मूर्ती विटंबना: जबाबदारी कोणाची?
देशात असो वा राज्यात, दरवर्षी मूर्ती विटंबनेचे प्रकार कुठेना कुठे घडतच असतात. त्यानंतर समाजात पडसाद उमटतात, भावना पेटतात आणि काही वेळा दंगलसुद्धा घडवून आणली जाते. प्रत्येकवेळी आपण एकच गोष्ट पाहतो दोषारोपांची मालिका, राजकीय भाषणं आणि लोकांच्या भावनांचा उद्रेक. पण खरी गोष्ट अशी आहे की, जबाबदारी कोणाची हे आपण ठरवतो का?
माझं परखड मत असं आहे की ज्या व्यक्ती, संस्था किंवा सरकारने मूर्ती बसवली आहे, त्यांचीच तिच्या सुरक्षिततेची आणि देखभालीची पूर्ण जबाबदारी असली पाहिजे. फक्त मूर्ती उभारून फोटो काढणे, हार घालणे आणि नंतर तिला धुळ खात बसू देणे हे सर्रास दिसणारे वास्तव आहे.
आज अनेक पुतळे धुळीत माखलेले दिसतात. कुठे पुतळ्यावर पक्ष्यांची विष्ठा पडलेली असते, कुठे त्यावर माती, धूळ साचलेली असते. कुणाचं लक्ष जात नाही, आणि मग जेव्हा विटंबना घडते तेव्हा मात्र सगळ्यांना संताप येतो. प्रश्न असा आहे की दररोज तिची काळजी घेतली असती तर ही वेळ आली असती का?
उपाय काय?
1. सुरक्षितता: मूर्ती बसवताना तिच्या भोवती जाड काचेचं आवरण असावं. त्यामुळे थेट हात लावणं, रंग टाकणं किंवा नुकसान करणं अशक्य होईल.
2. नजरदारी: प्रत्येक महत्त्वाच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. त्यामुळे विटंबना करणाऱ्यांचा शोध घेणं सोपं जाईल.
3. देखभाल: मूर्ती बसवली म्हणजे फक्त लोकार्पण सोहळा नव्हे, तर तिच्या स्वच्छतेची जबाबदारीही घ्यावी लागेल. वेळोवेळी स्वच्छता, रंगरंगोटी, आणि देखभाल केली गेली पाहिजे.
4. जबाबदारी निश्चिती: कोणती मूर्ती सरकारी आहे, कोणती खाजगी आहे, कोणती राजकीय पक्षाने बसवली आहे हे स्पष्ट असायला हवं. विटंबना झाली की ती जबाबदारी सरळ त्या संबंधितांनी उचलली पाहिजे.
मूर्ती ही फक्त धातू, दगड किंवा सिमेंटची नसते; ती समाजाच्या भावना, इतिहास आणि संस्कृतीचं प्रतीक असते. पण त्या प्रतीकाची सतत काळजी घेतली नाही, तर ती फक्त राजकारणाचं साधन बनते. म्हणूनच आता वेळ आली आहे की आपण परखडपणे सांगावं मूर्ती बसवली म्हणजे तिची देखभाल, सुरक्षितता, स्वच्छता ही बसवणाऱ्यांची जबाबदारी आहे. तेच झालं तर विटंबना कमी होईल, आणि झाल्यास त्याचं मूळ कारण शोधणं सोपं होईल.
Sachin Jayshree Krishna Tale ✍️
आहे ते आहे
No comments:
Post a Comment