूस आवर्जून जातो. आपली धार्मिक स्थळे मंदिरे हि आपल्या मनाला आपल्या मनात जे वादळ उठलंय त्याला शांत करण्याचं एक चांगलं ठिकाण सुद्धा आहे. अन असं ठिकाण जे भारतातल्या प्रत्येक हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू आहे ते ठिकाण जर भव्य दिव्य होणार असेल तर ती वार्ता इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसन्न करणार ठरेल.

असं म्हणतात कि गंगा नदीच पाणी हे विश्वेश्वराच्या मंदिरा लगत वाहत होत. भाविक गंगेच्या काठावर स्नान करून महादेवाचं दर्शन घेत. पण हळू हळू वाढत्या लोकवस्ती अन अतिक्रमण मुळे मंदिर चा परिसर पूर्णतः गुदमरून गेला. तिथे येणाऱ्या भाविकांना त्याचा मानसिक त्रास सुद्धा होत होता. हा परिसर स्वच्छ अन सुंदर दिसणे हि काळाची गरज होती. काशी भव्य सुंदर दिसावं हे तिथल्या प्रत्येकाचं स्वप्न होत. काशी पुनःनिर्माण अन भक्तांची होणारी अडचण पाहून नरेंद्र मोदी ह्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प उभारून विकासाची एक छानशी प्रतिमा भारतासमोर उभी केली. भारतीय संस्कृती मध्ये परिवर्तन हे सतत दिसून आलंय. काळानुसार, परंपरेनुसार आणि प्रगतीच्या दिशेने भारतीय संस्कृती स्वतःला बदलत गेली आणि बदलत आहे. भूतकाळात ज्या चुका घडल्या त्या वर्तमानकाळात सुधारून पुन्हा ताठ मानाने विकासाची ध्वजा आज वाराणसीत फडकावला गेला. ह्याच श्रेय कामगारांना, यंत्रणेला आणि त्यासोबत तिथल्या स्थानिक रहिवासींना सुद्धा जात. कारण ह्या प्रकल्पातून अनेकांसाठी छोटे रोजगार निर्माण झाले तसेच पर्यटक हि वाढलेत. ह्याच पार्श्वभूमीवर आता अयोध्यात राम मंदिरचे कामकाज चालू आहे.

वाराणसी हा नरेंद्र मोदी ह्यांचा मतदार संघ. आपल्या मतदार संघात आपण भौतिक विकासा सोबत अनेक लोकांचं मानसिक विकास कस करू शकतो ह्याच एक उदाहरण आहे हा प्रकल्प. काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प हा वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचे घाट यांना जोडणारा ठरला. १४०० दुकानदार, भाडेकरु, घरमालक यांचं विस्थापन करून मंदिराचा परिसर मोकळा केला गेला. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर करताना कुठे हि यंत्रणा कमी पडली नाही. ह्या कामादरम्यान ४० पुरातन मंदिरे आढळून आली आणि ती सुद्धा भाविकांना पाहता आली. अंधश्रद्धेला खतपाणी न घालता श्रद्धेला महत्व देत हा पहिला टप्पा पार पडला.

आपल्या आसपास असे अनेक वारसा आहेत पण ते आजही विकासा पासून वंचित राहिले. हि शोकांतिका म्हणावं कि आपल्याच लोकांची हलगर्जीपणा म्हणावं. आपण आपला मतदारसंघ कसा घडवू शकतो, तिथे रोजगार कसा निर्माण करू शकतो, तिथे पर्यटकांची सोय करून त्यांना आमंत्रित कस करता येईल ह्यावर लक्ष्य केंद्रित करून आज जो पहिला टप्पा पार पडला तो लोकप्रतिनिधींना शिकण्या सारखा आहे. राजकारण चांगल्यासाठी, राष्ट्रासाठी अन लोकांच्या भल्याच असेल तर ते राजकारण इतिहासाच्या पानांवर लिहिले जात.

आपले शिवकालीन गड, किल्ले, राजवाडे, ऐतिहासिक घाट म्हणजेच आपला वारसाचं आहे ना ! जेव्हा आपण ह्या स्थळांना भेट देतो तेव्हा त्याची झालेली चेष्टा त्यांचा अपमान त्याची अवस्था पाहून नक्कीच आपले मन दुखावले जात असेल पण हीच वस्तुस्तिथी आहे.  इतिहास वाचून ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्यां लोकांच्या मानसिकतेचा विचार शासकीय यंत्रणेतून झाला पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती अन स्वच्छ राजकीय दृष्टिकोन असेल तर असे अनेक वारसा आज पुनर्जीवित होऊ शकतात. काशी हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी पुढारी अन कर्मचारी वर्गाने जनतेच्या मानसिक विकासासाठी, राज्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी अन देशातल्या तमाम शिव प्रेमींसाठी शिवकालीन वास्तूंचा भौतिक विकास करावा आणि उत्तम राजकर्ते व्हावे.

सचिन कृष्णा तळे

पुणे

7709099646

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale