Tuesday, 18 April 2023

पुण्याचा ऐतिहासिक अन दुर्लक्षित वारसा; स्वराज्याचा घोरपडे घाट

 

 


पुण्याचा ऐतिहासिक अन दुर्लक्षित वारसा;

स्वराज्याचा घोरपडे घाट

 वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या गोष्टी. मग त्या वास्तू, वस्तू किंवा इतर स्थावर स्वरूपातील मूर्त गोष्टी असतील, किंवा एखादी कला, संस्कार यांसारख्या अमूर्त असतील. हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. वारसा म्हणून सांगताना त्या वास्तूमुळे त्या भौगोलिक भागावर पडलेला प्रभाव, त्या वास्तूचे राजकीय किंवा सामाजिक स्थान या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आपला वारसा विचारशैलीचे, धार्मिक, सामाजिक अभिसरणाचे, समृद्धीचे, विचार प्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात हे विसरता कामा नये. वारसा पूर्वजांच्या कर्तृत्वाने आणि त्याचबरोबर त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून ज्ञानमार्गी होण्याची प्रेरणाही देतो. इतिहास फक्त पाठ्य पुस्तकात जपला गेला पाहिजे असं नाही, तो वाचता वाचता तो पुन्हा पुनर्जीवित करणे सुद्धा काळाची गरज आहे.

माँ साहेब जिजाऊ यांनी बाळ शिवबाच्या हातून स्वराज्याचा सोनेरी नांगर ज्या पवित्र भूमीत चालवला, ज्या मातीला पेशेवेकालीन शनिवार वाडा लाभला, जिथे तळ्याचा गणपती सारसबाग म्हणून ओळखू लागला, जिथे पर्वती चा डोंगर इतिहासाचा साक्ष ठरला, जिथे स्वराज्याची पाने लिहिली गेली अश्या सांस्कृतिक पुण्याला आणि पुणेकरांना अनेक ऐतिहासिक वारसा मिळाला आहे. त्याचे जतन करणे आणि पुढच्या पिढीसाठी ते पुन्हा पुनर्जीवित करणे हे पुण्यातील प्रत्येक नागरिकांचं काम म्हणा किंवा कर्तव्यचं. पण पुणेकरांना त्याचा विसर पडला हे मात्र शंबर नंबरी सत्य आहे.

मुठा नदीकाठी शनिवार वाडा जवळ आणि पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी पुलावरून खाली वाकून पहिले तर रेखीव पायऱ्यांचा घाट मंदिराच्या जोत्यांचे काही अवषेश दिसून येईल. आकर्षक कोरीव दगडी चिरा, नदीपात्रात उतरणाऱ्या सुंदर दगडी पायऱ्या, लक्षवेधी दगडी बुरुजानी उठून दिसणारा पुण्याचा ऐतिहासिक घोरपडे घाट. सध्या हा घाट पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे खात्याच्या वादात अडकल्याने गेल्या अनेक वर्ष सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. तिथली अवस्था पाहण्यासारखी अन मनात राग निर्माण करणारी जरी असली तरी ह्या घाटावर दरवर्षी घोरपडे घराण्यातून आणि काही शिव प्रेमी यांच्या हातून या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जात आहे. सत्ताधारी वर्गाने डोळे मिटल्याने या घाटाची सुंदरता आजवर आपल्यापर्यंत पोह्चलीच नाही. शहराच्या मध्यवर्गी भागात असणारा हा "घोरपडे घाट" महापालिकेच्या वारसा विभागात नोंदवलेला आहे. तरीही वारसा विभागाकडून येथे या घाटा विषयी साधा फलक पण नाही. घाटा शेजारी सोडलेलं सांडपाणी आणि कचऱ्याचा ढीग तसेच रात्रीच्या वेळी चोरून नशा करणारे माणसं पाहिली तर मन सुन्न होतं. महानगर पालिकेच्या डोळ्यासमोर या घाटाची पवित्रता प्रशासन ला राखता आली नाही.

काय आहे घोरपडे घाटाचा इतिहास?

- १० फेब्रुवारी १८३१ रोजी यशवंतराव घोरपडे यांचे पुत्र दौलतराव घोरपडे यांनी "घोरपडे घाट" ची निर्मिती केली.

- आठ एकर चाळीस गुंठ्या मध्ये असणारा हा परिसर ब्रिटिश सरकार कडून दौलतराव घोरपडे यांना इनाम म्हणून देण्यात आला होता.

- या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर होत. मात्र, १९६१ मध्ये आलेल्या महापुरात हे मंदिर वाहून गेलं. मात्र या मंदिरातला महादेव आणि नंदी आजही त्याच जागेवर आहे.

- पूर्वी या घाटाला "कळकीचा बाग" संबोधले जात होते.

- या घाटावर दौलतराव घोरपडे यांच्या मातोश्री बयाबाई घोरपडे यांची समाधी होती, पण ती आता पूर्णतः दिसून येत नाही. 

पेशवाईच्या काळात मुठा नदीकाठी वृद्धेश्वराचा घाट आणि घोरपडे घाट अस्तित्वात होते. आता त्याचे काही अवशेष उपलब्ध आहे. या दक्षिणमुखी घोरपडे घाटाला चार दगडी बुरुज असून टप्या टप्याने पायऱ्या नदीत उतरताना दिसतात. बुरुजाला जोडणाऱ्या भिंतीमध्ये महिलांना वस्त्र बदलण्यासाठी दोन खोल्या आहेत. ह्या घाटावर असलेल्या शिवकालीन मंदिराला त्रिंबकेश्वर असे नाव असल्याचे सांगण्यात येते. घोरपडे घराण्याचे पूर्वज मालोजी घोरपडे हे सुप्रसिद्ध सेनापती संताजी घोरपडे यांचे बंधू. त्यांनाअमीर उल उमरावहा किताब खुद्द छत्रपती राजाराम महाराजांनी दिला होता.

हा घोरपडे घाट आणि या घाटाचे वैभव पुन्हा उभे करण्यासाठी घोरपडे घराणे कित्येक वर्ष सरकारी कागदपत्रातून लढा देत आहेत. पुण्याचा एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांची हि जवाबदारी आहे कि ह्या स्थळाला भेट देऊन शासन दरबारी ह्याची दखल घेण्यासाठी दबाव आणला गेला पाहिजे. हा घाट इतका वैभवशाली आणि सुंदर होऊ शकतो ह्याची कल्पना आजवर तुम्ही केली नसावी. पुण्याचे मानाचे गणपती देखील ह्या घाटावर विसर्जन करता येईल इतका छान रेखीव घाट आपल्याला कै. दौलतराव घोरपडे ह्यांनी निर्माण करून दिला आहे. तो जपणे आणि तो होता तसाच निर्माण करून पुढच्या पिढीला सुपूर्द करण्यासाठी ह्या घाटाला प्रत्येक पुणेकरांनी भेट द्यावी.

 

 - सचिन कृष्णा तळे 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale