Friday, 16 March 2018

देश मराठी भांडला होता


कविता : देश मराठी भांडला होता

गोंधळ अखंड महाराष्ट्राचा, जेव्हा शाहिरांनी गाईला होता...
घरदार सोडूनी तेव्हा,हा..देश मराठी भांडला होता...
देश मराठी भांडला होता...

आरे, तो काळ कोणता होता, हा काळ कोणता आहे...
फुट पाडण्या आमच्यातचं, सारा देश टपला होता...
देश मराठी भांडला होता...

त्या परकीयांची नाळ तोडूनी, सूर्य स्वराज्याचा पेटवला आम्ही...
अश्या ह्या सह्यागीरीच्या पोटी, तसा इतिहास जन्मला होता...
देश मराठी भांडला होता...

कैद झाली भारतभूमी अन रडली होती दारो दारी ...
स्वातंत्र्याची मशाल घेऊनी ,तेव्हा जो तो  उतरला होता
देश मराठी भांडला होता...

धर्म समाज सुधारकांचा, प्रबोधनाचा ठाकरी शैलीचा...
संताचा विचारवंतांचा शोर्याचा, इथेच बाळ रांगला होता...
देश मराठी भांडला होता...

मुंबई सह महाराष्ट्राची ,गुढी उभारली यशवंता नी...
हुतात्मे झाले आमचेच, खेळ कोणता हा मांडला होता ...
देश मराठी भांडला होता...

अमृता हूनी गोड अशी , ज्ञानियाची भाषा किती हो थोर...
त्याच भाषे वरुनी ,इथे राजकीय स्वार्थ पेटवला होता ...
देश मराठी भांडला होता...

सोडून मुंबईची लाट ,धरली गावाकडची त्यानं वाट ...
अस्तित्व टिकवण्यासाठीच, तो भगवा फडकवला होता...
देश मराठी भांडला होता...

बेळगाव कारवार बिदर निपाणी ,सीमेवर माझा श्वास मराठी ...
महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी ,एक वणवा भडकला होता  ...
देश मराठी भांडला होता...

आरे ह्या मातीला विकणाऱ्यांचीच, टोळी बसली हो सत्तेवरी ...
माय बाप जागे व्हा हो...तेव्हा महाराष्ट्र एकवटला होता ...
देश मराठी भांडला होता...

- सचिन कृष्णा तळे



No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale