Tuesday, 22 February 2022

विदर्भ साहित्य संघ

 



विदर्भ साहित्य संघ ही संस्था आता शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना म्हणून संस्थेची ओळख आहे. विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे येतात. ह्या जिल्ह्यांच्या सीमेला हिंदी भाषिक ह्यांचा प्रभाव जास्त दिसून येतो त्यामुळे मराठी भाषा संवर्धन होणे इथे गरजेचे होते. विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करून घेण्यात आले. राजकीय अन सामाजिक भूमिकेतून निर्माण झालेले अनेक चळवळी, तसेच ऐतिहासिक घटनेचा प्रभाव ह्या भागात दिसून येतो आणि ह्या सगळ्या घडामोडीचा एकमेव साक्षीदार म्हणजे विदर्भ साहित्य संघ ही संस्था आहे.

 

मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आली आहे. १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. खापर्डे यांनी तेव्हा आताचा विदर्भ, मराठवाडा, हैदराबाद आणि मध्य भारत येथील रसिकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ग्वाल्हेर ते छिंदवाडा अशा विविध हिंदी राज्यातील मराठी भाषक या संमेलनासाठी अमरावतीत एकत्र आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, १४ जानेवारी १९२३ रोजी खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्याची घोषणा केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. १९४६सालापासून विदर्भ साहित्य संघ हा 'मराठी साहित्य परीक्षा' घेत आला आहे आणि यांत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसाठी उत्कृष्ट सराव म्हणून त्या सिद्ध झाल्या आहेत.

 

विदर्भ साहित्य संघाच्या ५५ हुन अधिक शाखा आहेत. त्यांचा विस्तार  जितका मोठा आहे तितकाच त्यांचा वाचक वर्ग हि. दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनादिन साजरा होतो. या दिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. विदर्भ साहित्य संघाचे ’युगवाणी या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे तसेच संघाच्या गोंदिया शाखेमध्ये 'भवभूती रंगमंदिर' नावाचे नाट्यगृह हि आहे. संस्थेचे नाव ‘विदर्भ साहित्य संघ’ असले तरी त्यात मराठवाडा आणि मध्य भारताचा मोठा भूप्रदेश सामावला आहे.


सचिन कृष्णा तळे पुणे 

७७०९०९९६४६



No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale