Sunday, 21 May 2023

तेजस्वी शब्दप्रतिभेचे अन काव्यप्रतिभेचे धनी - साहित्यिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

 


तेजस्वी शब्दप्रतिभेचे अन काव्यप्रतिभेचे धनी -

साहित्यिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका पितृभू: पुण्यभूश्चैव वै हिंदुरिति स्मृत:

 

तात्यारावांच म्हणजेचं सावरकरांचं साहित्य हे विश्वप्रसिद्ध अन लोकप्रिय साहित्यात मोडतं. कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा विविध भूमिकांतून त्यांनी आपली साहित्यसंपदा सृजन केली लोकार्पण केली. विचारी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठा असलेले, पुरोगामी, कर्मयोगी पुरुष म्हणून आज आपल्याला सावरकर आठवत असतील तरी साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. आज हि त्यांचा साहित्याचा अभ्यास केला जातो, आजही त्यांच्या काव्याना चाल लावून ती गायली जातात, आजही सावरकरांचे काव्य मंगेशकर कुटुंबियांना आणि तमाम मराठी बांधवाना ऊर्जा देते. आजही त्यांच्या शब्दांचा अर्थ शोधण्यात त्यांना समजून घेण्यात अनेक तरुण पुढे येत आहेत. त्यांच्या साहित्यावर अन त्यांच्या कार्यकाळावर आजही साहित्य लिहिले जात आहे छापले जात आहे .

 

तात्यारावांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले अन भाषाशुद्धीची एक चळवळ देखील चालवली. उर्दू भाषेत सुद्धा त्यांच्या काही गझला लिहिल्या आहेत.अंदमानपूर्व कालखंडातील कविता, अंदमानमधील कविता आणि अंदमानमधून बाहेर आल्यावर स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कविता अश्या तीन कालखंडात त्यांच्या कवितांचा साम्राज्य विभागलेला आहे. सावरकर हे स्वतंत्रतेचे स्तोत्र गाणारे पहिले मराठी कवी. बाल सावरकर, तरुण सावरकर, वयोवृद्ध सावरकर या सर्व अवस्थांमध्ये सावरकर लिहीत राहिले.  प्राचीन संतांच्या कविता देवभक्तांच्या होत्या आणि सावरकरांची कविता देशभक्ताची होती. आपण आरती गातो, तशी ते एका राष्ट्रपुरुषाची, श्री शिवरायाची आरती गातात. श्री शिवाजी महाराजांची आरती त्यांनी रचली.  शिवरायांच्या आरतीबरोबरच त्यांच्या वीरसेवकांचा - वीर तानाजी आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा, बाजी देशपांडे यांचा पोवाडा, तानाजी-संताजी, दिल्लीच्या तक्ताची छकले करणारा सदाशिवराव भाऊ अश्या अनेक नारविणाराचे पोवाडे तात्याराव यांनी लिहिले.

 

ऐकुनिया आर्यांचा धावा महीवरला

करुणामय स्वर्गी श्रीशिवनृप गहिवरला

देशास्तव शिवनेरी घेई देहांला

देशात्सव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला

 

मातृभूमीच्या चरणी आपली स्फूर्तिप्रद तेजस्वी लेखणी, आपली ओजस्वी वाणी अर्पिलेले एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होते . तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण भारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किलोमीटर दूर समुद्रात एका बेटावर लिहिलेले हे काव्य ऐकताना अंगावर शहारे येतात. सहा महिने भयाण एकांतवास, १५ -१५ दिवस हातपाय जखडून ठेवणारी दंडा-बेडी, शरीराला १२ तास भिंतीशी टांगणारी खडा-बेडी, उपासमार अश्या ह्या जन्मठेपेत हातात कागद-लेखणी नसताना बंदीखान्याच्या भिंतींत एका लोखंडी खिळ्याच्या साहाय्याने प्राण फुंकत कमला हे पाच हजार पंक्तींचे महाकाव्य त्यांनी रचले. भिंतींवर काव्य लिहावे ते आठवून खोडून पुन्हा त्याच जागेवर नव्या ओळी लिहिणे आणि जन्मठेपेतून बाहेर येता जशी च्या तशी आठवून ती कागदांवर लिहून काढावे हे कोणत्याही प्रतिभावंत साहित्यिकांस शक्य नाही. अंदमानचे फाटके आभाळ, भयाण समुद्री वारा आणि तुरूंगाधिकार्‍याचे अत्याचार ११ वर्षे भोगूनही त्यांच्या विचारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे मनसुबे आजही धुळीस मिळत आहेत. त्यांनी लिहिलेले " सहा सोनेरी पाने " हे पुस्तक प्रत्येक भारतीयांनी वाचून समजून घेणे गरजेचे आहे. भारताच्या सुरवातीचा कालखंड पासून इंग्रजांच्या कालखंडाचा इतिहास म्हणजे हे पुस्तक.

 

नाटककार म्हणून उःशाप हे सावरकरांचे पहिले नाटक. या नाटकाचा गाभा आणि आशय हा अस्पृश्यता निवारण, दलित वर्गाचा उध्दार, जातीपातींचे उच्छेदन, समरस समाजाचे निर्माण हा होता. संन्यस्त खड्ग हे दुसरे नाटक सावरकरांनी भगवान गौतम बुध्दांच्या जीवनाच्या पार्श्‍वभूमीवर लिहिलेले आहे. कादंबरीकार म्हणून काळे पाणी मला काय त्याचे?’ या त्यांच्या कादंबऱ्या आत्मानुभव मांडणारी ग्रंथ. ‘गोमांतक,‘सप्तर्षी,‘रानफुले,‘सावरकरांची कविता, ‘कमला, ‘अग्निजा, ‘मूर्ती दुजी ती, ‘सावरकरांच्या अप्रसिध्द कविता, ‘अग्निनृत्य, ‘कुसुमसंचय इत्यादी काव्य सावरकरांनी लिहिले. सत्तावनचे स्वातंत्र्यसमर लिहून त्यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनात मोलाचे योगदान दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्याच्या कलमामुळे आनंद होऊन सावरकरांनी जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख हा लेख लिहिला.

 

हे फक्त साहित्यातून मांडलेलं सावरकर आहेत अश्या अनेक भूमिकेतून आपल्याला सावरकर भेटतील फक्त सावरकर वाचता आणि समजून घेता आले पाहिजे.  गांधींच्या चष्मेत्यातून तुम्हाला सावरकर नक्कीच वेगळे दिसतील पण स्वतःच्या अंतर्मनातून अभ्यासातून जर सावरकर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्या प्रकारे सावरकर तुम्हाला दाखवले गेले, तसे ते मुळीच नाही हेच तुम्हाला दिसून येईल. राजकीय तत्वज्ञानात उपयुक्ततावाद, तर्कवाद, मानवतावाद, वैश्विकता, पुरोगामित्व वास्तवतावाद यांचा संगम सावरकर आहेत. सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत.  आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. अश्या महान स्वातंत्र्यवीरांला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून गेली अनेक वर्ष काही सावरकर प्रेमी सरकारशी वादविवाद करताना दिसून येतात. साहित्यिक तात्यारावांना त्यांच्या जयंती निम्मित विनम्र आदरांजली.

 

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला

 

भूमातेच्या चरणतला तुज धूतां मीं नित्य पाहिला होता

मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू

तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें परि तुवां वचन तिज दिधलें

मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन त्वरित या परत आणीन

विश्वसलो या तव वचनी मी

जगदनुभव-योगे बनुनी मी

तव अधिक शक्त उद्धरणी मी

येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला सागरा, प्राण तळमळला

 

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ही फसगत झाली तैशी

भूविरह कसा सतत साहु यापुढती दशदिशा तमोमय होती

गुण-सुमनें मी वेचियली या भावें कीं तिने सुगंधा घ्यावें

जरि उद्धरणी व्यय तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे

नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाबही आता रे

फुलबाग मला हाय पारखा झाला सागरा, प्राण तळमळला

 

नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा

प्रासाद इथे भव्य परि मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा वनवास तिच्या जरि वनिंच्या

भुलविणें व्यर्थ हें आता रे

बहु जिवलग गमतें चित्ता रे

तुज सरित्पते ! जी सरिता रे

त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला सागरा, प्राण तळमळला

 

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा?

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिउनि का आंग्लभूमीतें

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी मज विवासनातें देशी

तरि आंग्लभूमी-भयभीता रे

अबला माझिही माता रे

कथिल हें अगस्तिस आता रे

जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला सागरा, प्राण तळमळला

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale