Tuesday, 30 September 2025

दसरा मेळावा : बाळासाहेबांच्या ज्वालामुखीचा इतिहास!

 दसरा मेळावा : बाळासाहेबांच्या ज्वालामुखीचा इतिहास! 🔥






दसरा म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोष्ट डोळ्यांसमोर उभी राहते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा!

शिवाजी पार्कवर उभा राहून बाळासाहेब बोलले की लाखोंच्या गर्दीत विजेचा पुरवटा पसरल्यासारखं वातावरण व्हायचं. त्यांची वाणी म्हणजे जणू गडगडणारा गड, त्यांच्या हातातील बोट म्हणजे जणू तलवारीची धार, आणि त्यांचं भाषण म्हणजे मराठी माणसाच्या हृदयात हिंदुत्वाचा गजर घडवणारा रणशिंग.

बाळासाहेबांचा दसरा मेळावा म्हणजे काय? फक्त एक सभा नव्हत तर मराठी अस्मितेचा जाहीरनामा होता. हिंदुत्वाच्या मशालीचा धगधगता झोत होता.महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात जिवंत झालेला अभिमान होता.

शिवाजी पार्कावरची गर्दी फक्त “लोकसभा” नव्हती, तर ती “शिवसभा” होती. हजारो लाखोंच्या गर्दीत उभं राहून बाळासाहेब म्हणायचे “मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यासाठी आहे, आणि तुमच्यामुळेच आहे!” ही वाक्यं ऐकली की मराठी तरुणाचं रक्त तापायचं, त्याच्या शिरांमध्ये धैर्य उसळायचं.

त्यांच्या भाषणात कोणत्याही स्क्रिप्टची गरज नसायची. ते डोळ्यांतून आग ओकत, शब्दांतून वज्राघात करत. त्यांनी कधीच कोणी कोणाचा अपमान केला नाही; पण त्यांनी नेहमी “मराठी माणूस” उभा केला, “हिंदुत्व” जगवलं. त्यांच्या प्रत्येक भाषणानंतर लाखो तरुण पुढच्या दिवसापासून रणांगणात उतरण्यास तयार व्हायचे.

आज परिस्थिती वेगळी आहे. आज दोन दसरा मेळावे भरतात. एक उद्धव ठाकरेंचा, दुसरा एकनाथ शिंदेंचा. दोन्हीकडं फक्त परस्परांची धुलाई, आरोप-प्रत्यारोपांचा बाजार, शिवराळीचा पाऊस. बाळासाहेबांच्या मेळाव्यात असलेली तोफेची गर्जना, सिंहाची दहाड, मशालीची ज्वाला या मेळाव्यांत कुठेही दिसत नाही.

बाळासाहेबांचा मेळावा का वेगळा होता ! कारण तो मराठी माणसासाठी होता. कारण तो हिंदुत्वाच्या लढ्यासाठी होता. कारण तो स्वाभिमानाच्या रणांगणासाठी होता. कारण तो एका व्यक्तीच्या खुर्चीसाठी नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी होता.

आजचे मेळावे पाहिले की दु:ख वाटतं. शिवसेना म्हणजे एक विचारधारा होती, एक आंदोलन होतं, एक ज्योत होती. पण आज तीच शिवसेना दोन तुकड्यांत विभागली. जिथे कधी “जय महाराष्ट्र” चा घोष ऐकू यायचा, तिथं आज “तो बरोबर की हा बरोबर?” अशी कुजबुज चालते.

पण खरी गोष्ट काय आहे? आजही मराठी माणसाच्या हृदयात फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा मेळावा धडधडतो. तो अजूनही आग आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. तो अजूनही सांगतो

“मराठी माणूस एकत्र या, हिंदुत्वासाठी उभे रहा, अन्यायाला विरोध करा!”

बाळासाहेबांचा दसरा मेळावा हा केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा उत्सव होता.

जिथे लाखो लोक जमून स्वतःला आठवण करून द्यायचे की आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीतले आहोत, आपण गड-किल्ल्याच्या मातीचे आहोत, आणि आपल्याला कुणीही डोळे दाखवू शकत नाही.

त्यांचा दसरा मेळावा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या श्वासात, रक्तात, आणि हृदयात पेटलेला आहे.

🚩 जय हिंद, जय महाराष्ट्र!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर राहो! 🚩

सचिन कृष्णा तळे ✍️🚩🙏

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale