Tuesday, 31 January 2023

सत्कार्योत्तेजक सभा


सत्कार्योत्तेजक सभा

 

१९ मे १८९३ रोजी सत्कार्योत्तेजक सभा या संस्थेची स्थापना झाली. महाराष्ट्राचे 'सांस्कृतिक तीर्थ' अशी ओळख लाभलेल्या मोजक्या संस्थांमध्ये धुळ्याच्या 'सत्कार्योत्तेजक सभे'चा समावेश होतो. भक्ती, शक्ती, संघटन आणि समाज प्रबोधन या माध्यमांतून खानदेशवासीयांना जागृत करण्याचे काम सत्कार्योत्तेजक सभेने केले आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात देखील समाजप्रबोधनाद्वारे राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्या संस्थांमध्ये अव्वल होती. 'भाषा प्राकृत उन्नतीस चढवा, काया करा अर्पण, आर्यावर्त हितास द्या, सतत सत्कार्यास उत्तेजन' या स्थापनेप्रसंगी निर्धारित करण्यात आलेल्या उद्देशास अनुसरून सभेची वाटचाल आजपर्यंत समर्थपणे सुरू आहे.

 

ह्या सव्वाशे वर्षांच्या प्रवासात 'सत्कार्योत्तेजक सभे' ने सन १९३५ मध्ये 'श्री समर्थ वाग्देवता मंदिर', सन २०१५ मध्ये शताब्दी महोत्सव साजरा केलेले 'रामदास आणि रामदासी' नियतकालिक, मुक्तद्वार वाचनालय, सन १९९३ मध्ये भारतीय विद्या संशोधन केंद्र आणि अखिल भारतीय स्वरुपाचा 'श्री समर्थ संघ' आणि जांब येथील 'श्रीसमर्थ मंदिर' या संस्थांना जन्म दिला. आज या संस्था आपल्या मातृसंस्थेचा मूळ गाभा असलेल्या श्री समर्थ रामदासांचे विचार आचारांचे सखोल चिंतन संशोधन करुन समाजस्वास्थ्य निकोप ठेवण्याचे कार्य अवितरपणे करीत आहेत. संस्थे तर्फे रायगड स्मारकासाठी घरोघरी फिरुन निधी संकलन करण्यात आले. दुष्काळाचा कायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समजावून देण्याचे काम केले. तर 'छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव' (सन १८९९), 'आपण कोण' (सन १९००) या नानासाहेबांच्या व्याख्यानावर आधारित आणि सन १९०३ मध्ये 'जपानची मर्दुमकी' या तीन पुस्तकांचे प्रकाशन हि या संस्थे मार्फत करण्यात आले.

 

सत्कार्योत्तेजक सभेचे संस्थापक दिवंगत शंकर श्रीकृष्ण उपाख्य नानासाहेब देव यांचे श्री समर्थ रामदास स्वामी भक्तिप्रेम, हे या सर्व कार्यामागील मूळ सूत्र होते. श्री समर्थांनी स्थापित केलेल्या महाराष्ट्रातील सर्व आणि लाहोरसह बहुसंख्य मठांना नानासाहेबांनी भेटी दिल्या. याशिवाय श्री समर्थ, त्यांचे ज्येष्ठ बंधू रामीरामदास आणि कल्याणादि शिष्यमंडळी यांच्यासंबंधी असलेले हस्तलिखित ग्रंथ आणि इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी थेट दक्षिणेत तंजावरपर्यंत आणि उत्तरेस पंजाबपर्यंत प्रवास केला.या संशोधन दौऱ्यातील सुवर्णक्षण म्हणजे १९१६ साली शिवथर घळीचा - श्रीसमर्थांच्या सुंदरमठाचा -श्रीमद् दासबोधाच्या जन्मस्थानाचा लागलेला शोध होय. संशोधित हस्तलिखितांचे अभ्यासपूर्ण संपादन करून त्यांचे ग्रंथरुपाने समर्थ विचारांचे प्रदर्शन करण्याचा उद्देश 'रामदास आणि रामदासी' ग्रंथमालेला पूरक ठरणे असा हेतू ठेवून 'इतिहास आणि ऐतिहासिक' हे मासिक १९१६ साली सुरु झाले३६ वर्षांत (१९१५-१९५१) त्यांच्या संपादकत्वाखाली ४३२ अंक प्रकाशित झाले. आतापर्यंत सभेने सुमारे १३ हजार २२३ पृष्ठांच्या १७३ ग्रंथांचे प्रकाशन केले आहे. नानासाहेब देव यांनी सुमारे ३२०० बाडांचे संशोधन करुन सूचिखंड अभ्यासकांसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील दुर्मीळ हस्तिलिखितांचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. विविध भाषांमधील ग्रंथ, बखरी, मंत्रतंत्र, व्याकरण, संगीत, रागदारी, जमाखर्च, गणित, आयुर्वेद, व्रतवैकल्ये, ज्योतिष, यंत्रे, ताम्रपट इत्यादी अनेक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण दस्तावेजांचा एकत्रित संग्रह सभे तर्फे स्थापन झालेल्या श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेत आहेत.

 

 

 

Wednesday, 2 November 2022

महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर

 

महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर




        पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सुभेदार झाले. त्यांनी इंदूरला राजधानी केली. त्यांच्या बरोबर मराठी भाषा संस्कृतीचे या इंदूर नगरी पदार्पण झाले. या प्रदेशाला मराठी साहित्य निर्मीतीची परंपरा १८६१ पासून आहे. बाळकृष्ण मल्हार हंस, एकनाथ शास्त्री करकंबकर प्रभुतींनी दर्जेदार लिखाण करून मराठी साहित्य निर्मतीचे बीज इंदूर या शहरात पेरले. हीच साहित्य परंपरा चालू ठेवण्यासाठी इथल्या मराठी वाचकांना स्वतंत्र व्यासपीठ असावे या हेतूने १८ सप्टेंबर १९१५ रोजी महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना झाली.

 

       इंदूरच्या गजबजल्या महात्मा गांधी मार्ग या क्षेत्रात या संस्थे जवळ स्वतःच्या मालकीची चार मजली प्रशस्त भवन आहे. साहित्यिक कार्यक्रमासाठी भा. रा. तांबे सभागृह आहे. वाचनालय साठी एक मोठा हॉल आहे. फेब्रुवारी १९१९ ला संस्थे मार्फत ग्रंथालयांची स्थापना झाली. ३५ हजाराहून अधिक ग्रंथ या ग्रंथालयात आहे. विशेष म्हणजे ग्रंथालयात असलेल्या सर्व पुस्तकांचे संगणीकरण करण्यात आलेले असून शंभर सवाशे वर्षांपूर्वी ची दुर्मिळ ग्रंथ देखील जतन करून ठेवलेले आहेत. या संस्थेची आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे मराठी साहित्य सभेने मध्यप्रदेशातील मराठी साहित्याचा इतिहास लिहिण्याचे कार्य हाती घेतले आहे. संस्थेतर्फे शारदोत्सवच्या वेळेस दर वर्षी "मालविका" हि समरणिका देखील प्रकाशित केली जाते. साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिकांना दरवर्षी होळकर राज्याचे पंतप्रधान श्री. वि. सी. सरवटे ( तात्यासाहेब सरवटे पुरस्कार ) देण्यात येतो.

 

       शारदोत्सव साहित्य संमेलनात आजवर अनेक नामवंत साहित्यिकांनी अध्यक्ष पद भूषवले आहे त्यात आचार्य केशव अत्रे, . . माडगूळकर, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, श्रीमती शांता शेळके, मधू मंगेश कर्णिक, प्रवीण दवणे, अरुण साधू . आहेत. लहान मुलांना मराठी वाचनाची गोडी लागावी म्हणून बालवाचनाची स्थापना करण्यात आली. ह्या बालवाचनात २५०० हुन अधिक बालसाहित्य आहे आणि ह्या बालवाचनालय ला कोणतेही शुल्क आकारले जात नाही. इंदूर मधील आकाशवाणीवर मराठी चा एकही कार्यक्रम नव्हता यासाठी या संस्थे अंतर्गत दिल्ली येथील आकाशवाणीवर इंदूरमधील मराठी माणसांचा प्रचंड मोर्चा ११ मी १९७९ रोजी गेला अखेर या आंदोलनाला २९ जून १९८० रोजी यश आले आणि दर रविवारी काही तास मराठी कलावंतांसाठी राखून ठेवण्यात आला. 

 

       या सभेचे अध्यक्ष श्री अश्विन खरे अन त्यांचे नव निर्वाचित कार्यकारणी इंदूर या शहरात मराठी अकादमी स्थापनेसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने या सभेची दखल घ्यावी अशी या सभेची इच्छा आहे. १९१७ , १९३५ अन २००१ साली जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हा महत्वपूर्ण सहभाग हा महाराष्ट्र साहित्य सभेचा होता. "इंदूर या प्रदेशात बहुसंख्य प्रजाजनांची भाषा हि हिंदी असल्याने तिचा स्वीकार करत मातृभाषेच्या म्हणजे मराठीच्या सेवेत तप्तर असणे हे आमचे कर्तव्य आहे" ह्या एकवेम कर्तृत्वावर महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्य चालू आहे. 

 सचिन तळे  

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale