Friday, 13 July 2018

युवा हृदयसम्राट ?


युवा  हृदयसम्राट ?


देशात खास करून राज्यात आणि त्याहून जास्त मुंबई पुणे भागात सध्या हृदयसम्राट ही पदवी खूपच चर्चेत आहे. अगदी गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आता हृदयसम्राट दिसतील. त्यांच्या मागेपुढे करणारी चार टाळकी दिसतील. परंतु हृदयसम्राट म्हणजे नक्की काय ? कोण ? ते कसे घडले ? त्यांना हृदयसम्राट हे नाव कसे मिळाले ? आणि त्याचे महत्व समाजात काय आहे , हे आताच्या युवकांना , कार्यकर्त्यांना आणि जनतेला खरंच माहित आहे का? समाजकारण आणि राजकारण ह्या क्षेत्रात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा , कार्य करावे . ती तर देशाची व काळाची गरज आहे. परंतु तुमच्याकडे व तुमचे हृदयसम्राट म्हणून प्रसिद्ध होणारे जाहिराती पाहता मनात काही प्रश्नाचे गोंधळ माजतो. समाजात तुमचे योगदान काय ? समाजाने तुमच्या कडून कोणता आदर्श घ्यावा? किती कार्यकर्ते तुम्ही स्वतःच्या जीवावर व स्वबळावर घडवले ? किती लोकांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात अन संघर्ष केलं ? किती लोकांनी तुमच्या एक शब्दावर जगण्याची दिशा बदलली ? तुमच्या वडिलोपार्जित आडनाव सोडलं तर समाजात तुमची खरी ओळख कोणती? स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्ही किती लोकांची मन जिंकू शकलात. किती लोकांचे प्रश्न तुम्ही मार्गी लावले? असे बरेच प्रश्न आहेत , कदाचित ते तुम्हाला व तुमच्या कार्यकर्त्यांना दिसत नसावं. परंतु स्वतःच्या नावापुढे युवा हृदयसम्राट ही पदवी लावण्या अगोदर ह्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्याच मनाला द्या आणि ते स्वतःलाच पटतंय का ते पहा..

जी व्यक्ती हृदयसम्राट होते त्या व्यक्तीचे कार्य म्हणजे अवघा सूर्यजाळ , एक आदर्श एक संघर्ष , एक काळ.  अशी व्यक्ती ज्याचे सारे आयुष्य हे फक्त देव , देश , धर्मासाठी सत्यासाठी , संघर्षासाठी मार्गी लागले. स्वतःची घर दार फुंकून ज्याने दुसऱ्यांची घरे वसवली. त्यांच्या कार्यामुळे इतिहासाची पाने सुवर्ण अक्षरात लिहिली गेली. त्यांच्या मुळे समाजात परिवर्तन झाले. समाजात न्याय व्यवस्था स्थापन झाली . हृदयसम्राट म्हणजे एक अशी पदवी जीचा सन्मान हा भारत रत्ना प्रमाणेच करू शकतो. ती व्यक्ती अनेक हृदयात आपले हक्काचे घर निर्माण करते. समाजात स्वतःचे एक वेगळं अस्तित्व निर्माण करते. जितकं स्थान देवाला अन घरातल्या कर्ता पुरुषाला असतो तितकंच स्थान त्या व्यक्तीचे असते. ती व्यक्ती कधीच विसरणारी असते. ती तिच्या विचाराने अनेक पुस्तकातून , लेखातून , बातम्यातून , भाषणातून जिवंत असते. जरी समाजात मतभेद असले तरी ही ह्या हृद्यसम्राटांबद्दल मनात एक आदर असतो. त्यांच्यावरून आपण राजकारण करतो , भांडतो तरी ही ती व्यक्ती तितक्याच ताकदीने लोकांना जगण्याचे बळ देते.    

अनेक लोकांच्या हृदयातून ,त्यांच्या प्रश्नातून, संघर्षातून ,एकमताने, समाधानाने एक किंकाळी आकाशात गर्जते  .. ती किंकाळी म्हणजेच हृदयसम्राट.

            जे बहुजनांसाठी लढले, ज्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र समाजात रुजू करून समाजातले जातीपातीचे विष नष्ट करण्यास आयुष्य मार्गी लावले, ज्यांनी समाजातल्या वंचित आणि मागासवर्गीय लोकांचे पालक झाले ,  ज्यांच्या मुळे अनेक लोकांना शिक्षणाचे प्रगतीचे मार्ग मोकळे झाले ते फुले , शाहू , डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने बहुजन हृदयसम्राट होत.

 ज्यांच्या मुळे हिंदू तरले, जे देव देश धर्मसाठी लढले , ज्यांनी हिंदुत्व पुजून हिंदुत्वाची ज्योत अखंड ह्या भारतात हिंदुस्थानात पेटवत ठेवली, हिंदूंवरील अत्याचाराला आवाज उचलले , स्वतःचे स्वराज्य स्थापन केले, मंदिरे उभारली , मंदिरे टिकवली , ज्यांच्या मुळे हिंदू आज ताट मानाने अभिमानाने भगवे पताका मिरवू शकतो, जे मुघल अन दंगलीत तसेच स्वतंत्रकाळात हिंदूंच्या मागे उभे राहिले ते … हो ते छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज , सावरकर , बाळासाहेब ठाकरे आरे हे खरे हिंदू हृदयसम्राट .

ह्या महापुरुषांची कार्य सांगण्यात गोडवे गाण्यात आजही लोकांना धन्यता वाटते, आजही ह्यांच्या शब्दांचा अभ्यास केला जातो , त्याचा अर्थ शोधला जातो , त्यांची कामगिरी युक्ती कार्याचे धडे आजही तितक्याच ताकदीने शिकले जातात. 

ते हृदयसम्राट जे भूतकाळात राहून वर्तमानकाळात ही जिवंत आहेत आणि तुम्ही जे वर्तमानकाळात राहून भूतकाळाचे दाखले देत राजकारण करत स्वतःच करियर घडवता घडवता इतर लोकांचे दिशाभूल करताहेत . खरंच त्या हृद्यसम्राटांच्या पायाखालची धूळ होण्याची तरी आपली तयारी आहे का ? आपण राजकारणात आलो कि आपल्याला राजकारणात आणलं गेलं . घराणेशाही आजही टिकवण्यात राजकीयांना यश मिळत कारण आपली मानसिकता. एखादा पक्ष हा जन्माला येतो तो जनकल्याणासाठी जनतेच्या उद्धारासाठी . त्या पक्षाचा नेता हा मुळात समाजाचा असतो. आज ही समाजासाठी धडपडणारे कार्यकर्ते हे खूप आहेत परंतु त्यांना संधी ही मिळत नाही. कारण घराणेशाही. आज जितके ही पक्ष सत्तेत आली आणि येणार आहेत त्या सर्व पक्षाचे अध्यक्ष हे त्यांचेच वारसदार आहेत. फक्त काहीच पक्ष असे आहेत जिथे तळागाळातला कार्यकर्ता हा ही अध्यक्ष्य झाला आहे.

तुम्ही युवा हृदयसम्राट व्हा , मोठे व्हा , करते व्हा , वंचितांचे पालक व्हा. वेळ पडली तर देव देश धर्मसाठी प्राणाची परवा करता अन्यायाविरुद्ध सत्यासाठी लढा द्या रस्त्यावर उतरा. जे भाग्य  तुम्हाला मिळाले त्याच सोन करा त्या अधिकाराचे उपयोग करा आणि योग्य तिथे न्याय मिळवूंन द्या. जन्माता तुम्हाला सोन्याचा पाळणा लाभल्यामुळे दगडमातीचे व्यथा समजून घ्या. तुमचे भाग्य थोर , त्यामुळे तुम्हाला वडिलोपार्जित कार्यकर्ते लाभले , गर्दी लाभली , प्रसिद्धी लाभली. त्यात काही जण तुमच्याकडे आशेने पाहत आहेत.  देशाचे राज्याचे नेतृत्व तुम्ही चोख करावे आणि खऱ्या अर्थाने हृदयसम्राट व्हावे ह्यसाठी कष्ट करा. महाराष्ट्रात पाहिलं तर असे काही युवा नेतृत्व आहे ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. सुप्रिया सुळे, सचिन पायलट, पूनम महाजन , पंकजा मुंढे, प्रणिती शिंदे, धनंजय मुंढे , अमित देशमुख . ह्या नेत्यांना ही वारसा हक्क मिळाला पण ह्यांनी कधीच स्वतःला युवा हृदयसम्राट म्हणून घोषित केले नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसे जाहिराती ही झळकावले नाही. बच्चू कडू सारखा तरुण ग्रामीण भागातून तळागाळातून लोकांच्या मातीतून राजकारणात येतो कार्य करतो. आमदार होतो ,आपण साधं नेगरसेवक ही झालो नाही.

खरी परिस्तिथी पहिली तर आज ही देशात काय तर जगात खऱ्या अर्थाने आणि तळमळीने सामाजिक राजकीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे निवडणूक प्रचारासाठी काय तर स्वतःचा किमान उदरनिर्वाह चालवण्यासाठी ही पुरेसे आर्थिक भांडवल नसते . त्यांच्यात ती ताकद असून ही घरच्या परिस्थिती समोर त्यांना झुकाव लागत, माघार घ्यावी लागते ,नाहीतर सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी वर्गाकडे आशेने पाहावे लागते.

करावे कार्य असे जे इतिहासात लिहिले जावे
करावे सिद्ध असे जे जनसामान्यात मानले जावे
तेव्हाच मिरवावी पताका तुमच्या नेतृत्वाची
तेव्हाच मिळू दे पोच तुमच्या कर्तृत्वाची



- सचिन कृष्णा तळे 
पुणे
७७०९०९९६४६



No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale