Friday, 21 April 2023

असे लहानपण नको देवा ... !!



लहान मुलांचा निरागस भाव पाहिला तर पुन्हा लहान व्हावं वाटतं. वाढत्या वयात लहानपण कधी निसटून जातं हे कळत नाही, त्यामुळे लहानपणाच्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात असा काही दरवळत असतो कि एखाद लहान मुलं दिसलं कि त्याच्या सोबत आपण हि लहान होऊन जातो. पण काहींचं लहानपण हे इतकं वाईट असतं कि ते कधीच आठवणीत ठेवू नये आणि कोणाच्या वाटेला हे असं बालपण येऊ नये.

पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेर घर. अर्थात पुण्यात जो येतो तो शिक्षण घेण्यासाठी स्वतःला घडवण्यासाठी. टोलेजंग इमारती, मॉल, आयटी कंपन्या, अनेक शैक्षणिक संस्था तसेच औदयोगिक कारखाने आणि वाढती लोकसंख्या हि नव्या स्मार्ट पुण्याची ओळख. पण ह्यात अजून एक उल्लेख राहिला ती म्हणजे पुण्यात वाढती बेरोजगारी आणि रस्त्याच्या कडेवर भीक मागणारी लहान मुलं. होय कारण पुण्यात असे बरेच चौक आहे, बाजार पेठ आहेत, स्टेशन परिसर आहे कि जिथे लहान मुलं भीक मागताना दिसतील किंवा हातात कापड घेऊन तुमच्या गाडीच्या काचा पुसत पाच दहा रुपयाची मागणी करताना दिसतील. काही वेळेला तुम्हाला ती फुल किंवा खेळणी सारख्या वस्तू विकताना दिसतील. जर बारकाईने पाहिलं तर हे प्रमाण गेल्या काही वर्षात जास्त वाढले आहे त्यामागचं कारण स्थलांतर असू शकतं. पर-राज्यातून आपल्याच जिल्ह्यातील दुष्काळ भागातून अनेक जण शहराकडे वळतात. घर दार सोडून लहान मुलाना घेऊन ती शहरात येतात आणि रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहतात. त्यांना रोजगार मिळेल तेव्हा मिळेल पण पोटाची भूक मिटवण्यासाठी ह्या निरागस बालकांना त्यांच्याच पालकांकडून भीक मागण्यास प्रवृत्त केले जाते हे सत्य आहे. ह्यात आईच्या झोळीत तीन चार महिन्याचं मुलं देखील दिसेल.

आपण काय करतोय हे ह्या मुलांना काहीच माहित नसते. फक्त हातात पैसे किंवा काही खायला मिळालं कि ते त्यांच्या आई वडिलांकडे देयचे आणि खेळाला जायचं. ज्या हातात पाठी आणि पुस्तक हवं त्या हातात पैसा येतो. ज्या वयात लाड असतात त्या वयात उन्हाचे चटके ह्यांना खावं लागत. कधी कधी मनात हा विचार येतो कि हि सुंदर गोंडस मुलं नक्की त्यांचीच आहेत का? मुलं पळवून नेणे हा प्रकार राज्यात देशात नवीन नाही. एक मोठी साखळी सुद्धा ह्यांच्या भोवती असते हे अनेक चित्रपटातून दाखवलं गेलं. अनेकांनी हि मुलं त्यांची नाहीत हे सिद्ध पण केलय. अनेक सामाजिक संघटनेनं ह्या मुलांसाठी रस्त्यावर शाळा देखील भरवल्या.

मुळात विषय हाआहे कि भीक मागणाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यात लहान मुलांचा असणारा सहभाग जो देशाच्या राज्याच्या प्रगतीच्या दुर्ष्टीने चांगला नाही. भिक्षा प्रतिबंध कायद्यानुसार चौकात, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणे हा देखील एक प्रकारे गुन्हाच आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्याधींचे जखंमाचे, अपंगत्वाचे किंवा असहायतेचे प्रदर्शन करून पैसे अन्य वस्तूंची मागणी करणे म्हणजेच भीक, पण त्यात लहान मुलांना घेऊन भीक मागणे हा खूप मोठा गुन्हा आहे कारण आपण देशाची भावी पिढी बर्बाद करतोय.

सर्वांना मूलभूत सुविधा, निवारा वैद्यकीय सुविधा देणे हे सरकार चे कार्य आहे आणि त्यासाठी शासन अनेकवेळा कार्य करताना दिसतात. पुण्यात अश्याच मुलांसाठी रात्र निवारा प्रकल्प पालिकेतर्फे राबवला जातो. सेनादत्त सांस्कृतिक हॉल (सेनादत्त पेठ), दुध भट्टी समाजमंदीर (बोपोडी), मदर तेरेसा समाजमंदिर (येरवडा) हि ती ठिकाण आहेत जिथे बेघर, बेसहारा लोकांसाठी रात्र निवारागृहांची संकल्पना राबवली जाती. केंद्रातून राज्यातून पालिकेकडे ह्यासाठी काही रक्कम सुद्धा सुपूर्द केली जाते. रात्र निवारा चालवणाऱ्या संस्थेला मानधन सुद्धा देण्यात येते.

महाराष्ट्रातील विविध परिसरातील अनेक लहान मुले रोजगारासाठी पुणे शहरात स्थलांतरित झाले. सुमारे ४८ टक्के मुले किंवा त्यांचे कुटुंब उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी आणि सोलापूर येथून आलेले आहेत. युनिसेफने स्ट्रीट चिल्ड्रनची केलेल्या व्याख्यानुसार १८ वर्षाखालील कोणतेही मुल जे रस्त्यावर राहते किंवा उपजीविकेसाठी आपला जास्तीत जास्त वेळ रस्त्यावर घालविते. सर्वसाधारणपणे स्ट्रीट चिल्ड्रनचे तीन गट पडतात- रस्त्यावर राहणारी मुले, रस्त्यावर काम करणारी मुले आणि रस्त्यावरील कुटुंबांमधील मुले. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर एक सर्वे सादर केला आहे. पुणे महानगरपालिका विभागातील ७६ निवडणुक प्रभाग आणि २ कॅन्टॉनमेंट परिसराचा अभ्यास केला असता १०४२७ मुलं ह्या गटात आढळली आहेत. ह्या मुलांमध्ये ५२०७ मुले ते १४ वयोगटातील आहेत. सर्वेक्षण करण्यात आलेल्या स्ट्रीट चिल्ड्रनमध्ये मुलांचे प्रमाण ५८. टक्के आहे, मुलींचे प्रमाण ४१. टक्के आणि तृतीयपंथीयांची . टक्केवारी आहे. तसेच रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबातील मुलांची संख्या तब्बल ८५५० एवढी आहे. सर्वेक्षण केलेल्या एकूण मुलांपैकी ३३% मुले हातगाडीवर/ फेरीवाले म्हणून काम करतात. सुमारे १७% मुले भीक मागतात किंवा काहीवेळा त्यांना भिक मागण्यासाठी वापरले जाते. तसेच १२% मुले बांधकाम करतात.

जर रात्र निवारा अंतर्गत विचार केला तर दाखवलेल्या आकडेवारी नुसार ह्या १० हजार मुलांसाठी हि तीन केंद्र पुरेशी आहेत का? जर हि सामाजिक केंद्र शासन तर्फे राबवली जात आहेत तर रस्त्यावर मुलं का दिसत आहेत? कारवाई होत असेल तर पुन्हा ती मुलं रस्त्यावर कशी? अश्या अनेक प्रश्नाच्या विचार केला तर एका बाजूला करोडोचा घोळ खंडणी प्रकरण राज्यात आहे तर दुसरीकडे देशाची पिढी रस्त्यावर आहे म्हणजे आपली प्रणाली खरंच कुठे तरी कमी पडतीय का? मुलं हि देवाघरची फुल आहेत असं म्हणतात मग देव भव्य स्थळात असताना त्याच्या ओंजळीतील हि निष्पाप गोंडस फुल रस्त्यावर का?

 

पंकसपर्के कमळ का भिकारी?

धूलिसंसर्गे रत्न का भिकारी?

सूत्रसंगे सुमहार का भिकारी

कशी तूंही मग मजमुळे भिकारी?

 

देव देतो सद्गुणी बालकांना!

काय म्हणूनी आम्हांस करंट्यांना?

लांब त्याच्या गावांस जाउनीया

गूढ घेतो हे त्यांस पुसोनीया

 

फुलांची ओंजळ- ‘बीकवींची समग्र कविता मंधील ह्या ओळी. कवितेचा आशय खुप साधा आहे. एक गरिब बाप मुलीला सांगतोय "धुळीत सापडले म्हणून रत्न भिकारी नसते, चिखलात उगवले म्हणून कमळ भिकारी होते का? असे सांगत माझ्या गरिबाच्या पोटी जन्माला आली असली तरी तू एक रत्न आहेस. हे आपल्या लाडकीला समजावून सांगताना. शेवटी अशी सद्गुणी गोड बालके आमच्या सारख्यांच्या पोटी का जन्माला घालतोस? आम्हाला त्यांचे लाड पुरवता येत नाहीत अशी तक्रार देवाकडे करतो. आणि मुलीला सांगतो की मी देवाकडे जावून हा जाब देवाला विचारणार आहे".

 

स्वतःच्या नाकर्तेपणा झाकण्यासाठी मुलांना जबरदस्तीने भीक मागवून त्यांचं आयुष्य धुळीस मिळवणाऱ्या त्या प्रत्येक आई बापाने विचार करावा.

 

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale