दोन माकडं आणि तिसऱ्याचा स्वार्थ
लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली होती दोन माकडं खीर वाटून घ्यायच्या भानगडीत भांडायला लागतात. कोणाला जास्त मिळालं, कोणाला कमी मिळालं यावरून ते रागावतात. आणि त्यांच्या भांडणात तिसरं माकड येतं, हसत-हसत ती सगळी खीर उचलून खातं आणि निघून जातं. जेव्हा दोन्ही माकडं थकून बसतात, तेव्हा त्यांना जाणवतं की खीरच संपली आहे, आणि आपलं नुकसान फक्त आपणच केलं आहे.
आजूबाजूला आपण नीट पाहिलं, तर ही गोष्ट केवळ गोष्ट नाही, तर सत्य आहे.
• एक माणूस दुसऱ्या माणसाशी भांडतो.
• एक भाषा दुसऱ्या भाषेशी भिडते.
• एक विचार दुसऱ्या विचाराशी टकरावतो.
• एक जात दुसऱ्या जातीशी संघर्ष करते.
• एक धर्म दुसऱ्या धर्माशी भिडतो.
• एक राज्य दुसऱ्या राज्याशी तुंबतो.
• एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी वैर धरतो.
• एक सरकार दुसऱ्या सरकारशी दोन हात करते.
• आणि अगदी एक देश दुसऱ्या देशाशी लढतो…
या सगळ्या भांडणांतून काय होतं?
आपण रक्त सांडतो. आपण एकमेकांचे वैरी होतो. आपले नाते, आपली एकता, आपला विश्वास तुटतो. आणि दरम्यान “तिसरा” मात्र गपचूप आपला स्वार्थ साधतो.
तो तिसरा कोण आहे?
कधी एखादा लोभी व्यापारी, कधी एखादा भ्रष्ट राजकारणी, कधी बाहेरचा शत्रू, कधी आपल्याच समाजातील संधीसाधू लोक.
आपण भांडण्यात गुंतलो असताना ते आपल्या श्रमांची, साधनांची आणि भावनांची खीर चाखून जातात.
आपण मात्र थकून, तुटून बसतो. आणि शेवटी जाणवतं की नुकसान फक्त आपलंच झालं.
म्हणूनच ..🙏🤝
आज थांबून विचार करायला हवा.
भांडणाच्या गदारोळात हरवून जायचं नाही.
भांडण थांबवायचं, समजून घ्यायचं, एकत्र उभं रहायचं.
नाहीतर प्रत्येक वेळी खीर कुणीतरी दुसराच लंपास करेल, आणि आपल्याकडे उरेल फक्त रिकामं भांड.
👉 अधिक लेखांसाठी भेट द्या : 👇🏻www.sachinktale.blogspot.com
✍️Sachin Jayshree Krishna Tale
आहे ते आहे
#sachintale
No comments:
Post a Comment