Wednesday, 2 August 2023

मोदी पुण्यात, नेते आनंदात, कार्यकर्ते आंदोलनात...!!

 

मोदी पुण्यात, नेते आनंदात, कार्यकर्ते आंदोलनात...!!

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०३ व्या पुण्यतिथी दिनी टिळक स्वराज्य ट्रस्ट अन लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा  ४१ वा "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार" हा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी याना सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानात प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर टिळक परिवारांसोबत राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अन अजित दादा होते. पण ह्याच मंचावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते कार्यक्रम सुरु होण्याआधी १५ मिनिट आगोदरच राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेस चे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची उपस्तीथी. ह्या दोन नेत्यांची हजेरी आणि मोदी पुण्यात येणार म्हणून विरोधकांनी मोदी विरोधात आखलेली फसवी रणनीती. जस काही सर्व स्क्रिप्टेड होतं असंच म्हणावं लागेल.  

"सत्ता येते सत्ता जाते पण समाज आणि देश तिथेच राहतो" मोदींच्या ह्या वाक्यांनी विकास कामाची सुरवात झाली आणि सर्वांनां विकासासाठी एकत्र कार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. यावेळी गरवारे महाविद्यालय ते रुबी क्लिनिक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या विस्तारीत मार्गाची मंगळवारी उदघाटन मोदींनी केले. या शुभ कार्याची सुरवात करण्याआधी मोदींनी दगडू शेट गणपती मंदिरात दर्शन घेऊन आरती केली. मोदींना पाहण्यासाठी पुणेकरांनी सुद्धा चांगलीच गर्दी केलेली दिसून आले. पुण्यात खासकरून मोदींच्या मार्गावर कुठेही चुकीचा प्रकार घडला नाही. तसेच या दौऱ्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सुमारे पाच हजार सदनिकांचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झाले. पिंपरीत चिंचवड महापालिकेच्या कचऱ्यापासून वीज निर्माण करणाऱ्या ७०० टन प्रकल्पाचे उदघाटन देखील झाले. बापट परिवाराची भेट असो किंवा पवार मोदी यांची भेट पुण्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे आनंदी होत. जे नेते आनंदात होते त्याच नेत्यांचे कार्यकर्ते आंदोलनात होते.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या बंडखोरीनंतर अजित पवार आणि शरद पवार प्रथमच एका व्यासपीठावर दिसले. शिंदे, फडणवीस हे पवारांच्या समोरून आसानस्थ झाले पण, अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेता त्यांच्या मागून जाणे पसंद केले. मोदी पुण्यात येणार म्हणून त्यांच्या विरोधात विरोधकांनी चांगलीच रणनीती आखली होती. त्यात आघाडीवर काँग्रेस होती. मणिपूर च्या घटनेवर जाब विचारण्यासाठी ह्या राजकीय संघटण्यानी पुण्यात कामानिमित्त राहणाऱ्या मणिपूरच्या रहिवाशींना देखील आपल्या आंदोलनात सहभागी करून घेतले होते. महाविकास आघाडीतले प्रमुख पक्ष राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना अन काँग्रेस या तिन्ही घटक पक्षाची आधी बैठक झाली होती. आंदोलन केव्हा , कुठे आणि कोणाच्या नेतृत्वात करायचं ह्याची तयारी देखील झाली होती. त्यानुसार काही बातम्या देखील प्रसिद्ध झाले होते. लोकांनाही ह्याची चाहूल लागलेली होती. काहीही झालं तरी आता आंदोलन हे करणे गरजेचं होत. तर दुसरीकडे आपलेच वरिष्ठ नेते त्याच कार्यक्रमात मोदींच्या भेटीला स्टेजर असणार हे फक्त काहीच राजकीय मंडळींना माहित असावं. मोदी द्वेषाची काविळ झालेल्या विरोधकांनी पुणेकरांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्यास जशाच तसे उत्तर देऊ. ते ज्या ठिकाणी आंदोलन करतील, त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्तेही आंदोलन करतील, असा इशारा पुण्याचे माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिला होता.  मोहोळ हे देखील म्हणाले की, काँग्रेसने विरोध करताना एवढंही भान ठेवले नाही की, ज्या घराला, कुटुंबाला काँग्रेस विचाराची परंपरा आहे. त्यांनी मोदींना पुरस्कार देण्यासाठी बोलावले आहे. जयंतराव टिळकापासून रोहित टिळकांपर्यंत हे कुटुंब काँग्रेस विचाराचं राहिलेलं आहे. त्या पक्षाचे लोक मोदींना विरोध करत आहेत. त्यामुळे हे दुटप्पी आणि नौटंकी आंदोलन आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस चे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मोदींच्या सोबत असणार ह्याची कल्पना किती कार्यकर्त्यांना होती ? असा प्रश्न चिन्ह आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता पडला पाहिजे. ह्याला शुद्ध फसवणूक म्हणता येईल, आपल्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांशी. " स्वागताला दादा एअरपोर्ट वर, सत्काराला पवार साहेब स्टेजवर आणि मोदी विरोध करायला कार्यकर्ते रस्त्यावर" असा योगायोग पूर्ण महाराष्ट्राने पहिला. नेटकरी  सुद्धा अनेक मिम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर ह्याची खिल्ली उडवताना दिसले. पुण्याला वेगवेगळ्या प्रकल्पांची भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदी आले होते. या प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला गती येणार हे सांगायची गरज आहे का पुणेकरांना. या विरोधकांचा विरोध नेमका कशाला होता?, हेच कळत नाही. दुटप्पी आणि नौटंकी भूमिका कशासाठी घेतली गेली? शरद पवार पुरस्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर जाणार आणि त्यांच्याच पक्षाचे लोक या पुरस्काराला विरोध म्हणून आंदोलन करणार? म्हणजे राष्ट्रवादीने ह्या आंदोलनातून नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न केला असेल? मोजकेच काही नेते मंडळी ह्या आंदोलनात दिसले. काळे वस्त्र, काळे झेंडे, भर रस्त्यात घोषणा, पोलिसांच्या गाडीत बसने अन  स्वतःला कैद करून पुन्हा सुटका करून घेणे हा सर्व प्रकार काय होता हे जनतेला देखील कळाला असेल. कदाचित त्यामुळेच प्रसार माध्यमांना या आंदोलनाची दखल जास्त घ्यावी वाटली नाही. म्हणून नेते आनंदात अन कार्यकर्ते आंदोलनात ह्यावरून इतकंच स्पष्ट होतं जे आंदोलनात होते त्यांना ना स्वतःचा विचार होता ना स्वतःची प्रतिमा. कोणतीतरी सांगितलं म्हणून आलेल्यांनी ह्या असल्या फसव्या स्टंट बाजीला भुलून स्वतःचा वेळ वाया घालवू नका. कार्यकर्ता हा भविष्यातला  नेतृत्व करणारा व्यक्ती आहे तो मेहनती अन समाजाप्रती सेवा अन प्रेम देणारा असला पाहिजे. कार्यकर्ता हा समाज कंठक नसावा, कार्यकर्ता हा समाजसेवक असावा. 

 

सचिन कृष्णा तळे

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale