सेंगोल -
धर्म, सत्य आणि निष्ठा
एक भारतीय
संस्कृतीच प्रतीक
विरोधकांच्या
प्रत्येक शब्दांवर ज्यांचं नाव आहे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी २८ मे
२०२३ रोजी भारताच्या नव्या संसदेचं उदघाटन केलं त्यासोबत ह्या नवीन संसद भवनात सभापतींच्या
खुर्ची जवळ सेंगोल म्हणजेच राजदंड स्थापन केले. सेंगोल हे धर्म, सत्य आणि निष्ठा ह्या
तीन तत्वांवर आधारित असून जिथे न्याय अन राजकारभार चालतो तिथे हा राजदंड स्थापन करण्याची
आपली प्रथा आहे. फक्त सनातन च नाही तर नव्या संसद भवनात सर्व धर्माची प्रार्थना झाली.
सर्व धर्माचे संत महात्मे तिथे उपस्तिथ होते. पण सर्वात जास्त चर्चा विरोधकांनी रंगवली
ती सेंगोल ची. विरोध करणे हे विरोधकांचं कामच आहे. पण व्यक्ती द्वेषातून, पक्ष द्वेषातून
सत्तेसाठी आपण कोणाचा विरोध करत आहोत इतकं हि विरोधकांना कळू नये हे शोकांतिकाच म्हणावी
लागेल.
'सेंगोल'
हा शब्द तामिळ शब्द 'सेम्माई' वरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा होतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल धारण करणार्या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे
राज्य करण्याचा आदेश असतो. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे काही जबाबदारी देण्यात आली
आहे हे त्याने विसरू नये म्हणून हा सेंगोल आहे. लोकसभेत बसणाऱ्या प्रत्येक व्यक्ती
ने आपली जवाबदारी जाणून काम करावे हीच त्यामागचा उद्देश मोदी यांचा असावा. चोल साम्राज्य
हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं साम्राज्य होतं. भारतीय उपखंडात चोला हे सर्वांत
जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्यांपैकी एक होते. तीन तामिलकम राजांपैकी मुकुटधारी एक, आणि
सोबत चेरा आणि पंड्या अशा साम्राज्याची १३ व्या शतकापर्यंत विविध प्रांतावर सत्ता होती.
नवव्या शतकात चोल साम्राज्याचा उदय झाला. पुढे तेराव्या शतकापर्यंत हे साम्राज्य आता
अस्तित्वात असलेल्या ११ देशांमध्ये पोहोचलं होतं. दक्षिण भारत, श्रीलंका, बांगलादेश,
म्यानमार, थायलँड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हीएतनाम, सिंगापूर आणि मालदीव
इतक्या सगळ्या देशांमध्ये चोल साम्राज्याची पताका फडकत होती. चोल साम्राज्यच प्रतीक
हे महादेव म्हणून सेंगोल म्हणजे महादेवाचा आशीर्वाद अशी धारणा त्याकाळी होती. सेंगोलच्या
हस्तांतरानं चोल साम्राज्यात सत्तेचं हस्तांतर व्हायचंय.
कोल्हापूरच्या
राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथे काही वर्षांपूर्वी सापडलेले शिल्पाचे वैशिष्ट्य
म्हणजे या शिल्पाच्या हातात चोल राजवटीत वापरला जाणारा राजदंड पाहायला मिळाला. चक्रेश्वरवाडी
येथील हे शिल्प भग्न अवस्थेत आहे. दोन हात जोडलेल्या अशा अवस्थेतील ती सूरसुंदरीची
भग्न मूर्ती आहे. जोडलेल्या हातांमध्ये वरच्या बाजूला नंदी कोरलेला अशा तऱ्हेचा राजदंड
आहे. नंदी विराजमान असलेल्या राजदंड घेऊन उभे असलेले काही शिल्प आजही दक्षिण भारतात
सहज पाहायला मिळतात. हिच आपल्या भारतीय इतिहासाची संस्कृतीची ओळख आहे. ती जपून ठेवणे
आपले कर्तव्य.
देशाला स्वतंत्र
मिळालं तेव्हा सत्ताहस्तांतरणाची प्रक्रिया कशी असावी हा प्रश्न उपस्तिथ राहिला. त्यासाठी
देशाचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र
ही प्रक्रिया नेमकी करायची कशी असा प्रश्न माऊंटबॅटन यांच्यासमोर होता. फक्त हस्तांदोलन
करुन ही प्रक्रिया करावी की त्यासाठी काही तरी प्रतिकात्मक प्रक्रिया असावी अशी चर्चा
सुरु झाली. तेव्हा नेहरुंनी तेव्हाचे ज्येष्ठ नेते सी राजगोपालचारी यांची भेट घेतली
आणि चर्चा केली. राजगोपालचारींचा भारतीय इतिहास, संस्कृतीवर प्रंचड अभ्यास होता. दक्षिणेतल्या
ऐतिहासिक चोल साम्राज्यात नव्या राजाची निवड होत असताना, पदावरुन दूर जाणारा राजा आपल्या
हाताने सेंगोल म्हणजेच राजदंड पुढच्या राजाच्या हातात देतो आणि अशाच पद्धतीनं चोल साम्राज्यात
शतकानुशतकं सत्तेचं हस्तांतर होत होतं. राजगोपाल यांनी सांगितलेली संकल्पना पंडित नेहरुंनाही
आवडली आणि त्यांनी होकार दिला. १९४७ साली वुम्मिदी बंगारु ज्वैलर्सकडून नव्या राजदंडाची
निर्मिती केली. चांदीचा दांडा त्यावर सोन्याचा पत्रा अश्या या राजदंडावर नंदीची मूर्तीही
स्थापित केली. ८०० ग्राम सोन्यापासून बनवलेला हा राजदंड ५ फुटाचा आहे.
नेहरूंच्या
हस्ते त्यावेळी त्याची विधिवत पूजा करण्यात आली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १० वाजून
३५ मिनिटांनी हाच राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हातात दिला.
अशा प्रकारे देशातल्या ब्रिटिश सत्तेचे हस्तांतर भारतीयांकडे झालं. मात्र काँग्रेस
च्या काही नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पण सत्य हेच आहे कि नेहरूंना हा सेंगोल
भेट म्हणून मिळाला होता, नंतर तो अलाहाबाद संग्रहालयात ठेवण्यात आला.
धर्म, सत्य
आणि निष्ठा चं प्रतीक असलेलं आणि भारतीय इतिहासाच्या पानांवर ज्याची नोंद आहे असं हे
भारतीय संस्कृतीचं प्रतीक गेल्या ७५ वर्षांपासून एका संग्रहालयात ठेवण्यात आलं. त्याचा
विसर कसा पडला. आपली संस्कृती आपली शिल्प आपली मंदिरे आपल वैभव आपण नाही टिकून ठेवणार
तर कोण ठेवणार हा विचार भारतीय का करत नाहीत? इंग्रज भारत खंड सोडून गेले त्यावेळचा
हा साक्षीदार आहे. ह्या सेंगोलची निर्मतीच मुळात भारताच्या सुवर्ण क्षणाचा आहे. स्वतंत्र
काळातील प्रत्येक वास्तू आपण जतन करून ठेवतो त्याचा इतिहास पुढच्या पिढीला सांगतो.
पण ह्या सेंगोलचा इतिहास ना आपण कधी वाचला ना अनुभवाला फक्त तो पाहिला गेला ते संग्रहालयात.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून आज भारतीय संस्कृतीचं पवित्र वास्तू
सेंगोल हे भारतीय लोकशाहीच्या मंदिरात स्थानबद्ध झालं. हे खरंच प्रत्येक भारतीयांसाठी
अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक राजकर्त्याला राजदंड हवा. राजकर्त्यांनी राज्य करताना
जनतेच्या अन राज्याच्या देशाच्या विचारातून राज्य करावे ह्याचसाठी हा राजदंड भारताच्या
प्राचीन काळापासून आहे.
No comments:
Post a Comment