“जगन्नाथ यात्रा आणि विठ्ठल वारी – भक्तिरसाने न्हालेली यात्रा”
भारतीय संस्कृती ही यात्रा-उत्सवांची भूमी आहे. हजारो वर्षांपासून भाविकांच्या मनात श्रद्धेचे अंकुर रोवणारी, हृदयाला भक्तिरसाने न्हाणारी दोन अतुलनीय यात्रा म्हणजे ओडिशातील जगन्नाथ रथयात्रा आणि महाराष्ट्रातील पंढरपूरची आषाढी विठ्ठल वारी. या दोन्ही यात्रांमध्ये केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर ती सामाजिक ऐक्य, समतेचा संदेश आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग आहे.
पुरीची जगन्नाथ रथयात्रा – प्रभू स्वतः रथावरून मार्गस्थ होतो
पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथ मंदिर हे भारतातील चार धामांपैकी एक आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तीन देवतांची भव्य रथयात्रा काढली जाते. या यात्रेमध्ये प्रभू स्वतः रथात बसून आपल्या भक्तांच्या भेटीला येतात . ही संकल्पनाच भक्तांना वेड लावणारी आहे.
तीन भव्य रथ – नंदिघोष, तालध्वज आणि पद्मध्वज यांच्यावर हे देव विराजमान होतात. लाखो भाविक रथ ओढण्यासाठी एकत्र येतात. येथे कुणालाही जातीपातीचा अडथळा नसतो राजा आणि रंक, ब्राह्मण आणि दलीत, सर्व एकत्र येऊन रथ ओढतात. यातून समाजसमतेचा अजरामर संदेश दिला जातो. जगन्नाथ म्हणजे ‘सर्वांचा नाथ’ हे नावच म्हणते की प्रभू कोणाचाही नाही, तर सगळ्यांचाच आहे.
पंढरपूरची वारी – “ये रे विठोबा रखुमाईचा राया!”
महाराष्ट्रात भक्तीच्या शिखरावर पोचवणारी यात्रा म्हणजे वारी. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी विठुनामाच्या गजरात लाखो वारकरी जमा होतात. ही फक्त यात्रा नाही, ती एक चालतीफिरती संतपरंपरा आहे.
वारी म्हणजे चालत जाण्याचा सोहळा शेकडो किलोमीटर पायपीट करत संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरपर्यंत पोचते. “ज्ञानबा-तुकाराम!” च्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर, डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर अभंग घेऊन लाखो वारकरी विठ्ठलनामात रंगतात.
वारीमधून भक्ती, शिस्त, संयम, समतेचा संस्कार मिळतो. येथे श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, दलित-ब्राह्मण यामध्ये फरक नसतो. सगळे “विठ्ठलाचे वारकरी” म्हणून एकत्र येतात. पंढरपूर हे केवळ एक शहर नाही, ती भक्तीची राजधानी आहे!
साम्य आणि साद
पुरी आणि पंढरपूर या दोन्ही यात्रांची अंतःप्रेरणा एकच आहे “प्रभू भक्तांकडे येतो, भक्त प्रभूकडे जातो.”
पुरीत जगन्नाथ रथातून भक्तांकडे येतो आणि पंढरपुरात भक्त हजारो मैल चालून विठोबाच्या भेटीला जातो. या यात्रांमधून एक अद्वितीय अध्यात्मिक ऊर्जा प्रसारित होते. दोन्ही ठिकाणी भक्तीचे अश्रू, एकतानता, सामूहिक साधना आणि प्रेममय उन्मेष अनुभवता येतो
यात्रा म्हणजे चालतीभक्ती
वारी असो वा रथयात्रा, ती केवळ परंपरा नव्हे, ती आहे चालती भक्ती, समाजप्रबोधनाचा मार्ग, आणि हृदयशुद्धीचा उत्सव.
आजच्या धावपळीच्या काळात, ही यात्रा आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवते. ती आपल्याला स्मरते की, “भक्ती म्हणजे केवळ रुढी नव्हे, ती जीवनशैली आहे जिथे प्रभू आणि भक्त यांच्यामध्ये कोणतीही सीमा उरत नाही!”
“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल!
जय जगन्नाथ!”
सचिन कृष्णा तळे , पुणे
No comments:
Post a Comment