वाणीने जे युक्त ते सर्व काही वाङ्मयच होय अन वाङ्मयामध्ये बोलल्या गेलेल्या व लिहिल्या गेलेल्या सर्वच अक्षररचनांचा समावेश हा साहित्यात होतो. आपल्या आसपासच्या जीवन व्यवहार विषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते. साहित्याचे अनेक प्रकार आहेत फक्त ते वाचकांवर रसिकांवर अवलंबून आहे. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका इ अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते. साहित्याच्या अश्या भव्य सागररुपी किनाऱ्यावर असंख्य लेखकांची नोंद आहे आणि आजही ह्या किनाऱ्याच्या दिशेने अनेक नवोदित लेखकांची वाटचाल चालू आहे. अश्यावेळी आपल्या राज्यात महाराष्ट्रात स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक १ मे, १९६० ला शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात येतील; असे आश्वासन दिले होते. ह्याच धोरणानुसार १९ नोव्हेंबर, १९६० ला महाराष्ट्र शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ‘ पुस्तक प्रकाशन ‘ हे मुख्य उद्दिष्ट असून मंडळाने वैविध्यपूर्ण विषयांवरील साधारणतः ५८४ ग्रंथ आता पर्यंत प्रकाशित केले आहेत. ह्या मंडळातून प्रकाशित झालेली पुस्तके हि मुंबई , पुणे , नागपूर , औरंगाबाद ( संभाजी नगर ) , कोल्हापूर ह्या पाच ठिकाणांतून वितरित केली जाते. हि सर्व पुस्तके स्वस्त किंमतीत मराठी वाचकांना उपलब्ध करून वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य ह्या मंडळातून होतंय. भाषेद्वारे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती,वस्तू स्तिथीविषयी किंवा इतर कुठल्याही विषयांवर विचार प्रकट करतो, त्या विचारांमधून आपण आपले ज्ञान,अभिरुची,आपली जीवनधारणा,नैतिक भूमिका,आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रकट करत असतो. हे सर्व शब्दात मांडल्यावर ते पुस्तकात रूपांतर व्हावे अशी प्रत्येक लेखकाची एक ईच्छा असते. परंतु लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रकाशक मिळत नाही किंवा त्यांना हवं तसं प्रोत्साहन मिळत नाही हि बोंब आज सुद्धा ऐकायला मिळते. अश्यावेळी नवोदित लेखकांच्या साहित्याला सरकार दरबारी योग्य तो न्याय देण्याचे कार्य सुद्धा मंडळ करते. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ४३४ इ बुक्स आपल्याला वाचायला मिळतील ती आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो. मराठी प्रकाशन व्यवसायात मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशकांना श्री.पु. भागवत पुरस्कार तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दर वर्षी देण्यात येतो. ह्या पुरस्कारांसोबत मंडळाच्या काही योजना देखील आहेत ज्या योजने अंतर्गत लेखक ह्या साहित्य विश्वात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो.
सचिन कृष्णा तळे , Pune
7709099646
No comments:
Post a Comment