पुणेकर मला
वाचवा...
प्रगतीच्या वाटेवरून ,जरा मागे वळून
पाहतोस का ?
चुकल्या असतील निर्णय काही, इकडे वळतोस
का ?
तुझ्या साठी आज ही,आहे उभी दौलत लाखाची
ती
तिच्या ऐतिहासिक पदरा खाली ,थोडा थांबतोस
का ?
तुझेच होते लढले तुझेच होते जे माझ्यासाठी
झिजले
तुझ्याच पूर्वजांची मित्रा ,कथा पुन्हा
लिहितोस का ?
आताच्या धावपळीच्या युगात आपल्याला
अनेक सोयीसुविधा हवेत. त्याशिवाय आपले जीवन निरर्थक होईल.
आपले गाव हे स्मार्ट सिटी
व्हावं, आपल्या गावात सर्व सुख सोयी मिळाव्या हे प्रत्येक नागरिकांचं स्वप्न असत. माझं
घर, माझं गाव, माझं शहर अन माझा ऐतिहासिक ठेवा. असा ठेवा जो मला माझ्या पूर्वजांनी
दिला. खरतर प्रगती आणि बदल हा हवाच. माणसांत तसेच निसर्गात ही! आपल्या भोवताली असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू हे आपल्याला
खूप काही शिकवत असतात. आपले गड, किल्ले , वाडे , राजवाडे , राजे , महाराजे
ह्यांचा इतिहास. त्यांचे योगदान बलिदान. ते सतत त्यांची
आठवण करून देत असतात. ते जन्मले, त्यांनी केलं ,ते जिंकले आणि गेले इतिहासाच्या पानांत हरवून. एखाद्या
माहिती पुस्तकात , आभ्यासिकात किंवा जयंती अन भाषणात.. हो ते पूर्णतः हरवून गेलेत.
आताच्या विज्ञान युगात, ह्या ऐतिहासिक
ठेवांना आहे का हो महत्व. ज्या महापुरुषांनी अन इतिहासप्रेमींनी तो जपून ठेवला तसाच
जपून ठेवण्यास आपण समर्थ आहोत का? खरतर आठवड्यातून सुट्टी घालवण्यासाठी नाहीतर प्रेमी युगलांना प्रेम करण्यासाठी चं काय ती जागा उरलीय आता! थोडेफार जे
काय अवशेष आहे त्यावर ही आपले नाव कोरून इतिहास गाजवणारे प्रेमवीर अन सुट्टीत ऐतिहासिक स्थळाला पिकनिक
पॉईंट च स्वरूप देऊन प्लॅस्टिक अन कचरा करणारे मंडळी. ह्यांना कसलं घेणं देणं त्या
इतिहासाशी, सांडलेल्या रक्ताशी, त्या संघर्षाशी. जयंती जल्लोषात डीजे वाजवून किंवा मोठं मोठाले पोस्टर बाजी करून त्या दिवसापुरता त्या महापुरुषांना जागे करून आताची युवा कोणता इतिहास घडवतीय
. स्वतःला युवा नेता म्हणत नाक्यावरली चार टाळकी समर्थक घेऊन आपल्या पोस्टरवर स्वतःचीच
झाहिरात करणारे तरुण , समाजाच्या विकासात किती भर देत आहेत . तरीही आज कुठेतरी माणुसकी म्हणा किंवा इतिहास प्रेमी म्हणा
इतिहास वारसा जपावा म्हणून काही मंडळी निस्वार्थी झगडत आहे. कित्येक तरुण वर्ग कित्येक सामाजिक संस्था सध्या ह्या इतिहासाचे पाने कुजण्यापासून वाचवत आहे, आहोरात्र राबत आहेत, कित्येक नागरिक ऐतिहासिक ठेवा जपण्यास तळमळतायत
. पण असाच ऐतिहासिक ठेवा आपल्या ह्या पुण्याला भेटलाय. हे जाणून ही आपण अंध झाले आहोत.
काही दिवसा नंतर मुलांना शाळांची सुट्टी पडली की गावाकडे जाणाऱ्या
लहान मुलांना त्यांच गाव आता पूर्णतः
बदलेलं दिसेल. मामाच्या गावाला जाऊया असे म्हणणारी
लहान मुलं जेव्हा
शहरातून पुण्यात येतील तेव्हा त्यांना शहरासारखंच
गजबजलेलं गावं दिसेल. खरा चिंतेचा विषय हा नसून दुसराच आहे. ह्या मुलांना इतिहासाची ओळख आता फक्त कागदी पुस्तकातून च भेटणार
का? आता कागदी पुस्तक ही सोडा डायरेक्ट इ पुस्तक तेही नेट च्या जाळ्यातून
सोशल मीडियावरून..
आपण आपल्या मुलांना इतिहास शिकवतो त्यांना इतिहासाची माहिती देतो त्यासाठी त्यांना ऐतिहासिक स्थळावर घेऊन जातो त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य आणि त्यातून देव देश समाज कसा घडला ह्याची ओळख करून देतो . आपण जरा विचार करूया!
जर हे स्थळ नष्ट झाले तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवू ... घाणीच्या साम्राज्यात
कुजत पडलेले हे शौर्याचे अन वीरतेचे प्रतीक की एके काळी अमुक गोष्ट इथे घडली होती आणि
अमुक असा इथे वाडा होता, हे सांगणार आहोत.. का? सगळ्यात जवळच उदाहरण देण्याचं झालं
तर. एके काळी सात मजली असलेला शनिवार वाडा
आपल्या अद्याप उभारता आलेला नाही. त्याच्या आजूबाजूस असणारे अतिक्रमण आपल्याला हटवता
आले नाही. शनिवार वाड्यात भेटी देणारे लोकांची संख्या दिवसंदिवस वाढतीय त्याप्रकारे
दर ही आकारले जातात. पण जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा काही अवशेष
अस्थव्यस्थ तर काही माहिती फलक ते ही तुटक्या
फुटक्या अवस्थेत आढळतात. आपण त्या विशाल सिंधू सागराच्या छाताडावर
मुंबई किनारी भव्य स्मारक उभे करू शकतो.
कामगारांच्या त्या जागेवर भव्य दिव्य स्मारकाचे योजना आखू शकतो. त्यासाठी पैसा व राजकारण करू शकतो .त्याची स्वप्ने जनतेला दाखवू शकतो. परंतु आपण ज्या ठिकाणी इतिहास घडला.. ज्या जागेवर त्या वीर महा पुरुषांनी बलिदान दिल .. जिथे
स्वराज्याची ध्वजा मानाने फडकावली गेली त्या जागेवर त्याकाळी जे वैभव होत, किमान त्याचे
५० टक्के तरी वैभव पुढच्या पिढीसाठी पुन्हा उभारू शकत नाही का
? किंवा त्या साठी आपल्याकडे अनुदान ही नाही का ? किंवा वेळ च
नाही.
आपल्या महाराष्ट्रातील पुणे हा ही तसाच ऐतिहासिक जिल्हा. जिथे भोसले,
पेशवे तसेच शाहू, फुले, कर्वे ह्यांच्या पदस्पर्शाने अन तुकाराम, ज्ञानेश्वर सारख्या संतांच्या अमृतवाणीने पावन. पुणे कुठे तरी ऐतिहासिक वास्तू जपण्यास असमर्थ राहिलाय
का ? एकीकडे जीवनाशी लढत शिव इतिहास सांगणारे महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे तर दुसरीकडे सरकारी नोकरीत मस्त असणारे, त्या ऐतिहासिक ठिकाणावर दुर्लक्ष्य करणारे
सरकारी अधिकारी. पुण्यातली
वाढती लोकसंख्या, समस्या आणि कमी पडत चाललेले रस्ते ह्यातून पालिकेला, सरकारला कदाचित लक्ष्य देता येत नसावे. पण हा वारसा विभाग जपण्यासाठीच वारसा विभाग तयार केले गेले परंतु वारसा विभागात असणारे कर्मचारी आणि त्यांची कार्याची माहिती कोण घेतय का ? पुण्याच्या मध्यवर्गीय भागातून वाहणारी मुळा मुठा तिच्या पात्रात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत जसे कि सिंहगड, शनिवार वाडा, पर्वती,
घोरपडे घाट, पाताळें श्वर, नाना साहेब पेशवे समाधी, अनेक पुरातन मंदिरे, वाडे, विश्रांत बाग, महात्मा फुले वाडा.
जिथे महात्मा फुले ह्यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली तो भिडे वाडा . इ. सरकारी कागद
पत्राद्वारे ही सगळी स्थळे वारसा व पुरातन विभागात मोडतात. परंतु
ह्या सगळ्या स्थळांसाठी सरकार कोणत्या यादीत मोडत हेच उत्तर अद्याप मिळलेलं नाहीय .
वारजे कर्वेनगर अन खडकवासला तसेच खेड शिवापूर इथून थेट दिसणारा सिंहगड म्हणजे स्वराज्याचा साक्षिदार. शौर्याच प्रतीक. पण दुर्दव्य कि, गडावर गेल्यावर तिथे स्वरज्याच
इतिहास सांगणारे दगड मात्र कोसळलेले आढळतात. त्या ठिकाणी इतिहास काय होता कसा घडला ते महत्वाचं नसून आपल्याला सिंहगडावर मिळनारी कांद्याची भजी , पिठलं भाकर अन कुठे तरी लपून प्रेमाचे चाळे करणारे तरुणाई ची भुरळ दिसते. वारजे तुन निघाल्यावर नळ स्टॉप च्या मार्गे नदीपात्रात उतरल्यावर थेट स्टेशन गाटे पर्यंत आपले सर्वांचे मन वेधून घेणारे काही स्थळ आहेत ते पाहताना मन खूप अस्वस्थ होत. त्याची दुरावस्था पाहवत नाही. पेशवे हे नाव जरी ऐकलं तर उत्सुकता वाटते. ज्यांनी महाराष्ट्र च नव्हे तर त्या अफगाणिस्थान पर्यंत मराठी झेंडे फडकावले त्या पेशव्यांची समाधी ह्याच नदीपात्रात आहे. जिथे त्यांचे निरंतर वास आहे,ज्यांनि त्यांच्या काळात ऐश्वर्य चे जीवन जगले आज त्यांची समाधी धूळ खात आहे . नदीपात्रात उतरल्यावर उजव्या हाताला भारती
विद्यापीठ च्या बाजूला प्रथम लक्ष जात ते नाना साहेब पेशवे ह्यांच्या समाधी कडे . पेशव्यांना पाहत तिथून सरळ निघाल्यावर ओंकारेश्वर मंदिर च्या कळसाला नमस्कार करावं. आतल्या
भव्य दिव्य गाभाऱ्यातल्या शिव पिंडीला पाहून मन प्रसन्न व्हावं. सरळ वाट चालावी आपल्याला घोरपडे घाट नजरेस पडतो . त्याच्या थेट समोर शनिवार वाडा अन पुढे विश्राम बाग वाडा आणि आजून खूप काही.
गेल्या दोन तीन वर्षांपासून सतत माझ लक्ष वेधून घेतय ते म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या थेट समोर असलेल घोरपडे घाट . त्याची तटबंदी कोरीव दगडी चिरा, सुंदर पायऱ्या .. अन तिथे विसावलेले सुंदर असं शिव पिंड आणि नंदी . हे पाहताना उत्सुकता वाढते अन मन
तितकंच अस्वस्थ होत. त्याच्या भोवती असणारे घाणीचं साम्राज्य आन त्यात देवाचा अपमान ... मान खाली टाकण्या शिवाय दुसरा पर्याय तरी
काय? त्या संबधी पालिकेला विचारणा
केली तर उत्तरे ही असमाधानकारक . हालचाल करण्यासाठी ते आपल्या घरातली वास्तू कुठे आहे. घोरपडे घाट आणि त्यासंबंधी साधी फलक सुद्धा आपल्याला लावता आला नाही. पुरात इथले भव्य शिवमंदिर हे वाहून गेलं परंतु देव तिथेच त्याच जागेवर राहिला. शनिवार वाडा अन लाल महाल ला खेटून चिकटून इमारती उभे करत गेलो . आपण आपली घरे वाढवत गेलो पण देवाचे दाराकडे मात्र दुर्लक्ष्य केलं. तिथून शनिवार वाड्याला वेढा घातला तर त्याच्या तटबंदी भोवती अनेक विक्री वाले धंदे करत बसतात त्यावर पोस्टर लावणे स्वतःच्या उद्योगाची झायिरत करणे. इतिकेच नाही तर जिथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं ते लालमहाल काय इतका लहान असावं
? त्याच्या
भवती चिपकून खाजागी इमारती उभे तरी कश्या राहिल्या. त्यात हि राजकारण करून समाज पेटवणे
हे चालूच आहे. हे
सर्व चित्र पाहताना पुण्याच्या वारसा विभागाची किव करावी वाटे . पण हे नक्की, जर असच दुर्लक्ष राहील तर एक दिवस पुण्यातील सर्व ऐतिहासिक वास्तूंची
" पुणेकर मला वाचावा " अशी किंकाळी ऐकू येईल .
मी ढासळलो आहे कोसळलो आहे
अनेक युगांपासून
पडक्या ह्या वैभवाची किंकाळी
जरा ऐकतोस का ?
तुझ्याच पुढील भविष्यासाठी,
तुझ्या नव्या पिढीसाठी
माझे अस्तित्व टिकवण्यास,
मला पदरात घेतोस का ?
सचिन कृष्णा तळे
बिबवेवाडी - ७७०९०९९६४६

☺☺☺
ReplyDeleteथेंक्स
ReplyDelete