१९ फेब्रुवारी – शिवजन्मोत्सवाचा जल्लोष आणि बलिदानाची वेदना.
१९ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रत्येक हिंदूच्या, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमानाने कोरलेला दिवस. हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन स्वराज्याचे शिल्पकार, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे युगपुरुष! गावागावात ढोल-ताशे, भगवे झेंडे, मिरवणुका, व्याख्याने, रक्तदान शिबिरे… सर्वत्र एकच जयघोष “जय भवानी, जय शिवाजी!”
पण या जल्लोषाच्या सावलीत एक वेदना देखील आहे. फेब्रुवारी महिन्यातच आपण स्मरण करतो ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या अमर बलिदानाचे. हा महिना केवळ उत्सवाचा नाही, तर त्याग, साहस आणि धर्मरक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या एका महान राजाच्या स्मरणाचा आहे.
स्वराज्याचा जन्म आणि त्याची किंमत
शिवजन्मोत्सव साजरा करताना आपण केवळ इतिहासातील एक घटना साजरी करत नाही, तर एका विचाराचा जन्म साजरा करतो अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा विचार, स्वाभिमानाचा विचार, धर्म आणि संस्कृती रक्षणाचा विचार.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची पायाभरणी केली, त्यासाठी असंख्य मावळ्यांनी रक्त सांडले. त्यांनी शिकवले की राज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे; राज्य म्हणजे प्रजेचे कल्याण, स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे रक्षण आणि न्यायनिष्ठ कारभार.
बलिदानाचा महिना – संभाजी राजांचा अमर इतिहास
ज्यांनी स्वराज्य उभं केलं, त्यांचे वारसदार म्हणून संभाजी महाराजांनी त्याची जबाबदारी सांभाळली. औरंगजेबाच्या अमानुष छळाला सामोरे जातानाही त्यांनी धर्मांतर नाकारलं. त्यांच्या डोळ्यांसमोर क्रूर अत्याचार झाले, पण त्यांनी हिंदू धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्य यासाठी प्राण दिले.
संभाजी महाराजांचे बलिदान हे केवळ एका राजाचा मृत्यू नव्हे, तर अन्यायाविरुद्ध झुकणार नाही, हा हिंदू स्वाभिमानाचा जाज्वल्य संदेश आहे. म्हणूनच फेब्रुवारी महिना हा आनंद आणि वेदना यांचा संगम ठरतो.
आज आपण शिवजयंतीला मोठ्या थाटामाटात साजरे करतो. स्टेज, डीजे, देखावे, सोशल मीडियावरील पोस्ट… पण आपण खरंच महाराजांचा एक तरी गुण आत्मसात करतो का?
• अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का?
• स्त्रियांचा सन्मान करतो का?
• भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम उभे राहतो का?
• समाजात एकोपा आणि धर्मनिष्ठा जपतो का?
जर हे नसेल, तर आपला उत्सव केवळ दिखावा ठरतो
१९ फेब्रुवारीला आपण आनंदाने शिवजन्मोत्सव साजरा करतो. त्याच महिन्यात आपण संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवतो. एकीकडे जन्माचा उत्सव, तर दुसरीकडे बलिदानाची वेदना.
ही दोन भावना आपल्याला एकच संदेश देतात .स्वराज्य केवळ मिळवायचं नसतं, ते टिकवायचं असतं. आणि ते टिकतं त्यागाने, निष्ठेने आणि स्वाभिमानाने.
शिवजयंती आणि बलिदान मास हे दोन वेगळे प्रसंग नाहीत, तर एका अखंड परंपरेचे दोन टप्पे आहेत. शिवरायांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला, संभाजी राजांनी तो आपल्या रक्ताने तेजस्वी ठेवला.
सचिन कृष्णा तळे ✍️
आहे ते आहे
No comments:
Post a Comment