असहिष्णुता का वाटे भारतातच यांना ... !
असहिष्णुता आणि सहिष्णुता ह्या दोन शब्दांचा अर्थ भारतीयांनी फक्त पुस्तकात वाचला असावा त्यानंतर सोशल मिडीयावर अन बातम्यांद्वारा. कारण काबाड कष्ट करून, मेहनत करून आपली बहुतांश जनता हि सोशल मिडीयावर जास्त विश्वास ठेवते. या अदृश्य दुनियेवर विश्वास ठेवणाऱ्या बऱ्याच भारतीय बंधूना असहिष्णुता आणि सहिष्णुता म्हणजे नक्की काय हे माहित ही नसेल. पण गेल्या काही महिन्यापासून म्हणा किंवा काही वर्षांपासून किंवा नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून या दोन शब्दांनी चांगलाच रंग घेतलायं. त्यात जास्त चर्चेत राहिले ते नसूरद्दीन शाह , शाहरुख खान, अमीर खान अन सलमान खान. विविध राजकीय पक्ष सहिष्णुता आणि असहिष्णुतेची व्याख्या आपापल्या सोईनुसार करतात. मात्र, जेव्हा-जेव्हा हा मुद्दा समोर येतो, तेव्हा लोकांनी त्यास सहिष्णुतेनेच उत्तर दिले आहे. मग ती युद्धाची स्थिती असो की अंतर्गत संघर्ष. देशात सर्व जण असहिष्णुतेबाबत बोलत आहेत, उदाहरणे देत आहेत. मात्र, कोणी सहिष्णुतेवर ब्र काढत नाही.
काही दिवसांपूर्वी सलमान खान ह्यांना एका १६ वर्षाच्या मुलाने जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यावर त्याने भारत हा सुरक्षित नाही दुबई ( इस्लाम राष्ट्र ) हा सर्वात जास्त सुरक्षित देश आहे असे मत मांडले. अशीच काहीशी भूमिका अमीर खान, शाहरुख खान अन नसरुद्दिन शहा ह्यांनी मांडली होती. त्यावर ह्याच सोशल मीडियावर जोरदार टीका झाली, वादविवाद झाले. खरचं भारत सुरक्षित नाही का ? या बॉलिवूड स्टार ना भारतात असहिष्णुता का वाटू लागली ? भारतातल्या जनतेने या सर्व कलाकारांचा ना धर्म पहिला ना जात ना समाज पाहिला. त्यांच्या कलेवर प्रेम करत त्यांना मोठं केलं. आज याच बॉलीवूड मध्ये शेकडो कलाकार आहेत अन अगणित कलाकार स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करीत आहेत. जी या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना का भारतात असहिष्णुता वाटली नाही ? ह्याचा विचार सुद्धा झाला पाहिजे. वाढत्या असहिष्णुतेचे कारण सांगून अनेक साहित्यिक-कलावंतांनी आपापले पुरस्कार परत केले होते.
सहिष्णुता हा माणसाचा एक असा नैतिक गुण आहे, जो माणसाला त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या व्यक्तींच्या आणि समूहांच्या व्यवहारांकडे सकारात्मक दृष्टिकोणांतून पाहण्याचे बळ देतो. जी माणसे संवेदनशील असतात ती इतरेजनांचे विचार, भावना, आणि अनुभव यांबद्दल सहवेदना बाळगत असतात. ती जीवनात खडतर अनुभव घेतलेल्या एखाद्या इसमाच्या कडवट बोलण्यावर उलटून त्यास तेवढीच कडवट प्रतिक्रिया देत नाहीत. कारण तसे करणे असहिष्णुपणाचे होईल हे ते जाणतात. अशावेळी स्वत:ला त्या इसमाच्या जागी कल्पून, त्याच्यासारखाच खडतर अनुभव स्वत:ला आला, तर त्या प्रसंगी आपण कसे वागू हा प्रश्न ते स्वत:ला विचारतात. असे करणे हे समाजाभिमुख आणि परहितदक्ष असण्याचे लक्षण होय, आणि ते नेहेमीच सहिष्णुतावर्धक असते.
मत मांडण हे चुकीच नाहीय घटनेत हा अधिकार सर्वांना दिलाय . सर्वाना आपल मत मांडून व्यक्ती स्वातंत्र चा हक्क आहे मग जर शारुख आणि आमिर ला देश सोडून जायच असेल तर त्याने नक्की जावे. कारण ईतर देशापेक्षा, भारत हा कितीतरी पटीने सहिष्णु आहे. सर्वधर्म समभाव हा ह्याच देशात मिळेल ईतर देशात धार्मिक कट्टरता अन त्यावरील बातम्या आपण पाहतच असतो. स्वतंत्र पूर्व व स्वतंत्र मिळाल्यानंतर ही आम्ही किती लढे दिले किती सहन केल पण भारताच्या अस्मितेला धक्का लावून दिला नाही. अफगाणिस्तान पासून कितीतरी परकीयांनी आमच्या वर आक्रमणे केलीत पण आम्ही लढलो पण देश सोडला नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांना जन्म दिला इथल्या हिंदुना वार्यावर सोडून तिथल्या लोकांना आश्रय दिला पण देश सोडला नाही. भारताची तुलना इतर देशाशी होऊच शकत नाही.
सहिष्णुतेचे काही उदाहरण -
१) अयोध्येच्या वादग्रस्त जागेबाबत निकाल लागणार होता. देशात तणाव होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठाने निकाल दिला. निर्मोही आखाडा, सुन्नी वक्फ बोर्ड आणि रामलल्लासाठी जमिनीचे त्रिभाजन करण्यात आले. कुठे किरकोळ घटनाही घडली नाही. निकालाचे स्वागत झाले. सहिष्णुतेचे हे उत्तम उदाहरण होते.
२) दिल्लीत निर्भयावर बसमध्ये अत्याचार झाला. कुटुंबच नव्हे संपूर्ण देश सुन्न झाला. मात्र, या वेळीही देशात सहिष्णुता पाहावयास मिळाली. निर्भयाच्या कुटुंबीयांनी हिंसाचार केला नाही, ना अन्य कोणी. सर्व ६ आरोपींना शिक्षा मिळाली. निर्भयाच्या नावे बलात्कारविरोधी कठोर कायदा तयार करण्यात आला. यातून शांततामय मार्गाने देशात मोठा बदल झाला.
३) काश्मीरमध्ये हिंदू कुटुंबांना घरे सोडण्यास सांगण्यात आले. दरवाजांवर धमकीपत्र चिटकवण्यात आली. त्या वेळी ३.५ लाख काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडल्याचे जाहीर करण्यात आले. एवढे होऊनही काश्मिरी पंडितांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले. विशेष म्हणजे त्यांची गेल्या २५ वर्षांपासून घराशी ताटातूट झाली आहे.
एकंदरीत भारतातील लोक असहिष्णू व कट्टर नसले तरी त्यांना स्वतःचे वेगळे पण स्वतःचे धार्मिक रूढी परंपरा अन वेगळेपणा जपतच एकत्र रहायचे आहे. हीच शिकवण आपल्या ऋषीमुनी संत माहात्म्य यांनी आपल्याला दिली आहे. देशांतर्गत वादविवाद होतच राहणार. म्हणून सर्वधर्म सामावून घेणाऱ्या या सहिष्णू भारताची तुलना इतर देशाशी करून आपण देशाचा आणि स्वतःचा हि अपमान करत आहोत ह्याची जाणीव झाली पाहिजे. मुळात ह्या बॉलीवूड कलाकांराना फॉलो करणारा खूप मोठा युवा वर्ग आहे. त्यामुळे असे चुकीचे वक्तव्य करून आपण स्वतः देशात असहिष्णुता ला खतपाणी तर घालत नाही ना ह्याचा विचार झाला पाहिजे.असहिष्णुता आपल्याला रोज दिसते. रस्त्यावर दिसते, आपण राहत असलेल्या सोसायटीत दिसते. ऑफिसेसमध्ये दिसते, प्रसंगी आपल्या स्वत:च्या घरातच दिसते.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment