माझ्या शाळेतल्या आठवणी.
वयाने कितीही आकडे गाठले तरी शाळेच्या आठवणी न विसरणारेच असतात. गृहपाठामुळे नकोशी वाटणारी शाळा मोठ्यापणी मायेची आठवण करून देत असते. शाळा छोटी असो कि मोठी, वर्ग आणि त्या वर्गात सोबत राहणारी मैत्री आणि त्या मैत्रीतून फुलणारी मस्ती धमालच असते सगळी. एकट्यात आठवलं तर मनात हसू येत आणि मित्रांच्या सोबत गप्पांमधून आठवलं तर प्रेमळ झराच फुटतो. अश्या ह्या शाळेबद्दल जितकं बोलावं जितकं लिहावं तितकं कमीच.
शाळेने आयुष्य घडविले, इतकंच नाही तर आयुष्यभर आठवणीत राहतील अश्या चांगल्या गोष्टी शाळेने मनात रुजवल्या. पावसाळ्यात सुरु होणारी पहिली शाळा, त्यासाठी लागणारी पुस्तके आणि त्या पुस्तकाला कव्हर लावून घेण्यात येणारी मज्जा. नव्या पुस्तकांचा सुगंध आणि त्यात कोणते चित्र आहेत ते पाहण्यात पहिले काही दिवस सरसपणे निघून जातात. बालभारती ते भूगोल , इतिहास , नागरिकशास्त्र , विज्ञान , गणित अश्या पुस्तकांनी अन वह्यांनी सजलेल दप्तर.
दिवसांवरून दिवस , एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, परीक्षेवरून परीक्षा अन मार्कशीट वरील मार्कांनी सहज १० वर्ष शाळेच्याच अंगणात निघून जातात. पास नापास च्या जाळ्यातून स्वतःची सुटका करत मनातला विद्यार्थी रुपी कैदी जेव्हा महाविद्यालयात आणि खऱ्या आयुष्यात पाऊल ठेवतो तेव्हा जाणवत कि शाळेची कैद म्हणजे बालहट्ट अन संस्कार घडवणार खरं गुरुकुल. चक्रवाढ व्याज, लसावि, मसावि सारं माझ्या डोळ्यापुढे फिरायचं आणि डोक्यावरून जायचं. ज्ञानेश्वरांचं पसायदान ही आमची प्रार्थना. शाळेच्या समोर मोठं मैदान, मैदानाच्या बाजूला कार्यक्रम भरवण्यासाठी हॉल, पहिल्या पायरीवर सरस्वतीची सुंदर मूर्ती, काही पायऱ्या चढल्यावर वर्ग आणि हेडमास्तर चा रूम, पिण्याच्या पाण्यासाठी १० नळ, भिंतीवर राष्ट्र महापुरुषांच्या प्रतिमा, संगणक रूम , विज्ञान खोली , आणि ग्रंथालय. हीच होती माझ्या शाळेतल्या आठवणी.
No comments:
Post a Comment