Thursday, 15 June 2023

आत्मविश्वास हिच तुमच्या यशाची गुरुकिल्ली

आत्मविश्वास हिच तुमच्या यशाची गुरुकिल्ली



शालेय शिक्षण, महाविद्यालय शिक्षण आणि त्यातून मिळवलेल्या पदव्या तसेच सर्टिफिकेट हे प्रत्येक विद्यार्थी मित्राचं भविष्य घडवण्याचं कार्य करत असतं. ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणा किंवा इन्स्टिट्यूट आज सहज उपलब्द आहेत. आजच्या युगात इंटरनेट च्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत तुम्ही कुठे हि ऍडमिशन घेऊन तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता. अगदी घरबसल्या विदेशातील शिक्षण हि तुम्ही पूर्ण करू शकता. आर्थिक किंवा सामाजिक दुर्बल असाल तरी तुमच्या मदतीला अनेक संस्था तसेच अनेक सरकारी योजना आहेत. शाहू फुले आंबडेकर तसेच अनेक समाजसुधारक यांनी आर्थिक वंचितांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले आहे. शिक्षणाचं महत्व किती आहे, हे ज्यांनी शिक्षण केलं नाही त्यांना विचारा. पण योग्य वेळी योग्य ज्ञान योग्य शिक्षण घेतलं ते हि स्वतःची आवड पाहून तर भविष्य हे सोन्याहून पिवळं.

काही दिवसांपूर्वी अनेकांचे निकाल लागले. निकाल लागला कि पहिला चिंता पालकांना पडते ती म्हणजे... "आता पुढे काय?" कश्यात ऍडमिशन घेयचं, कोणत्या फिल्ड मध्ये मुलाला टाकायचं, कोणता कोर्स लावायचा वैगैरे वैगैरे अश्या अनेक प्रश्नांनी त्यांचा गोंधळ उडतो कारण त्यांना काळजी असते ती त्यांच्या मुलाच्या करियर ची उज्वल भविष्याची. आणि ह्या काळजीपोटी पालक भेटेल त्यांना माहिती विचारत फिरताना दिसतात. ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत ते योग्य रीतीने पुढे जातात. पण ज्यांना माहितीचं नसते ते मार्क च्या नुसार ऍडमिशन घेतात पदवी घेतात आणि करियर घडवण्यासाठी धडपड करतात. हि वस्तुस्तिथी आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांच्यासमोर सर्वात जास्त प्रश्न उभा राहतो की, त्यानंतर विज्ञान , वाणिज्य आणि कला या तीनपैकी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा. योग्य प्रवाहाच्या निवडीमागे कोणता प्रवाह इतरांपेक्षा चांगला आहे हे ठरवणे अनेकदा विद्यार्थ्यांना पालकांना अवघड जाते. आपल्या आवडीनुसार करियर निवडणे शक्य नसते. अश्या परिस्तिथीत खूपवेळा आपण लोकांचं ऐकतो त्यांना प्राधान्य देतो. अनेकवेळा निर्णय चुकला असं हि वाटतं. आपली आवड असते एका गोष्टीत आणि आपण शिकतो भलतंच.

आपण कृती केली आपण हालचाल केली तरचं आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत. अन्यथा आपण मित्र ह्या महाविद्यालयात ऍडमिशन घेतोय, ह्या शाखेत तो शिक्षण घेणार आहे म्हणून आपण हि तेच करत बसलो तर हा मार्ग चुकीचा ठरेल. विवेकानंदांच्या आयुष्यातील एक छानसा प्रसंग इथे सांगावासा वाटतोय. स्वामी विवेकानंद हे एकदा कलकत्त्याला गेले होते. सकाळची पूजा आराधना आटपून ते कालिमाताच्या दर्शनाला निघाले. सकाळ अजून उजाडलेली नव्हती. एकटेच ते रस्त्याने चालू लागले. काही अंतर चालता चालता त्यांना एका वळणावर ३ रस्ते लागले. ह्या ३ रस्त्यांपैकी कालिमाताच्या मंदिराकडे नक्की जाणारा रास्ता कोणता हा प्रश्न त्यांच्या समोर पडला होता. दिवस उजाडला नव्हता आणि रस्त्यावर कोणतेही फलक नव्हतं. सोबत सेवेकरी सुद्धा नव्हते आणि वरदळ पण नव्हती. कुठल्यातरी भलत्याच दिशेला भरकटण्यापेक्षा कोणाला तरी विचारून पाहावं म्ह्णून ते आजूबाजूला पाहू लागतात.

एका रस्त्याच्या फुटपाथवर रंगीत खडूने चित्र काढणारा एक चित्रकार बसला होता. स्वामींची नजर त्या माणसाकडे जाते. ते त्या माणसाला हाक देतात पण तो काहीच उत्तर देत नाही. दुसऱयांदा आवज देतात पण त्या माणसाकडून काहीच उत्तर येत नाही. पुन्हा त्याला मार्ग विचारतात पण तो काहीच बोलत नाही. स्वामी विविएकानंदांना वाटतं हा माणूस बहिरा आणि मुका असावा. म्हणून स्वामी त्या माणसाकडे दुर्लक्ष्य करून एक मार्ग निवडून त्या मार्गाने चालू लागतात. इतक्यात तो चित्रकार माणूस स्वामींच्या पाठी पळत येतो आणि त्यांना मार्ग दाखवतो. त्याच्या ह्या वागण्यावर स्वामी क्षणभर चकित होतात. इतक्या वेळ मी ह्या माणसाला विचारत होतो तर त्याने एकही शब्दाने उत्तर दिले नाही. उलट त्यालाच हा प्रश्न विचारतात. त्यावर तो माणूस स्वामींना म्हणतो ...

स्वामी माफ करा मी तुम्हाला ओळखलं होत. तुम्हाला मी वाट दाखवणार होतो पण म्हंटल तुमचीच आज छोटीशी परीक्षा घ्यावी. तुम्ही जो रास्ता निवडला आहे तो योग्य आहे. इथूनच पुढे काही अंतरावर कालिमाताच मंदिर आहे. तेव्हा स्वामी म्हणतात "मग इतक्या वेळ मी तुला विचारलं तर तू मला काहीच उत्तर का बरं दिल नाही" तो तो माणूस स्वामींना म्हणाला " स्वामी तुम्हाला कुठे जायचं आहे ह्याची कल्पना मला तुम्हाला पाहताच आली होती. पण तुम्ही त्या चौकात जिथून ३ रास्ता चालू होतो तिथे थांबलात. अश्यावेळी तुम्ही जर कृती केली असती आणि मनाला वाटेल त्या रस्त्याने निघाला असता आणि ती वाट जर चुकीची असती तर नक्कीच मी तुम्हाला मार्ग दाखवला असता. तुम्ही थांबलात आणि कोणतीही कृती न करता तुम्ही माझी मदत घेण्याचा विचार केला. पण पहा तुमच्या आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य मार्ग दाखवलं व तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू लागलात."

ह्या गोष्टीवरून तुम्हाला कळालं असेलच कि, तुम्हाला कोणीतरी येऊन मार्गदर्शन करेल तुम्हाला मार्ग दाखवेल ह्याची वाट न पाहता तुम्ही कार्य करा कृती करा स्वतःच्या आत्मविश्वसाने वाटचाल चाला आणि पहा मार्ग सहज मिळेल. कोणीतरी त्या वाटेने चालाय हे न पाहता आपण कोणत्या वाटेने गेलं पाहिजे ह्यावर विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल. मार्ग सांगणारे चुकीचा हि सांगतात आणि काही बरोबर पण सांगतात. ज्यांना मार्ग माहीतच नाही त्यांना तुम्ही मार्ग विचारला तर ते तुमची फक्त दिशाभूल करू शकतात. आणि काही लोक अशी हि असतात जी तुमचा मार्ग पाहून तुम्हाला मदत करायला धावून येतात. तुमचं आत्मविश्वास हिच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

 -सचिन कृष्णा तळे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale